https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राजकीय सहभागावर प्रभाव पाडणारे घटक Influencing Factors of Political Participation


  राजकीय सहभागावर प्रभाव पाडणारे घटक  Influencing Factors of  Political Participation

 राजकीय सहभाग ही साधारण संकल्पना वाटत असली तरी प्रत्यक्षात ती फारच गुंतागुंतीची आहे. राजकीय सहभाग संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी राजकीय सहभागाला प्रभावित करणाऱ्या घटकांचे अध्ययन करणे गरजेचे आहे. विविध समाजात आणि समाजाच्या विभिन्न स्तरात राजकीय सहभागाचे प्रमाण व प्रकार वेगवेगळे होण्यासाठी कारणीभूत असलेले घटक अभ्यासकांनी शोधून काढले आहेत. त्या अभ्यासकांच्या अभ्यासातून व्यक्ती राजकारणात का सहभागी होण्यामागची पुढील कारणमीमांसा केलेली दिसते.

) राजकीय चेतनेचे प्रमाण :- सामाजिक संपकांचे प्रमाण व राजकीय चेतना यांचा जवळचा संबंध असतो. विविध संघटना आणि राजकीय ससूनन माध्यमाशी संपर्क असणाऱ्या व्यक्तींना राजकीय चेतना मोठया प्रमाणावर मिळत असल्याने त्यांचा राजकीय सहभाग मोठया प्रमाणावर वाढत असतो. रेडिओ, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्र, इंटरनेट इत्यादी संसूचन माध्यमाचा आधुनिक काळात मोठया प्रमाणावर वापर वाढलेला आहे. या माध्यमे मोठया प्रमाणावर राजकीय ज्ञान व राजकीय चेतना पुरवितात. या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या माहितीची विश्वसनियता मोठ्या प्रमाणावर असल्याने ती माहिती वास्तव आहे असा बहुसंख्य लोकांचा समज आहे. या संसूचन माध्यमाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचा सहभाग इतरांपेक्षा जास्त असतो. शहरी भागात या माध्यमाचे मोठया प्रमाणात जाळे असल्यामुळे शहरी भागाचा ग्रामीण भागापेक्षा राजकीय सहभाग जास्त असतो. ज्या घरात राजकारणावर गप्पा होतात किंवा राजकीय सहभागाला पोषक वातावरण असते. त्या कुटुंबातील मुलांचा राजकीय सहभाग जास्त असतो. म्हणून अशिक्षित कुटुंबापेक्षा शहरी कुटुंबाचे राजकीय सहभागाचे प्रमाण जास्त असते. म्हणून अनेक राजकीय चळवळीचा जन्म शहरात झालेला दिसतो. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या व्यक्ती प्रसिद्धी माध्यमाशी नियमितपणे संपर्क ठेवून असतात. त्यामुळे सामाजिक कार्यात रस असणाऱ्या व्यक्ती राजकारणात अधिक क्रियाशील असण्याची शक्यता असते.

