महात्मा गांधीजींचे शिक्षण विषयक विचार महत्व आणि आवश्यकता-
•
महात्मा गांधी मूलगामी शिक्षणाच्या माध्यमातून चांगला माणूस आणि चारित्र्यसंपन्न नागरिक घडविण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण हे व्यक्तीचे शरीर,बुद्धी आणि मन यांचा समतोल विकास करणारे साधन आहे. परंतु सध्याची शिक्षण पद्धती पुस्तकी विद्या आणि पोपटपंची करणारे विद्वान निर्माण करणारी आहे. वर्गात दिल्या जाणाऱ्या बंदिस्त पद्धतीवर सध्याची शिक्षण पद्धती भर देते. पुस्तका बाहेरचे ज्ञान वर्ज्य
समजले जाते. परीक्षेत चांगली उत्तरे लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना बुद्धिमान म्हणून केली जाते. परीक्षेतील गुणांच्या आधारावर यश मोजण्याच्या पद्धतीतून कागदी विद्वान बनविणार्या शिक्षण पद्धतीला गांधीजीं विरोध करतात. समाजव्यवस्थेत व्यापक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नई तालीम किंवा मूलोद्योग शिक्षण पद्धतीची संकल्पना मांडतात.
• महात्मा गांधीजींनी आपल्या रचनात्मक कार्यक्रमांना व्यावहारिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मूलगामी शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. मूलगामी शिक्षण पद्धती 'जीवनासाठी शिक्षण आणि जीवना द्वारे शिक्षण' या मूलभूत तत्वांवर आधारलेली होती. मूलगामी शिक्षणाच्या माध्यमातून गांधी राष्ट्राच्या गरजा भागवणाऱ्या शिक्षणाला आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणाऱ्या महत्त्व देत होते. शिक्षण हे समाजासाठी उपयोगी ठरले पाहिजे. निव्वळ पदव्या देणारे शिक्षण त्यांना नको होते. काम करता करता शिक्षण घेता यावे या उद्देशाने शिक्षणात शारीरिक श्रमाला महत्त्व दिले. मूलगामी शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेत असताना मुलांना बागकाम, सुतार काम, स्वयंपाकात मदत इत्यादींचा समावेश केलेला होता.
• या पद्धतीत वर्ग अध्यापनासोबत निसर्गाच्या सानिध्यात शिकवण्यावर भर देतात. संपूर्ण समाज शिक्षणाचे केंद्र मानतात. विद्यार्थ्यांना आलेल्या स्व अनुभवाच्या आधारावर शिकण्याची संधी देतात. शिक्षण व उद्योग यात समन्वय प्रस्थापित करतात. शिक्षण घेत असताना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यावर भर देतात. गणित, निसर्ग परिचय, संगीत, चित्रकला आणि व्यवसाय प्रशिक्षणाचा शिक्षणात समावेश करतात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासोबत मानसिक विकासाला महत्व देत असल्याकारणाने ही शिक्षण पद्धती परिवर्तनकारी शिक्षण पद्धती ठरेल असा विश्वास व्यक्त करतात.
• शिक्षणाचा निसर्गाशी आणि जीवनाशी सुसंवाद असला पाहिजे. कारण जीवनाच्या प्रश्नाला जे भिडते तेच खरे शिक्षण होय म्हणूनच गांधीजींनी कृषी व्यवस्थेशी मूलगामी शिक्षणाला जोडण्याचा प्रयत्न केला. विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम मूलगामी शिक्षणामध्ये आहे. शिक्षणात सतत प्रयोग केले पाहिजे. प्रयोगातून मुले लवकर शिकतात
म्हणून गांधीजी शिक्षणात प्रयोगाला महत्त्व
देतात. नई तालीम शिक्षण पद्धतीचा सत्य अहिंसा स्वातंत्र्य आणि सहकार हा पाया आहे.
• शिक्षणाची जीवनाशी जोड देण्यासाठी ग्रामीण कुटीर उद्योग आणि हस्त उद्योगांचे शिक्षण जोडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून व्यावसायिक आणि उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास शाळेतच होईल. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असण्यावर गांधीजींनी भर दिला. कारण मातृभाषेतून विषयाचे आकलन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पुस्तकांचा संबंध रोजच्या जीवनाशी असल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल म्हणून बोजड पुस्तके आणि बोजड भाषेला गांधींनी विरोध केला होता. पाठांतरावर भर देणारी 'घोका आणि ओका’ नवभारताचे निर्माणासाठी उपयुक्त नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळातील नव भारताची उभारणी करण्यासाठी
नई तालीम सारखी क्रांतिकारी आणि परिवर्तनकारी शिक्षण पद्धती आणण्याचा आग्रह धरतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.