https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

जागतिकीकरण प्रक्रियेची तत्त्वे,परिणाम व प्रभाव


 

जागतिकीकरण प्रक्रियेची तत्त्वे, परिणाम व प्रभाव

जागतिकीकरण ही सर्वव्यापी प्रक्रिया असून त्या प्रक्रियेची तत्त्वे पुढील प्रमाणे सांगता येतात.

  • ·        अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप अमान्य करणे

·      आंतरराष्ट्रीय बाजारातील मुद्रादर बाजारावर आधारित असतील.

  • ·      आंतरराष्ट्रीय बाजारातून सीमा शुल्क, राखीव कोटा आणि व्यापारावरील प्रतिबंध कमी कमी करून कालांतराने समाप्त केले जातील.
  • ·      विश्वस्तरावर बौद्धिक संपदा संरक्षणासाठी समान कायद्याची स्थापना करणे.
  • ·      संपूर्ण जगभर भांडवल आवागमनावर कोणतेही निर्बंध नसतील. प्रत्येक राष्ट्र अन्य राष्ट्रांत आर्थिक गुंतवणूक करू शकतील आणि आर्थिक फायदा मिळवू शकतात.
  • ·      विश्व स्तरावर तंत्रज्ञानाबरोबर मानवसंसाधनाच्या आवागमनाचे स्वांतत्र्य असेल.
  • ·      जागतिकीकरणात व्यापारावरील नियंत्रणे रद्द करून सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करणे.
  • ·      जागतिकीकरणात संपूर्ण जगाची एक बाजारपेठ निर्माण केली जाते.

जागतिकीकरण प्रक्रियेचे परिणाम व प्रभाव

जागतिकीकरण प्रक्रियेची सुरुवात दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली दिसते. १९८० च्या दशकात जागतिकीकरण प्रक्रियेचा वेगाने विकास झाला. सद्य:स्थितीत जागतिकीकरण प्रक्रियेचा सर्व राष्ट्रांनी स्वीकार केलेला दिसतो. जागतिकिकरण ही सर्वव्यापी प्रक्रिया असून या प्रक्रियेचे अनेक परिणाम वा प्रभाव जगावर पडलेला दिसून येतात. ते परिणाम पुढील प्रमाणे सांगता येतात.

१) आर्थिक परिणाम - जागतिकीकरणामुळे गरीब देशातील लोक उद्योगप्रधान देशातील उत्पादित वस्तू वा मालाकडे अधिक आकर्षित होतील. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक उद्योगांव्यक्तिरिक्त इतर उद्योग सुरू करण्यासाठी सरकारी परवानगीची गरज राहणार नाही. उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला मुक्त वाव राहील. सरकारी व सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण केले जाईल. उद्योगांवरील सरकारी नियंत्रणे रद्द केली जातील. आयातीवरील निर्बंध कमी केले जातील. मुक्त स्पर्धेमुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर दिला जाईल. जागतिकिकरणामुळे राज्याची आर्थिक कार्य खाजगी उद्योगांच्या हातात जातील. जागतिकीकरणामुळे उद्योगांमध्ये मुक्त स्पर्धा निर्माण झाल्यामुळे ग्राहकांना वस्तूनिवडीचे अनेक पर्याय उपलब्ध होतील तसेच एक वस्तू अनेक उत्पादकांकडून निर्माण केली जात असल्याने स्पर्धा निर्माण होईल. स्पर्धेमुळे ग्राहकांना कमी किमतीत वस्तू उपलब्ध होतील. जागतिकीकरणातून आर्थिक व सामाजिक विकास संतुलित प्रमाणात झाला नाही तर असंतुलित विकासातून प्रादेशिक असमतोल, विषमता, साधन संपत्तीचे असमान वितरण, सत्ताकारणावर अर्थकारणाचे वर्चस्व इत्यादी प्रश्न निर्माण होतील, जागतिकीकरणामुळे जकात ठरविण्याचा राष्ट्राचा अधिकार नष्ट झाला आहे. आर्थिक धोरण निश्चितीचा अधिकारदेखील राष्ट्रांनी गमावलेला आहे. प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना, विश्व बँक आणि जागतिक नाणेनिधीच्या सल्ल्याने आर्थिक धोरणे आखावी लागतात.

