https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

जॉन रॉल्सचा न्याय सिद्धान्त पार्श्वभूमी, स्वरूप आणि तत्त्वे


 

रॉल्सचा न्याय सिद्धान्त पार्श्वभूमी, स्वरूप आणि तत्त्वे

    रॉल्स यांनी सर्वप्रथम १९५८ मध्ये 'Justice as Fairness' निबंधाद्वारे सर्वप्रथम सामाजिक सद्गुणाच्या दृष्टीने न्याय संकल्पनेचे विवेचन केले. या निबंधाला मिळालेल्या प्रतिसादातून आपल्या न्यायविषयक संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी 'A Theory of Justice' हा ग्रंथ प्रसिद्ध केला. सामाजिक न्याय संकल्पनेस मध्यवर्ती मानून हा ग्रंथ लिहिलेला आहे. रॉल्सच्या न्यायविषयक सिद्धान्ताला तत्कालीन सामाजिक आणि राजकीय घटनांचा संदर्भ आहे. व्हिएटनाम युद्ध आणि अमेरिकतील कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्क चळवळीतून उपस्थित प्रश्न आणि सामाजिक न्यायाच्या निकडीच्या गरजांचा प्रभाव पडलेला दिसतो. त्यांची न्याय कल्पना उदारमतवादी अर्थशास्त्राशी संबंधित असून त्या व्यवस्थेस अभिप्रेत मानवी स्वभाव व व्यवहार गृहीत धरतो. न्याय ही संज्ञा व्यक्ती आणि त्यांच्या कृती संदर्भात वापरली जात असली तरी समाज हा व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्यातून तयार होत असल्यामुळे न्यायाचा संबंध सामाजिक व्यवहाराशी येत असतो. व्यक्तीच्या स्वार्थी हितसंबंधामुळे परस्परसंबंधात आणि ते ज्या संस्थेत कार्यरत आहेत तेथे संघर्ष निर्माण होतात आणि त्या संघर्षातून काही व्यक्तींवर अन्याय होत असतो; म्हणून रॉल्स न्याय तत्त्वांच्या आधारे आदर्श समाजरचनेची मांडणी करतो. त्या समाजरचनेत व्यक्ती आणि संस्था आपआपल्या जबाबदारी आणि कर्तव्यानुसार व्यवहार करतील त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही.

     हॉब्ज, लॉक, रूसो प्रमाणे रॉल्स हा करारवादी विचारवंत आहे. त्याने मांडलेले तत्त्वज्ञान अमूर्त स्वरूपाचे असून न्यायाधिष्ठित समाजरचना निर्माण करण्यासाठी तो काही गृहीतके गृहीत धरतो. समाजाची मूळ स्थिती (Original Position) हे प्रथम गृहीतक मांडतो. मूळ स्थितीत मानव विवेकशील मार्गाने चालतो. चांगल्या-वाईटाची त्याला जाण असते. स्वहितासाठी कोणता मार्ग वापरावा आणि स्वहिताचा विचार करून इतरांशी तसे ते वागत असतात. मूळ स्थितीतील विवेकशील माणसे एकमेकांचा द्वेष करत नाहीत कारण द्वेष हा परस्परांना अडचणीचा आणि नुकसानकारक असतो. या अवस्थेत जबरदस्तीऐवजी परस्पर संमतीने वा स्वइच्छेने करार व व्यवहार होत असतात. सर्वाच्या गरजा आणि हितसंबंध समान असल्यामुळे सर्व जण स्वतंत्र आणि समान पातळीचे असतात. अशा प्रकारच्या लोकांमध्ये सहकार्याची सहजभावना असते. या समाजात स्वत्व आणि स्व-हितसंबंधाचे संघर्ष या दोन्ही बाबी एकाचवेळी अस्तित्वात असतात. या समाजात विशिष्ट परिस्थितीत लोकांचे परस्परांशी सहकार्य होणे गरजेचे असते; कारण सामाजिक आणि राजकीय तत्त्वांच्या बाबतीत विविधता असणारी माणसे असतात याचा अर्थ रॉल्स समाजातील विविधता मान्य करतो.

