https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

बहुसंस्कृतिवादाची तत्त्वे वा लक्षणे Principles of Multi-Culturalism


 

बहुसंस्कृतिवादाची तत्त्वे वा लक्षणे : बहुसंस्कृतिवाद ही संकल्पना एक - दीर्घकालीन विकास प्रक्रियेचा परिणाम मानली जाते. प्राचीन काळापासून बहुसांस्कृतिक समाजाचे अस्तित्व दिसून येते. परंतु संस्कृतीचा राजकीय व सामाजिक समानतेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीतून हा विचार उदयाला आलेला दिसतो. बहुसंस्कृतिवाद विचारसरणीची पुढील काही लक्षणे व तत्त्वे सांगता येतात.

१. सांस्कृतिक ओळख वा अस्तित्वाला महत्त्व : बहुसंस्कृतिवादाचे समर्थक प्रत्येक व्यक्तीला संस्कृतीची देन मानतात. प्रत्येक व्यक्ती ही संस्कृतीशी बांधलेली असते. संस्कृतीद्वारा निर्मित जगात जीवन जगत असते. जीवनातील विविध अनुभवांना सांस्कृतिक मान्यतांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, मूल्य आणि त्यांच्या मान्यता संस्कृतीद्वारा निर्धारित केलेल्या असतात. संस्कृती ही मानवी जीवनाशी निगडित असल्यामुळे राज्यानेदेखील सांस्कृतिक ओळखीला मान्यता दिली पाहिजे. कारण प्रत्येक संस्कृतीची मूल्ये व जीवन-दृष्टिकोन स्वतंत्र असतो. समाजातील विभिन्न संस्कृतीमध्ये उत्तम जीवनाविषयीच्या कल्पनेत भिन्नता असते. प्रत्येक संस्कृतीची मूल्ये व जीवन-दृष्टिकोन उपलब्ध पर्यावरणातून निर्माण होत असतो. त्यामुळे कोणतीही संस्कृती श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. व्यक्तीची ओळख संस्कृतीद्वारे निर्माण होत असल्यामुळे राज्याने व्यक्तीची ही ओळख पुसण्याचा वा त्यांच्यावर दुसऱ्या संस्कृतीची मूल्ये लादण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सांस्कृतिक ओळख व अस्तित्वाला मान्यता प्रदान करावी असा आग्रह बहुसंस्कृतिवाद विचारसरणीकडून केला जातो. बहुसंस्कृतिवाद सांस्कृतिक विभिन्नतेला महत्त्व देणारी। विचारसरणी आहे.

