https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

जागतिकीकरण संकल्पना आणि प्रक्रियेचा, अर्थ, व्याख्या, स्वरूप व वैशिष्ट्ये


 जागतिकीकरण संकल्पना आणि प्रक्रियेचा, अर्थ, व्याख्या, स्वरूप व वैशिष्ट्ये

    जागतिकीकरण ही संज्ञा सद्य:काळात एक चलनी नाणे बनलेली आहे. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिकीकरण संकल्पनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली. शीतयुद्धोत्तर काळातील नवीन विश्वरचनेत जागतिकीरणाचा बोलबाला राहिलेला दिसतो. आज कोणतेही राष्ट्र जागतिकीकरण प्रक्रियेपासून अलग राहू शकत नाही. प्रत्येक राष्ट्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामील झालेले आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे शब्द परवलीचे बनलेले आहेत. आर्थिक उदारीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी जोडली जात आहे, तर खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकारी उद्योगाचे खाजगी उद्योगात रूपांतर केले जात आहे. जागतिकीकरण संकल्पनेचा सर्वप्रथम अर्थशास्त्रात विचार केला जाऊ लागला. अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाशी ही एक संलग्न प्रक्रिया मानली गेली. अर्थव्यवस्था समाजव्यवस्थेचे एक उपांग असल्यामुळे तिच्यातील बदलाचा प्रभाव समाजातील एका उपांगावरदेखील पडू लागला. जागतिकीकरण प्रक्रियेचे फक्त आर्थिक परिणाम नसून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम देखील आहेत हे वास्तव लक्षात आल्यानंतर सामाजिकशास्त्रात अध्ययन होऊ लागले. राज्यशास्त्रातदेखील राजकीय संकल्पना म्हणून जागतिकीकरणाचा विचार केला जात आहे.

 जागतिकीकरणाला वैश्वीकरण, भूमंडलीकरण, विश्वव्यापारीकरण इत्यादी असेही संबोधिले जाते. जागतिकीकरण म्हणजे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाशी संलग्न करणे वा जोडून देणे होय. आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करून अर्थव्यवस्था खुली करणे होय. जागतिक पातळीवर वस्तू वा सेवांचा खुला व्यापार करणे हा जागतिकीकरण प्रक्रियेचा एक भाग मानला जातो. जागतिकीकरण ही व्यापक संकल्पना असून प्रत्येक राष्ट्राला विश्वस्तरावर उपलब्ध संधी, भांडवल, ज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव संसाधने सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे होय आणि त्यासाठी विविध राष्ट्रांतील भांडवल, तंत्रज्ञान, व्यापार, मनुष्यबळ, नैसर्गिक संसाधने इत्यादींवरील निर्बंध हटविणे आवश्यक मानले गेले. विश्वस्तरावरील बाजार शक्तीच्या क्रियाशीलतेवर कोणताही प्रतिबंध असणार नाही. सद्य:परिस्थितीत जागतिकीकरण हा राष्ट्रविकासासाठी परवलीचा शब्द बनलेला आहे. आज जगातील कोणतेही राष्ट्र जागतिकीकरणापासून मागे हटू शकत नाही.

 जागतिकीकरणाची व्याख्या

जागतिकीकरण संज्ञा साधारणत: १९८० च्या दशकापासून वापरली qaजाऊ लागली. जागतिकीकरणाच्या संदर्भात अभ्यासकांमध्ये एकमत येत नाही. कारण जागतिकीकरण प्रक्रियेचे अनेक पैलू आहेत. या पैलूंपैकी एखाद्या पैलूवर लक्ष केंद्रित करून परिभाषा करण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केलेला आहे. काही अभ्यासकांनी जागतिकीकरणाचे आर्थिक पैलू लक्षात घेतले तर काहींनी सामाजिक आणि राजकीय पैलू लक्षात घेतलेले आहेत. हवूडखा अभ्यासक मानतो की, 'जागतिकीकरणाने भौगोलिक अंतर कमी करून दिले आणि प्रादेशिक सीमांचे महत्त्व कमी करून दिले.' जागतिकीकरणाने स्थानिक, राष्ट्रीय तत्त्वाला अधीन केले नाही, तर स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील प्रक्रियांमध्ये सामंजस्य प्रस्थापित केले. जागतिकीकरण हे फक्त वस्तु, सेवा, मानव संसाधनाचे आदानप्रदान नसून आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपात व्यक्ती आणि राष्ट्रांच्या मध्ये समन्वय करणारी प्रक्रिया आहे. जागतिकीकरण एक अशा प्रकारची सामाजिक व राजकीय प्रक्रिया आहे की तिचा संस्कृति, प्रशासन आणि देशाच्या आंतरिक नीतीवर प्रभाव पड़त असतो. वेबस्टर डिक्शनरीत जागतिकीकरण संकल्पनेचा अर्थ विशद करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. समाजघटक व संबंध यांचे विश्वव्यापी आंतरसंबंधातील वैशिष्ट्यपूर्ण वाढ हा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला आहे. एथनी गिडिन्स यांनी जागतिकीकरण संज्ञेविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांच्यामते, आधुनिकतेचा उदय व विकास पश्चिमेत झालेला आहे. आधुनिकतेच्या जाणिवेतून जागतिकीकरण प्रक्रिया जन्माला आलेली दिसते. जागतिकीकरण संकल्पनेच्या अर्थाच्या स्पष्टीकरणासाठी विविध अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या आपण लक्षात घेऊ.

