लोकशाही अर्थ व व्याख्या,स्वरूप,प्रकार आणि आधुनिक काळातील वर्गीकरण-
लोकशाही शब्दाचा अर्थ 'लोकांचे शासन' किंवा 'लोकांना उत्तरदायी असलेले
शासन' असा व्यवहारात केला जातो.
लोकशाहीला इंग्रजीत Democracy असे म्हणतात. Democracy हा शब्द Demos (डेमॉस) म्हणजे लोक वा प्रजा
आणि kratia (क्रेटॉस वा क्रेटिया)
म्हणजे या सत्ता वा राज्य करणे अशा दोन ग्रीक शब्दा पासून तयार झालेला दिसतो.
लोकशाही शब्दाचा अर्थ लोकांची सत्ता म्हणजे लोकशाही असा होतो. लोकशाही विचार
प्राचीन काळापासून अस्तित्वात असला तरी त्याचे सिद्धांत आणि तत्त्वज्ञान विकसित
झालेले नव्हते. माल्कम वायलीच्या मते स्थल-काल-परिस्थितीनुसार लोकशाही विकसित आणि
त्यात सतत परिवर्तन होत असते. त्यामुळे ती एक गतिमान संकल्पना आहे. आधुनिक लोकशाही
शासनपद्धतीचा विकास जवळपास हजार वर्षांपासून सतत चालू राहिलेला आहे. इंग्लंडमध्ये
राजा आणि प्रजा यांच्या दीर्घ संघर्ष, विचारविनिमय आणि तडजोडीच्या माध्यमातून इंग्लंडमध्ये
लोकशाहीचा विकास झाला. त्यामुळे इंग्लंड देशाला लोकशाहीची जननी मानले जाते.
प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत लोकशाही व्यवस्थेत अनेक स्थित्यंतरे
झालेली आहेत. लोकशक्ती वा लोकइच्छेनुसार कारभार करणारी शासनपद्धती हा लोकशाहीचा आशय प्राचीन काळापासून ते
आधुनिक काळापर्यंत कायम राहिलेला आढळतो.
·
अब्राहम लिंकन यांच्यामते, लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी
चालवलेले राज्य होय.
·
सिसो यांच्यामते, ज्या शासन व्यवस्थेत
प्रत्येकाचा वाटा किंवा अंश असतो या शासन प्रकाराला लोकशाही असे म्हणतात.
·
प्रा. सिली यांच्यामते, लोकशाही शासनात भाग
घेण्याची संधी प्रत्येक व्यक्तीला मिळत असते.
·
प्रा. डायसी यांच्यामते, संपूर्ण राष्ट्राच्या
मानाने फार मोठ्या अंशाकडून कारभार चालविणारा शासनप्रकार म्हणजे लोकशाही होय.
·
लॉर्ड ब्राईस यांच्यामते, एखाद्या राज्याची शासनसत्ता
विशिष्ट वर्गाच्या वा गटाच्या ठायी अधिष्ठित नसते तर संपूर्ण लोकसमुदायच्या हाती
असते,असा
शासनप्रकार म्हणजे लोकशाही होय.
वरील व्याख्यांचा विचार
करता लोकशाही शासनपद्धती ही अत्यंत व्यापक आहे. काही विचारवंत लोकशाही ही एक
जीवनपद्धती आहे असे मानतात.लोकशाहीत जनता सार्वभौम असते. अंतिम निर्णय घेण्याचा
अधिकार जनतेला असतो. जनतेने निवडलेले प्रतिनिधी अंतिमत: जनतेला जबाबदार
असतात.त्याशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही.
