https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

Five Motivational Stories in Marathi



शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

एका मंदिराला राजा भेट देणार असतो. राजा मंदिराला भेट देणार साहजिकच मोठे दान मिळणार अशी मंदिराच्या पुजाऱ्याला अपेक्षा असते. या अपेक्षे पोटी तो बायकोचे दागिने विकून मंदिराचे सुशोभीकरण आणि रंगरंगोटी करतो. ठरलेल्या दिवशी राजा मंदिराला भेट देतो. भेटीदरम्यान राजा मंदिराला सव्वा रुपये देणगी देतो. देणगीची रक्कम अत्यंत कमी असल्यामुळे पुजाऱ्याला फार वाईट वाटते. परंतु तो वाईट वाटून न घेता एक युक्ती लढवतो. राजाने मंदिराला जी अनमोल देणगी दिलेली आहे तिचा लिलाव करायचा आहे अशी राज्यभर दवंडी देतो. ही बातमी राजाला कळताच राजा धावत धावत पुजाऱ्याकडे येतो. पुजाऱ्याला लिलाव स्थगित करण्याची विनंती करतो. त्या मोबदल्यात मंदिरासाठी मोठी देणगी जाहीर करतो.

तात्पर्य- संकट किंवा अडचणीत खचून न जाता युक्तीने त्यावर कसे मात करता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे.

योग्य मार्गाचा वापर

एकदा एक नवीन लग्न झालेला जावई सासरवाडीला जातो. सासरी रात्री पाहुणचार घेत असताना सासुबाईकडून जावयाच्या ताटात अनावधानाने पापड लावला जात नाही. पापड हा जावयाचा आवडता पदार्थ असतो तोच ताटात लावला नसल्यामुळे त्याचा जीव खालीवर होतो. पण पापड मागायचा कसा हा प्रश्न निर्माण होतो. मग जावई एक  युक्ती करतो. एक लहानशी गोष्ट सांगू लागतो. 'सासरवाडीला येत असताना रस्त्यात मोठा साप आडवा आला होता.' मेव्हणा सहज म्हणतो, 'साप किती मोठा होता.' जावई चाणाक्षपणे सांगतो, 'मी बसलोय इथून ते पापडाच्या पराती पर्यंत मोठा होता.' हे सांगितल्याबरोबर सासुबाईंचे लक्ष जावयाच्या ताटाकडे जाते. सासुबाईच्या लक्षात येते की आपण जावईबापूंना पापडच वाढला नाही. सासुबाई लगेच जावई बापूंना पापड वाढते.

तात्पर्य- कार्य कितीही कठीण असले तरी योग्य मार्ग वापरला की त्या कार्यात यश प्राप्त होते.

समन्वयाचे महत्त्व

स्टीव्ह जॉब्स यांच्या आत्मचरित्रात एक सुंदर उदाहरण दिलेले आहे. पल कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असताना ते कंपनीचे प्रमुख बनले. आणि अल्पकाळात कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले. या यशाबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला, "तुमच्या कंपनीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना तुम्ही तिचे प्रमुख बनलात आणि ती कंपनी यशस्वी करून दाखवली हे कसे शक्‍य केले." त्यावर उत्तर देताना स्टीव्ह जॉब्स म्हणाले की, "मी लहानपणी एका वयस्कर शेजार्‍यांकडे खेळायला जात असे तेथेच चमकदार आणि ओबडधोबड दगड पडलेले होते." मी त्यांना प्रश्न विचारला की, "ओबडधोबड दगडाची चमकदार दगड कसे तयार करतात. शेजारी मला एका मोटर लावलेल्या ड्रम जवळ घेऊन गेले. या ड्रममध्ये वेगवेगळ्या आकाराचे वीस-पंचवीस दगड टाकण्यास सांगितले आणि मला मोटर सुरू करण्यास सांगितले. आता घरी जा उद्या सकाळी ये, उद्या सकाळी आल्यानंतर मोटर बंद करण्यास सांगितले. आत ड्रममध्ये पाहण्यास  सांगितले. सर्व दगड एकाच आकाराचे बनले होते तसेच त्यांच्यातील ओबडधोबडपणा नष्ट होऊन ते चकचकीत बनले होते." शेजारी म्हणाला की, 'तुम्ही सर्वांना एका साच्यामध्ये टाकले, त्यांच्यात योग्य रीतीने चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यांना त्यांची योग्य जागा दिली, योग्य पद्धतीने प्रक्रिया केली की प्रत्येक दगडात असलेली चमक बाहेर येते. '

तात्पर्य-या उदाहरणावरून मी बोध घेतला की कंपनीतल्या सर्व घटकांमध्ये समन्वय निर्माण केला. योग्य व्यक्तींना योग्य जागा आणि योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे कंपनीतील प्रत्येक माणसाने योग्य योगदान दिल्यामुळे मी यशस्वी होऊ शकलो.

मनाची श्रीमंती

एक दरोडेखोर आपल्या मुलाला व्यवसायाची गुपिते सांगतो. चोरीची सुरुवात चांगली झाली पाहिजे. पकडला जाऊ नये म्हणून तो साधूची झोपडी दाखवतो. या झोपडीतून तू चोरी कर, गेल्या तीस वर्षापासून मी तिथे चोरी करत आहे. मी अनेक वर्षापासून तेथे चोरी केली तरी साधूने आजपर्यंत पोलिसात तक्रार केली नाही. मुलगा बापाला म्हणतो, 'तुम्ही तीस वर्ष चोरी करून ही साधूला कधीही काही कमी पडले नाही परंतु तुम्हाला आजही जगण्यासाठी चोरी करावी लागते याचा अर्थ सज्जनपणाने जगून श्रीमंती मिळवता येते म्हणून मी चोरी करण्याऐवजी साधूकडे राहण्यास जातो.

तात्पर्य- गैर मार्गाने कमावलेले संपत्तीपेक्षा मनाची श्रीमंती आणि मोठेपणा जास्त महत्त्वपूर्ण असतो.

 

सकारात्मकता

आर्थर रॉबर्ट एशे हा अमेरिकेचा जगप्रसिद्ध टेनिसपटू होता. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करताना दूषित रक्त दिल्यामुळे त्यांना एड्सचा  (HIV/AIDS) आजार झाला. ही गोष्ट त्यांच्या चाहत्याला समजते. चहात्याने त्यांना पत्र लिहितो, 'इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुला का निवडले? या पत्राला उत्तर देताना तो लिहितो की, "पाच कोटी मुलं जगभर टेनिस खेळतात, त्यातील 50 लाख शिकतात, त्यातील पाच लाख मुले व्यावसायिक टेनिसपटू बनतात, त्यातील पाच हजार खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत भाग घेतात, त्यातील चार उपांत्य फेरीत पोहोचतात, दोन अंतिम फेरीत खेळतात या दोघांपैकी मी एक होतो. विम्बल्डनचा विजेतेपदाचा करंडक हातात उंचावताना मी देवाला कधीही विचारले नाही की तू माझी निवड का केली. आता वेदना होत असताना देवाला का विचारू?

तात्पर्य- महान लोक कोणत्याही प्रसंगात खंबीर असतात मग तो प्रसंग आनंददायक असो की दुःखदायक असो



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.