२) व्यक्तिगत घटक- व्यक्तीचा राजकीय सहभाग हा तिच्या स्वभाव आणि मनः स्थितीचा व्यक्त अविष्कार असतो. समाजातील विविध स्तरात किंवा भागात कोणत्या प्रकारच्या स्वभावाच्या व्यक्तीचा कितपत भरणा आहे यावर त्या समाजाच्या राजकीय सहभागाचे प्रमाण अवलंबून असते. चंचल, स्वार्थी, समाधानी, रागीट, शांत, सहनशील, मूल्यांना महत्त्व देणारे अशा विविध स्वभावाच्या व्यक्तीचे वास्तव्य राजकीय व्यवस्थेत असते. व्यक्तीचे ज्ञान, दृष्टिकोन व तिचे व्यक्तिमत्व यावर त्या व्यक्तीचा राजकीय सहभाग अवलंबून असतो. व्यक्तीचा स्वभाव अहंकारी, आंतरमुख आहे की समाजभिमुख, उमदया स्वभावाची आहे यावर व्यक्तीचा राजकीय सहभागाचे प्रमाण ठरत असते. व्यक्ती जर अहंकारी व आंतरमुख स्वभावाची असेल तर तिचा राजकीय सहभाग कमी असतो कारण अहंकारी स्वभावाच्या व्यक्तीना फार मित्र नसतात तसेच त्यांचा घराबाहेरील कार्यात सहभाग व वावर अत्यंत कमी असल्यामुळेही त्यांचा राजकीय सहभागाचे प्रमाण कमी असते. याउलट चार चौघात मिसळणाऱ्या वा उमदया स्वभावाची असेल तर ती व्यक्ती मोठया प्रमाणावर कुटुंबाबाहेरील कार्यात सहभागी होते. त्यातून त्यांचा स्वतःविषयी आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे त्यांचा राजकीय सहभाग जास्त वाढतो. कारण व्यक्तीचा स्वभाव हा व्यक्तीची भूमिका ठरवत असल्याने राजकीय सहभागाचे प्रमाण ठरविण्यातही व्यक्ती स्वभावाचा मोठया प्रमाणात कारणीभूत मानला जातो.

 ३) व्यक्तीची सामाजिक गुण वैशिष्टये :- व्यक्तीच्या व्यक्तिगत गुणवैशिष्टयांप्रमाणे तिची सामाजिक गुणवैशिष्टये राजकीय सहभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. समाजप्रिय किंवा मोकळया स्वभावाच्या व्यक्तीचा राजकीय सहभाग जास्त असू शकतो. व्यक्ती सामाजिक कार्यात भाग घेते किंवा नाही यावरही राजकीय सहभाग अवलंबून असतो. बऱ्याचदा व्यक्ती सामाजिक कार्यातून राजकारणात भाग घेते. सामाजिक स्थान व दर्जावर राजकीय सहभाग अवलंबूनअसतो. व्यक्ती समाजभिमुख असेल मात्र समाजात अनुकूल वातावरण वा नसेल तर राजकीय सहभाग कमी होतो. उदा. भारतात स्त्रियांनी राजकारणात घेऊ नये ही विचारसरणी असल्यामुळे राजकारणात स्त्रियाचा सहभाग कमी दिसतो. अरब राष्ट्रामध्ये स्त्रियाच्या राजकीय सहभागाला मान्यता नसल्यामुळे तेथील या राजकारणात सहभागी होत नाही. समाजाकडून प्रोत्साहन मिळत असेल तर व्यक्ती राजकारणात सहभागी होते पण प्रेरणा मिळत नसेल तर व्यक्ती राजकारणापासून दूर राहते. अभ्यासकांना व्यक्तीचे सामाजिक स्थान आणि दर्जा यांचाही राजकीय सहभागावर परिणाम करतो हे आढळून आलेले आहे. उच्च सामाजिक स्थान व उच्च सामाजिक दर्जा असणाऱ्या व्यक्तीचा राजकीय सहभाग जास्त असतो. उच्च शिक्षण, उत्पन्न व व्यावसायिक दर्जा असणाऱ्या व्यक्तीचा राजकीय सहभाग जास्त असतो. ज्या प्रमाणात व्यक्तीचे शिक्षण, उत्पन्न व व्यावसायिक दर्जा उंचावतो त्याप्रमाणात राजकीय सहभागाचे प्रमाण देखील वाढत जाते. आर्थिकदृष्टया संपन्न वर्गातील विविध गटांची किंवा समाजाची काही सर्वसाधारण वैशिष्टये असतात व ती त्या गटातील बहुसंख्य लोकांत दिसून येतात त्याचाही राजकीय सहभागावर परिणाम होता उदा. भारतात हिंदू व मुस्लिम गटांच्या राजकीय प्रवृत्तीत फरक असल्यामुळे राजकीय सहभागाच्या प्रमाणातही फरक आढळतो, परिस्थिती

