https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

परीक्षा ताणतणाव व्यवस्थापन


 परीक्षा ताणतणाव व्यवस्थापन


आजच्या स्पर्धात्मक युगात परीक्षा हा विद्यार्थ्याच्या जीवनातील एक अत्यावश्यक घटक बनला आहे. शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वच अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करण्याचे परीक्षा हे महत्वपूर्ण साधन आहे. परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक भवितव्यावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव सारख्या समस्या निर्माण होणे हे साहजिकच आहे. परीक्षेपूर्वी ताण येणे ही सामान्य बाब आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी मर्यादित प्रमाणात विद्यार्थ्यांवर ताण असणे आवश्यक असते. ताणामुळे विद्यार्थी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सजग होतात त्यातून  परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य त्यांच्यात निर्माण होते. परंतु ताणाची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतो. विद्यार्थ्यांवर येणारा ताणतणाव योग्यरीत्या समजून घेऊन त्याची योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास त्यातून त्यांची सुटका  करता येऊ शकते.

ताण तणाव संकल्पना- ताणतणाव म्हणजे व्यक्तीवर येणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आव्हानास शरीर आणि मनाने दिलेली एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. नवीन बदल किंवा आव्हाना सामोरे जाताना शरीराने नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे ताण होय. अभ्यासाचा भार, स्पर्धा, पालकांची अपेक्षा, अपयशाची भीती, पूर्वतयारीचा अभाव इत्यादी घटकामुळे परीक्षेसंदर्भात ताण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली की आपण कमी पडणार हे भय ताण वाढविण्यास कारणीभूत ठरते. एखादी गोष्ट जीवन मरणाचा प्रश्न बनल्यास ताण प्रचंड वाढतो.

परीक्षा ताणतणाव प्रमुख कारणे-  मर्यादित प्रमाणात असलेला ताण प्रेरणादायी ठरतो. परंतु अतिताण विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करतो. विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत.

1.       गुणांना अधिक महत्त्व- भारतीय शिक्षण पद्धतीत गुणांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. अपेक्षित गुण न मिळाल्यास पालकांकडून, शिक्षकांकडून, किंवा सहकाऱ्याकडून हेटाळणी होण्याच्या भयातून ताण निर्माण होतो.

2.       शिक्षणावर आधारित करियर महत्त्व-शिक्षणावर आधारित करियरला असलेली समाज मान्यता आणि प्रतिष्ठेमुळे बहुसंख्य विद्यार्थीचा कल डॉक्टर आणि इंजिनियर होण्याकडे असतो. मुलांच्या संख्येच्या मानाने हे शिक्षण देणाऱ्या चांगल्या आणि दर्जेदार संस्थांची संख्या कमी असल्यामुळे प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते. या स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि तयारी करावी लागते. आवश्यक गुण मिळवून देखील प्रवेश मिळेल की नाही या धास्तीमुळे विद्यार्थ्यांवर ताण निर्माण होतो.

3.  इतर करियरला कमी महत्त्व-  खेळ, संगीत, कला, व्यवसाय क्षेत्रातील करियर उदरनिर्वाहाच्या दृष्टीने फारसे उपयुक्त नाहीत हा गैरसमज समाजामध्ये निर्माण झाल्यामुळे या क्षेत्राची आवड असलेले विद्यार्थी देखील पालकांच्या दडपणामुळे नाईलाजाने प्रवेश परीक्षा देण्याच्या स्पर्धेत उतरतात. आवड नसलेल्या क्षेत्रात स्पर्धेत उतरल्यामुळे त्यांच्यावर अधिकचाच ताण निर्माण होतो.

4.  पालकांच्या अपेक्षा- पालकांकडून पूर्ण न झालेल्या अपेक्षा मुलांच्या गळी उतरवून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न काही कुटुंबामध्ये केला जातो. तसेच मुलांची क्षमता लक्षात न घेता पालकांकडून निर्माण होणाऱ्या अपेक्षेच्या दबावामुळे मुलांमध्ये गोंधळ निर्माण होतो. पालक ध्येय सिद्धी करण्यासाठी मुलांच्या आवडीनिवडींवर बंधने लागतात. त्यांनी फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे यावर भर देतात. त्यामुळे देखील मुलांवर तणाव निर्माण होतो.