रूसी मोदी यांच्या मते, जागतिकीकरण म्हणजे खुली स्पर्धा आणि नवे तंत्रज्ञान यातून उत्पादकता आणि उत्पादन वाढविणे तसेच संपूर्ण जगाची एकच बाजार पेठ निर्माण करणे आणि वस्तू व सेवा वितरित करणे होय.

श्रवण कुमारसिंग यांच्या मते, जगातील सर्व राष्ट्रांची एकच बाजारपेठ करणे आणि त्या बाजारपेठेत जगातील साधनसामुग्री आणि भांडवलाचे सहजतेने परिचलन करणे म्हणजे जागतिकीकरण होय.

मार्टिन अल्ब्रो यांच्या मते, विश्वाची लोकसंख्या एकात्म समाजव्यवस्थेत बांधली जाण्याची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.

एडवर्ड हार्मन यांच्या मते, जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल, सेवा आणि आर्थिक क्रिया-प्रक्रियांच्या वाढत्या प्रवाहाला लक्ष्य करणारी प्रक्रिया आहे.

रोबर्टसन यांच्या मते, जागतिकीकरण एक अशी संकल्पना आहे की, जी संपूर्ण विश्वाला जोडण्याचे काम करते किंवा संपूर्ण विश्वामध्ये घनिष्ठता निर्माण करते.

एंथनी गिडिन्स यांच्या मते, जागतिकीकरण संकल्पना विश्व व्याप्त सामाजिक संबंधाना स्थानिक पातळीशी जोडण्याचे काम करते आणि स्थानिक घटनांना प्रभावित देखील करत असते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

विश्व संकल्पनेचा विचार व उल्लेख प्राचीन वाङ्मयात आलेला दिसतो. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ हिरोडोटस् ही संकल्पना वेगळ्या अर्थाने मांडली. सेंट ऑगस्टाईन यांनी मध्ययुगीन कालखंडात जागतिकीकरणाबाबत मानव विश्व संकल्पनेची मांडणी केली. हरडर, टर्गाट, कनडोरसेट या इतिहासकारांनी आणि कार्ल मार्क्स, कॉम्त, हेगेल या विचारवंतांनी मानवतावाद आणि राष्ट्राराष्ट्रातील संबंधाबाबत विस्तृत मांडणी केली. कार्ल मार्क्सने शास्त्रीय समाजवादाची मांडणी करताना जागतिक कामगार संघटना स्थापनाची कल्पना मांडून त्यातून जागतिक कामगार क्रांतीचे स्वप्न पाहिले. या विचारवंताच्या योगदानातून वैश्विक जाणिवा निर्माण होण्यास हातभार लागला. औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेला वसाहतवाद, राष्ट्रवाद, वाढता व्यापार आणि त्यातून निर्माण झालेले पहिले आणि दुसरे महायुद्धामुळे झालेल्या मानवी आणि मोठ्या प्रमाणावरील वित्तहानीमुळे संयुक्त राष्ट्र संघ आणि अन्य वैश्विक संघटनेच्या स्थापनेतून जागतिकीकरण संकल्पनेच्या उदयाला पोषक पार्श्वभूमी विकसित झालेली दिसते. राष्ट्राराष्ट्रांतील वाढते परस्परावलंबन, जागतिक तापमान वाढीचा धोका, प्रदूषण, अणुवस्त्राचे भय इत्यादींमुळे राष्ट्रातील सीमा कुचकामी ठरून परस्परसहकार्याची गरज भासू लागली. त्यामुळे १९७० च्या दशकात ही प्रक्रिया आकारास येऊ लागली. गॅट कराराने तयार केलेल्या डंकेल प्रस्तावावरील चर्चेस जगातील विविध देशांनी मान्यता दिल्यानंतर १९९५ मध्ये जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. या संघटनेचे सदस्यत्व जगातील बहुसंख्य देशांनी स्वीकारून जागतिकीकरणास मान्यता दिलेली दिसते. जागतिकीकरणात राष्ट्राच्या सीमांनी अर्थकारणात अडथळा आणू नये.. अर्थव्यवस्थेला बंदिस्तांकडून मुक्ततेचे धोरण राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध देशांच्या अर्थव्यवस्थेचे एकीकरण अभिप्रेत आहे. एकीकरण असतांना विविध देशाच्या अर्थव्यवस्थेचे परस्परावलंबनदेखील त्यात दिना येते. जागतिकीकरण ही आर्थिक एकीकरणाची प्रक्रिया आहे. एका अर्थाने विविध देशांच्या अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेशी एकीकरण करणारी विकासाची एक व्यूहरचना देखील आहे. जागतिकीकरणामुळे जग एक होत असल्याची अनुभूती प्रसार माध्यमातून जाणवते. सामाजिक व राजकीय घडामोडींची अपने कमी होत चालली आहेत. या परिवर्तनामागे भांडवली राजकीय अर्थव्यवस्था उभी आहे. २० व्या शतकात तंत्र वैज्ञानिक विकासाने आधुनिकीकरणाचा पाया घातला आणि त्या आधारावर आधारित जीवन पद्धतीचा कलाव जागतिकीकरणामुळे सर्वत्र होऊ लागला. थॉमस फ्रिडमन यांनी 'द वर्ल्ड इ प्लॅट: दि ग्लोबलाईज्ड वर्ल्ड इन ट्रेन्टी फर्स्ट सेन्चुरी' पुस्तकात जागतिकीकरणाच्या तीन टप्प्यांची चर्चा केलेली आहे. प्रथम टप्पा १४९२ ते १८०० हा मानतो. या टप्प्याची सुरुवात कोलंबसच्या सागरी सफारीपासून ते राष्ट्र राज्य बळकटीपर्यंतच्या कालखंडाचा समावेश करतो तर दुसरा टप्पा १८०० ते २००० पर्यंतचा मानतो. या टप्प्यात युरोपीय देशांचा साम्राज्य व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जागतिकीकरण प्रक्रियेला हातभार लावला, तिसरा टप्पा २००० च्या पुढे काळ मानतो. हा टप्पा मानवकेंद्रित विकासावर भर देणारा आहे. या टप्प्यात सर्वसमावेशक विकासाला बाब देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 जागतिकीकरण प्रक्रियेचे स्वरूप व वैशिष्ट्ये

