भाजपच्या विजयाची पंचसूत्री
हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीनंतर
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश प्राप्त केले. 2014 ते 2024 या दहा वर्षाच्या कालखंडात काही निवडणुकाचा
अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक यशाचे सातत्य टिकून ठेवले आहे. सलग तीन
लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला. भारतातील अनेक राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आहे.
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने 288 पैकी 230 जागांवर यश संपादन केले. गेल्या 30-35 वर्षानंतर सत्ताधारी पक्षाला
एवढ्या प्रचंड प्रमाणात यश संपादन केल्याचे प्रथम उदाहरण आहे. महायुतीतील प्रमुख
घटक पक्ष असलेल्या भाजपने 149 जागा लढवून
132
जागांवर
विजय मिळवला. एकूण मतदानापैकी 26.77 टक्के मते एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. भाजपला एवढ्या
प्रचंड प्रमाणावर यश प्राप्त करून देण्यास पुढील पंचसूत्री कारणीभूत मानली जाते.
हिंदुत्व-भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे
बहुपदरी स्वरूपाची आहे. हिंदुत्वाचा पहिला पदर धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणणे आहे.
हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातल्या लोकांमधल्या तणाव आणि संघर्षाचा वापर करून
भाजप धार्मिक ध्रुवीकरण घडून आणते. त्यासाठी 80 विरुद्ध 20 चे समीकरण, बटेंगे तो कटेंगे, एक हे तो सेफ है अशा घोषणांच्या
माध्यमातून हिंदूंचे राजकीयकरण करून भाजप निवडणुकांमध्ये लाभ उठवत असते. भाजपचे
हिंदुत्वाचा दुसरा पदर म्हणजे हिंदुत्वासाठी कार्य करत असलेल्या विविध सामाजिक आणि
सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था, संघटना आणि व्यक्तींशी जवळीक साधणे
होय. हिंदुत्वासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार करण्याचे काम हे घटक निवडणूक असताना
आणि निवडणूक नसताना देखील सातत्याने करत असतात. महाराष्ट्रात देखील भारतीय जनता
पक्षाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सावरकर विचारधारेवर
आधारित संघटना, भिडे
गुरुजी, कीर्तनकार, अध्यात्मिक प्रवचन देणारे संत,
महंत इत्यादींशी सातत्याने संवाद प्रस्थापित केला. परिणामतः या लोकांनी
निवडणुकीच्या काळात भाजपला अनुकूल भूमिका घेतलेली दिसते. अनेकांनी उघड उघड
हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करा असे आव्हान देखील केलेले दिसून येते. भाजपच्या
हिंदुत्वाचा तिसरा पदर म्हणजे हिंदुत्वाला विकासाची दिलेली जोड होय. भाजप
सातत्याने हिंदुत्वा सोबत विकासाची चर्चा करताना दिसतो. महाराष्ट्राच्या विधानसभा
निवडणुकीत प्रचार करताना भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी महायुती विकासवादी आणि
महाविकास आघाडी विकास विरोधी हा नरेटिव्ह सेट केलेला होता. भाजपला मत म्हणजे
विकासाला मत हे समीकरण हिंदुत्वाच्या परिघाबाहेर असलेल्या वर्गाला देखील आकर्षित
करते. भाजपच्या हिंदुत्वाचा चौथा पदर म्हणजे हिंदुत्वादाला राष्ट्रवादीची दिलेली
जोड मानली जाते. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व हे भाजपच्या प्रचाराचे 2014 पासून प्रमुख सूत्र बनले आहे.
भारतातील हिंदुत्ववादी नेतेच खरे राष्ट्रवादी आहेत. त्यांना राष्ट्रहिताची कळकळ
आहे; तळमळ आहे. भाजप
नेते विरोधकांचा उल्लेख तुकडे तुकडेची गॅंग, शहरी नक्षलवादी, दहशतवादाचे समर्थक अशी करतात.
भाजपच्या हिंदुत्वाचा पाचवा पदर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या
संघटनांची साथ मानला जातो. लोकसभा निवडणुकीत संघा संदर्भात केलेल्या उलट सुलट
विधानामुळे संघ निवडणुकीपासून अलिप्त राहिला. त्याचा फार मोठा फटका देशात आणि
विशेषत: महाराष्ट्रात भाजपला बसला. हीच चूक भारतीय जनता पक्षाने विधानसभा
निवडणुकीत दुरुस्त केली. संघांच्या नेत्यांच्या मदतीने लोकसभेतील पराभवाचे
आत्मचिंतन केले. विधानसभेत असा फटका पुन्हा बसू नये म्हणून संघाच्या सल्ल्याने
मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म नियोजन केले. संघ आणि भाजपमध्ये समन्वय निर्माण
करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या गेल्या. परिणामतः संघ आणि त्यांच्याशी संलग्न
असलेल्या अनेक संघटनांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला.