5.  प्रवेश परीक्षा वाढते प्रस्थ- भारतीय शिक्षण पद्धतीत उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. विविध संस्थांच्या विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा असल्यामुळे मुलांना प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या प्रवेश परीक्षा पास होण्यासाठी शाळेसोबत क्लासेस पण अटेंड करावे लागतात. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर व्यस्त बनतात. अति बौद्धिक श्रमामुळे देखील विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण होतो. परीक्षेच्या दडपणामुळे मोकळा वेळ मिळत नसल्याने मित्रांमध्ये,नातेवाईकांमध्ये आणि समाजातील विविध उपक्रमांत मुलांना सहभागी होता येत नसल्याने ते एकटे पडतात. हा एकटेपणा देखील ताण निर्माण करायला हातभार लावतो.

6.  पालकांकडून अपेक्षित सहकार्य अभाव- पालक मुलांकडून अभ्यासाची अपेक्षा करतात. परंतु अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करत नाही. पालक आणि शिक्षकांकडून मुलामुलांमध्ये केल्या जाणाऱ्या तुलनेमुळे देखील ताण निर्माण होतो

7.  योग्य समुपदेशन अभाव- विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन शिक्षकांकडून देखील अनेकदा भेटत नाही. तणाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना शाळेंकडून देखील केल्या जात नाही. शिक्षक किंवा शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याऐवजी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेत मुलांना ढकलतात.

8.  इतर कारणे- परीक्षेबद्दल असलेले नकारात्मक अनुभव किंवा गैरसमज, पुरेशी तयारी नसणे, अतिरिक्त अभ्यासाचा भार, स्पर्धात्मक वातावरण, परीक्षा तंत्र आणि अभ्यास पद्धतीचे ज्ञान नसणे, वेळेचे अयोग्य नियोजन.अपयशाची तीव्र भीती, आत्मविश्वासाचा अभाव, स्वतःवरचे नियंत्रण गमावणे, शारीरिक स्थिती नीट नसणे इत्यादी कारणामुळे देखील परीक्षा काळात ताणतणाव निर्माण होत असतो.

परीक्षा ताणतणावाचे परिणाम- परीक्षा ताणतणावाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर विविध प्रकारचे परिणाम होत असतो. चिंता, नैराश्य, एकाग्रतेचा भाव, चिडचिड इत्यादी मानसिक परिणाम होतात. डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, मळमळ, झोप न लागणे इत्यादी सारखे शारीरिक परिणाम होतात. अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी, स्मरणशक्ती ऐनवेळी दगा देणे इत्यादी सारखे शैक्षणिक परिणाम होतात. एकलकोंडेपणा, नातेसंबंधात तणाव इत्यादी सारखी सामाजिक परिणाम होत असतात. ताणतणावामुळे भीती, गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणावर घट होते.

परीक्षा ताणतणाव व्यवस्थापन -परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक टप्पा आहे. अंतिम पायरी नाही. परीक्षेमुळे निर्माण होणारा ताण तणाव ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्याची योग्य व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांचा यशाचा मार्ग सुकर करता येऊ शकतो. परीक्षेमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढील उपाय सुचविले जातात. 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान रेंद्र मोदी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या होत्या. "दहावी बारावीच्या किंवा इतर प्रवेश परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नाही. या परीक्षा पलीकडेही जगात खूप काही आहे, असा विचार करून परीक्षा दिल्यास ताण कमी करता येईल. परीक्षेतून निर्माण होणाऱ्या दबावाला मानसिक तयारीने सहज जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता नियमित सराव करून सुधारणा करीत राहिल्यास सहज यश साध्य होईल" हे पंतप्रधानांनी व्यक्त केले. डॉ. आशिष देशपांडे यांनी परीक्षेचे मुलांवरील दडपण कमी करण्यासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे गरजेचे आहे. अभ्यासासोबत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या विद्यार्थी कसे भक्कम होतील याच्यावर देखील भर देणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातल्या अनुभवी शिक्षिका अनुराधा पाटील यांच्या मते, "दहावी बारावी ही काय आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही. तो एक टप्पा आहे. या टप्प्यात मिळालेले मार्क सर्वस्व आहेत असे मुलांवर बिंबवणे चुकीचे आहे. त्यामुळे पालकांनी दहावी बारावी वर्गात मुले असताना घरात विशेष वातावरण निर्माण करणे ऐवजी घरातले वातावरण नेहमी प्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न केला तर मुलांवरचे दडपण कमी होईल. मुलांवरचे अभ्यासाची दडपण कमी करण्यासाठी पालकांनी अपेक्षित संवाद साधून सहकार्य केल्यास विद्यार्थ्यांमधला ताण देखील कमी होईल." तज्ञांच्या मते, "भारतीय शिक्षण  पद्धतीत प्रवेश परीक्षांचे प्रस्थ कमी करून मुलांचा कल ओळखून शिक्षण देण्यासाठी कलचाचणी (Aptitude Test)  हा पर्याय निवडल्यास मुले आपल्या आवडीप्रमाणे विषय शिकू शकतील. त्यांना आवडीनुसार शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यास आपोआप ताणाचे निराकरण होईल.