४) व्यक्ती सभोवतालचे सामाजिक व राजकीय पर्यावरण:- राजकीय सहभाग घडविण्यामागे उपलब्ध असलेल्या सामाजिक व राजकीय पर्यावरणाचा फार मोठा वाटा असतो. व्यक्तीच्या ज्या कुटुंबात जन्मास येते आणि ज्या समाजात वावरत असते तेथे राजकारणास पूरक वातावरण असेल तर राजकीय सहभाग जास्त प्रमाणात असतो. भारतात उच्च जातीकडे पारंपरिक काळापासून सत्तासूत्रे असल्याने त्या जातीतील व्यक्तींच्या राजकीय सहभागाचे प्रमाण जास्त आढळून येते याउलट कनिष्ठ जातींना राजकीय अधिकारपदापासून अलिप्त ठेवल्यामुळे आज लोकशाही असूनही त्या जातीतील लोकांच्या राजकीय सहभागाचे प्रमाण कमी दिसते. राजकारणाविषयी पाहण्याची दृष्टी, राजकीय व्यवस्थेविषयीचा विश्वास, राजकारणाची आवड आणि स्वतःच्या प्रभावक्षमतेविषयी विश्वास हे घटक ही राजकीय सहभागला प्रभावित करत असतात. समाजात एकंदरित राजकारणाविषयी नकारात्मक भावना असेल तर राजकीय सहभागावर निश्चित परिणाम होतो. राजकारण हा गुंडाचा खेळ आहे, पैसाशिवाय राजकारणात यश नाही, राजकारण हा पैसावाल्यासाठी चालते, गरिबांने राजकारणापासून दूर राहावे, राजकारणी लोक धोकेबाज, खोटारडे असतात अशा पूर्वग्रहाचे अस्तित्व समाजात असेल तर राजकीय सहभागावर निश्चित परिणाम होत असतो. राजकीय सहभागासाठी पूरक सामाजिक व राजकीय पर्यावरण उपलब्धअसलेल्या देशात राजकीय सहभागाचे प्रमाण निश्चितच जास्त असते. अमेरिका इंग्लंडमध्ये प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या लोकशाही शासनामुळे राजकीय जागृतीचे प्रमाण प्रचंड असल्याने राजकीय सहभागाचे प्रमाणही जास्त दिसून येते.