संघाने घेतलेल्या मेहनतीचा फार मोठा फायदा महायुतीला झाल्याचे बोलले जाते.
प्रभावी नेतृत्व आणि भक्कम संघटन-भारतीय जनता पक्षाला
निवडणुकीमध्ये सातत्याने यश मिळवून देण्यात या घटकांचा देखील फार मोठा वाटा आहे.
भारतीय जनता पक्षाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे प्रभावी आणि आकर्षक नेतृत्व
आहे. भारतात विरोधी पक्षा सोबत नेतृत्वाची तुलना करताना पंतप्रधान मोदींचे नेतृत्व
नेहमीच उजवे ठरते. पंतप्रधानांचा भारतीय लोकमतावरील असलेल्या प्रभावाचा फायदा
बहुसंख्य निवडणुकीमध्ये भाजपला झालेला दिसून येतो. पंतप्रधानाची प्रतिमा लक्षात
घेऊन भाजप सातत्याने त्यांच्या नावाने निवडणुका लढवितांना दिसते. महाराष्ट्राची
निवडणूक जरी प्रत्यक्ष पंतप्रधानाच्या नावाने लढवलेली नसली तरी पंतप्रधानांना साथ देण्यासाठी
डबल इंजिन सरकारची गरज आहे. देशाचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्राची साथ आवश्यक
आहे अशा भावनिक आव्हानामधून महाराष्ट्राच्या जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीत केलेला दिसून येतो. देशपातळीवर नेतृत्वासोबत भाजपकडे अनेक
दुय्यम दर्जांच्या नेत्यांची साखळी दिसून येते. राज्य पातळीवर देखील भाजपने मोठ्या
प्रमाणावर नेतृत्वाचा विकास घडवून आणलेला आहे. भाजपकडे जवळपास प्रत्येक
राज्यामध्ये सक्षम नेतृत्व उपलब्ध आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारखे
प्रभावशाली नेतृत्व भाजपकडे उपलब्ध आहे. देवेंद्र फडणवीस यांना शह देऊ शकेल असे
नेतृत्व विरोधी पक्षाकडे उपलब्ध नाही. भाजपची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस
यांच्या हाती सत्तेचे सूत्रे येतील या भावनेने देखील अनेक मतदारांनी भाजपला मतदान
केलेले दिसते. भारतीय जनता पक्षाचे संघटन भारतात सर्वात प्रभावी मानले जाते. भाजप
हा भारतातील सर्वाधिक पक्ष सदस्य असलेला पक्ष आहे. भक्कम संघटनेच्या जोरावर भाजप
अनेकदा विरोधी पक्षांवर मात करताना दिसतो. भारतात विरोधी पक्षांकडे ग्राउंड लेबल
फारसे संघटन दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपने
आपल्या भक्कम संघटनेच्या जोरावर बुथ लेवलवर अत्यंत सूक्ष्म नियोजन करून मतदानाची
टक्केवारी वाढवली. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा सर्वाधिक फायदा महायुतीला
मिळाल्याचे निकालावरून दिसून येते.
लोक कल्याणकारी योजना-भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत
यश मिळून देण्यात लोक कल्याणकारी योजनांचा देखील मोठा वाटा दिसून येतो. महाराष्ट्र
संदर्भात विचार करायचा झाला तर लाडकी बहीण योजना, मुंबईसाठी जाहीर केलेली टोल माफी, विज बिल माफी, सणासुदीला रेशन मध्ये भेट वस्तू
वाटप, मोफत रेशन, ज्येष्ठ नागरिकांना बस मोफत
प्रवास, महिलांना
बस मध्ये अर्धे तिकीट, तरुणांना
रोजगाराभिमुख प्रशिक्षण भत्ता इत्यादी योजना महायुती सरकारने राबविल्या. या
कल्याणकारी योजना राबविताना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत कशा पोहोचतील याचे
उत्तम नियोजन महाराष्ट्रात महायुती सरकारने केले. आपले सरकारच ह्या योजना राबवू
शकते. विरोधी पक्षाचे सरकार आले तर ते योजना बंद करतील असा उघड उघड प्रचार केला
गेला. उदा. लाडकी बहिणी योजना परिणामत: कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांनी
भाजपच्या झोळीत भरभरून मते टाकलेली दिसतात.
विरोधी पक्ष कमजोर करणे-भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक
यशात या सूत्राचा देखील मोठा वाटा दिसून येतो. 2014 मध्ये भाजपचे केंद्रात सरकार आल्यानंतर
मोठ्या प्रमाणावर ईडी, सीबीआय आणि
इतर केंद्रीय यंत्रणांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षातल्या
नेत्यांमध्ये भीती व तणावाचे वातावरण निर्माण केले. तणावातून सुटका करून
घेण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे पसंत केले.