जागतिकीकरण प्रक्रियेनंतर सर्व पातळीवर शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन राष्ट्राराष्ट्रातील सीमारेषाचे अंतर कमी होऊ लागले. सुरुवातीला पश्चिमी वसाहतवादाचा नवा प्रकार मानून विकसनशील देशातील डाव्या व समाजवादी विचारांच्या समर्थकांनी जागतिकीकरण प्रक्रियेस जोरदार विरोध केला. जागतिकीकरणाला आर्थिक साम्राज्यवादाचे नवे रूप मानले. काही काळानंतर जागतिकीकरणाची आवश्यकता लक्षात घेऊन विकसनशील राष्ट्रांनी त्यास मान्यता दिली. या प्रक्रियेच्या अनुरूप आपल्या राजकीय व्यवस्थेत धोरणात्मक बदल करून ही संकल्पना मान्य केली. या संकल्पनेचे स्वरूप व वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे विशद करता येतात.

 ·      जागतिक संबंधाबाबत प्राचीन काळी थोडाफार विचार झाला असला तरी औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीतून उदयाला आलेल्या राष्ट्रवाद आणि वसाहतवादाच्या स्पर्धेतून पहिले आणि दुसरे महायुद्ध घडून आले. दुसऱ्या महायुद्धाने केलेल्या मानवी व वित्तहानीपासून जगाला वाचविण्यासाठी विश्वपातळीवर विविध संस्था आणि संघटनांची स्थापना झाली. या संघटनांनी मानवी कल्याणाच्या हेतूने विविध करार-मदार करून विश्वाला जोडण्याचा प्रयत्न केला. ही जागतिकीकरणाची प्रथम पायरी होती.

 · शीतयुद्धाच्या अस्तानंतर जगातील संघर्ष कमी होऊ लागल्यामुळे जागतिकीकरणाबद्दल वेगाने चर्चा सुरू झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतिकारी बदलामुळे भौगोलिक अंतर, वेळ व काळाच्या मर्यादा कमी होऊन जगाला वैश्विक खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले.

·      · जागतिकीकरण ही प्रक्रिया असून ती सतत विकसित होणारी आहे. तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या शोधामुळे या प्रक्रियेस अधिक गती मिळाली. १९८० नंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने विकसित होऊ लागली.