५) राजकीय व्यवस्थेचे स्वरूप :- राजकीय व्यवस्थेचे स्वरूप व व्यवस्थातर्गत एकूण परिस्थिती यांचाही व्यक्तीच्या राजकीय सहभागावर परिणाम होता. व्यक्ती ज्या राजकीय व्यवस्थेत जीवन जगत असते. त्या व्यवस्थेच्या स्वरूपावर राजकीय सहभाग अवलंबून असतो. राजकीय व्यवस्थेचा विस्तार अफाट असेल आणि राजकीय संसूचनाच्या यंत्रणा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध नसतील, लोकांना राजकीय सहभागाबद्दल प्रोत्साहन दिले जात नसेल तर जनतेला शासनाविषयी आत्मीयता वाटणार नाही या पर्यावरणाचा राजकीय सहभागवर निश्चित परिणाम होईल अशा व्यवस्थेत राजकीय सहभागाचे प्रमाण मर्यादित असते. राजकीय व्यवस्थेची कार्यक्षमता हा घटक देखील राजकीय सहभागाला प्रभावित करत असतो. राजकीय व्यवस्था कार्यक्षम असेल तर जनता मोठया प्रमाणावर राजकीय सहभाग दर्शवित असते याउलट राजकीय व्यवस्थेच्या कामकाजाविषयी लोकांच्या मनात तीव्र स्वरूपाची नाराजी असेल तर ही नाराजी राजकीय उदासीनतेचे कारण बनू शकते. लोकशाही व्यवस्थेत राजकीय सहभागाला उत्तेजन दिले जाते. त्यामुळे लोकशाहीच्या विकासाबरोबर राजकीय सहभागाचे प्रमाणही वाढत जाते. लोकशाही शासन पद्धती जनतेला मुक्त राजकीय सहभाग संधी असते. त्यामुळे लोक राजकारणात मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. हुकूमशाही व साम्यवाद असेल तर राजकीय सहभागातून बंदी असते. म्हणून लोक राजकारणापासून अलिप्त असतात. संघराज्य पद्धतीत ग्राम पातळी पासून देश पातळी पर्यंत सतत निवडणूका चालू असतात. सत्तेची अनेक पदे असतात. त्यामुळे अनेक लोकांना राजकारणात सहभागी होण्याची जास्त संधी मिळते. सार्वमत, प्रतिनिधी परत बोलविण्याचा अधिकार इ प्रत्यक्ष लोकशाही साधनाचा वापर ज्या राजकीय व्यवस्थेत होत असतो तेथे राजकीय सहभागाचे प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आढळून आलेले आहे. लोकशाही व्यवस्थेच्या जागी अचानक सर्वकष व्यवस्था आल्यास राजकीय सहभागावर प्रामुख्याने गुणात्मक परिणाम होता. कारण सर्वंकष व्यवस्थेत लोकशाहीसारख्या राजकीय सहभाग मुक्त नसतो उलट राजकीय सहभाग नियंत्रित केला जातो. मर्यादित लोकांना राजकीय सहभाग दिला जातो. राजकीय व्यवस्थेत सत्तेचे केंद्रीकरण आहे की विकेंद्रीकरण आहे यावरही राजकीय सहभागाचे प्रमाण अवलंबून असते. केंद्रीकृत व्यवस्थेत मर्यादित लोकांना राजकीय सत्तेत सहभागी करून घेतले जाते विकेंद्रीत व्यवस्थेत जास्तीत जास्त लोकांना राजकीय सत्तेतसहभागी करून घेतले जाते म्हणून राजकीय व्यवस्थेचे स्वरूप विकेंद्रीत स्व असल्यास राजकीय सहभागचे प्रमाण वाढत असते.

) राजकीय पक्ष- राजकीय सहभागावर प्रभाव पाडणारा पक्ष हा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. हितसंबंधाचे अविष्करण आणि सुक करणे, राजकीय नेतृत्वाची भरती आणि प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य राजकीय पक्ष पार पाडत असतात. शासक आणि शासित यात मध्यस्थ वा म्हणून राजकीय पक्ष कार्य करत असतात. लोकांना राजकीय सहभाग घेण्यास पूरक वातावरण निर्मिती करण्यात राजकीय पक्ष आघाडीवर असतात. सभामद नोंदणी, अधिवेशने, कार्यशाळा, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे इत्यादींच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्ष शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची यंत्रणा निर्मितीचा प्रयत्न करत असते. विशेषत: निवडणुकाच्या काळात चालणाऱ्या प्रचारमोहिमा ह्या राजकीय सहभागाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. प्रचारमोहिमाच्या माध्यमातून विरोधकाच्या विरोधात राळ उडविणे, आरोप-प्रत्यारोपाच्या माध्यमातून जनतेच्या उत्सुकता शिगेला पोहचविल्या जातात. प्रचार मोहिमांच्या माध्यामातून राजकीय चेतना पुरविल्या जात असतात. म्हणूनच इतर काळापेक्षा निवडणुकांच्या काळात राजकीय सहभागाचे प्रमाण जास्त दिसून येते. सार्वजनिक सभाचे आयोजन, प्रत्यक्ष व्यक्तिगत भेटी, प्रचार रॅली इत्यादींच्या माध्यमातूनही राजकीय पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतो. पक्षपद्धतीचे स्वरूपही राजकीय सहभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. एकपक्ष पद्धती की द्विपक्षपद्धती की अनेक पक्षपद्धती यावर राजकीय सहभागाचे प्रमाण अवलंबून असते. एकपक्षीय राजवटीत अन्य पक्षाचे अस्तित्व मान्य नसते खुल्या स्पर्धेच्या अभावातून राजकीय सहभागावर मर्यादा येत असते. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय पक्षपद्धतीत खुली स्पर्धे असते. जनतेकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात अशा ठिकाणी राजकीय सहभागाचे प्रमाण जास्त दिसतून येते.

