हिंदुत्ववादी संघटनांची कार्यपद्धती: एक विश्लेषणात्मक अभ्यास
हिंदुत्ववाद विचारधारेला वैचारिक पाया स्वातंत्र्यवीर
सावरकर यांनी उपलब्ध करून दिला. 'पितृभूमी' आणि 'पुण्यभू' या संकल्पनाच्या
माध्यमातून हिंदू ही केवळ धार्मिक अस्मिता किंवा ओळख नसून सांस्कृतिक व राष्ट्रीय
ओळख आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. डॉ.केशव बळीराम हेगडेवार यांनी राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाची स्थापना करून हिंदुत्ववाद विचारसरणीला संस्थात्मक आणि संघटनात्मक
स्वरूप उपलब्ध करून दिले. संघाचे दुसरे संघ सरसंचालक एम. एस. गोलवलकर यांनी 1939 मध्ये लिहिलेल्या 'We or Our Nationhood Defined'
ग्रंथातून हिंदुत्ववादी प्रचाराची वैचारिक पायाभरणी करण्यात
आली. त्यांनी हिंदू राष्ट्राची व्याख्या करताना भारताची राष्ट्रीयता म्हणजे
हिंदुराष्ट्र होय. त्यांनी हिंदूंना राष्ट्र म्हणून परिभाषित केले आणि गैरहिंदूंना
परके मानले. अल्पसंख्यांक विशेषता मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांना हिंदू
संस्कृतीशी जुळून घेऊन दुय्यम दर्जाच्या नागरिकत्वाच्या स्वरूपात भारतात वास्तव्य
करता येईल. सुरुवातीच्या काळात हिंदुत्ववादी संघटना मुख्यता मौखिक, छापील साहित्य आणि संघाच्या शाखेत बौद्धिक घेऊन हिंदू
राष्ट्र निर्मिती संदर्भात प्रचार केला जात असे.
हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यपद्धतीत
प्रामुख्याने राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात फार मोठा बदल झालेला दिसून येतो.
हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्याच्या राम मंदिराला हिंदू अस्मितेचे प्रतीक बनवले.
सर्वसामान्य हिंदूंच्या मनात असलेल्या रामाच्या प्रतिमेचे मोठ्या प्रमाणावर राजकीयकीकरण
करून हिंदू समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्ववादी संघटनांनी
त्यासाठी मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्मातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतीके आणि
प्रतिमा यांचा वापर सुरू केला. राजकीय आणि आर्थिक राष्ट्रवादाच्या जागेवर
सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आधारे हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न केला. विविध
गट आणि छावणींमध्ये विखुरलेल्या हिंदू समाजाला राजकीय आणि सांस्कृतिक शक्तीच्या
स्वरूपात पुढे आणण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी 'ऑर्गनायझेशनल डिफ्युजन'तंत्राचा वापर केला. या तंत्रानुसार एका मध्यवर्ती संघटनेच्या
नेतृत्वाखाली (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) अनेक फ्रंटल संस्था स्थापना करण्यात आल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःला सांस्कृतीक संघटना मानते. विश्व हिंदू परिषद , धार्मिक, बजरंग दल युवकांची, भारतीय जनता पक्ष राजकीय आणि याशिवाय समाजातील महिला, शिक्षण, सेवा
इत्यादी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत. ऑर्गनायझेशनल डिफ्युजन रचनेत
प्रचारक किंवा पूर्ण वेळ कार्यकर्ते केंद्रस्थानी असतात. ते संघाच्या विविध
शाखांमधून प्रशिक्षण घेऊन विविध फ्रंटल संघटनांमध्ये कार्य करून वैचारिक एकसूत्रता
टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विविध फ्रंटल
संघटनांमध्ये समाजातील विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देऊन हिंदूंमधील सर्व
सामाजिक गटांपर्यंत संदेश पोचवण्याचा प्रयत्न करतात.
