पश्चिम बंगालच्या निवडणुक निकालाचाअन्वयार्थ-
2 मे 2021 रोजी केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. परंतु पाच राज्यांच्या निवडणुकी पैकी सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल होत आहे. बंगालच्या निवडणुकीबद्दल सर्वाधिक चर्चा होण्याचे कारण म्हणजे गेल्या तीन-चार वर्षापासून भाजपने बंगाल मध्ये सत्ता मिळवण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली होती. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी निवडणुकीच्या आधीपासून व्यापक स्वरूपाचे प्रयत्न सुरू होते. ममता बॅनर्जी ना एकटे पडण्यासाठी त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. या प्रयत्नांना व्यापक यश मिळाले तृणमूल काँग्रेसमधील अनेक महत्वपूर्ण नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश केलेल्या नेत्यांना बक्षीस म्हणून निवडणुकीत तिकीट देण्यात आली.
• निवडणुकीच्या आधीपासूनच गृहमंत्री अमित शहा, राज्याच्या संघटनेत काम करणाऱ्या नेत्यांनी संपूर्ण बंगाल पिंजून काढला होता. बंगालची सत्ता काबीज करणे या उद्देशाने प्रचार यंत्रणा उभी केली गेली. निवडणुकीच्या आधीपासूनच बंगालच्या विजयासाठी भाजपने जीवाचे रान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून निवडणूक आयोगाला हाताशी धरून आठ टप्प्यात बंगालची निवडणूक घेण्यास भाग पाडले अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. परंतु एवढे सर्व करूनही भाजपच्या वाट्याला फक्त 77 जागा मिळाल्या.
• पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने उत्तम तयारी करून आणि संपूर्ण ताकद लावून ही पराभूत का झाला याचे अनेक कारणे आता समोर आलेली आहेत.
• भाजपच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे बंगालमधील कमजोर संघटन मानले जाते. दोनशे जागा मिळवण्याच्या घोषणा करणाऱ्या भाजप कडे पुरेशी उमेदवार नव्हते. उमेदवारांच्या यादीत जाहीर केलेल्या काही उमेदवारांनी उमेदवारांना नाकारल्या. निवडणूक जिंकण्याची शक्यता नसलेल्या अनेकउमेदवारांना अखेरच्या क्षणात उमेदवाऱ्या बहाल कराव्या लागल्या
• भाजपने बंगालची निवडणूक पूर्णपणे व्यक्तिकेंद्री करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असा लढा उभा करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींच्या वलयांकित प्रतिमेचा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. निवडणुका जिंकण्याचे भाजपचे हे तंत्र प्रत्येक राज्यात यशस्वी होऊ शकत नाही कारण ज्या राज्यात प्रादेशिक स्वरूपाचे वलयांकित नेतृत्व अस्तित्वात असते त्या राज्यात पंतप्रधानाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे तंत्र यशस्वी होऊ शकलेले नाही हे दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ इथल्या विधानसभा निवडणुकीने सिद्ध केलेले आहे. प्रादेशिक व स्थानिक नेतृत्व तयार नसताना निव्वळ पंतप्रधानाच्या नावावर निवडणूक जिंकता येत नाही हे भाजपने लक्षात घेणे आवश्यक आहे.
• भारतीय जनता पक्षाने नंदिग्राम मध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्ती खर्च केली त्यामुळे देखील त्यांची इतर मतदारसंघांत कडे दुर्लक्ष झाले.
• प्रत्येक राज्याचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती भिन्न भिन्न असते हे लक्षात न घेता प्रचार यंत्रणा राबवल्यास अपयश पदरात येते हे बंगालच्या उदाहरणावरून सिद्ध झालेले आहे. बंगाली लोकांवर असलेला बंगाली संस्कृतीचा प्रभाव, मुस्लिम समुदायाची जास्त मतसंख्या, आणि बंगाल मधील विविधता लक्षात न घेता राम मंदिर, आक्रमक हिंदुत्ववाद व राष्ट्रवाद, CAA इत्यादी सारखे राष्ट्रीय राजकारणातील प्रभावी मुद्द्यांच्या आधारावर बंगालची प्रचार यंत्रणा राबवल्या गेल्यामुळे स्थानिक आणि प्रादेशिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. प्रत्येक राज्याच्या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरत नाही हे भाजपची रणनीतीकारांच्या लक्षात अजूनही आलेले नाही. राष्ट्रीय अस्मिता राज्याच्या निवडणुकीदरम्यान निष्क्रिय ठरतात अनेकदा सिद्ध झालेले आहे.
