https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राजकीय सहभाग अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि विशेषतः Meaning, Definition, Nature of Political Participation


 

राजकीय सहभाग अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि विशेषतः Meaning, Definition, Nature of Political Participation

राजकीय सहभागाचे वाढते प्रमाण हे आधुनिक राजकीय व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्टये मानले जाते. प्राचीन काळी राजकीय व्यवस्थेमध्ये लोकांचा सहभाग अत्यंत मर्यादित प्रमाणात होता. प्राचीन ग्रीक नगरराज्यात प्रत्यक्ष लोक असूनही फक्त नागरिकाचा दर्जा असलेल्या व्यक्तींनाच राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार होता. मध्ययुगीन संरजामशाही व राजेशाही व्यवस्थेत राजा मंत्री, सरदार आणि राजघराण्यातील व्यक्तीपुरूता राजकीय सहभाग मर्यादित होता आधुनिक काळात प्रौढ मताधिकाराच्या अधिकारांमुळे सर्व लोकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे सर्वांना राजकीय व्यवस्थेत सहभागी होण्याचाही अधिकार प्राप्त झाला. शासन संस्थेच्या वाढता विस्तार, संघराज्य शासन पद्धती, वाढती प्रसार माध्यमे आणि दळणवळण साधनात झालेली वाढ इत्यादींमुळे राजकीय सहभागाच्या संधी विपुल प्रमाणात व्यक्तीला मिळू लागल्या. राज्याच्या वाढत्या कार्यक्षेत्रामुळे व्यक्ती जीवनातील सर्व क्षेत्रावर राज्यसंस्थेच्या निर्णयाचा प्रभाव पडू लागल्यामुळे या संस्थाच्या कार्याबद्दल व्यक्तीला उदासीन राहणे अशक्य होऊ लागल्यामुळे नागरिक आधुनिक काळात मोठया प्रमाणात राजकीय सहभाग घेऊ लागले आहेत. श्रेष्ठजनवादी सिद्धांताचे अभ्यासक राजकीय व्यवस्थेचा प्रकार लोकशाही असो वा सर्वकषशाही किंवा कोणत्याही प्रकारचा असला तरी सता ही शेवट मूठभर लोकांच्या हातात असते. सत्ता जरी मूठभर लोकांच्या हातात असली तरी या सत्तेला अधिमान्यता मिळविण्यासाठी अभिजनांना प्रयत्न करावा लागत असतो. राजकीय सहभागातून राजकीय व्यवस्थेच्या अधिमान्यतेचा प्रश्न सुटू शकतो. सर्वकष राजकीय व्यवस्था देखील घेतलेल्या निर्णयावर जनतेची मोहर उमटविण्याचा प्रयत्न करत असतात. राजकीय अधिमान्यतेशिवाय राजकीय व्यवस्थेचे स्थैर्य टिकू शकत नाही. म्हणून प्रत्येक राजकीय व्यवस्था राजकीय सहभागाला आधुनिक काळात प्राधान्य देत असते. वाढत्या राजकीय सहभागातून राजकीय व्यवस्थेची अधिमान्यता विकसित करता येऊ शकते.



राजकीय सहभागाची अर्थ व व्याख्या:-

अधिकृतरीत्या मूल्यनिर्धारण करणे हे राजकीय व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण कार्य असते. मूल्यनिर्धारण करत असतांना राजकीय प्रक्रियेत आपल्या स्थान मिळावे किंवा बाटा मिळावा या हेतूने व्यक्ती राजकीय प्रक्रियेत सहभागी असते याचा अर्थ आपल्या गरजाच्या पूर्तीसाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी होत असते. राजकीय भरती प्रक्रियेला प्रभावित करणारा घटक म्हणून राजकीय सहभाग संकल्पनेचा विचार केला जात असतो. राजकीय भरती हा राजकीय सहभागचा एक प्रकार मानला जातो. सुरूवातीला राजकीय सहभाग प्रक्रियेचा विचार मतदानापुरता मर्यादित होता. मतदान प्रक्रियेतील सहभाग हा तात्पुरता राजकीय सहभागाचा प्रकार मानला जातो. परंतु आज मतदानाव्यक्तिरीक्त राजकीय सहभागाचे अनेक मार्ग आणि पातळ्यांचे अध्ययन अभ्यासकांनी सुरू केलेले आहे. यातून राजकीय सहभाग संकल्पनेच्या व्यापक आशय लक्षात येतो. प्रतिनिधिक लोकशाहीच्या विकासापूर्वी राजकीय सहभाग मर्यादित वर्गापुरता मर्यादित होता. आज राजकीय सहभागाचे गुणात्मक व संख्यात्मक व्याप्ती वाढत गेल्यामुळे ही संकल्पना आधुनिक काळात व्यापक बनली आहे.

१) मॅक्सोली : शासकाच्या निवड प्रक्रियेत व सार्वजनिक धोरण निर्मिती प्रक्रियेत लोकांचा जो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असतो त्याला राजकीय सहभाग असे म्हणतात.

२) डेव्हिड ईस्टन : विशिष्ट भूप्रदेशात राहणारा लोकसमूह जो सार्वजनिक निर्णय घेता त्या प्रक्रियेत लोकांनी घेतलेला भाग हा राजकीय सहभाग असतो.

