https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

'यू' आसन व्यवस्थेचा अध्यापन व अध्ययन प्रक्रियेवरील परिणाम आणि धोके


 'यू' आसन व्यवस्थेचा अध्यापन व अध्ययन प्रक्रियेवरील परिणाम आणि धोके

शिक्षण ही माहिती प्रवाहित करणारी प्रक्रिया नसून एक सर्जनशील आणि परस्पर संवादी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेवर शिक्षकाची भूमिका, शैक्षणिक साधने, बैठक व्यवस्था इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो.



'यू' आकार बैठक व्यवस्था म्हणजे काय?- 'यू' आकार बैठक व्यवस्था म्हणजे वर्गातील विद्यार्थी आणि बाके वा खुर्च्या इंग्रजी U अद्याक्षराप्रमाणे लावल्या जातात. या पद्धतीत वर्गाच्या मध्यभागी मोकळी जागा असते. शिक्षक U च्या खुल्या टोकाकडे किंवा मध्यभागी उभा राहून संवाद साधत असतात. शिक्षक वर्गाच्या मध्यभागी मोकळ्या जागेत आरामदायक पद्धतीने फिरून सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो. सर्व विद्यार्थ्यांवर प्रभावीपणे नियंत्रण देखील ठेवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सहज पोचून त्यांच्या वैयक्तिक शंका निरसन करू शकतो. त्यामुळे ही पद्धत शिक्षकाच्या सुलभ हालचालीच्या दृष्टीने योग्य मानली जाते.

      शिक्षण प्रक्रिया ही माहितीची देवाण-घेवाण करणारी प्रक्रिया नसून द्विमार्गी संवाद प्रक्रिया आहे. त्यामुळे वर्गातील भौतिक वातावरण आणि विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था यांचा विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असतो. पारंपारिक बैठक व्यवस्थेत काही विद्यार्थी शिक्षकां जवळच्या बाकावर आणि काही विद्यार्थी शिक्षकांपासून लांब असलेल्या बाकांवर बसलेला असतो. वर्गातील ही असमान आसन व्यवस्था विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करत असते. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेत नाही म्हणून या आसन रचनेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी यू आकाराच्या बैठक व्यवस्था अंमलात आणण्याचा आग्रह धरला जातो. यू आकार बैठक व्यवस्था ही आधुनिक शिक्षण पद्धतीतील अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय रचना आहे. पारंपारिक ओळींमधील बैठक व्यवस्थेला छेद देते. विद्यार्थी आणि शिक्षक यातील संवाद अधिक सुलभ करते.

      2024 मध्ये रिलीज झालेल्या 'स्थानार्थी श्रीकुट्टम' या मल्याळम चित्रपटापासून प्रेरणा घेऊन केरळ राज्याची परिवहन मंत्री के. बी. गणेश कुमार यांनी सर्वप्रथम 'यू' आसन व्यवस्था 'रामविलासम व्हीएचएसएस' शाळेत राबवली. या शाळेत मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादातून ही योजना केरळ मधील आठ शाळा आणि पंजाब मधील एक शाळेने ही पद्धत स्वीकारली. केरळ आणि कर्नाटक राज्याने वर्गातील 'यू' आसन व्यवस्था लागू करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. केरळ मधील शाळांनी स्वीकारलेल्या वर्ग खोल्यातील यू आकाराच्या बैठक व्यवस्थेमुळे शिक्षण क्षेत्रातील झालेल्या बदलाचे अनेकांनी स्वागत केलेले आहे. या क्रांतिकारी नवीन बैठक व्यवस्थेमुळे आता भारतीय शिक्षण व्यवस्थेतील 'बॅकबेंचर्स ही संकल्पना मोडत निघेल अशी आशा व्यक्त केली. या नवीन पद्धतीमुळे वर्ग खोल्यांचे रूपांतर चर्चा मंचामध्ये होईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे शिक्षकांना समान लक्ष देण्याची संधी मिळेल.