(२) राजकीय परिणाम - जागतिकीकरणामुळे राज्याचे आर्थिक अधिकार कमी होतील. खाजगीकरण आणि उदारीकरणामुळे राज्याचे अधिकार कमी होऊन.राज्याला सबसिडी, अनुदान, कपातीमुळे समाजकल्याणकारी योजनात कपात करावी लागेल. त्यामुळे कल्याणकारी राज्याचे रूपांतर पोलिसी राज्यात होईल. जागतिकीकरणामुळे राष्ट्र विघटनाची प्रक्रिया सुरू होऊन आंतरराष्ट्रीय एकीकरण वृद्धींगत होईल. विश्वव्यवस्था एक ध्रुवीय ऐवजी बहुध्रुवीय होऊन विशिष्ट देशांची बा गटांची मक्तेदारी नष्ट होईल. जागतिकीकरणामुळे युनो, विश्व बँक, जागतिक व्यापार संघटनांचे महत्त्व वाढेल. राज्याच्या सार्वभौमत्वावर मर्यादा येतील. जागतिकीकरणामुळे राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर अप्रत्यक्ष मर्यादा येत आहेत. सार्वभौमत्व ही एक अविभाज्य प्रक्रिया होती. परंतु जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या नवीन पर्यावरणात राष्ट्रांना आपल्या पारंपरिक सार्वभौम संकल्पनेची पुनर्मांडणी करणे भाग पडत आहे. प्रत्येक राष्ट्राला आपल्या राष्ट्राशी अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाशी जोडणे भाग पडत आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची स्वायत्तता टिकविणे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. पारंपरिक सार्वभौमत्व संकल्पनेत प्राधिकारांना (Authority) महत्त्व स्थान होते. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्या, विभागीय व्यापार संघ आणि जागतिक आर्थिक संस्थामुळे प्रत्येक क्षेत्रात राज्याचा प्राधिकार टिकविणे अवघड बनले आहे. जागतिकीकरणामुळे सामाजिक, आर्थिक विकास संतुलित प्रमाणात न झाल्यास असंतुलनामुळे विषमता असलेल्या राज्याराज्यात संघर्षाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जागतिकीकरण प्रक्रियेत सहभागी देशांमध्ये संस्थात्मक बांधणी नीट न केल्यास विकासाची फळे सर्वांना मिळणार नाहीत. परिणामतः समाज घटकांत असंतोष निर्माण होईल,

३) सांस्कृतिक परिणाम - जागतिकीकरणामुळे सर्व क्षेत्रात पाश्चिमात्य - संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे. परिणामतः सर्व देशातील नागरिकांच्या वर्तनातही परिवर्तन होत आहे. जीवनपद्धत, वेशभूषा, आहार, आकांक्षा, आचारविचार इ. बाबींवर पश्चिमी मूल्यांचे अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणामुळे सांस्कृतिक रक्षणाच्या नावाखाली प्रत्येक देशात मूलतत्त्ववाद्यांची संख्या वाढते आहे. त्यातून सांस्कृतिक संघर्ष उदयाला येत आहे. लोकभाषांचे महत्त्व कमी होऊन इंग्रजीचे महत्त्व अतोनात वाढले आहे. वाढत्या प्रसार माध्यमांमुळे पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव तिसऱ्या जगातील देशावर मोठ्या प्रमाणांवर पडतो आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या स्वीकारामुळे तिसऱ्या जगाची विभागणी दोन गटात झालेली दिसते. पारंपारिक मूल्य मानणारे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार करणारे यामुळे तिसऱ्या जगातील देशांचे सांस्कृतिक विघटन निर्माण होताना दिसते. जागतिकीकरण प्रक्रियेमुळे नव एकात्मिक प्रादेशिक समूह • विकसित होणे हे सांस्कृतिक बहुलवादाचे अंगभूत तत्त्व आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय बहुलवाद विकसित होत आहे. त्यामुळे राष्ट्र राज्याचे महत्त्व कमी होत आहे.

 ४) सामाजिक परिणाम - जागतिकीकरणामुळे शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील • खाजगी गुंतवणुकीस मान्यता दिली जाते. खाजगी गुंतवणुकीमुळे हे व्यवसाय नफा कमविण्यासाठी चालविले जातील. त्यामुळे सर्वसामान्यांना पैसा खर्च करून सेवा विकत घ्याव्या लागतील. कल्याणकारी राज्याऐवजी पोलिसी राज्याचा जन्म होईल. तीव्र आर्थिक स्पर्धेमुळे श्रीमंत-गरीब, ग्रामीण-शहरी यांच्यात आर्थिक दरी वाढून आर्थिक विषमता निर्माण होईल. उद्योगातील नवतंत्रज्ञानाच्या बापरामुळे मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होऊन बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. बेरोजगारीमुळे, गुन्हेगारीमध्ये वाढ होईल. जागतिकीकरणामुळे स्थलांतराची प्रक्रिया सुरू होईल. स्थलांतरामुळे अनेक भीषण सामाजिक समस्यांना प्रत्येक देशाच्या सरकारला तोंड द्यावे लागेल. विश्व व्यापारासाठी राष्ट्रांना देशाच्या सीमा खुल्या कराव्या लागत आहेत. त्यातून भूमिपुत्र आणि बाहेरील कामगार यात अनेक देशात संघर्ष घडताना दिसत आहेत.