२. अल्पसंख्याकाच्या अधिकारांचे समर्थन : बहुसंस्कृतिवाद अल्पसंख्याक समूहाच्या विभिन्न स्वरूपाच्या अधिकारांचे समर्थन करणारी विचारसरणी आहे. बहुसंस्कृतिवादाचे अभ्यासक अल्पसंख्याक समूहाचे तीन विभागात विभाजन करतात. त्यांतील प्रथम म्हणजे स्वदेशी वा मूळ निवासी समुदाय हाय. हा समुदाय जन्मतःच आपल्या मातृभूमीशी जोडलेला असतो. हा समुदाय भावनिकदृष्ट्या राष्ट्राशी जोडलेला असल्यामुळे त्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक अधिकार राज्याने देणे योग्य मानले जाते. मूळ निवासी समुदायाने आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी स्वशासनाच्या मागण्या केलेल्या आहेत. बहुसंस्कृतिवाद या मागण्यांचे समर्थन करतो. दुसरा समूह म्हणजे अल्पसंख्याक समुदाय होय. अल्पसंख्याक समुदायाची सर्वात मोठी समस्या म्हणजे सांस्कृतिक ओळखीला मान्यता आणि त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी महत्त्व देणे, ह्या मानल्या जातात. अल्पसंख्याक समुदाय बहुसंख्याक समुदायाचा द्वेष वा उपेक्षेचे शिकार असतात. त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. या समुदायाच्या सांस्कृतिक ओळखीला प्राधान्य देणे; त्यांच्या क्षमतांच्या विकासासाठी विशेष वा योग्य प्रतिनिधित्व बहाल करणे; राष्ट्रीय प्रसारण, शिक्षण व सार्वजनिक क्षेत्रात पर्याप्त स्थान बहाल करणे, धार्मिक आधारावर काही सवलती देणे; (गणवेश सवलत-शीख लष्करात पगड़ी परिधान करण्याचा अधिकार) सांस्कृतिक व धार्मिक आधारावर सुट्ट्या; सण, समारंभ साजरा करण्याची सवलत; धार्मिक स्थळे विकसित करण्याचा अधिकार शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांत भागीदारीची समान संधी इत्यादी अधिकाराचे समर्थन बहुसंस्कृतिवादाद्वारे केले जाते. तिसरा समुदाय म्हणजे अप्रवासी व्यक्ती होय. अप्रवासी समुदायांनादेखील आपली सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवण्यासाठी काही अधिकार प्रदान करण्याचे समर्थन बहुसंस्कृतिवादाद्वारे केले जाते. आहारविहार, पोषाख, धर्म, मनोरंजन आणि सांस्कृतिक ओळखीला टिकवून ठेवता येईल, यासाठी आवश्यक अधिकार दिले पाहिजेत. शाळा आणि सार्वजनिक संस्थांमध्ये धार्मिक सुट्ट्या, पोषाख आणि आहारविहाराच्या बंधनांतून सवलती दिल्या पाहिजेत, याचे समर्थन बहुसंस्कृतिवाद विचारसरणी करत असते.

३. सांस्कृतिक सापेक्षतेला विरोध : बहुसंस्कृतिवाद सांस्कृतिक समानतेचा समर्थक असल्यामुळे सांस्कृतिक सापेक्षतेला विरोध करतो. सांस्कृतिक सापेक्षता म्हणजे संस्कृतीतील गुणदोषांच्या आधारावर श्रेणीबद्धतेला महत्त्व देणे होय. बहुसंस्कृतिवाद हा संस्कृतीतील श्रेष्ठ-कनिष्ठतेला मान्यता देत नाही. कोणतीही संस्कृती इतकी श्रेष्ठ नसते की, ती इतरांवर लादता येईल वा इतर संस्कृतींवर वर्चस्व निर्माण करण्यास योग्य आहे. तसेच कोणतीही संस्कृती ही इतकी कनिष्ठ नसते की, नष्ट करता येईल. संस्कृती ही चांगली-वाईट वा श्रेष्ठ-कनिष्ठ नसते. बहुसंस्कृतिवाद ही विचारधारा सांस्कृतिक विभिन्नतेचे समर्थन करते. संस्कृतीतील भिन्नतेला मान्यता देऊन सर्व सांस्कृतिक समुदायांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देते.