'यू' आसन व्यवस्था स्वीकारण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अध्ययन आणि अध्यापन ही एक कृतिशील, संवादात्मक आणि बहु आयामी स्वरूपाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त मानली जाते. अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. परंतु पारंपारिक वर्ग बैठक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग घडवून आणणे जवळपास अशक्य असल्यामुळे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी बनवण्यासाठी अर्धवर्तुळकार म्हणजे 'यू' आकाराची बैठक व्यवस्था योग्य मानले जाते. वर्गातील 'यू' आकाराच्या बैठक व्यवस्थेमुळे वर्ग चर्चा, सादरीकरण आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष राखण्यासाठी  उपयुक्त मानले जाते. पारंपारिक बैठक व्यवस्थेमध्ये शिक्षकांच्या समोर असलेल्या विद्यार्थ्यांची योग्य पद्धतीने संवाद होतो. मात्र मागच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवाद होत नसल्यामुळे शिक्षण पद्धतीत 'बॅकबेंचर्स' ही संकल्पना उदयाला आलेली आहे. बॅकबेंचर्स म्हणजे वर्गातील फारसे सक्रिय नसलेले आणि फक्त श्रोते असलेल्या विद्यार्थ्यांचा निर्देश करण्याच्या मानसिकतेतून उदयाला आलेली आहे. बॅकबेंचर्स ही भावना एकंदरीत विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने मारक आहे. शिक्षण प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या गळतीमध्ये देखील बॅकबेंचर्सचा फार मोठा वाटा आहे. या बॅकबेंचर्स विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेतील मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी पारंपारिक बैठक व्यवस्थेत बदल करण्याची नितांत गरज आहे. पारंपरिक बैठक व्यवस्थेत बॅकबेंचर्स विद्यार्थी अनेकदा दुर्लक्षित असतात. मात्र या पद्धतीमुळे 'मागचा बेंच' ही संकल्पना नष्ट होत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सहभागाला संधी प्राप्त होत असल्याने विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या डोळ्यांशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने ही पद्धत उपयुक्त असल्याने शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊ शकतो. विद्यार्थी देखील शिक्षकांसोबत इतर विद्यार्थ्यांना पाहू शकतात त्यामुळे वर्गात एक प्रकारचा जिवंतपणा येतो. गटचर्चा आणि वादविवादासाठी ही बैठक व्यवस्था उत्तम मानली जाते. या व्यवस्थेत विद्यार्थी एकमेकांची चेहरे पाहू शकतात त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण अधिक नैसर्गिकपणे होते.



'यू' आकाराची बैठक व्यवस्था पारंपारिक फळ्याकडे तोंड करून बसण्यापेक्षा वेगळी असली तरी सीबीएसईसीने अद्याप मान्यता दिलेली नाही. आवश्यक भौतिक संसाधनाचा अभाव, निधीची कमतरता, अपुऱ्या वर्ग खोल्या, शिक्षकांची कमी संख्या इत्यादी सारख्या समस्यांशी झुंजणाऱ्या सरकारी शाळांसाठी यू आकाराची बैठक व्यवस्था स्वीकारणे आव्हानात्मक ठरू शकते. यू आकाराची बैठक व्यवस्था करण्यासाठी मोठ्या वर्गांची आवश्यकता असते. लहान वर्गांसाठी ही रचना उपयुक्त नाही. मर्यादित विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गांपुरतीच वापरली जाऊ शकते.  काही अभ्यासकांना ही संकल्पना आदर्शवादी स्वरूपाची वाटते. बैठक व्यवस्थेतील क्रांतिकारी बदलामुळे होणाऱ्या दीर्घकालीन शारीरिक, कार्यात्मक आणि मानसिक पैलूंचा अजूनही सखोल अभ्यास झालेला नाही. यू आकाराच्या वर्गातील आसन व्यवस्थेमुळे 360 अंश दृश्यमानतेचे नवीन मॉडेल विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपलब्ध झाले आहे. या बैठक व्यवस्थेत विद्यार्थी एकमेकांसमोर बसतात. शिक्षक मध्यभागी किंवा सर्वांवर नजर ठेवून शैक्षणिक कार्य करू शकतात. सैद्धांतिक दृष्ट्या या पद्धतीत प्रत्येक मुलाला समान प्रमाणात दृश्यमानता आणि संवाद साधण्याची संधी प्राप्त होते. मात्र 'यू' आकाराच्या टोकाच्या वक्रावर बसलेल्या विद्यार्थ्याला वर्गातील फळा किंवा डिजिटल स्क्रीन पाहण्यासाठी सतत आपली मान किंवा धड वळवावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना फळ्याकडे पाहताना, नोट्स लिहून घेताना आपली मान आणि धड अस्वाभाविकपणे वळवावी लागते. "दीर्घकाळ मान वाकून ठेवल्याने मानेवरचे ताण, स्नायूंची आकुंचन होऊन स्लिप डिस्क किंवा मणक्याच्या आजाराला निमंत्रण मिळू शकते" असे मत अपोलो रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.सुशांत रेड्डी यांनी व्यक्त केलेले आहे. यू आकाराची रचना दीर्घकाळ एकाच जागी बसण्यास प्रोत्साहन देते. त्यामुळे ही रचना बसण्याच्या स्थितीत होणाऱ्या गतिमान बदलाला मर्यादित करत असल्याने व्यवस्थित रक्ताभिसरणासाठी अयोग्य मानली जाते. या प्रकारच्या आसन मांडणीचा मुख्य उद्देश अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेतील विद्यार्थ्यांचा एकाकीपणा कमी करून सहभाग वाढवणे हा जरी असला तरी विशेषता अंतर्मुख असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्यावर कोणीतरी नजर ठेवत आहे ही भावना निर्माण होऊ शकतात. बाल मानसशास्त्रज्ञ आणि शालेय संशोधक डॉक्टर उर्मिला रेड्डी यांच्या मते, "सर्वच विद्यार्थीसाठी 'यू' आकाराच्या बैठक व्यवस्था उपयुक्त ठरू शकत नाही. या व्यवस्थेमुळे अंतर्मुख असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण होऊन एकाग्रता कमी होण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक सुरक्षिततेसाठी ही पद्धत फारशी उपयुक्त ठरलेली नाही." यू आकाराच्या आसन व्यवस्थेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांमध्ये देखील ताण निर्माण होतो. त्यांना अध्ययन-अध्यापन करण्यासाठी जास्त अंतर चालावे लागते. विद्यार्थ्यांवर नजर फिरवून ठेवण्यासाठी सतत फिरावे लागत असते. विरुद्ध बाजूला बसलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावे लागते. कारण शिक्षकांच्या मागे बसलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष न ठेवल्यास ते गैरवर्तन करू शकतात. त्यामुळे वर्गात गोंधळ उडू शकतो आणि वर्गावरील नियंत्रण कमी होऊ शकते.  

