भारतातील राजकीय पक्ष-
• राजकीय पक्ष हे लोकशाहीचे अविभाज्य घटक असतात. राजकीय पक्षाशिवाय लोकशाहीची कल्पना करता येणार नाही. लोकशाही शासन यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची आवश्यकता असते. लोकशाही व्यवस्थेत जिवंतपणा आणण्याचे कार्य राजकीय पक्ष करत असतात.
• सनदशीर मार्गाने विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गटाला राजकीय पक्ष असे म्हणतात. राजकीय पक्ष विशिष्ट ध्येय वा तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जनतेला संघटित करण्याचा प्रयत्न करतात आणि सत्ता ग्रहण केल्यानंतर आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
भारतीय राजकीय पक्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी-
• अलन ह्यूम, उदारमतवादी ब्रिटिश सनदी अधिकारी, भारतीय उदारमतवादी नेत्यांच्या प्रयत्नाने 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना केली. या सभेचे काँग्रेस पक्षात रूपांतर झाले.
• 1906 साली मुस्लिम लीग पक्षाची स्थापना झाली.
• मुस्लिम अनुनयाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी 1915 मध्ये हिंदू महासभा पक्षाची स्थापना झाली.
• रशियन क्रांतीच्या प्रभावाने गुप्तपणे 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.
• सुभाष चंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला.
• डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर पक्ष आणि शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन केले होते.
स्वातंत्र्योत्तर काळ-
• डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने 1951 मध्ये जनसंघ पक्षाची स्थापना केली पुढे हा पक्ष जनता पक्षात विलीन झाला. जनता पक्षात फूट पडल्यानंतर पूर्वाश्रमीच्या जनसंघातील नेत्यांनी 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष स्थापन केला.
• चिनी आक्रमणावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष असे दोन पक्ष निर्माण झाले.
• इंदिरा गांधींच्या एकतंत्री कारभाराला विरोध करण्यासाठी संघटना काँग्रेस, भारतीय लोक दल, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या तरुण तुर्कांच्या गटांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली.
• काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला विरोध करण्यासाठी व्ही. पी. सिंग यांनी जनमोर्चा, जनता पक्ष आणि लोकदल यांना एकत्र आणून जनता दल नावाच्या पक्षाची स्थापना केली.
• या प्रमुख पक्षांशिवाय शिवसेना -1966, बसपा-1984,सपा-1992, राष्ट्रवादी काँग्रेस -1999, तृणमूल काँग्रेस-1998 इत्यादी प्रमुख पक्ष आहेत . याशिवाय अनेक स्थानिक आणि प्रादेशिक पक्ष भारतात अस्तित्वात आहेत.
भारतीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये-
• एक प्रबळ पक्ष पद्धती-1977 च्या निवडणुका अपवाद वगळता काँग्रेस हा एकमेव शक्तिशाली पक्ष होता. काही काळ जनता दल, भाजप आणि प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला. 2014 नंतर भाजप हा शक्तिशाली पक्ष बनला.
• बहुपक्ष पद्धती- भारतात अनेक पक्ष अस्तित्वात आहेत. निवडणूक आयोगाच्या 15 मार्च 2019 नोंदीनुसार 2334 नोंदणीकृत पक्ष आहेत. त्यात 8 राष्ट्रीय पक्ष, 26 राज्यस्तरीय पक्ष, 2391 नोंदणीकृत पक्ष आहेत.
• सक्षम विरोधी पक्षाचा अभाव-1990 पर्यंत 1977 चा अपवाद वगळता काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची ताकद विरोधी पक्षात नव्हती.1990 ते 2014 च्या काळात भाजपच्या रूपाने सक्षम विरोधी पक्ष निर्माण झाला.2014 च्या निवडणुकीनंतर भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे कोणत्याही पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत.
• पक्षशिस्त वा पक्षनिष्ठेचा अभाव- भारतातील राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षांतरे करतात. भारतीय राजकारणातील आयाराम गयाराम प्रवृत्तीमुळे अनेक पक्षांत फाटाफूट पडल्याचा इतिहास आहे.
• व्यक्तिनिष्ठ राजकारण- भारतातील बहुसंख्य पक्षांमध्ये कार्यक्रम आणि ध्येयधोरणांपेक्षा घराणेशाही आणि व्यक्तिनिष्ठ राजकारणाला महत्व देतात. पक्षापेक्षा नेत्यावर जास्त श्रद्धा ठेवतात. व्यक्तीपूजेमुळे व्यक्तीच्या नावाने पक्ष स्थापन केले जातात. उदा. इंदिरा काँग्रेस पक्ष
• धर्मांध आणि जातीय पक्ष- भारतातील राजकीय पक्षांवर धर्म आणि जातीचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. भारतीय राजकारणात याच कारणामुळे मूलभूत प्रश्नां पेक्षा जातीय तणाव निर्माण करणे आणि भावनिकतेच्या आधारावर राजकारण करण्याला महत्त्व आलेले आहे.
• प्रादेशिक पक्ष- काँग्रेसचा प्रभाव कमी झाल्यामुळे 1990 ते 2014 च्या कालखंडात प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला. त्यांनी अनेक राज्यात सत्ता स्थापन केली. केंद्रातील सरकारदेखील प्रादेशिक पक्षाचे पाठींब्याने निर्माण होऊ लागली.2014 च्या निवडणुकीनंतर देखील भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला राष्ट्रीय पक्षी ऐवजी प्रादेशिक पक्ष शह देताना दिसत आहेत.
• सत्ताकारणाला महत्व- भारतातील राजकीय पक्ष सत्ताप्राप्तीसाठी कोणत्याही तडजोडीला तयार होतात. एकमेकांच्या विरोधी विचारधारा असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र येतात. उदा. महाराष्ट्रातील महा विकास आघाडीचे सरकार
• काँग्रेस पक्षातून इतर पक्षांची निर्मिती- भारतातील बहुसंख्य राजकीय पक्षांची स्थापना काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या मतभेदातून झालेली दिसते. उदा. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस
• पक्षांतर्गत गटबाजी व पक्षांतर- भारतातील बहुसंख्य पक्षांना राजकीय गटबाजीची लागण झालेली आहे. त्यातून प्रत्येक पक्षात अनेक गट निर्माण झालेले दिसतात. आणि या गटातील वाढत्या सत्ता स्पर्धेमुळे अनेक पक्षात फूट पडल्याचे दिसून येतात. राजकीय अभिजनांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या काळात पक्षांतर होताना दिसतात. उदा. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या वेळेस तृणमूल काँग्रेस पक्षातून झालेली पक्षांतरे संघटनात्मक कमजोरी आणि पक्षांतरे केलेल्या व्यक्तींना राजकीय पदे बहाल करण्याच्या प्रवृत्तीमुळे पक्षांतराना ऊत आलेला दिसतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.