७) प्रादेशिकता :- प्रांतिक भेद वा प्रांतावर होणाऱ्या अन्यायकारक घटनातूनही राजकीय सहभाग वाढल्याची उदाहरणे आहेत. उदा. आंध्रप्रदेश राज्यात तेलंगणा प्रांत मागासलेला राहिल्याने वेगळया तेलंगणा राज्याची मागणी पुढे आली त्याकाळात त्या प्रदेशातील लोकांचा राजकीय सहभाग वाढलेला होता. काही वेळेस प्रादेशिक प्रश्न निर्माण होतात. प्रादेशिक प्रश्न लोकांच्या आक्षा-आकांक्षा वाढवणारे असतात. आपल्या प्रदेशाला राजकीय दर्जा मिळाल्यास आपली भाषा व संस्कृतीला महत्त्व प्राप्त होईल, रोजगार वाढेल असा विचार मांडता जातो. त्यामुळे लोकांचा राजकीय सहभाग अचानक वाढतो. उदा. धुळे जिल्हाचे विभाजन करून नंदुरबार जिल्हा निर्माण करतात. दोंडाईचा व पिपळनेर या गावांनी तालुक्याची मागणी केली त्यामुळे गावातील जनतेचा राजकीय सहभाग वाढला.

८) दबावगट वा हितसंबंधी गट :- राजकीय सहभागाचा अभ्यास करतांना राजकीय पक्षांच्या खालोखाल दबावगटांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. आधुनिक काळात जनसहभागाला राजकारणात मिळालेल्या महत्त्वामुळे दबावगटांच्या कार्याला महत्त्व प्राप्त होऊ लागलेले आहे. लोकशाही व्यवस्थेत निर्णयप्रक्रियेच्या सुलभीकरणासाठी दबावगटाचे कार्य निर्णायक स्वरूपाचे असते. आधुनिक लोकशाही व्यवस्थेत व्यक्तिगत सहभागापेक्षा संघटित सहभागाला जास्त प्राधान्य दिले जाते. संघटित सहभाग दबावगटांच्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. दबावगट हे प्रामुख्याने समान हितसंबंध असलेल्या व्यक्तीचे गट असतात. राजकीय पक्षाप्रमाणेच त्यांची संघटनात्मक रचना असते. स्वतः सत्ताधीश होण्याऐवजी निर्णय प्रक्रियेला प्रभावित करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्टे असते. विशिष्ट हितसंबंधाच्या परिपूर्तीपूरती दबावगटाची भूमिका मर्यादित असते. हितसंबंधी संघटना शिष्टमंडळ, लॉबिग आणि दडपणाच्या माध्यमातून आपला कार्यभाग साधत असते. हितसंबंधी गटाच्या राजकीय सहभागावर शासनसंस्थेचे स्वरूप आणि कार्यपद्धती, राजकीय पक्षाचे स्वरूप, राजकीय संस्कृतीचे स्वरूप यावर अवलंबून असते. दबाबगटाकडूनवापरली जाणारी तंत्रे सुद्धा व्यवस्थानुरूप भिन्न भिन्न असतात. दबावगट साधारणत: लोकमत अनुकूल करून घेणे, संप, बंद, मोर्चे, घेराव या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनावर दडपण टाकणे, विविध शासकीय कमिटयामध्ये प्रतिनिधित्व मिळवून सत्ताकेंद्राच्या जवळ जाणे, लॉबीत विधिमंडळ सदस्यावर दडपणे आणणे, राजकीय नेते, सनदी अधिकारी यांच्याशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करून किंवा शासनाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्यातून या विविध मार्गातून दबावगर राजकीय सहभाग दर्शवित असतात. राजकीय सहभागातील दबावगटांच्या स्थान व महत्वाचा विचार करता त्यांना विधिमंडळाचे तिसरे सभागृह मानले जाते. अर्थात दबावगटाच्या राजकीय सहभागावर संघटना बांधणी, सदस्याची गुणवत्ता व गटनिष्ठा, नेतृत्व, कौशल्य व आर्थिक परिस्थिती इत्यादी घटकांचा प्रभाव पडत असतो. दबावगटाच्या वरील कार्याचा विचार करता राजकीय सहभागाला प्रभावित करणारा महत्त्वाचा घटक मानला जातो.