'यू' आकाराच्या आसन व्यवस्थेत काही प्रमाणात मर्यादा असल्या तरी ही क्रांतीकारी पद्धत अंमलात न आणता सोडून देणे योग्य नाही. शाळा आणि शिक्षकांनी अत्यंत शास्त्रीय आणि सुरक्षितपणे ही बैठक व्यवस्था लागू करण्यासाठी दर आठवड्याला विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या जागेत बदल करावा जेणेकरून कोणताही विद्यार्थी जास्त वेळ कडेला बसणार नाही. त्यामुळे शारीरिक ताण समान रीतीने विभागला जाईल. पारंपारिक फळ्याचा वापर करण्याऐवजी विविध कोनात बसवलेले किंवा छतावर लावलेल्या प्रोजेक्टरचा वापर करता येईल. दोन किंवा अधिक बोर्ड वर्गात लावल्यास मुलांना पाहण्यासाठी जास्त अंशात वळण्याची गरज राहणार नाही.सर्वांना सारख्या प्रमाणात दृश्यमानता उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांना वर्गात टॅबलेटचा वापर करता येईल. विद्यार्थ्यांना शारीरिक दृष्ट्या आराम प्राप्त करून देण्यासाठी कमरेला आधार देणाऱ्या समायोजित बाकाचा वापर करता येईल. यू आकाराच्या आसन व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालींवर येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शरीराची स्थिती बदलण्यासाठी हालचालींवर आधारित शिक्षण किंवा उभे राहून चर्चा करणारी सत्रे शिक्षकांनी आयोजित करावी. हे मॉडेल यशस्वी होण्यासाठी हालचालींवर आधारित अध्यापन आणि वर्ग नियोजनाबाबत शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

केरळ राज्यात अंमलात आलेल्या यू आकाराच्या आसन व्यवस्थेचा हेतू प्रशंसनीय आहे. यू आकार बैठक व्यवस्था विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्थेला आकार देण्याच्या दृष्टीने उपयोगी मानले जाते. या प्रकारच्या बैठक व्यवस्थेत विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याची समान संधी प्राप्त होते. शिक्षकांना देखील आनंददायी आणि प्रेरणादायी अध्ययनासाठी उपयुक्त मानले जाते. या सर्व गुणांमुळे ही बैठक व्यवस्था लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देणारी आहे. या पद्धतीमुळे सर्वसमावेशकता, सहकार्य, संवादी अध्यापन आणि दृश्यमानता यासारख्या आधुनिक शैक्षणिक मूल्यांची प्रभावीपणे रुजवणूक करता येईल. बॅकबेंचर्स हा शिक्का काढून टाकण्यासाठी ही आसन व्यवस्था उपकारक आहे. मात्र ही व्यवस्था कायमस्वरूपी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाही हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. बालकेंद्रीत शिक्षणाचे प्रणेते असलेले फिनलँड, जपान आणि डेन्मार्क सारख्या देशांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रयोग केलेले आहेत. या सर्व प्रयोगात असे दिसून आलेली आहे की कोणत्याही एकाच प्रकारची मांडणी सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे वर्गातील आसनाच्या मांडणी बाबत लवचिकता असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळ्या वर्गामध्ये विविध प्रकारच्या मांडणीचा उपयोग केला पाहिजे. त्यामुळे फिनलॅंड सारख्या देशाने धड्याच्या योजनेनुसार आसन व्यवस्थेत बदल करत असतो.

नवीन क्रांतिकारी प्रयोग म्हणून ही आसन व्यवस्था लागू करायचे सरकारच्या मनात असेल तर या पद्धतीचा शास्त्रीय आणि वैद्यकीय मूल्यांकन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ञांशी योग्य चर्चा करून ती लागू करणे गरजेचे आहे. वर्गातील आसन व्यवस्थेचा उद्देश अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पूरक असणे गरजेचे आहे. वर्गात विद्यार्थी कुठे बसतो किंवा कोणत्या बैठक पद्धतीचा वापर करतो याला महत्व नसून ती बैठक पद्धत त्याच्या मनाला, शरीराला, आत्म्याला आणि अध्ययन प्रक्रियेला आधार देते की नाही हे पाहणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.