महाराष्ट्रात देखील अनेक विरोधी प्रमुख पक्षाचे नेते भाजपमध्ये आल्यामुळे विरोधी
पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर कमी झाली. भाजपने निव्वळ विरोधी पक्षातले नेते
आपल्या पक्षात
घेतले नाही तर विरोधी पक्षांमध्ये मोठ्या फुट देखील घडवून आणल्या. उदा. शिवसेना
आणि राष्ट्रवादीतील फूट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट
बाहेर पडला. अजित पवार यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील मोठा गट बाहेर पडला.
शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षात मोठी फूट
पडल्यामुळे भाजपला शह देणारा प्रतिस्पर्धी पक्ष राहिला नाही. महाराष्ट्रातील
काँग्रेस पक्षात फूट पडलेली नसली तरी काँग्रेसचे अनेक नेते व आमदारांनी भाजप आणि
महायुतीतील घटक पक्षांमध्ये निवडणुकीच्या आधीच प्रवेश केलेला दिसून येतो. केंद्रीय
यंत्रणांचा वापर, विरोधी
पक्षांमध्ये घडवून आणलेली फाटाफूटीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडे अनेक
मतदारसंघांमध्ये सक्षम उमेदवार नव्हते. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी नवख्या
उमेदवारांना तिकीट वाटप केले. हे नवखे उमेदवार भाजपच्या प्रचंड ताकदी पुढे टिकू शकले नाही. तसेच विरोधी
पक्षांना काही ठळक आणि मोजक्या नेत्यांना घेऊनच आपली प्रचार यंत्रणा राबवावी
लागली. प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी आवश्यक दुय्यम नेत्यांची फौजच उपलब्ध
नसल्यामुळे प्रचारात मोठ्या प्रमाणावर विस्कळीतपणा आला. विरोधी पक्षातल्या अनेक
उमेदवारांना पक्षाच्या ताकदीचे फारसे पाठबळ उपलब्ध होऊ शकले नाही याच कारणामुळे
अनेक मतदारसंघात भाजपची सरशी झाली.
समाज घटकांची नाराजी दूर करण्यात
यश-लोकसभा
निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला फटका बसण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकरी, ओबीसी आणि मराठा समाजाची नाराजी
मानली. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका पुन्हा बसू नये म्हणून मराठवाड्यात
मोठ्या प्रमाणावर मराठा उमेदवार देण्याची रणनीती आखली केली. मराठा आरक्षण
देण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न लोकांपर्यंत पोचवण्याचा मोठ्या प्रमाणावर
प्रयत्न केला गेला. भाजपची ही खेळी मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेली दिसून येते.
मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली
होती. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी काम करणाऱ्या
संघटना आणि नेत्यांच्या मदतीने मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यांमध्ये
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची हमी देण्यात आली. सरकारमध्ये असलेल्या
अनेक ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक ताकद देण्यात आली उदा. छगन भुजबळ ओबीसींसाठी
भाजपने केलेल्या प्रयत्नांमुळे या समाजाने मोठ्या प्रमाणावर विधानसभा निवडणुकीत
भाजपला साथ दिल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीत भाजपला शेतकऱ्यांची नाराजी
देखील भोवली. कांदा निर्यातीवर बंदी लादल्यामुळे शेतकऱ्यांनी उघड उघड लोकसभा
निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ दिली. शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून
भाजपने निवडणुकीच्या आधीच कांद्यावरील निर्यात बंदी उठवली. विदर्भामध्ये देखील
सोयाबीनच्या भावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. देवेंद्र फडणवीस यांनी
सोयाबीनच्या हमीभावाबाबत शेतकऱ्यांना आश्वत केले. महायुती सरकारने उचललेल्या
सकारात्मक पावलामुळे शेतकऱ्यांमधली नाराजी दूर झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत या
सर्व घटकांनी सहकार्य केल्यामुळे महायुती सरकारला घवघवीत यश प्राप्त झाले.
भारतीय जनता पक्षाला
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यास वरील पंचसूत्रीने फार मोठा
हातभार लावलेला दिसून येतो. भारतीय जनता पक्ष निवडणूक कोणतीही असली तरी पूर्ण
ताकदीने निवडणुकीला सामोरे जातात. पक्षातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन विरोधकांवर
आक्रमकपणे हल्ला करतात. 'आक्रमणातच खरे संरक्षण' हा मूलमंत्र प्रचार यंत्रणा राबवताना
अंमलात आणला जातो. भाजपची ही रणनीती विरोधकांना स्पर्धेतून बाद करण्यास उपयोगी ठरत
असते. या पंचसूत्री शिवाय लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांमध्ये निर्माण झालेला अति
आत्मविश्वास, जागा
वाटपाचा घोळ, महाविकास
आघाडीतील नेत्यांमधील समन्वयाचा अभाव, मुख्यमंत्री पदासाठी झालेली स्पर्धा, आघाडीतल्या नेत्यांची आरोप प्रत्यारोप, एकनाथ शिंदे यांची प्रतिमा
इत्यादी कारणांनी देखील भाजपच्या महाविजयास हातभार लावलेला दिसून येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.