लोकशाहीचे स्वरूप-
लोकशाहीची सुरुवात ग्रीक
गणराज्यातील अथेन्स नगरराज्यापासून झाली असे मानले जाते. भारतातदेखील वेदकाळात सभा
आणि समिती, बौद्ध काळात गणराज्यसारखी लोकशाही शासनपद्धती अस्तित्वात
असल्याचे उल्लेख सापडतात. परंतु प्राचीन काळातील लोकशाही आधुनिक काळातील
लोकशाहीपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. प्राचीन काळी कारागीर, स्त्रिया
व गुलामांना लोकशाहीव्यवस्थेत कोणतेही अधिकार नव्हते. कुलीन लोकांपुरती लोकशाही
मर्यादित होती.अथेन्समध्ये लोकशाहीचा अरुणोदय झाला, परंतु
उजेड फक्त श्रीमंताच्या हवेल्यापर्यंत पोहचला गरिबाच्या वा गुलामाच्या
झोपडयापर्यंत पोहचला नाही. असे अथेन्स लोकशाहीचे वर्णन एका विचारवंताने केलेले
आहे. आधुनिक लोकशाहीच्या उदयाला व विकासाला सर्वप्रथम इंग्लंडच्या भूमित सुरूवात
झाली. युरोपातील प्रबोधन वा ज्ञानोदयाच्या युगात इंग्लंडमध्ये राजा आणि प्रजा
यातील संघर्षातून लोकशाहीचा विकास झालेला दिसतो. १६८८ वैभवशाली रक्तविहीन
क्रांतीनंतर इंग्लंडने लोकशाही शासनप्रणालीवर
अधिकृत मोहोर उमटबिली, १७८९ फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन
स्वातंत्र्ययुद्धातून लोकशाहीच्या विकासाला गती प्राप्त झाली. १९ व्या शतकात
लोकशाही आणि हुकूमशाहीचा लपंडाव अनेक युरोपिय देशात सुरू राहिला. विसावे शतक हे
लोकशाहीसाठी सुवर्णयुग मानले जाते. या शतकात जगातील बहुसंख्य देशांनी लोकशाही शासन
पद्धतीचा स्वीकार केलेला आहे.
लोकशाही शासनपद्धतीचे आधुनिक काळात महत्त्व वाढण्याचे
प्रमुख कारण म्हणजे राजकीय सत्तेत समान भागीदारी आणि समान स्वातंत्र्य उपभोगण्याचा
अधिकार वा संधी होय. लोकशाही पद्धती ही जनसार्वभौमत्वावर आधारलेली शासन पद्धती
मानली जाते. लोकशाही सत्तेचा अंतिम मालक जनता समजली जाते. जनतेच्या
प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभागावर लोकशाहीचा डोलारा उभा राहतो. लोकशाही व्यवस्थेत
निवडलेल्या प्रतिनिधिच्या माध्यमातून राज्यकारभार चालत असतो. प्रतिनिधि निवडण्याचा
अधिकार हा जनतेला बहाल केलेला असतो. निवडलेल्या प्रतिनिधिनी योग्य पद्धतीने
राज्यकारभार केला नाही तर जनतेला विरोध करण्याचा देखील अधिकार असतात. काही देशात
तर निवडलेल्या प्रतिनिधिना परत बोलविण्याचा देखील अधिकार असतो. जनतेने निवडलेल्या
प्रतिनिधिनी योग्य पद्धतीने काम केले नाही तर जनता पुढील निवडणूकीत मतदानाच्या
माध्यमातून प्रतिनिधिला पराभूत करू शकते. म्हणजेच लोकशाही शासनपद्धती सत्तेचा खरा
मालक ही जनता असते. लोकशाही शासनपद्धती ही जनतेला उत्तरदायी आणि जबाबदार असलेली
जगातील एकमेव शासनप्रणाली मानली जाते.
लोकशाहीचे प्रकार आणि
आधुनिक काळातील वर्गीकरण
लोकशाहीच्या पारंपरिक वर्गीकरणानुसार प्रत्यक्ष लोकशाही आणि
अप्रत्यक्ष लोकशाही हे ठळक दोन प्रकार पाडले जातात. जगातील सर्व लोकशाही शासन
प्रणालींचा दोन प्रकारात समावेश केला जातो. परंतु आधुनिक काळात लोकशाहीच्या
प्रत्यक्ष कामकाज आणि लोकशाहीविषयक सिद्धांतांचा आधार घेऊन वर्गीकरण केले जात
असते.
१) प्रत्यक्ष लोकशाही वा प्रत्यक्ष सहभागात्मक लोकशाही (Direct Democracy and Direct Participatory Democracy)
राज्य कारभारात जनता प्रत्यक्ष भाग घेते. त्या शासन
प्रकाराला प्रत्यक्ष लोकशाही म्हणतात. या प्रकारात राज्यातील सर्व नागरिक विशिष्ट
ठिकाणी एकत्र येऊन विचारविनिमय करून राज्यकारभार चालवित असत, कायदे
व नियम स्वतः तयार करत असत, जनतेकडून राज्याचा प्रमुख
निवडला जाई, राज्याचा प्रमुख जनतेच्या मर्जीनुसार निर्णय घेत असतो.
