https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

2024 ची लोकसभा निवडणूक आणि काँग्रेस पक्ष


 2024 ची लोकसभा निवडणूक आणि काँग्रेस पक्ष

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पुनरुज्जीवन होईल का? 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी निर्माण होईल का? 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हा प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उदयाला येईल का? या तिन्ही प्रश्नांची चर्चा 2024 च्या निवडणुकीच्या आधी प्रसिद्धी माध्यमे आणि राजकारणांमध्ये सुरू झालेली आहे. या चर्चेचा पहिला प्रश्न म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल किंवा तिचे पुनरुज्जीवन का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे फारसे कठीण नाही. 'भारत जोडो यात्रे' च्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रमाणात पक्षातली मरगळ दूर झाली. राहुल गांधीच्या नेतृत्वाबद्दल प्रसिद्धी माध्यमांमध्ये नव्याने विचार होऊ लागला. त्यांच्या काल्पनिकरित्या उभ्या केलेल्या 'पप्पू' प्रतिमेला पुसण्यास यात्रेने मदत केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नव्हता. त्यामुळे पक्षाला फार मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत होते. या टीकेला उत्तर देण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका घेऊन काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खरगे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. मात्र काँग्रेस पक्षाने उचललेली सर्व पाऊले 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी पुरेशी नाहीत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाचे संघटन फार मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. पक्षातील अनेक नेत्यांनी भाजप किंवा इतर विरोधी पक्षांमध्ये प्रवेश केला. पंजाब, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यात काँग्रेसला निवडणुकीत यश मिळाले. परंतु पक्षातील गटबाजीला आवर घालण्यास केंद्रीय नेतृत्वाला अपयश आल्यामुळे पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यातील सत्ता काँग्रेसला गमवावी लागली. राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात देखील सत्ता असली तरी पक्ष मोठ्या प्रमाणावर गटबाजीने पोखरला गेलेला आहे. पक्षातील ही बेबंदशाही आणि गटबाजी रोखून एकजूट निर्माण करून भक्कम संघटना उभी करण्याचे प्रयत्न आजही काँग्रेस पक्षात होताना दिसत नाही. पक्षाचे संघटन भक्कम असल्याशिवाय निव्वळ राहुल गांधीच्या प्रतिमेच्या जोरावर 2024 च्या निवडणुकीत पक्षाला यश प्राप्त होण्याची किंवा गतवैभव प्राप्त होण्याची सुतराम शक्यता वाटत नाही. काँग्रेस पक्षाने आपला पक्ष किती लोकशाहीवादी आहे हे दर्शवण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या. परंतु या निवडणुकीत गांधी घराण्याचे पसंतीचे उमेदवार सुरुवातीला अशोक गहलोत होते. परंतु ते एकाच वेळेस मुख्यमंत्री पद आणि पक्ष अध्यक्षपद सोबत ठेवू इच्छित होते. परंतु राहुल गांधी यांनी 'एक व्यक्ती एक पद' चा आग्रह धरल्यामुळे त्यांचे नाव आपोआप मागे पडले या उदाहरणावरून काँग्रेस पक्ष अध्यक्ष पदाला फारशी किंमत नाही हे दिसून येते. गांधी घराण्याच्या पाठिंब्याने मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या विरोधात शशी थरूर यांनी निवडणूक लढवली. खरगे हे निवडून आल्यानंतर त्यांनी निर्माण केलेल्या नव्या टीम मध्ये शशी थरूर यांना स्थान दिले नाही यावरून काँग्रेस पक्षातील लोकशाही किती तकलादू आहे हे दिसून येते.

भारतीय जनता पक्षाला 2014 नंतर सातत्याने निवडणुकीमध्ये यश मिळवून देण्यासाठी पक्षाचे भक्कम नेतृत्व जितके जबाबदार आहे त्यासोबत पक्षाची भक्कम संघटना, प्रत्येक निवडणुका इर्षने लढवण्याची मनोवृत्ती आणि सहयोगी संघटनांची मदत कारणीभूत मानले जाते. काँग्रेस पक्षाकडे राहुल गांधी सारखे नेतृत्व असले तरी नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला शह देऊ इतके प्रभावशाली नाही. भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींच्या नेतृत्वाचा काही प्रमाणात प्रभाव वाढलेला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सिलसिला कमी झालेला नाही. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात केल्या जाणाऱ्या वक्तव्यांचा लाभ पक्षाला होण्याऐवजी नुकसान होत आहे. भारतीय जनता पक्ष नेमक्या याच वक्तव्यांचा आधार घेऊन काँग्रेसची आणि राहुल गांधीची कोंडी करण्यात यशस्वी झालेले आहेत.

2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भक्कम पक्ष संघटना विकसित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने फारशी गंभीर पावले उचलल्याचे ऐकिवात नाही. भक्कम संघटनेच्या आधाराशिवाय निव्वळ सहानुभूतीच्या जोरावर काँग्रेस पक्षाला यश प्राप्त होईल असे म्हणणे एक दिवा स्वप्न आहे. भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत प्रचंड ताकदीने सामोरा जातो. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करतो. मात्र काँग्रेस पक्षाकडून असे प्रयत्न होताना फारसे दिसत नाही. गुजरात सारख्या महत्त्वाची  राज्याची निवडणूक असताना राहुल गांधी यांच्या फक्त दोन सभा झाल्या याउलट पंतप्रधानांनी अनेक सभा घेऊन संपूर्ण गुजरात पिंजून काढला. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीकडे राहुल गांधी यांनी पाठ फिरवली फक्त प्रियंका गांधी यांच्या मर्यादित ठिकाणी सभा झाल्या. ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड सारख्या राज्यात झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेस नेतृत्वाकडून फारसा प्रभावी प्रचार न झाल्यामुळे निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडे निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक मनोवृत्तीचा अभाव असताना निव्वळ अँटीइन्कमबन्सीचा वा सरकारविरोधी लाटेचा लाभ मिळून 2024 मध्ये काँग्रेस पक्षाला सत्ता मिळेल आशा आशावाद व्यक्त करणे व्यर्थ आहे.

भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत विजय प्राप्त करून देण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि इतर सहयोगी हिंदुत्ववादी संघटनांचा खूप मोठा वाटा असतो हे ईशान्य भारतात भाजपला मिळालेल्या यशावरून सिद्ध झालेले आहे. ईशान्य भारतात भारतीय जनता पक्ष रुजवण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा फार मोठा वाटा आहे. काँग्रेस पक्षाकडे देखील पूर्वी अशा विद्यार्थी, कामगार आणि विविध घटकांच्या सहयोगी संघटना होत्या. परंतु आज या संघटना फक्त नावापुरत्या उरलेल्या आहेत. उदा. युवक काँग्रेस या संघटना पक्ष वाढीसाठी काम करण्यापेक्षा पक्षातील नेत्यांची मुले आणि नातेवाईकांना प्रोजेक्ट करण्याचे काम करत असल्यामुळे जनतेत त्यांचा फारसा प्रभाव उरलेला नाही. अशा परिस्थितीत निव्वळ पक्ष संघटनेच्या जोरावर 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळण्याची फारशी शक्यता दिसून येत नाही.

भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीसाठी वेगळी रणनीती आखतो वेळप्रसंगी आपल्या कार्यक्रमांना मुरड घालून विविध पक्षांची युती करतो वा मोडतो. उदा. जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुक्ती यांच्या पक्षासोबत युती भाजपची ही रणनीती पक्षाला यश प्राप्त करून देते. गोवा आणि ईशान्य भारतामध्ये विशेषत: ख्रिश्चन अल्पसंख्याकांचे प्रमाण जास्त असूनही स्थानिक पक्षांशी युती करून भाजप सत्तेचा भागीदार बनला. परंतु काँग्रेस पक्षाकडून असे प्रयोग फारसे होताना दिसत नाही. या सर्व चर्चेवरून असे लक्षात येते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फारसे यश प्राप्त होईल असे दिसत नाही.

दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी निर्माण होईल का? या ही प्रश्नाचे उत्तर अत्यंत सोपे आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसून येत नाही. सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या काही बैठका घेण्याचा प्रयत्न जरूर केलेला दिसतो परंतु या बैठकांना अनेक पक्षाचे नेते गैरहजर होते. कारण तिसऱ्या आघाडीत समाविष्ट होऊ इच्छिणारे अनेक पक्ष त्या त्या राज्यात काँग्रेसचे प्रतिस्पर्धी आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीत आपण सहभागी झाल्यास आपले महत्त्व कमी होईल असे या पक्षांना वाटत असल्या कारणाने ते फारसा प्रतिसाद देत नाही. भारतातील अनेक पक्षांना राहुल गांधी यांनी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची कल्पना मान्य नाही. त्यामुळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला वगळून शरद पवार, नितीश कुमार किंवा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी निर्माण करण्याच्या मानसिकतेत आहेत. के. चंद्रशेखर सारखा नेता काँग्रेसला वगळून स्वतंत्र आघाडी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये दौरे करत आहे. आम आदमी पक्षाला आघाडीत स्थान देण्यास काँग्रेस राजी नाही याचा सरळ अर्थ असा आहे की काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी निर्माण होणार नाही फार तर काही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष प्रादेशिक पक्षांची युती करून निवडणुकीला सामोरे जाईल. उदा. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती करून निवडणुका लढवल्या जातील. या परिस्थितीत काँग्रेसला काही ठळक पक्षांची युती करून निवडणुका लढवेल.

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष प्रभावी विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात येईल का? या ही प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अधिकृत विरोधी पक्षाचा दर्जा प्राप्त होईल एवढ्या देखील जागा लोकसभेत मिळालेल्या नव्हत्या. 2024 च्या निवडणुकी नंतर यात फारसा फरक पडेल असे आज तरी दिसून येत नाही. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा काही प्रमाणात वाढतील. अधिकृत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला दर्जा देखील प्राप्त होईल. परंतु काँग्रेस पक्षाला भक्कम विरोधी पक्षाचा दर्जा प्राप्त होईल एवढ्या जागा प्राप्त होण्याची फारशी आशा वाटत नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी निर्माण होण्याची सकारात्मक चिन्हे नाहीत. प्रभावशाली नेतृत्व, भक्कम पक्ष संघटना, सहयोगी संघटनांची साथ, निवडणुका जिंकण्याची मानसिकता, निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक रणनीती, पक्ष वाढीसाठी व्यापक प्रयत्न, पक्षाच्या संघटनेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी होणारे प्रयत्न इत्यादींचा अभाव दिसून येत असल्यामुळे काँग्रेस पक्षाला 2024 च्या निवडणुकीत एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त यश मिळण्याचे भाकीत करणे योग्य ठरणार नाही.




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.