भाजपने जंतर-मंतर वरील आंदोलनाचे डीकोडींग करण्यास सुरुवात केली?
भारतीय
जनता पक्षाचे सरकार गेल्या बारा वर्षापासून विना अडथळा सुरू होते. सरकारच्या
विरोधातील आवाजात फारशी धार नव्हती. विरोधी पक्ष असून नसल्यासारखा होता. विरोधी
पक्षांचा सरकारवर फारसा अंकुश नव्हता. सत्ताधारी आपल्या इच्छेनुसार राज्यकारभार
हाकत होते. किसान आंदोलनाचा अपवाद वगळता सरकारला माघार घेण्याचा प्रसंग
फारसा आला नाही. परंतु कॉकरोज जनता पार्टीने जंतर-मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनामुळे
पहिल्यांदा मोदी सरकार बॅकफूटवर आले. सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करून
विद्यार्थ्यांनी सरकार पुढे आव्हान उभे केले. भाजपने नेहमीच्या शैली प्रमाणे
आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. काही दिवसा नंतर आंदोलन प्रभावहीन बनेल हा अंदाज लावून
सुरुवातीला दुर्लक्ष केले. आंदोलनाला जसजसा पाठिंबा मिळू लागला तसं तसे देशातील
वातावरण बदलू लागले. आंदोलनाबद्दलचा अंदाज चुकल्यामुळे फारसा विचारविमर्श न करता
घाईगर्दीत हे आंदोलन दडपून
टाकण्यासाठी भाजपने पोलिसी बळाचा वापर केला. परंतु हा वापर भाजपच्या नेतृत्वावर
उलटला. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर सरकारने केलेला लाठी हल्ला आणि उपोषणात
सोनम वांगचुक ढासळू लागलेल्या तब्येतीमुळे देशात भावनिक वातावरण निर्माण झाले.
जंतर मंतरच्या दिशेने देशातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आणि स्वयंसेवी संघटनेचे
प्रतिनिधी सहभागी होऊ लागले.
आंदोलन हा लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग असला तरी जंतर-मंतर आंदोलनातील
असंतोष हा सरकार बदलण्याच्या दिशेने एक पाऊल असू शकतो या संभावनेने भाजप
नेतृत्वाने आंदोलनाचे डीकोडींग करण्यास सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या काळात
विद्यार्थ्यांच्या मागण्या पुरते मर्यादित असलेले आंदोलन सरकार विरोधी चळवळीला बळ
देणारे आहे हे भाजपच्या चाणाक्ष नेतृत्वाच्या लगेच लक्षात आले. आंदोलनाच्या
माध्यमातून भाजप सरकारवर होत असलेल्या हल्लाबोलातून होणारे संभाव्य राजकीय परिणाम
परिणाम लक्षात घेऊन भाजपने उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली दिसते. आंदोलना प्रति
असलेली सहानभूती लक्षात घेऊन भाजप सरकारने आंदोलनाला थेट विरोध न करता सामोपचाराची
भूमिका घेऊन आंदोलकांच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरूवातीला केला.
त्यामुळे सुरुवातीला आंदोलकांच्या वास्तविक मागण्या समजून घेऊन त्यांना योग्य
प्रकारे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. कारण
विरोधी पक्षाकडून आंदोलनाचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आंदोलनाच्या
निमित्ताने विरोधी पक्षांना आपले अपयश धुवून काढण्याचे संधी प्राप्त झाली होती. या
संधीचा लाभ घेऊन आपला राजकीय पाया भक्कम करण्याच्या दिशेने विरोधी पक्ष नेत्यांनी
आंदोलनाला पाठिंबा दिला. विरोधी पक्षाच्या आंदोलनातील सहभागाने आंदोलन आणखीच
भडकण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने सुरुवातीच्या टप्प्यात बचावात्मक भूमिका घेऊन
आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या.
आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन भाजपच्या नेतृत्वाने
प्रदीर्घकाळ विचारमंथन करून इच्छा नसताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा
राजीनामा घेतला. भाजपने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला मात्र हा दबावात
दिलेला नसून विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता, नैतिकता आणि उत्तरदायित्वाच्या भावनेने दिला असल्याचा लगेचच
दावा सुरू केला. एका राजीनाम्याने सरकार खचले नाही हे दर्शवण्यासाठी
राजीनामा दुसऱ्या दिवशी धर्मेंद्र प्रधान संसदेत आल्यानंतर पक्षाच्या वतीने जोरदार
घोषणाबाजी आणि स्वागत समारंभ पार पडला गेला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा
नंतर कॉकरोज जनता पार्टीचे पदाधिकारी आणि विरोधी पक्षांमध्ये श्रेयाची
लढाई सुरू झाली. कॉकरोज जनता पार्टीचे पदाधिकारी फार मोठी लढाई जिंकल्याच्या
अविर्भावात वावरू लागले. सरकारला हरवल्याच्या आनंदात आंदोलन विद्यार्थी घरी
परतल्यानंतर भाजपने आपले डाव टाकण्यास सुरुवात केली.
सर्वप्रथम आंदोलनाबद्दल असलेली सहानभूती कमी करण्यासाठी
आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली. नीटच्या पेपर फुटीवरून प्रामुख्याने हे
आंदोलन झालेले असल्याने तात्कालीक कारवाई म्हणून भविष्यात पेपर फूट होऊ नये म्हणून
संसदेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) कायदा 2024 कायद्यात सुधारणा करून
दहा वर्षापर्यंतच्या कारावास आणि दहा कोटी रुपयांच्या दंडाची कठोर तरतूद केली.
परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नंदन निलकेणी यांच्या अध्यक्षतेखाली कृती गट
स्थापन केला. या दोन्ही कृतींच्या माध्यमातून सरकार पेपर फुटी संदर्भात गंभीर असून
आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत असा संदेश दिला. जंतर मंतर वरील आंदोलनात मोठ्या
प्रमाणावर तरुण सहभागी झाले होते. तरुण पारंपरिक मीडियापेक्षा सोशल मीडिया सारख्या
साधनांचा जास्त वापर करतात हे लक्षात घेऊन तरुणांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केले. एका बाजूला तरुणांची
सहानभूती प्राप्त करण्याचा पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला तर दुसऱ्या
बाजूला आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि कॉकरोज जनता पार्टीच्या
पदाधिकाऱ्यांना घेरण्यासाठी दुय्यम नेत्यांना पुढे केले. भाजपच्या खासदार कंगना
राणावत यांनी आंदोलनात सहभागी मुलीच्या संदर्भात केलेली विधाने याच कृतीचा एक भाग
होते. भाजपच्या आयटी सेलने आणि विविध पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या
माध्यमातून आंदोलनात सहभागी बहुसंख्य तरुण
हे विद्यार्थी नव्हते हे दर्शवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांच्या कपड्यापासून ते
पंतप्रधान विरोधातील विधानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरुवात केली.
आंदोलनाला मिळालेल्या फंडिंग वर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. आंदोलनाच्या
ठिकाणी आंदोलन खात असलेले अन्न आणि करत असलेल्या कृती यांचे देखील व्हिडिओ व्हायरल
करून आंदोलनाची हवा कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. आंदोलनात सहभागी
विद्यार्थ्यांवरील गुन्हे माफ करण्याचे सरकारने वचन दिले. परंतु त्याची अंमलबजावणी
सरसकट केली नाही. आंदोलनात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा गुन्हा नोंद
असलेल्या विविध कार्यकर्त्यांना धरपकड करून गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केली.
आंदोलनाला डीकोड करण्यासाठी भाजपला माहिती होते की इतके
प्रयत्न पुरेसे नाहीत या पेक्षा व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे लक्षात आले. कॉकरोज जनता पार्टीचे
जंतर-मंतर बिन चेहऱ्याचे आणि बिना आयडेंटिटीचे आंदोलन भाजपसाठी धोकेदायक ठरण्याची
शक्यता होती. कारण भाजपचे राजकारण हिंदुत्व आयडिओलॉजी आणि मोदींच्या प्रतिमेवर उभे
होते नेमक्या जंतर-मंतर वरील आंदोलनाने दोन्ही गोष्टींवर आघात केल्यामुळे भाजपचे
नेतृत्व आतून हादरले होते. आंदोलनाला मिळत असलेल्या पाठिंब्याचा लाभ उठवून विरोधी
पक्ष संसदेत वरचढ बनत चालला होता. निवडणुकीच्या राजकारणात भाजपला हरवू न शकणारा
विरोधी पक्ष आंदोलनामुळे अचानक शक्तिशाली बनला. सरकारवर राहुल गांधी आणि काँग्रेस
अत्यंत त्वेषाने हल्ला करू लागले. आंदोलनातून निर्माण झालेली सहानुभूती आपल्या
बाजूने वळवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाने प्रयत्न केले. या सर्व घडामोडींमुळे
भाजपचे नेते अस्वस्थ बनले.