०४. सांस्कृतिक एकीकरणाला विरोध: उदारवादी लोकतांत्रिक व्यवस्थेत सुरुवातीला सांस्कृतिक एकीकरणाच्या नीतीचा अवलंब केला गेला. सार्वजनिक क्षेत्रात सांस्कृतिक विभिन्नता उपजणार नाहीत याची दक्षता घेतली गेली. सार्वजनिक क्षेत्रात राज्यांनी सांस्कृतिक तटस्थतेची नीती लागू केली. या नीतीच्या अंतर्गत बहुसंख्याक सांस्कृतिक मूल्यांना राष्ट्रीय स्तरावर स्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात अल्पसंख्याक सांस्कृतिक समुदायाच्या अधिकारांना मान्यता मिळणे अशक्यप्राय बनले. उदारवादी राज्यांनी व्यक्तिवादी, तांत्रिक व उपभोगतावादी आणि भांडवलवादी मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या विशिष्ट संस्कृतीला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक एकीकरणाला प्राधान्य दिले, त्यात अमेरिका व इंग्लंडसारख्या देशांत काही प्रमाणात यशदेखील प्राप्त झाले, सांस्कृतिक एकीकरणाच्या नीतीमुळे मूळ निवासी, अल्पसंख्याक व अप्रवासी समुदायाच्या अधिकारांवर गदा आली. त्यामुळे या समुदायांनी एकीकरणाच्या नीतीला विरोध करण्यास सुरुवात झाली. हे समुदाय संघटित होऊन सांस्कृतिक अधिकार संरक्षणाच्या मागण्या करू लागले. उदा. अमेरिकेतील रेड इंडियन त्याशिवाय अल्पसंख्याक, स्थलांतरित समुदाय, वंचित समुदाय (निग्रो) आणि बहिष्कृत समुदाय (लेस्बियन, गे समुदाय) इत्यादी समुदायांनी राज्यांतर्गत आपल्या सांस्कृतिक अधिकारांच्या संरक्षणाची मागणी सुरू केली. आपल्या सांस्कृतिक मान्यतेनुसार जीवन व्यतीत करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, यावर भर दिला. सांस्कृतिक विभिन्नतेला राज्याने मान्यता प्रदान करावी. आपल्या संस्कृतीला अपेक्षित सन्मान मिळवून देण्यासाठी प्रजातंत्र, न्याय आणि नागरिकतेच्या पारंपरिक सिद्धान्त परिवर्तनाची मागणी केली. सांस्कृतिक एकीकरणाच्या आधारावर निर्माण केल्या जाणाऱ्या बहुसंख्याक वर्गाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला विरोध सुरू केला. सांस्कृतिक एकीकरण संकल्पना सांस्कृतिक समुदायाचे अस्तित्व नाकारून एकल नागरिकता सिद्धान्ताला महत्त्व देते. बहुसंस्कृतिवाद विचारधारा सांस्कृतिक एकीकरणाला विरोध करून सांस्कृतिक बहुलता, सांस्कृतिक भिन्नता व सांस्कृतिक समानतेला महत्त्व देते.

५. सांस्कृतिक विविधता व बहुलतेला महत्त्व : बहुसंस्कृतिवाद ही विचारधारा सांस्कृतिक विविधता व बहुलतेला महत्त्व देते. राज्यांतर्गत विविध सांस्कृतिक समुदायांच्या उपस्थितीला मान्यता देणे, म्हणजे सांस्कृतिक विविधता व बहुलतेचा स्वीकार करणे मानले जाते. त्यासोबत विभिन्न सांस्कृतिक समूहांतील लोकांमध्ये मूल्यात्मक अंतरालादेखील स्वीकारते. विभिन्न संस्कृतीतील मूल्यांपैकी कोणत्याही एका संस्कृतीच्या मूल्यांना प्राधान्य देण्यास विरोध करते. सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीचे मूल्यांकन करू शकत नाही वा दुसन्या संस्कृतीला कनिष्ठ ठरवू शकत नाही. चार्लस् टेलरसारखे अभ्यासक मानतात की, 'विविधतेमुळे एकतेला बाधा निर्माण होत नाही, तर एकात्मता जास्त मजबूत होते. विविधतेतून एकता निर्मितीचा प्रयत्न बहुसंस्कृतिवाद करतो. सांस्कृतिक समुदायाची विभिन्नता कायम टिकवून ठेवण्यासाठी अल्पसंख्याक समुदायांना राजकीय अधिकार देण्याचे समर्थन करतो.