रॉल्स न्याय सिद्धान्ताचे स्पष्टीकरण करण्यासाठी अज्ञानाचा बुरखा (Veil of Ignorance) ही अमूर्त संकल्पना विशद करतो. समाजातील आपले स्थान, आपला वर्ग, सामाजिक दर्जा, बौद्धिक क्षमता, ताकद इत्यादींविषयी ज्ञान नसते. व्यक्ती आपले हित आणि मानसिक कलाबाबत अज्ञानी असतो. आपल्या स्थानाबाबत अज्ञानी असणारे लोक सर्व माझ्यासारखेच आहेत ही धारणा करून घेईल आणि सर्वांना न्याय वागणूक मिळाली पाहिजे असे त्यांना वाटेल. या परिस्थितीला तो मूळ स्थिती (Original Position) असे म्हणतो. या स्थितीत प्रत्येक व्यक्ती समाजातील जे लोक सर्वांत कमीत कमी फायदा मिळणारे वा उपेक्षित लोक आहेत त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करतील, त्यामुळे सर्वांना आपले मत समानतेने मांडता येईल. रॉल्सने मांडलेल्या मूळ स्थितीतील समानतेची संकल्पना करारवादी विचारवंतांनी मांडलेल्या निसर्गावस्थेशी साधर्म्य साधणारी आहे. अज्ञानाच्या पडद्याआड राहणाऱ्या सर्व व्यक्ती सर्वांना समान मानतील. समान हितासाठी न्याय तत्त्वांना मान्यता देतील.

मूळ स्थितीच्या आधारावर दोन न्याय तत्त्वांची मांडणी करतो. ही तत्त्वे त्यांच्या न्याय सिद्धान्ताची आधारभूत तत्त्वे मानली जातात.

१. सर्वांना समान हक्क आणि स्वातंत्र्ये असले पाहिजेत.

२. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे समाजातील वंचित वा उपेक्षित स्तरातील व्यक्तींना लाभ होणार असेल तर ही विषमता न्याय मानता येईल.

रॉल्स सर्वसाधारण परिस्थितीत सामाजिक आणि आर्थिक विषमतेला मान्यता देत नाही परंतु उपेक्षित लोकांना फायदा मिळवून देणारी वा नुकसानकारक नसेल तर तो विषमतेला न्याय मानतो. अशा प्रकारे रॉल्स अमूर्त आणि गृहीतकाच्या आधारावर न्याय तत्त्वांची मांडणी करतो. अज्ञानाच्या बुरख्याखाली बावरणाच्या मूळ स्थितीतील मानव वरील न्याय तत्त्वांना मान्यता देतील. ती समाजाच्या मूळ चौकटीला लागू करावी लागतील. पहिले तत्त्व समानतेचे असल्याने लोकांच्या इच्छा-आकांक्षांना आकलन येऊन स्व-जाणीव विकसित होईल तर दुसऱ्या तत्त्वांच्या आधारावर सामाजिक संस्थांची उभारणी आणि लोकांच्या गरजा कशा पूर्ण करता येतील यांचे मार्गदर्शन मिळेल.

न्याय तत्त्वांची निवड करता दोन तत्त्वे मूळ परिस्थितीत मानव मान्य करतील. ती तत्त्वे पुढीलप्रमाणे होत -

१. प्रत्येक व्यक्तीला मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार असला पाहिजे. हा अधिकार दुसऱ्याच्या स्वातंत्र्यास बाधा आणणारा नसावा.

२. सामाजिक आणि आर्थिक व्यवहारात विषमता असली तरी ही विषमता सर्वांना फायदेशीर असली पाहिजे. अधिकार पदे आणि सामाजिक दर्जा यामुळे निर्माण होत असेल तर ती अधिकार पदे आणि सामाजिक दर्जा सर्वांसाठी खुला असला पाहिजे.