भारतीय राजकारणात सद्य
काळात हिंदू राष्ट्रवाद प्रभावी राजकीय शक्ती
म्हणून उदयाला आलेला आहे. हिंदुत्ववादी विचारांचे 2014 पासून सातत्याने केंद्रात
आणि अनेक राज्यांमध्ये सरकारे आल्यामुळे अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमकपणे
हिंदुत्ववादी संघटनांनी वाटचाल सुरू केलेली आहे. क्रिस्टोफ जाफ्रेलोट
यांच्या मते, "भारतातील
राजकीय भगवीकरणाची पातळी असे सूचित करते की भारत हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करत
आहे." हिंदुत्ववादाची महत्त्वाकांक्षा मतपेटीच्या पलीकडे म्हणजे भारताच्या
सार्वजनिक जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने विस्तारित जाणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना
परिवाराचे नेतृत्व करत आहे. भारतातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांची वैचारिक
पायामुळे संघाच्या विचाराशी मिळतीजुळती आहेत. संघ परिवाराचे अनेक गट गेल्या दशकात
प्रचंड विकसित होत आहे. सरकारी पाठिंब्यामुळे पूर्वी फारशा महत्त्व नसलेल्या
संस्थांना आता प्रशासन व्यवस्थेत आणि समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
शैक्षणिक धोरणे ठरवण्यापासून ते न्यायपालिकेतील नेमणुकांवर प्रभाव टाकण्यापर्यंत
त्यांचे महत्त्व वाढलेले आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे जाळे संघाच्या प्रत्यक्ष
किंवा अप्रत्यक्षरित्या पारंपारिकरित्या जोडलेल्या संघटनात्मक जाळ्याच्या पलीकडे
जाऊन पसरत चाललेले आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्य संस्थात्मक, संकल्पनात्मक आणि वैचारिक क्षेत्रांमध्ये देखील पसरत
चाललेले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते हिंदूंना राजकीय दृष्ट्या
अधिक अधिक सक्रिय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांची कार्यपद्धती ही प्रामुख्याने सांस्कृतिक राष्ट्रवाद, हिंदू अस्मिता व ध्रुवीकरण, सामाजिक एकत्रीकरण, डिजिटल माध्यमांचा प्रभावीपणे वापर या चार खांबावर उभा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही प्रचार रणनीती
आखणीतील प्रमुख वैचारिक कणा आहे. भाजप आणि तिच्याशी संलग्न असलेल्या संघटना संघाची
वैचारिक भूमिका सर्वसामान्य हिंदू पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात. हिंदुत्ववादी
संघटना हिंदू आणि हिंदुत्व यांच्यात फारकत करतात. हिंदुत्व हा धर्म नसून जीवन पद्धती मानतात. भारत
हा सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्रवादाच्या मार्गातील
'स्युडो सेक्युरॅलिझम' हा प्रमुख अडथळा मानतात. हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्व
संकल्पनेचा बहुपर्यायी पद्धतीने वापर करतात. हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोकांमधील
तणाव आणि संघर्षाचा वापर करून धार्मिक ध्रुवीकरण घडून आणण्याचा प्रयत्न करतात.
त्यासाठी 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है', 'गर्व से कहो हम हिंदू है' इत्यादी घोषणांच्या माध्यमातून
हिंदूंचे राजकीयकीकरण करून आपला वैचारिक पाया विस्तारण्याचे कार्य करतात. हिंदुत्वासाठी
कार्य करणाऱ्या विविध सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था संघटना आणि
व्यक्तींची जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. सनातन संस्था, भिडे गुरुजी, कीर्तनकार, अध्यात्मिक
प्रवचन देणारे संत व मंहत इत्यादींशी सातत्याने संवाद प्रस्थापित केला जातो. या
व्यक्ती किंवा संघटना हिंदुत्ववादासाठी आवश्यक पोषक पार्श्वभूमी तयार करण्याचे काम
करत असतात. कारण
यातील अनेकांनी उघड उघड हिंदुत्ववादी
पक्षाला मतदान करा असे आव्हान देखील केलेले दिसून येते.