·      जागतिकीकरण विकसित देशांचा आर्थिक साम्राज्यवाद म्हणून विकसनशील देशांनी या प्रक्रियेस सुरुवातीला विरोध दर्शविला. परंतु तिची व्यवहार्यता लक्षात घेऊन नंतर सर्वांनी तिचा स्वीकार केला.

·      जागतिकीकरण ही आर्थिक क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया असून तिचा अर्थव्यवस्थेशी संबंध आहे असे सुरुवातीला मानले जात आहे. परंतु ही बहुमुखी व सर्वव्यापी प्रक्रिया असून मानव जातीच्या सर्व अंगांना व्यापणारी आहे हे लवकरच लक्षात आले.

 ·      जागतिकीकरणामुळे शस्त्र संधी, निमलष्करीकरण, युद्धबंदी, जागतिक पर्यावरण प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, मानवविकास, मानवतावाद इत्यादी मुद्यांना जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त होत आहे.

 ·      जागतिकीकरणामुळे राज्याचे सार्वभौमत्व व सीमा पुसट ठरल्या आहेत. प्रत्येक राष्ट्राला आपल्या धोरणात बदल घडवून उदारीकरणाचे धोरण स्वीकारणे भाग पडत आहे. या प्रक्रियेमुळे विकसित आणि विकसनशील यांच्यातील दरी कमी होऊन राष्ट्रांराष्ट्रातील समानता व सहकार्य विकसित होत आहे.

 ·      जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे परस्परावलंबित्व वाढून विशिष्ट देशांची मक्तेदारी नष्ट होण्यास मदत झाली. जागतिक बाजार पेठांवर एक ध्रुवीय व्यवस्थे ऐवजी बहुध्रुवीय व्यवस्था निर्माण होत आहे. जागतिकीकरणामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रांना महत्व प्राप्त झाले असून जागतिक राजकारणात त्यांना सन्मानाने वागविले जाऊ लागले आहे.

 ·      जागतिकीकरण अर्थव्यवस्था संबंधित प्रक्रिया असली तरी समाज व्यवस्थेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी असल्यामुळे सर्व सामाजिक शास्त्राशी तिचा संबंध येतो. म्हणून जागतिकीकरण राजकीय प्रक्रियादेखील आहे. जागतिकीकरणामुळे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सीमा कमजोर होत आहे. मुक्त व्यापारास प्राधान्य मिळून जागतिक व्यापार संघटनेस प्राधान्य मिळत आहे.

 ·      जागतिकीकरणामुळे राष्ट्रांमधील परस्परावलंबन वाढून विशिष्ट देशाची मक्तेदारी नष्ट होऊन वसाहतवादाचा अंत होऊन नवे सत्ता संतुलन विकसित होत आहे.

 ·      जागतिकीकरणामुळे उदारीकरण, खाजगीकरण व शिथिलीकरणास प्राधान्य मिळून मानव जातीचा जलदगतीने विकास घडून येत आहे. खुल्या व्यापार नीतीतून देशादेशात व्यापार समझौते, विभागीय करार, विभागीय व्यापार संघटना स्थापन होत आहेत. त्यातून जागतिक व्यापार संघटनेचे महत्व वाढत आहे. राष्ट्राच्या परराष्ट्रधोरणात आर्थिक प्रश्न आणि व्यापार प्रश्नास प्राधान्य मिळत आहे.

·      जागतिकीकरण ही वैश्विक पातळीवर राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक एकीकरणाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्र राज्य व सार्वभौमत्वाचे महत्त्व कमी होऊन राज्यकांचे महत्त्व वाढत आहे. यूनो, जागतिक व्यापार संघटना, जागतिक नाणेनिधी, विभागीय संघटना इत्यादी सारख्या संस्थांची धोरणे राज्यांना प्रभावित करीत आहेत किंवा राज्यांना त्यांच्या सल्ल्यानुसार धोरण आखणी करावी लागते.

 ·      जागतिकीकरण प्रक्रियेमुळे विश्व समस्यांवर समाधान शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्सुनामी, रोगराई, नैसर्गिक आपत्ती इत्यादी समस्या सर्व राज्यांना भेडसावत आहेत. त्यावर विजय मिळविणे एका राष्ट्राला शक्य नाही. जागतिकीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून राष्ट्राराष्ट्रामध्ये सहयोग विकसित करून जागतिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 ·      जागतिकीकरण प्रक्रियेमुळे एक विश्व एकराज्य ही संकल्पना अस्तित्वात येईल, असा विश्वास काही अभ्यासक व्यक्त करतात. भविष्यात राष्ट्र राज्य आणि सार्वभौमत्वाला महत्त्व राहणार नाही.

·      जागतिकीकरण राष्ट्राराष्ट्रामध्ये परस्पर सहकार्य, पस्पर निर्भरता आणि परस्पर संबंध विकसित करणारी प्रक्रिया आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.