परीक्षेमुळे येणारा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील उपायांचा अवलंब केला पाहिजे. अभ्यासक्रमासंदर्भातील योग्य अध्ययन साहित्याचे वाचन करणे. प्रभावी अभ्यास तंत्रांचा वापर करणे. अभ्यासाची योग्य नियोजन करणे. वेळेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे नकारात्मक विचारांपासून दूर राहणे. अतिरिक्त ताण जाणवल्यास  विश्रांती घेऊन ताण कमी होईपर्यंत आवडीचे काम करणे. ताण कमी करणाऱ्या कृती करण्यावर भर देणे. मित्रांमध्ये आणि निसर्गरम्य वातावरणात भटकण्यासाठी थोडा वेळ काढणे. मागील काळातील प्रश्नपत्रिका सोडवणे. मॉक चाचणी देणे. पुरेशी झोप व्यायाम आणि सकस आहार घेणे. एकदम मोठे उद्दिष्ट ठेवण्याऐवजी लहान लहान उद्दिष्ट ठेवून कृती करत राहणे. पाठांतरावर भर देण्याऐवजी अभ्यासक्रमातील संकल्पना समजून घेणे. ऐन वेळेवर तयारी करण्या ऐवजी नियमित अभ्यासाची उजळणी केल्यास न्यूनगंड कमी होण्यास हातभार लागतो. व्यायाम, योगासने, ध्यानधारणा, विपश्यना इत्यादींचा वापर करून देखील तणाव कमी करता येतो.

परीक्षेची भीती हा स्थायीभाव असला तरी या भीतीकडे डोळसपणे पाहून तिचे मूळ शोधून योग्य मार्गाने वाटचाल केल्यास ताणतणावाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करता येते. ताणविहरीत जीवन आदर्श स्थिती असते. मात्र सभोवतालच्या जगात सुरू असलेली स्पर्धा, विविध प्रवेश परीक्षा, मर्यादित जागा, शाळा आणि पालकांच्या अपेक्षा, समाजाचे दृष्टिकोन इत्यादींमुळे आपल्याला काहीतरी मिळवायचे आहे ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भावना ताणतणावाला जन्म देत असते. अशा परिस्थितीत तणावाला बळी पडण्यापेक्षा त्याची योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ताण नेमका कशामुळे निर्माण होतो हे नीट समजून घेतल्यास ताणाचे व्यवस्थापन करणे प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर शक्य असते. ताणाचे व्यवस्थापन करण्यास अडचणी येत असतील तर पालक, शिक्षक, समवयस्कर मित्र आणि वेळप्रसंगी समुपदेशक  यांची देखील मदत घेण्यास हरकत नाही. परीक्षा बद्दल येणाऱ्या ताणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. कारण हा ताण एखादी यशस्वी कामगिरी करून दाखवण्यासाठी योग्य आहे हे सूत्र लक्षात घेतल्यास ताण व्यवस्थापन साध्य करता येईल. महत्त्वाचे यश प्राप्त करण्याच्या तयारीतील पहिला टप्पा या अर्थाने ताणाचा विचार करणे गरजेचे आहे. अनेकदा विद्यार्थी नकारात्मक कल्पनाशक्तीला नको एवढे ताणून स्वतःला ताणात गुंतून घेतात. आपण भलतीच कडे भरकट चाललो हे त्यांच्या लक्षात येत नाही. अशा वेळेस शिक्षक आणि पालकांनी त्यांना योग्य दिशा दाखवून आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास ताणाचे व्यवस्थापन सहज शक्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.