या अस्वस्थतेतून सुटका करून आपल्या पक्षाची प्रतिमा परत उजळ
करण्यासाठी आवश्यक राजकीय ध्रुवीकरण साध्य करण्यासाठी सरकारने आंदोलनाची काळी बाजू
पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपने आपल्या नेहमीच्या रणनीतीनुसार
आंदोलनात देश विघातक डाव्या संघटनेचा
सहभाग होता. आंदोलन हे देश विरोधी कटाचा भाग होता. आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर
राष्ट्रविरोधी पक्ष आणि विदेशी शक्तींचा पाठिंबा होता हे सिद्ध करण्यासाठी आटापिटा
सुरू केला. एका बाजूला आंदोलनाची बदनामी सुरू केली आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनात
चुकून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी पंतप्रधानांनी
आपल्या प्रतिमेचा वापर केला. विद्यार्थ्यांबद्दल आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा
राग नाही हे दर्शवण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींना शिव्या
देणाऱ्या आंदोलनातील सहभागी तरुणीला मनापासून माफ केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला.
तसेच आंदोलनात झालेला लाठी हल्ला हा कसा कायदेशीर होता हे सिद्ध करण्याची धडपड
सुरू केली. लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कुटुंबीयांच्या पत्रकार परिषदा
आयोजित केल्या. आंदोलकांनी केलेल्या हुल्लडबाजीला रोखण्यासाठी लाठी हल्ला केला.
पोलिसांनी लाठी हल्ला केला नसता तर अनेक पोलीस जखमी झाले असते. त्यामुळे
नाईलाजास्तव लाठी हल्ला करावा लागला हे चित्र उभे करण्यास सरकारने सुरुवात केली.
तरुणांच्या वाढत्या रोषामुळे सरकारला दबावाखाली मागे हटावे
लागले असले तरी मोदी सरकार इतक्या सहजासहजी माघार घेणारे नाही. आंदोलन काळात
सरकारने घेतलेला बचावात्मक पवित्रा हा कायम राहणार नाही हे आंदोलन संपल्या बरोबर
लगेच लक्षात येऊ लागले. आंदोलन समाप्त झाल्याबरोबर सरकार मधले नेते आणि सरकारी
यंत्रणा सजग झाल्या. आंदोलकांना कोंडीत पकडण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब सरकारने
सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षातले वरिष्ठ नेते जाणीवपूर्वक
वादग्रस्त विधाने न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपल्याकडे वळवण्याच्या
दिशेने काम करू लागले. जंतर मंतर मधील आंदोलन व्यापक करण्यात सोशल मीडियाचा फार
मोठा वाटा राहिला. सोशल मीडियावरील आपली उपस्थिती वाढवण्यासाठी स्वतः
पंतप्रधानांनी इंस्टाग्राम वर तीन व्हिडिओ पोस्ट केले. सरकारची भूमिका लोकांपर्यंत
पोहोचवण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी सोशल मीडियावर अधिक सक्रियता दाखवावी असा
आदेश देण्यात आला. पक्षातील दुय्यम नेते
आणि सहयोगी संघटनांनी आंदोलनातील सहभागी घटकांचा अभ्यास करून हल्ले चढवण्यास
सुरुवात केली. आंदोलकांची जास्तीत जास्त कोंडी करून
पक्षाची प्रतिमा उजळ करण्याच्या दिशेने भाजप नेतृत्वाने जंतर-मंतर वरील आंदोलनाची
डीकोडींग करण्यास सुरुवात केलेली दिसून येते.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.