https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

उत्तर आधुनिकतेची लक्षणे वा वैशिष्ट्ये Post-Modernism Factors and Charateristics


 

उत्तर आधुनिकतेची लक्षणे वा वैशिष्ट्ये -

उत्तर-आधुनिकता अवधारणेची एक निश्चित व सर्वसंमत परिभाषा नाही. उत्तर-आधुनिकतेची परिभाषा करणाऱ्या अभ्यासकांनी आपआपल्या दृष्टिकोनानुसार परिभाषेची मांडणी केलेली दिसते. आधुनिक समाजात तीव्र गतीने परिवर्तन होत आहे. या परिवर्तनाचे अध्ययन आधुनिकतेच्या चौकटीत करणे अशक्य आहे. आधुनिकतेनंतर समाजाच्या विकास आणि परिवर्तनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न उत्तर आधुनिकतावादी करत आहेत. त्यामुळे ही संकल्पना आधुनिकतेची जागा घेत आहे. उत्तर-आधुनिकतावादाची काही लक्षणे वा वैशिष्ट्ये सांगता येतात. ती पुढीलप्रमाणे होत.

१. उत्तर - आधुनिकता एक सांस्कृतिक अवधारणा आहे - उत्तर - आधुनिकतेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते, उत्तर आधुनिकता एक सांस्कृतिक नमुना आहे. ही अवधारणा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि राजकीय प्रक्रियांशी संबंधित आहे. या संकल्पनेची अभिव्यक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रांत म्हणजे कला, साहित्य, तत्त्वज्ञान आदीमध्ये  दिसून येते. सामाजिक आयोजन आणि आर्थिक परिवर्तनातही दिसते.

२. उत्तर - आधुनिकतावाद बहुआयामी आहे आधुनिकता विविधतेत - समानता आणि एकतेला महत्त्व देते, तर उत्तर आधुनिकतावाद बहुलतेचे

समर्थन करते, स्थानीयता आणि विखंडनला महत्त्व देते. फूकोच्या मते, सत्तेला कोणतेही एक स्वरूप नसते, ती बहुस्वरूपी असते. उत्तर आधुनिकता म्हणूनच महान वृत्तान्तांचा अस्वीकार करते म्हणजे ज्ञानोदय आणि सकलताच्या सिद्धान्तांना नाकारते. उत्तर-आधुनिकतेच्या केंद्रात स्त्रिया, अश्वेत लोक, वंचित समूह आणि मागास वर्गांचा विचार केला जातो. ही विचारधारा अपेक्षित वर्गाच्या संस्कृतीला उचलून धरते.

३. उत्तर - आधुनिकतावाद भांडवलवादी संस्कृती आहे - उत्तर आधुनिकतावादाचे आलोचक ही संकल्पना भांडवलशाहीची देण मानतात. संस्कृतीच्या विकासाचा तर्क देऊन पूंजीवाद वा भांडवलवादाचे समर्थन करते. वस्तुतः उत्तर-आधुनिकतावाद एक पूंजीवादी संस्कृती आहे.

४. उत्तर आधुनिकतावाद विखंडन वा विरेचन प्रवृत्ती असते - उत्तर आधुनिकतेची प्रवृत्ती विखंडन वा विरेचनवादी आहे. ती निरंतरतेपेक्षा अनिरंतरतेला महत्त्व देते. एकात्मतेऐवजी विविधतेचा स्वीकार करते. उत्तर-आधुनिक समाजात विविधतेचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर दिसते.

५. स्थानिक घटकांचा शोध - उत्तर आधुनिकतावादी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात घडणाऱ्या घटनांचा विचार स्थानिक पातळीवरून करते. त्यांचे विश्लेषण करण्यासाठी स्थानिक घटकांचा शोध घेतला जातो.

 ६. उत्तर-आधुनिकता महान वृत्तान्तांना विरोध करते ल्योतार आणि - फूकोसारखे उत्तर-आधुनिकतावादी विचारवंत महान वृत्तान्त, महान सिद्धांतांना विरोध करतात. हेगेल, मार्क्स आणि वेबरद्वारे निर्माण केलेल्या महान सिद्धान्तांची वैधता ते अमान्य करतात. मानवी समाजातील मूलभूत सत्याची ओळख हे वृत्तान्त करू शकत नाही. महान वृत्तान्तांचा उद्देश औद्योगिक आणि व्यावसायिक वृद्धी करणे आहे म्हणून ते वृत्तान्तांना ते नाकारतात.

७. स्थानिक स्वायत्ततेला महत्त्व उत्तर - आधुनिकतावाद ही संकल्पना राष्ट्रीय स्तरापेक्षा स्थानिक स्तराला जास्त महत्व देते. स्थानिक स्तरावरील बहुआयामी घटकांच्या आधारावर राजकीय प्रक्रियांचे विश्लेषण केले पाहिजे. स्थानिक राजकीय आंदोलन आणि संघर्ष महत्त्वपूर्ण असतात. आधुनिकता ही स्थानिकांवर वरून लादलेली संरचना आहे या एक प्रकारे बाहेरच्या मूल्यांचा स्थानिक परिस्थितीवर झालेला परिणाम आहे. आधुनिकता हा एक लहान प्रकारच्या स्थानिकांवर लादलेला साम्राज्यवाद आहे; म्हणून उत्तर-आधुनिकतावादी स्थानिक स्तरावरील बाह्य तत्वांचा हस्तक्षेप अमान्य करून स्थानिक स्वायत्ततेला महत्त्व देतात.