कायदेनिर्मिती, अंमलबजावणी आणि न्यायदानदेखील जनतेकडून केले जात असते.
प्रशासकीय अधिकाऱ्याची निवडदेखील विशिष्ट काळासाठी जनतेकडून केली जात असे. ग्रीक
नगरराज्यातील लोकशाही प्रत्यक्ष राजकीय सहभाग आणि राजकीय उत्तरदायित्वावर आधारलेली
होती. अथेन्ससारख्या गणराज्यात राजकारणात सहभागी होणे पवित्र कर्तव्य वा उच्च
दर्जाचे कार्य मानले जात होते. राज्य आणि समाज, राज्य आणि व्यक्ती यात फरक
केला जात नसल्यामुळे व्यक्ती स्वतःला राज्याचा एक भाग मानत असे. भारतात देखील
वेदकाळात सभा आणि समिती, बौद्धकाळात गणराज्य
शासनपद्धतीत लोकांच्या प्रत्यक्ष सहभागाला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. रोमन
काळातदेखील मर्यादित प्रमाणात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात असल्याचे आढळून येते.
रोमन काळात सिनेट व मंत्र्यांचे अस्तित्व आढळून येते. कायद्या निर्मिती करताना
जनतेचे मत लक्षात घेतले जाई. आधुनिक काळात फ्रेंच विचारवंत रूसोने प्रत्यक्ष
लोकशाहीचे जोरदार समर्थन केलेले आहे. प्रत्यक्ष लोकशाही हा लोकशाहीचा सर्वोत्तम
राजकीय सहभाग देणारा प्रकार असला तरी सद्यःकाळात असे शासन निर्माण करणे शक्य नाही.
प्राचीन काळी ग्रीक नगर राज्यात हा प्रकार अस्तित्वात होता. नगर राज्याची
लोकसंख्या खूप कमी होती. ग्रीक नगरराज्यात परकीय, कारागीर, स्त्रिया
आणि गुलामांना राजकीय सहभागापासून दूर ठेवले होते. मर्यादित लोकांना नागरिकत्वाचा
अधिकार असल्याने त्यांना एकत्र येणे सहज शक्य होते. परंतु सद्यकाळात राष्ट्राचे
आकारमान व लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे कोणत्याही देशात प्रत्यक्ष लोकशाही हा
शासन प्रकार दिसून येत नाही.
आधुनिक काळात अनेक
देशांमध्ये अप्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात असली तरी त्या लोकशाहीला व्यापक स्वरूप
देण्यासाठी प्रत्यक्ष लोकशाहीस पूरक काही मार्ग वापरले जातात. स्वित्झर्लंडसारख्या
देशात प्रत्यावहन (Recall) अधिकार जनतेला दिलेला आहे.
या अधिकाराचा वापर करून जनता इच्छेनुरूप कार्य करू न शकणाऱ्या, जनतेने
निवडलेल्या प्रतिनिधीस परत बोलवू शकते. निवडून दिलेल्या प्रतिनिधीचे प्रतिनिधित्व
रद्द करण्याचा अधिकार प्रत्यावहनामुळे जनतेला मिळतो. याशिवाय सार्वमताचा अधिकार
दिलेला आहे. कायदेमंडळाने केलेल्या कायद्यावर जनतेचे मत घेणे म्हणजे सार्वमत होय.
जनतेला कायदा मान्य नसेल तर जनता सार्वमताद्वारे कायदा नाकारू शकते. तसेच जनतेला
विधिउपक्रमाचा अधिकार दिलेला आहे. विधिमंडळ कायदा करत नसेल तर जनता स्वतः विधेयक
तयार करून विधिमंडळाकडे पाठवू शकते. या महत्त्वपूर्ण अधिकाराद्वारे अप्रत्यक्ष
लोकशाहीतील दोष दूर करण्याचा प्रयास आधुनिक काळात स्वित्झर्लंड, अमेरिकेतील
काळी घटक राज्य आणि युरोपतील काही देशात केला जात आहे.
