• महात्मा गांधी जीवन परिचय, कार्य आणि विचाराचे महत्त्व आणि वैशिष्टे -
महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी काठीयावाड संस्थानातील पोरबंदर येथे झाला.
• गांधींचे वडील करमचंद गांधी काठीयावाड संस्थानाचे दिवाण होते.
• आई पुतळीबाई धार्मिक प्रवृत्तीची होती. गांधीजींचे कुटुंब वैष्णवपंथी होते. कुटुंबातील धार्मिक वातावरणाचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडलेला दिसतो.
• प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी इंग्लंड गेले होते.
• 1891 मध्ये इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेऊन भारतात परत आले. पोरबंदर, राजकोट, बडोदा आणि मुंबई येथे वकिली सुरू केली.
• पोरबंदर येथील मेमन पिढीवाल्याचा खटला लढवण्यासाठी आफ्रिकेला गेले. ही घटना गांधींच्या जीवनाला नवीन वळण देणारी ठरली.
• दक्षिण आफ्रिकेतील श्वेतवर्णीय राजवटीने रंगभेदाच्या आधारावर भारतीयांवर अन्याय-अत्याचार सुरू केला होता. या अन्याय-अत्याचाराला प्रतिकार करण्यासाठी 'नाताळ इंडियन काँग्रेस'ची स्थापना करून गांधींनी सत्याग्रह सुरू केला. भारतीयांमध्ये जागृती घडून आणण्यासाठी 'इंडियन ऑपिनियन' हे वर्तमानपत्र सुरू केले. 'टॉलस्टॉय फॉर्म'ची स्थापना केली. दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह आणि सविनय प्रतिकार साधनांचा वापर करून गांधींनी यश मिळवले.
• दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काळात गोपाळ कृष्ण गोखले यांची भेट झाली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांना आपले राजकीय गुरु मानले. 1914 मध्ये आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर नामदार गोखले यांच्या सल्ल्याने देशभ्रमण करून देशाच्या परिस्थितीचे आकलन केले.
• सर्वात प्रथम खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व केले. अहमदाबाद येथील गिरणी कामगारांसाठी लढा दिला.
• बिहारच्या चंपारण्यातील निळी कामगारावर होणाऱ्या अन्यायाच्या निवारणार्थ बंदी हुकूम मोडून चळवळ सुरू केली. या चळवळीला यश मिळाल्यामुळे गांधींचे नेतृत्वाची ओळख भारतीयांना होऊ लागले रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी चळवळ सुरू केली. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला.
• 1920 साली सुरू केलेल्या असहकार आंदोलनामुळे गांधींचे नेतृत्वाला देशव्यापी मान्यता मिळाली. राजकीय चळवळीला सामाजिक चळवळीची जोड देण्यासाठी त्यांनी विधायक कार्य सुरू केले. उदा. खादी प्रसार, दारूबंदी
• संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. या चळवळीची व्यापकता वाढवण्यासाठी 12 मार्च 1930 रोजी 'दांडी यात्रा' सुरू केली. या यात्रेच्या माध्यमातून मिठाचा सत्याग्रह केला. दांडी यात्रेला जगभर प्रसिद्धी मिळाली. सविनय कायदेभंग स्थगित करण्यासाठी गांधी आणि आयर्विन यांच्यात करार झाला. या करारानुसार भारताचे भवितव्य घडवण्यासाठी इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या. दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. या परिषदेने जाहीर केलेल्या जातीय निवाड्याला विरोध करण्यासाठी पुणे येथील येरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू केले. उपोषण थांबवण्यासाठी महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार घडून आणण्यात आला. पुणे करारानंतर हरिजन सेवेला वाहून घेण्यासाठी 'हरिजन सेवक संघा’ची स्थापना केली. 'हरिजन' हे साप्ताहिक सुरु केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू केली.
• भारतीयांची संमती न घेता इंग्रजांनी हिंदुस्थानला दुसऱ्या महायुद्धात उतरविले. त्याच्या निषेधार्थ मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले.
• ब्रिटिश साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यासाठी 1942 साली 'चलेजाव चळवळ' सुरू केली. 'करा आणि मरा' हा संदेश दिला. या चळवळीच्या काळात इंग्रजांनी गांधी आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांना स्थानबद्ध केले.
• स्वातंत्र्याच्या मागणीला बळ प्राप्त होत असताना बॅरिस्टर जीना यांनी पाकिस्तानची मागणी केली. गांधींनी जीनांशी वाटाघाटी करून फाळणी टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु मुस्लीम लीगने हंगामी सरकार आणि घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. पाकिस्तान मिळवण्यासाठी 'प्रत्यक्ष कृती दिन' साजरा केला. या दिवसापासून हिंदू-मुसलमानांमध्ये दंगली होऊ लागल्या. दंगली थांबविण्यासाठी गांधी कोलकत्ता आणि नौखालीला गेले. माउंटबॅटन योजनेनुसार भारताची फाळणी झाली.
• फाळणी नंतर पाकिस्तानला 55 कोटी देण्यास भारत सरकारने टाळाटाळ केल्यामुळे गांधीनी उपोषण सुरू केले. या उपोषणामुळे गांधींवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
• 30 जानेवारी 1948 रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केली. 1920 ते 1947 हा भारतीय राजकारणातील गांधीयुग मानला जातो. कारण या काळात ते सर्वात प्रभावशाली नेते होते.
• गांधी 'यंग इंडिया' हे वर्तमानपत्र चालवले. 'माझे सत्याचे प्रयोग' आणि 'हिंद स्वराज्य’ हे ग्रंथ लिहिले.
• गांधीजींच्या विचारांवर आई, नरसी मेहता, भगवतगीता, बायबल, रामायण, महाभारत, जैन धर्म, बौद्ध धर्म, कवी रामचंद्रजी, गोपाळ कृष्ण गोखले, लिओ टॉलस्टॉय, रस्किन, डेव्हिड थोरो, इत्यादींचा प्रभाव दिसतो.
•
महात्मा गांधीचे विचाराचे महत्त्व आणि वैशिष्टे-
• गांधीजींनी आपल्या राजकीय जीवनात विशिष्ट प्रकारचा सिद्धांत मांडलेला नाही. राजकारणात वावरत असताना विविध विषयांवर व्यक्त केलेली मते आणि त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या विचारांची ओळख होते.
• गांधी हे एक आदर्शवादी, अध्यात्मवादी आणि अराज्यवादी नेते होते. एका प्रयोगशील साधका प्रमाणे त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. या प्रयोगातून त्यांच्या विचारांची जडणघडण झालेली दिसते.
• गांधीनी निव्वळ राजकारण केले नाही तर अनेक विधायक कार्याची पायाभरणी केली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सामान्य माणसांचा आणि महिलांचा सहभाग घडून आणला. समाजातल्या सर्व वर्गाला आंदोलनामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली.
• सत्य, अहिंसा, सत्याग्रह, विश्वस्त, राजकारणाची अध्यात्मिकरण, मूलगामी शिक्षण इत्यादी महत्त्वपूर्ण संकल्पनेची मांडणी केली. समाजाच्या विविध क्षेत्रात सुधारणा घडून आणण्यासाठी आपले आयुष्य वेचले.
• गांधींच्या विचारांची आज ही महती कमी झालेली नाही. त्यामुळे अमेरिकेच्या टाइम्स मासिकाने त्यांना विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानले. नोबेल समितीने देखील त्यांचा मृत्यू झाल्यामुळे 1948 साली नोबेल परितोषिक देता आला नाही ही खंत व्यक्त केली.
•
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.