हिंदुत्ववादी
संघटना हिंदू धर्मातील विविधतेकडे दुर्लक्ष करून सर्व हिंदूंना एकाच समान ओळखी
खाली एकत्रआणण्याचा
प्रयत्न करतात. 'हिंदू खतरे में है' हा भाव प्रदर्शित करण्यासाठी मुस्लिम
आणि ख्रिश्चन परकीय असून त्यांची आपल्या भूमीवर निष्ठा नाही हे सूत्र प्रचारात
वारंवार वापरतात. हिंदुत्ववादी
संघटनेचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्यांक
मुस्लिम विरोधी राहिलेला आहे.अल्पसंख्याकांकडून
असलेला धोका ठळकपणे समाजात पुढे आणण्यासाठी लव जिहाद, घुसखोरी, जनसंख्येतील
बदल सारखे नॅरेटिव्ह सेट केले जातात. हे नरेटीव समाज घटकांमध्ये योग्य पद्धतीने
रुजवण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे. गतकाळात झालेला संघर्ष हा
आक्रमकांविरुद्धचा लढा होता. आक्रमकांनी या देशाचा आत्मा नष्ट केला. हिंदूंचे लचके
तोडले असा आक्रमकपणे प्रचार केला जातो. हिंदूंची अस्मिता जागृत करण्यासाठी भगवा
ध्वज,
योग, गोहत्या
बंदी,
हर हर महादेव सारख्या घोषणांचा वापर केला जातो.
हिंदुत्ववादाला भक्कम वैचारिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप इत्यादींसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा
वापर केला जातो. त्यांनी केलेला संघर्ष हा हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी केलेला
प्रयत्न होता हे सिद्ध करण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण करतात. भूतकाळातील
अस्मितांचा देखील प्रचारात अत्यंत खुबीने वापरला केला जातो. मुस्लिम आणि
ख्रिश्चनांच्या आगमनापूर्वी भारतात स्वर्णयुग अस्तित्वात होते. भारत सर्व
क्षेत्रात प्रगत होता. परंतु परकीय आक्रमणामुळे आपली अधोगती झाली. भूतकाळातील
गतवैभव प्राप्त करून आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी विश्वगुरु
सारख्या कल्पना समाजामध्ये प्रस्तुत केल्या जातात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना दररोज चालणाऱ्या
आपल्या शाखांच्या माध्यमातून वैचारिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची
मजबूत नेटवर्क तयार करतात. आपल्या नेटवर्कला भक्कम जन पाठिंबा मिळवण्यासाठी गृह
संपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न
करतात. हिंदूंची सामाजिक एकत्रीकरण साध्य करण्यासाठी हिंदू एकता संमेलने आयोजित
केली जातात. आधुनिक काळात हिंदुत्ववादी संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली
विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, स्वयंसेवक आणि पगारी लोकांचा वापर करतात. 'आय ॲम अ ट्रोल:
इन साईड द सीक्रेट वर्ल्ड ऑफ द भाजप आर्मी' या स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलेल्या
पुस्तकात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून केल्या जाणाऱ्या राजकीय ट्रोलिंगच्या
पडद्यामागील सत्यसमोर आणलेले आहे. हिंदुत्व विरोधी पत्रकार, राजकारणी आणि प्रतिष्ठित लोकांना लक्ष करून ट्रोल करणे, त्यांच्याबद्दल बदनामीकारक भाषा, ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करणे जेणेकरून त्यांच्या आवाज बंद
केला जाईल. हिंदुत्ववादी संघटना अत्यंत आक्रमकपणे मुद्दे मांडतात. हिंदूंचे
अस्तित्व धोक्यात आहे हा भयगंड लोकांमध्ये निर्माण करून एकत्रीकरण साधण्याचा
प्रयत्न करतात. 'एक है तो
सेफ है'सारखे नारे याच भावनेने दिले जातात. 'लव्ह जिहाद', 'लँड जिहाद', 'व्होट जिहाद' सारख्या मुद्द्यां बाबत आक्रमक भूमिका मांडून
धार्मिक ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या विचारधारेला सत्य म्हणून सादर
करण्यासाठी 'काश्मीर फाइल्स', 'द
केरला स्टोरी', 'बंगाल
फाइल्स' सारखे चित्रपट तयार केले जातात. या चित्रपटांचे जाहीर कौतुक करून हिंदूंची खरी बाजू
पहिल्यांदा मांडल्याचे नमूद करून अधिक अधिक लोकांनी चित्रपट पाहा म्हणून उत्तेजित
करण्याचा प्रयत्न करतात.
. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यपद्धतीचा
पॅटर्न हा बहुस्तरीय स्वरूपाचा आहे. शाखांमध्ये सुरू असलेल्या बौद्धिकापासून ते
जागतिक पातळीवर विश्वगुरू सारख्या हिंदू एकतेवर आधारित संकल्पनात्मक पातळीवर
पर्यंतच आहे. हिंदुत्ववादी संघटना प्रचाराच्या मानसशास्त्राचा (psychology
of propaganda) चा वापर करतात.
जनमानसाच्या भावना मते आणि वर्तन बदलण्यासाठी तार्किक तथ्यांचा वापर करण्या ऐवजी
भीती आणि राष्ट्रप्रेम सारख्या भावनांना आव्हान करून आम्ही विरुद्ध ते असा
दृष्टिकोन निर्माण केला जातो. समूहाला एकत्रित करण्यासाठी एका काल्पनिक शत्रूची
निर्मिती केली जाते. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व
हे हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रचाराचे 2014 पासून प्रमुख
सूत्र बनले आहे. भारतातील हिंदुत्ववादी नेतेच खरे राष्ट्रवादी आहेत. त्यांना
राष्ट्रहिताची कळकळ आहे; तळमळ आहे. विरोधकांचा उल्लेख ते 'तुकडे तुकडे की गॅंग', 'शहरी नक्षलवादी',
'दहशतवादाचे समर्थक' अशी उपहासाने करतात. भारताचे माजी पंतप्रधान
व्ही. पी. सिंग यांनी संघ आणि हिंदुत्ववादी संघटनेचे निरीक्षण करताना पुढील मत
व्यक्त केलेले आहे. "संघ परिवार आणि हिंदुत्व काय आहे हे समजून घ्यायचे असेल
तर नेतेमंडळी ऐवजी सर्वसामान्य प्रचारक करतात याकडे लक्ष असू द्या. संघ परिवारातले
नेते मंडळी विरोधकांच्या आक्षेपाना उत्तर देत असतात; या उलट सर्वसामान्य प्रचारक त्यांच्या अंगी जे रुजवलेले असते,
त्याचप्रमाणे ते कृती करत असतात. विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर
देण्याच्या भानगडीत पडत नाही." हिंदुत्ववादी विचारसरणीची वाढती पकड या विषयाचा अभ्यास करणारे लेखक धीरेंद्र
झा यांनी लिहिलेल्या 'Shadow army fringe
organizations and foot soldiers of Hindutv' या पुस्तकात लिहितात की, "देशात गेल्या तीन
दशकात हिंदुत्वाचे राजकारण आश्चर्यकारकरीत्या प्रबळ झालेले आहे. हिंदुत्व ब्रँड
राजकारणाचे अनेक पैलू आहेत. केवळ संघ नाही तर त्यांच्या छायेत काम करणाऱ्या अनेक संघटना
मुख्य भूमिकेत आलेले आहेत." हिंदू हिताबद्दल बोलणाऱ्या अनेक गटांचा संघाशी
संबंध नसला तरी त्यांचे विचारसरणी आणि अजेंडा संघाच्या विचारांशी मिळता जुळता आहे.
हिंदुत्वाची पताका मिरवणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांच्याशी संबंधित
व्यक्तींच्या कृतीचा अभ्यास केला तर असे दिसते की ते विचारधारेच्या प्रत्यक्ष
अंमलबजावणीसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. हिंदुत्ववादी संघटना नियमित
कार्यक्रम, वादग्रस्त विधाने, धार्मिक
ध्रुवीकरण यांच्या माध्यमातून सातत्याने सर्वसामान्य हिंदू मध्ये स्वतःचे अस्तित्व
टिकून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.