३) सिडने व्हर्बा : राजकीय सहभाग म्हणजे सर्वसाधारण जनतेची विधिसमत क्रिया की ज्याद्वारे राजकीय पदाधिकाऱ्यांची निवड आणि त्यांच्याद्वारे जाणाच्या निर्णयांना प्रभावित करणारी प्रक्रिया होय.

वरील व्याख्यावरून लक्षात येते की, राजकीय सहभाग ही मतदानापुरती मर्यादित प्रक्रिया नसून व्यापक, कायमस्वरूपी आणि दीर्घमुदतीची प्रक्रिया आहे. राजनीतिक पदाधिकाऱ्यांची निवड आणि निर्णय प्रक्रियेला प्रभावित करणे या राजकीय कृतीचा समावेश राजकीय सहभागात समावेश होता. राजकीय सहभागात समाजातील सदस्य प्रत्यक्षाप्रत्यक्ष मार्गाने सहभागी होत असते. 

राजकीय सहभागाचे स्वरूप आणि विशेषतः - राजकीय सहभाग संकल्पनेचे अनेक विशेषत: सांगितल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे होत.

१) राजकीय सहभागाची पहिली विशेषत: म्हणजे राजकीय क्रिया किंवा राजकीय कृतीचा समावेश राजकीय सहभागात केला जात असतो. मनुष्य एखादया राजकीय कृती वा क्रियेत सहभागी म्हणजे राजकीय सहभाग दर्शविणे असे मानले जाते. राजकीय सहभाग दर्शविण्यासाठी व्यक्ती विविध साधनाचा उपयोग करत असतो. हितसंबंधी गट, दबावगट, राजकीय पक्ष इत्यादी साधनाद्वारे व्यक्ती राजकीय सहभाग घेत असतो.

२) राजकीय सहभागात राजकीय पक्ष आणि हितसंबंधी गट महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. कोणताही नागरिक राजकीय कृती भाग घेत असताना दबाव गट किंवा राजकीय पक्षाच्या माध्यमातून राजकीय सहभाग घेत असतात. व्यक्तीला राजकीय चेतना पुरवून तिचे राजकीय सामाजीकरण घडवून आणण्याचे कार्य दबावगट आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून सातत्याने सुरू असते. निवडणुकीच्या काळात राजकीय प्रचार मोहिमाच्या माध्यमातून जनतेचे राजकीय सामाजीकरण घडवून त्यांना मतदान देण्यासाठीप्रोत्साहित करत असतात. प्रचार यंत्रणेने निर्माण केलेल्या वातावरण निर्मितीतून मतदानाचे प्रमाण वाढल्याचे अनेक अभ्यासकांनी समप्रमाणात सिद्ध करून दिलेले आहे.

३) राजकीय सहभागाचे वैशिष्टये म्हणजे राजनीतिकरण प्रक्रियेला गती देणे होय. राजकीय सामाजीकरणाच्या विभिन्न अभिकरणामार्फत व्यक्तीचे राजकीय सामाजीकरण होत असते. या प्रक्रियेतून व्यक्तीला राजकीय माहिती मिळते. असते. त्या माहितीच्या आधारावर व्यक्तीची राजकीय मूल्ये वा मते निश्चित होत असतात. राजकीय व्यवस्थेच्या गतिमान राजकीयकरणातून लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी पूरक वातावरण निर्माण होत असते. लोकशाहीच्या स्थैर्यासाठी राजकीयकरण होणे आवश्यक असते हे कार्य राजकीय सहभागाच्या माध्यमातून साध्य होऊ शकते.

४) राजकीय सहभाग ही प्रक्रिया शासनाच्या निर्णय प्रक्रियेला प्रभावित करत असते. राजकीय सहभागाच्या माध्यमातून व्यक्तीचा राजकीय व्यवस्थेतील विविध स्तर आणि संरचनाशी संपर्क प्रस्थापित होत असतो. बहुसंख्य व्यक्ती राजकीय पक्ष आणि दबावगट या संघटित साधनाच्या माध्यमातून राजकीय सहभाग घेत असतात आणि या माध्यमाचा वापर करून शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर दडपण आणून आपल्याला अनुकूल निर्णय घेण्यास बाध्य करत असतात. उमेदवारास निवडून आणण्यास सहकार्य करणे, निवडणुकीसाठी पक्षाला निधी देणे इत्यादी वैयक्तिक मार्गातूनही व्यक्ती भावी काळात दबाव तंत्र विकसित करू शकतो.

 ५) राजकीय सहभाग ही एक संचयी वा समुच्चयी क्रिया आहे. व्यक्ती एखादी राजकीय कृती करतो त्यासोबत इतरांनी कृती करावी यासाठी प्रोत्साहन देत असतो. उदा. मतदार स्वतः मतदान करतो त्यासोबत इतरांनी मतदान करावे म्हणून प्रचार प्रसार देखील करत असतो. म्हणजे राजकीय सहभागाचा केंद्र समूह किंवा दलाऐवजी एक व्यक्ती असते. व्यक्ती विविध मार्गाचा वापर करून राजकीय सहभाग घेत असते..

६) राजकीय सहभागाचे शेवटची विशेषतः म्हणजे राजकीय सहभाग हा राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत असतो. राजकीय व्यवस्थेच्या परिधाबाहेर राजकीय सहभागाचे अस्तित्व असू शकत नाही. राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत विभिन्न अभिकरणे. संरचना यात घेतलेल्या सहभागाचा राजकीय सहभाग संकल्पनेत समाविष्ठ होतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.