६. सांस्कृतिक विचारविनिमयाला प्राधान्य : बहुसस्कृतिवाद विचारसरणी सांस्कृतिक विचारविनिमयाला प्राधान्य देते. सांस्कृतिक विभिन्नता हे सद्य:कालीन समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. सांस्कृतिक विचारविनिमयाच्या माध्यमातून एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीशी परिचय होईल. या परिचयाच्या माध्यमातून परस्परांचे गुणदोष, साम्यता वा सामर्थ्याची जाणीव होईल. विचारविनिमयाच्या प्रत्येक संस्कृतीला आपल्या दोषांचे निराकरण करण्याची संधी प्राप्त होईल. सांस्कृतिक विचारविनिमयाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्राधान्य मिळते. परस्पर संपर्कामुळे गैरसमज, पूर्वग्रह दूर होण्यास हातभार लागतो. म्हणून बहुसंस्कृतिवाद विचारसरणी आंतरसांस्कृतिक विचारविमर्शाला प्रोत्साहन देते. सांस्कृतिक विचारविनिमयाला प्राधान्य देणाऱ्या तरतुदीचा राष्ट्रीय संविधानात समावेश करावा असा आग्रह बहुसंस्कृतिवादाचे समर्थक धरतात. विभिन्न संस्कृतींत कायम मित्रवत व सामंजस्यशील संबंध राहतील, हे बहुसंस्कृतिवाद गृहीत धरत नाही. विभिन्न सांस्कृतिक समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि हा संघर्ष विचारविनिमयाच्या माध्यमातून नष्ट करता येऊ शकतो हा विश्वास बहुसंस्कृतिवाद व्यक्त करतो.

७. सांस्कृतिक समानतेचे समर्थन : बहुसंस्कृतिवाद ही विचारधारा सांस्कृतिक सार्वभौमिकतेला विरोध करून सांस्कृतिक समानतेचे समर्थन करते. सांस्कृतिक समानता म्हणजे सर्व संस्कृतीच्या मूल्यांना समान करणे नव्हे, तर विभिन्नतेच्या आधारावर सर्व संस्कृतींतील मूल्यांना समान संरक्षण प्रदान करणे होय. बहुसंस्कृतिवाद सांस्कृतिक समानतेच्या आधारावर विभिन्न सांस्कृतिक समुदायांना विकासाची समान संधी राज्याने उपलब्ध करून द्यावी यावर भर देतो. बहुसंस्कृतिवाद ही विचारधारा सांस्कृतिक समानतेच्या आधारावर सामाजिक न्याय स्थापन करण्याचा प्रयत्न करते. अल्पसंख्याक समुदायाना अशा प्रकारचे सामाजिक व राजकीय पर्यावरण उपलब्ध करून देते की, ते आपला विकास घडवून आणतील आणि आपले अस्तित्वदेखील टिकवू शकतील. अशा प्रकारचे पर्यावरण निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक समानता प्रस्थापित करणे ही पूर्वअट मानली जाते.

.राष्ट्रनिर्माण प्रक्रियेला महत्त्व : बहुसंस्कृतिवाद राष्ट्रनिर्माण अवधारणेचे समर्थन करतो. राष्ट्रनिर्माण प्रक्रिया राष्ट्रातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करते. सावर्जनिक स्थानावर बहुसंख्याकांच्या संस्कृतीची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न केला किंवा अल्पसंख्याकांवर बहुसंख्याकांच्या सांस्कृतिक मान्यता लादण्याचा प्रयत्न केला, तर अल्पसंख्याक समुदायामध्ये असंतोषाची भावना उत्पन्न होईल. राज्याची ही नीती राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत अडथळे निर्माण करेल, कारण या नीतीमुळे अल्पसंख्याक राष्ट्राच्या मुख्य धारेपासून अलग होतील आणि त्यांच्यात अलगतावादाचा विकास होईल. म्हणून बहुसंस्कृतिवाद राष्ट्रनिर्माण प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी सांस्कृतिक समानतेचा पुरस्कार करतात. सांस्कृतिक समानतेच्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या अधिकारांना स्वीकृती मिळेल. त्यामुळे ते समुदाय राष्ट्रनिर्माण प्रक्रियेशी जोडले जातील. राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाचे योगदान मिळत राहील. राष्ट्रनिर्माण प्रक्रियेची आवश्यकता म्हणून बहुसंस्कृतिवादाचा वर्तमानकाळात स्वीकार केला जातो आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.