https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

कसबा मतदार संघातील भाजप पराभवाची कारणमीमांसा वा विश्लेषण


 कसबा मतदार संघातील भाजप पराभवाची कारणमीमांसा वा विश्लेषण

कसबा मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांची पोट निवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान झाले आणि दोन मार्चला निकाल लागला. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय प्राप्त केला तर बीजेपीचे हेमंत रासने यांना पराभव पहावा लागला. रवींद्र धंगेकर यांना 73194 तर हेमंत रासने यांना 62224 मते मिळाली. चिंचवडच्या जागेवर भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला. या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचंड मेहनत घेतली. मुख्यमंत्री शिंदे देखील प्रचारात सहभागी झाले परंतु तरीही कसबा मतदार संघात भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त झाला नाही. कसबा मतदार संघात भाजपचा पराभव का झाला याबद्दल नवभारत टाईमचे पत्रकार सचिन परब यांच्या मते, कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला विजयाबाबत असलेल्या अति आत्मविश्वासाने पक्षाचा घात केला. मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींनी पक्षाकडे तिकीट मागितले होते परंतु भाजपने हेमंत रासने यांना तिकीट दिले. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या मृत्यूच्या सहानभूतीचा लाभ पक्षाला मिळालेला नाही. वास्तविक गेल्या 28 वर्षापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता अशा मतदारसंघात भाजपचा पराभव होणे हा पक्षाला मोठा धक्का मानला जातो. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ही पहिली पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी अत्यंत एकजुटीने प्रचार केल्यामुळे विजय प्राप्त झाला. दुसरं महत्त्वाचं कारण असं सांगितलं जातं की रवींद्र धंगेकर हे ओबीसी समाजाचे आहेत. या मतदारसंघात ओबीसी समाजाची निर्णायक स्वरूपाची मत आहेत. तसेच या आधीही 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर त्यांनी गिरीश बापट यांना टक्कर दिली होती. त्यावेळेस बापट फक्त सात हजार मतांनी निवडून आले होते म्हणून रवींद्र धंगेकर सारखा प्रभावी उमेदवार महाविकास आघाडीने दिल्यामुळे या जागेवर भाजपचा पराभव झाला.

    राजकीय विश्लेषक सुरेश माने यांच्या मते, कसबा मतदार संघातील भाजपच्या पराभवाला चार कारणे कारणीभूत आहेत. पहिले कारण म्हणजे या जागेवर भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही. त्यामुळे नाराज ब्राह्मण समाजाने भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीला मते दिली कारण या मतदारसंघावर ब्राह्मण समाजाची अनेक दिवसापासून पकड होती या आधीचे गिरीश बापट आणि मुक्ता टिळक हे ब्राह्मण उमेदवार निवडून आले होते.

    दुसरे कारण म्हणजे खासदार गिरीश बापट आजारी असताना देखील भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रचारात उतरवले ही गोष्ट मतदाराच्या पचनी पाडली नाही. तिसरं कारण म्हणजे शिवसेना पक्षावर भाजपच्या मदतीने शिंदे गटाने केलेल्या कब्जामुळे कट्टर शिवसैनिकांनी भाजपचा पराभव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रचारात भाग घेतला. शिवसैनिकांनी उचललेल्या पावलामुळे देखील भाजपला पराभव पत्करावा लागला. चौथे कारण म्हणजे कसबा मतदारसंघात ओबीसी आणि अल्पसंख्यांक समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदान आहे या दोन्ही समाजातल्या लोकांनी एकजूट होऊन भाजपच्या विरोधात मतदान केल्यामुळे भाजपला हार पत्करावी लागली.

कसबा मतदार संघातील पराभव भारतीय जनता पक्षाला आत्मचिंतन करण्यास भाग पडणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उत्साहाने करणार आहे. तिने पक्षातल्या लोकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास भाजप आणि शिंदे गटाला पराभूत करू शकतो हा संदेश या पोटनिवडणुकीने मिळाला.

कसबा मतदार संघातील भाजप पराभवाची कारणे

       कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला विजयाबाबत असलेल्या अति आत्मविश्वास घातक ठरला.

       मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींला  पक्षाने तिकीट देणे.

       भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही.

       खासदार गिरीश बापट आजारी असताना देखील भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रचारात उतरवणे

       महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी अत्यंत एकजुटीने प्रचार केल्यामुळे विजय प्राप्त झाला.

       रवींद्र धंगेकर सारख्या प्रभावी उमेदवारास कॉंग्रेसने तिकीट दिले.

       कसबा मतदारसंघात ओबीसी आणि अल्पसंख्यांक समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदाराची संख्या

       कट्टर शिवसैनिकांचा निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग घेतला.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.