२) अप्रत्यक्ष वा
प्रातिनिधिक लोकशाही-
(Indirect or Representative
Democracy) आधुनिक काळात वाढती लोकसंख्या आणि व्यापक भू-प्रदेशामुळे
प्रत्यक्ष लोकशाहीऐवजी अप्रत्यक्ष लोकशाही जगातील सर्व राष्ट्रांनी स्वीकारलेली
दिसते. प्रातिनिधिक लोकशाहीत जनतेला प्रौढ मताधिकाराचा अधिकार असतो. राज्यातील
नागरिक राज्य कारभारात प्रत्यक्ष भाग न घेता प्रतिनिधी निवडून देतात. त्या
निवडलेल्या प्रतिनिधी मार्फत राज्य कारभार चालतो. त्या लोकशाहीस प्रातिनिधिक
लोकशाही असे म्हणतात. या प्रकारात जनता सार्वभौम असते. प्रतिनिधी निवडण्याचा
अधिकार जनतेला असतो. जनतेचे प्रश्न, समस्या प्रतिनिधिमार्फत
सोडविल्या जातात. जनतेच्या इच्छा, आकांक्षा व मागण्यांना
मांडण्याचे कार्य जनप्रतिनिधी करत असतात. प्रतिनिधी अंतिमत: जनतेला जबाबदार असतात.
या लोकशाहीचे मुख्य दोन प्रकार आहेत.
अ) संसदीय लोकशाही - या पद्धतीत राज्यातील
जनता कायदेमंडळाचे सदस्य प्रत्यक्ष गुप्त मतदानाने निवडून देतात. कायदे मंडळातून
कार्यकारी मंडळ निर्माण केले जाते. कार्यकारी मंडळ सामूहिकरित्या कायदे मंडळाला
जबाबदार असते, जोपर्यंत कायदे मंडळाचा विश्वास आहे तो पर्यंतच कार्यकारी
मंडळाला सत्तेवर राहता येते. कायदे मंडळाने अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्यास
कार्यकारी मंडळाला राजीनामा द्यावा लागतो. कार्यकारी मंडळाचे सदस्य कायदे
मंडळाच्या कामात भाग घेतात. कार्यकारी मंडळाच्या सदस्यांचा बहुतांश वेळ
कायदेमंडळात कामकाजात व्यतीत होतो. या प्रकारात वास्तव व नामधारी असे दोन
शासनप्रमुख असतात. नामधारी प्रमुख कायदेशीरदृष्ट्या देशाचा सर्वोच्च प्रमुख असतो.
मात्र खरी सत्ता वास्तव प्रमुखाच्या हातात असते. भारत, इंग्लड
इत्यादी देशात हा शासन प्रकार दिसून येतो.
ब) अध्यक्षीय लोकशाही - या लोकशाहीत राजकीय
सत्तेचे विभाजन केलेले असते. कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ एकमेकांपासून स्वतंत्र
असतात. कायदे मंडळाचे सदस्य कार्यकारी मंडळ सदस्य बनू शकत नाही. कार्यकारी मंडळाचे
सदस्य कायदे मंडळाच्या कामकाजात भाग घेत नाही. मंत्री हे • जबाबदार असतात. जनता
प्रत्येक निवडणुकीद्वारे अध्यक्षाला निवडून देते. अध्यक्ष कायदे मंडळाला जबाबदार
नसतो. त्याचा कालावधी निश्चित असतो. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि
न्यायमंडळे हे स्वायत्त पद्धतीने काम करीत असतात. ही शासनपद्धती अमेरिकेत आहे.
३) उदारमतवादी लोकशाही
उदारमतवादी लोकशाही हा जगातील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.
परंतु जगातील सर्व देशातील उदारमतवादी लोकशाही समान नाही तसेच उदारमतवादी लोकशाही
व्यवस्थेत काळानुरूप अनेक बदल झालेले आहेत. या बदलातून उदारमतवादी लोकशाहीचे अनेक
विचारप्रवाह विकसित झालेले आहेत. त्या विचारप्रवाहाचा आपण अभ्यास उपरोक्त मुद्यांत
करणार आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.