यातील पहिले तत्त्व स्वातंत्र्य (Liberty Principle) आणि दुसरे तत्त्व विषमतेचे (Difference Principal) आहे. पहिल्या तत्त्वात व्यक्ती विकासासाठी दिल्या जाणाऱ्या विविध स्वातंत्र्याचा समावेश होता तर दुसऱ्या तत्त्वांत समता निर्मितीसाठी विषमतेला मान्यता दिलेली आहे. रॉल्स दोन्ही तत्त्वांपैकी पहिले तत्त्व निश्चित स्वरूपाचे मानतो. दुसरे तत्त्व अंमलात आणण्यासाठी पहिल्या तत्त्वावर बंधने घालणे अनुचित मानतो. रॉल्स दोन्ही तत्त्वांमध्ये पहिल्या तत्त्वाला प्राधान्य देतो. व्यक्तीला जास्तीतजास्त स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. सर्व व्यक्तींना समान स्वातंत्र्याचा उपभोग घेता आला पाहिजे. एकाचे स्वातंत्र्य दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणार नाही हे पाहाणे म्हणजे 'न्याय' होय. त्याचे दुसरे तत्त्व कमाल लाभ देणारे आहे. त्याला तो लोकशाही समतेचे तत्त्व म्हणतो. व्यक्तींना आनुवंशिकतेमुळे प्राप्त होणारी विशिष्ट क्षमता ही सामाजिकदृष्ट्या मौल्यवान ठेवा असून त्यांचा उपयोग समाजातील सर्व व्यक्तींच्या विकासासाठी झाला पाहिजे. जन्म जात वा आनुवंशिक क्षमता प्राप्त लोकांना अधिक लाभ मिळविण्याचा अधिकार नाही तर त्यांनी या क्षमतेचा उपयोग समाजातील उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. याचा अर्थ रॉल्सने मांडलेल्या दोन न्यायत्तत्त्वांमुळे नैसर्गिक क्षमता आणि आनुवंशिकतेच्या आधारावर निर्माण होणारी विषमता नष्ट होईल. तो वैयक्तिक क्षमतांना सामाजिक ठेवा मानतो आणि त्यांचा उपयोग वंचित वर्गांच्या कल्याणासाठी करावा हे अपेक्षितो. रॉल्स सर्व स्वातंत्र्य, संधी, संपत्ती आणि दर्जा याबाबत समानता अपेक्षित करतो. सर्वांच्या वितरणात असमानता केवळ उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी योग्य मानतो.

समाजातील विषमता सामाजिक संस्था आणि त्यांच्या व्यवहारातून निर्माण होते. या विषमतेतून कार्यक्षमतेची प्रेरणा निर्माण करता येईल हे वास्तव मान्य करून स्वातंत्र्याचा लाभ सर्वांना कसा होईल आणि प्रत्येकाने स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांना कसा मिळेल यांचा विचार करतो. अनिर्बंध स्वातंत्र्याचा विचार न करता सामाजिक दर्जा आणि स्थानामुळे स्वातंत्र्याच्या लाभापासून वंचित असलेल्या वर्गाला ते कसे मिळेल या विवंचनेतून समाज घटकांची सुटका करण्यासाठी न्याय सिद्धान्त मांडतो. समाजात योग्य स्वातंत्र्यवाटप होईल यावर भर देतो. कार्यक्षमता आणि कल्याण याऐवजी न्यायाला प्राधान्य देतो. व्यक्तीच्या वैयक्तिक कौशल्य, बुद्धिमत्ता आणि सामाजिक स्थानाला व्यक्तिगत न मानता सामाजिक मानतो आणि त्यांचा उपयोग उपेक्षित वर्गांच्या विकासासाठी करण्याला ‘न्याय’ असे म्हणतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.