 ५) शेती व उद्योग क्षेत्रातील परिणाम  - जागतिकीरणामुळे शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतील. शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानात जागतिकीकरणामुळे कपात केली जाईल. शेतीमालावरील आयातकराच्या कपातीमुळे विदेशी शेतीमालाशी देशी शेतकऱ्यांना स्पर्धा करावी लागेल. परिणामतः वाढत्या स्पर्धेमुळे शेतीमालाच्या किंमती कमी होऊन शेतकरी देशांधडीला लागतील. खते, बी-बियाणे, पेटंट कायद्यामुळे शेती उत्पादन प्रक्रियेत बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शिरकाव झाल्याने शेती संबंधित उत्पादनाच्या किंमती प्रचंड वाढतील. जागतिकीकरणाने भांडवल, वस्तू, सेवा राष्ट्राच्या भिंती ओलांडून भराभर पसरत चालल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात स्पर्धा व कार्यक्षमता वाढत आहे. वाढत्या स्पर्धामुळे लहान उद्योग बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विलीन होताना दिसतात. नव तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर कामगार कपात होत आहे. बाजारपेठांवर कब्जा मिळविण्यासाठी उद्योगांना तीव्र स्पर्धा करावी लागते. प्रचंड जाहिरातबाजी होत असते. मात्र ग्राहकाला जागतिकीकरणामुळे विविध पर्याय उपलब्ध होत आहेत.

 ६) पर्यावरणावरील परिणाम - जागतिकीकरणामुळे विकासाचे मोठे मोठे प्रकल्प राबवितांना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विस्थापनामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलेले आहे. उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर शेतजमिनीच्या वापरामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी होत आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, प्रदूषण इ. बाबींचे दूरगामी परिणाम जगावर होत असून त्यातून वैश्विक तापमान वाढीचा धोका निर्माण होत आहे. वाढत्या औद्योगिकरण आणि नागरीकरणातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. या समस्या सोडविणे राज्याच्या क्षमतेबाहेरचे कार्य मानले जाऊ लागल्यामुळे मोठया प्रमाणात जनतेत प्रस्थापित व्यवस्थेबद्दल असंतोष निर्माण होत आहेत. त्यातून जनता नैराश्यातून हिंसाचार व गुन्हेगारीचा आश्रय घेतांना दिसते आहे.

७) आंतरराष्ट्रीय राजकारणावरील परिणामजागतिकीकरण प्रक्रियेत बाजारपेठांवर प्रभाव टाकणाऱ्या शक्तीचे वर्चस्व प्रस्थापित होऊन आंतरराष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत त्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या वेगाने प्रयत्न करीत आहेत. तंत्रज्ञान, गुंतवणूक, बाजारपेठा मिळविण्यासाठी त्यांच्यात विषारी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धांमुळे पर्यावरण असंतुलन, मानवी मूल्यांचे विघटन, बेकारी इत्यादी समस्या निर्माण होऊन संपूर्ण मानव समाज संकटाच्या खाईत लोटला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात संशयवाद आणि राजकीय व आर्थिक अस्थैर्य निर्माण होत आहे. सामाजिक व राजकीय गोष्टींऐवजी आर्थिक करार, व्यापार संधी, औद्योगिकीकरणासंबंधी मुद्यांना अतोनात महत्त्व मिळत आहे. जागतिकीकरणाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर पुढील परिणाम झालेले दिसतात.

  • ·      प्रत्येक राष्ट्राला आपले परराष्ट्र धोरण व संरक्षणविषयक धोरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्राराष्ट्रांतील संबंध यात मोठ्या प्रमाणात बदल करावे लागत आहेत.
  • ·       सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा अंत झाला. त्याबरोबरच राष्ट्राराष्ट्रांतील प्रदेश, समूहातील वैचारिक मतभेदातील अंतर कमी होऊन लागले आहे.
  • ·      राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणात अर्थव्यवस्था, व्यापार आणि गुंतवणूक या बाबींना अधिक प्राधान्य द्यावे लागत आहे.
  • ·      राष्ट्र राज्याच्या सार्वभौम सत्तेला वेगवेगळ्या घटकांकडून आव्हाने दिली जात आहेत. त्यामुळे राष्ट्रातंर्गत अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अस्थिरता दिसून येत आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.