८. उत्तर-आधुनिकतेत गंभीरतेचा अभाव - उत्तर आधुनिकतावादी विचारधारेला अभ्यासक गंभीरतेने घेत नाहीत; कारण ही विचारधारा कोणता मुद्दा वा घटनेचा सविस्तर विचार करत नाही. जे प्रश्न उद्भवतील त्यांचे निराकरण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे जेमेसन सांगतात की, 'उत्तर-आधुनिकतावादी संस्कृतीत गहनता वा सखोलतेची कमी आहे. ती वरवरचा विचार करणारी संस्कृती आहे.'

९. उपभोक्तावादी संस्कृतीचा विकास - उत्तर-आधुनिकतावादी संस्कृतीचा युरोप आणि अमेरिकेत विकास होत आहे. ही संस्कृती उपभोक्ताबाद आणि चंगळवादाला प्राधान्य देते. नैतिक जबाबदारी नसलेल्या संस्था आणि समूहांची संख्या उत्तर आधुनिकता युगात वाढत आहे. या वर्गाला नैतिकतेचे सोयरसुतक नाही. प्रचलित व्यवस्था आणि त्यातील नैतिक मूल्यांवर टीका करणे आणि त्यांच्या विश्वासार्हतेला सतत आव्हान देत राहणे त्यांना आवडते. आत्मतुष्टीकरण मानणारी नवी संस्कृती उदयाला आली आहे. या संस्कृतीत विवेक आणि नीतिमत्तेला स्थान नाही. कमालीचा स्वार्थी व्यक्तिवाद आणि चंगळवाद त्यात रुजलेला आहे. स्वतःच्या सुखापलीकडे दुसऱ्या कशाचाही विचार न करणे, मूल्याविषयी बेफिकीर राहणे ही वैशिष्ट्ये उत्तर आधुनिकता संस्कृतीत सर्रास दिसून येतात.

१०. उत्तर-आधुनिकता युवकांची उपसंस्कृती आहे उत्तर - आधुनिकतावादातून एक विशिष्ट प्रकारच्या संस्कृतीची निर्मिती संस्कृतीने युवकांना मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलेले आहे. उत्तर आधुनिकतेच्या प्रभावामुळे युवकांना 'आधुनिकतेच्या बंधनातून मुक झालो' असे वाटते. परिणामतः युवकांमध्ये एक नवी संस्कृती उदयाला येत त्याला पर्यायी संस्कृती' वा 'उपसंस्कृती' नावाने संबोधिले जाते. या संस्कृतीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे, असा प्रयत्न युरोप आणि अमेरिकेतील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सार्वजनिक जीवनात उत्तर-आधुनिकतावादी संस्कृतीला स्वतंत्र ओळख मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सकारात्मक प्रयत्नातून उत्तर आधुनिकतेबद्दल गैरसमज कमी होतील आणि सर्व जण तिचा स्वीकार करतील, असा दावा काही अभ्यासक करतात.

 ११. उत्तर आधुनिकता एक सांस्कृतिक तर्क आहे - जेमेसनसारखे मार्क्सवादी मानतात की, भांडवलशाहीच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे उत्तर-आधुनिकतावाद संस्कृती आहे. उत्तरआधुनिकतावादात भांडवलशाही आणि संस्कृती दोन्ही समाविष्ट आहेत. ही विचारधारा संस्कृतीच्या नावावर भांडवलशाहीचा प्रचार आणि प्रसार करते. उत्तर-आधुनिकताबाद विचारसरणीच्या लक्षणाचा विचार केल्यानंतर असे दिसून येते की, आधुनिकतानंतर येणारा काळ म्हणजे उत्तर आधुनिकतावाद आहे. सर्व उत्तर-आधुनिकतावादी विचारवंत या प्रक्रियेत विखंडनाचे तत्त्व एक केंद्रीय तत्त्व मानतात. संस्थापक विचारवंत, महान वृत्तान्त यांना ही विचारसरणी स्वीकारत नाही. उत्तर-आधुनिकता संस्कृतिप्रधान विचारधारा आहे. तिचे अस्तित्व कला, साहित्य, संगीत, सामाजिकशास्त्रात आढळून येते. जेमेसन आणि हारवेसारखे विचारवंत या विचारधारेला अर्थव्यवस्थेशी जोडतात. वरील सर्व लक्षणांचा विचार करता थोडक्यात असे म्हणता येते की, उत्तर-आधुनिकता हा एक स्वतंत्र सिद्धान्त आहे आणि त्याला स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.