• ममता बॅनर्जी यांनी प्रचारातील स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा संघर्ष मतदारांना भावला. भाजपचे राज्य आल्यास केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्याने बंगालच्या राज्यकारभार चालेल हा मुद्दा मतदारांना भावला कारण बंगाल मध्ये भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा सक्षम उमेदवाराचा अभाव होता.
• भाजपने धार्मिकतेच्या आधारावर केलेले ध्रुवीकरण ममता बॅनर्जी यांच्या पथ्यावर पडले. मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते त्यांना मिळाली. हिंदू मतांचे अपेक्षित ध्रुवीकरण न झाल्याने भाजपला मर्यादित यश मिळाले.
• लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर ममता बॅनर्जी यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. या योजनांना पर्याय देऊ शकेल अशा प्रभावी योजनांचा भाजपकडे अभाव होता. ममता बॅनर्जी यांनी राबवलेल्या योजनांच्या त्रुटी वर टीका करण्यापुरता भाजपचा प्रचार मर्यादित राहिला.
• भाजपची भिस्त तृणमूल काँग्रेस मधून पक्षांतर केलेल्या नेत्यांवर होती. तृणमूल काँग्रेस मधील अनेक भ्रष्ट नेत्यांना प्रवेश देऊन नवा बंगाल घडवण्याची कल्पना सामान्य मतदारांना आकर्षित करू शकले नाही.
• बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झालेला असला तरी मागील निवडणुकीत तीन जागा मिळवणाऱ्या भाजपने 77 जागा मिळवल्या 38.10 मते मिळवून विरोधी पक्षाची जागा बळकावली. शून्यातून भरारी घेत भाजपने बंगालमध्ये मिळवलेले विरोधी पक्षाचे स्थान भविष्यातील बंगालच्या राजकारणात पाया भक्कम होत असल्याचे लक्षण आहे. कारण भाजपने याच मार्गाने अनेक राज्यात चंचुप्रवेश करून सत्ता प्राप्त केल्याची उदाहरणे आहेत. उदा. कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार
• मागच्या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या आघाडीने 70 जागा मिळवल्या होत्या. या आघाडीला 32 टक्के मते मिळाली होती. परंतु आत्ताच्या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. मतांची टक्केवारी 8.39 पर्यंत घसरली. काँग्रेस आणि डाव्यांची परिस्थिती बंगालचे निवडणुकीने अवघड बनवली. भविष्यात भाजपला पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्ष विफल आहेत हे या निवडणुकीने सिद्ध केले. राष्ट्रीय पक्षांपेक्षा तृणमूल काँग्रेस सारखे प्रादेशिक पक्ष भाजपला समर्थ पर्याय देऊ शकते. प्रादेशिक पक्षांची आघाडी उभी करून भाजपला पराभूत करता येऊ शकते हा नवा आशावाद बंगालचे निवडणुकीने विकसित केलेला आहे.
• बंगालच्या निवडणुकीचा भविष्यातील भारताच्या राजकारणावर काय परिणाम करेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. परंतु बंगालच्या निवडणुकीनंतर केंद्र-राज्य संबंधाचा आकृतीबंध संघर्षवर आधारलेला राहील आणि ही संघर्षाची भूमिका भविष्यात संघराज्य व्यवस्थेच्या एकात्मतेला घातक ठरण्याची शक्यता आहे. कारण या संघर्षातून प्रादेशिक अस्मिता आणि प्रादेशिक वादाला बळ प्राप्त होईल आणि ही गोष्ट भारतीय संघराज्याच्या विकास आणि भवितव्यासाठी शुभ संकेत नाहीत.
• बंगाल मधील निवडणूक निकालाने प्रादेशिक पक्षांना एक नवे बळ दिले आहे. नरेंद्र मोदीच्या नेतृत्व उदयानंतर प्रादेशिक पक्षांची फार मोठी पडझड झाली होती. अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष सत्ते बाहेर पडले होते. ममता बॅनर्जी च्या विजयाने प्रादेशिक पक्षांमध्ये नवा हुरूप तयार होईल. आपली ताकद पणाला लावून निवडणुकीत उतरलो तर भाजपला पराभूत करता येते हा बंगालच्या निवडणुकीने भारतातल्या प्रादेशिक आणि विरोधी पक्षांना दिलेला हा एक संकेत आहे. विरोधकांच्या अस्तित्वाशिवाय अस्तित्वहीन बनलेल्या भारतीय लोकशाहीला भक्कम विरोधी पक्ष निर्माण करण्यास बंगालची निवडणूक प्रेरणादायी असू शकते.
•
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.