९) शिक्षण, उत्पन्न, लिंग व वय :- देशात शिक्षणाचे प्रमाण जास्त असेल तर राजकीय सहभाग वाढतो. सुशिक्षित लोक राजकारणात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. त्यांच्याकडे राजकारणाबद्दलचे आवश्यक ज्ञान असल्याने त्यांचा सहभाग क्रियाशील स्वरूपाचा असतो. उच्च उत्पन्न गटातील लोकांचा उपजीवकेची फारशी चिंता नसते. आधुनिक काळात आर्थिक घटक राजकीय सहभागात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. व्यक्ती आपल्या आर्थिक हिताच्या परिपूर्तीसाठी राजकारणात सहभाग होत आहेत. आर्थिक घटकांच्या वाढत्या महत्त्वातून आधुनिक काळात राजकारणापासून अलिप्त राहणारे उदयोग समूहाचे मालक राजकारणात भाग घेऊ लागल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. आर्थिक हितासोबत आर्थिक प्राप्तीच्या उद्देशाने देखील अनेक व्यक्ती राजकारणात सहभागी होतांना दिसतात. सेवा है राजकारणाचे मूल्य न राहता आर्थिक फायदा मिळविणे हे राजकारणाचे ध्येय बनले आहे. आर्थिक घटकाच्या प्रभावातून राजकारणाचे मोठया प्रमाणावर व्यावसायिकरण होताना दिसते आहे. तसेच त्यांच्याकडे भरपूर मोकळा वेळ असल्याचे त्यांचा राजकीय सहभाग जास्त असतो. वयावरही राजकीय सहभाग अवलंबून असतो. समाजात तरूणांचे प्रमाण जास्त असेल तर त्यांचा राजकारणात जास्त सहभागी असतो. तरुण शारीरिक व मानसिक दृष्टया कणखर आणि उत्साही असल्याने वयोवृद्ध व्यक्तीपेक्षा त्यांचा सहभाग जास्त असतो. लिंगाचा राजकीय सहभागावर परिणाम होतो. स्त्रियाबा पुरुषापेक्षा राजकीय सहभाग कमी असतो. समाजात राजकारण हे क्षेत्र स्त्रियासाठी योग्य नाही हा समज असल्याने स्त्रिया राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत करतात त्यामुळे त्यांचा सहभाग पुरूषांपेक्षा कमी असतो.

 १०) तात्कालिक घटना : राजकारणात काही घटना अचानक घडतात त्याचा समाजावर खोलवर परिणाम होतो. भारतात बाबरी मशिदीचे पतन ही घटना घडली. या घटनेमुळे हिंदू-मुस्लिम परस्परांच्या विरोधी गेले. या घटनेनंतर दोन्ही समाजातील लोकांनी वरचढ ठरण्याच्या भावनेतून राजकीय सहभाग वाढविला.

११) मतदानविषयक अटी:- मतदान विषयक अटींचाही राजकीय सहभागावर परिणाम होता. सुरुवातीच्या काळात मतदानासाठी शिक्षण व संपत्तीची अट असल्यामुळे मर्यादित लोकांना मतदानाचा अधिकार असल्यामुळे इतरांचा राजकीय सहभाग शून्य स्वरूपाचा होता. विसाव्या शतकाच्या आधी कोणत्याही देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार नसल्यामुळे त्यांचा राजकीय सहभागही शून्य स्वरूपाचा होता. मात्र आधुनिक काळात प्रौढ मताधिकाराचे तत्त्व बहुसंख्य देशांनी स्वीकारलेले असल्यामुळे राजकीय सहभागाचे प्रमाण वाढलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.