https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

विचारप्रणालीची अंत संकल्पना : (Concept of End of Ideology )


 

विचारप्रणालीची अंत संकल्पना : (Concept of End of Ideology ) राजकीय जीवनासाठी विचारप्रणाली आवश्यक मानली जाते. प्राचीन व्यवस्थेच्या विकास आणि समृद्धीत राजकीय विचारप्रणालीने महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. परंतु २० व्या शतकाच्या मध्यानंतर अनेक अभ्यासकांनी विचारप्रणालीचा अंत झाला, असे जाहीर केले. विचारप्रणालीचा अंत ही संकल्पना विसाव्या शतकात मांडल्या गेलेल्या मूल्याधिष्ठित राजकीय विचारातून उदयाला आली. २० व्या शतकात विकसित झालेल्या प्रत्यक्षार्थवाद, अनुभववाद आणि विज्ञानवादाने मूल्यमुक्त संशोधनाचा आग्रह धरला. वास्तवापासून फारकत घेणारे आणि शास्त्रीय निकषावर सिद्ध न होणारे विचार अप्रस्तुत मानणे, हा प्रमुख दृष्टिकोन होता. या दृष्टिकोनाचा प्रभाव असलेल्या अभ्यासकांनी विचारप्रणालीचा अंत ही संकल्पना मांडली.

विचारप्रणालीचा अंत ह्या संकल्पनेचा प्रमुख जनक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ मॅनहिम मानला जातो. त्यांनी 'Ideology and Utopia' या ग्रंथात विचारप्रणालीचा अंत संकल्पनेबाबत सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यांच्या मते, सद्यःकाळात राजकारणावर अर्थकारणाची मजबूत पकड आहे. अर्थकारण राजकारणाचा गाडा हाकलते. त्यामुळे ऐतिहासिक भूतकाळ नाकारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. मूल्याधिष्ठित संकल्पनेचा संकोच होत आहे. या परिस्थितीत राजकीय क्षेत्रातून मूल्याधिष्ठित विचारांची हकालपट्टी होत आहे. विचारप्रणालीचा वापर काही राजकीय अभिजनांनी स्वतःचे वर्चस्व कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी केलेला आहे. तसेच राजकीय विरोधकांचा नायनाट करण्यासाठीदेखील तिचा वापर अनेक राष्ट्रांमध्ये झालेला दिसून येतो. विचारप्रणालीच्या प्रर्वतकांनी तिचा अयोग्य पद्धतीने वापर केल्यामुळे ही संकल्पना त्याज्य ठरविण्याचा प्रयत्न आधुनिक काळात अनेक अभ्यासकांनी केलेला आहे.

फ्रेंच शास्त्रज्ञ रेमन्ड आमरा या मार्क्सवादाच्या विरोधकाने मार्क्सचा साम्यवाद संपला आहे, हे विचार मांडून विचारप्रणालीच्या अंताचे भाकीत केले. त्याने 'दि ओपियम ऑफ इंटलेक्युअल्स' या ग्रंथात साम्यवाद, नाझीझम आणि फॅसिझम इत्यादी विचारप्रणालीच्या आधारावर निर्माण झालेल्या व्यवस्था आधुनिक जगातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने अनउपयुक्त ठरल्यामुळे विचारप्रणालीची गरज नाही असे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विचारसरणी ही संकल्पना बुद्धिवंत वर्गापुरती मर्यादित राहिली असून, उदारवादी देशामधील सक्रिय पक्षीय राजकारण आणि मतदारांच्या व्यवहाराशी तिचा संबंध राहिलेला नाही. १९५५ साली मिलान येथे झालेल्या परिषदेत उजव्या आणि डाव्या विचारप्रणालीतील कटुता कमी झालेली आहे. फॅसिझम, नाझीझमदेखील समाप्त झालेला आहे. टॉलकॉट पारर्सन्ससारख्या विचारवंताच्या मते, 'वैज्ञानिक दृष्टीकोन हा राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग मानला गेल्यामुळे कोणतीही एक विचारसरणी स्वीकारणे राष्ट्राला शक्य नाही. कारण विचारप्रणाली एक प्रकारचे विचारांचे गूढीकरण असते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसते.' डान्टेसारखा जर्मन अभ्यासक विचारप्रणाली ही बौद्धिक शक्कल मानतो. तिचा स्वीकार करणे म्हणजे राष्ट्राला विनाशाकडे ढकलणे असते. एडवर्ड शील्स यांनी मानव जात आता विचारधारावादी आणि उन्मादवादीच्या उत्पीडनापासून लवकरच मुक्त होईल, हे घोषित केले. बर्नार्ड क्रीक यांनी विचारप्रणाली नेहमीच हुकूमशाही राजवटीला पाठिंबा देत असतात हे सिद्ध करून देण्यासाठी राजकीय वास्तव आणि राजकीय विचारप्रणाली यांत फरक दर्शविण्याचा प्रयत्न केला. विचारप्रणालीच्या आधारावर प्रस्थापित झालेल्या राजवटी दमनकारी वा जुलूमी स्वरूपाच्या असतात. या संदर्भात ते फॅसिस्ट, नाझीझम आणि साम्यवादाचे उदाहरण देतात. दडपशाही मार्गाने होणाऱ्या राजकीय परिवर्तनात स्वायत्त विचाराला कोणताही वाव राहत नाही. त्यामुळे कोणतीही विचारसरणी वास्तवापेक्ष अत्यंत भिन्न स्वरूपाची असते. हॅना ऍरेंट या महिला अभ्यासिकेने विचारप्रणालीच्या अंत संकल्पनेला सहमती दर्शविलेली आहे. विचारप्रणाली ही नेहमीच भूतकाळाशी संबंधित असते. प्रत्येक विचारवंत तत्कालीन परिस्थितीच्या आधारावर विचार मांडत असतो. तर्कशुद्ध पद्धतीने विधाने करून सत्य शोधल्याचा आभास निर्माण करत असतो. आपण सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण केल्यास अपेक्षित परिवर्तन घडवून येईल हा दावा करत असतो. परंतु कोणतीही विचारप्रणाली वास्तवात जशीच्या तशी लागू करता येत नाही. कारण परिस्थितीत नेहमी बदल होत असतो. तत्कालीन काळात विचारप्रणाली बरोबर असेल, परंतु भविष्यात ती बरोबर ठरेल याची कोणतीही शाश्वती नसते. भविष्याविषयी भाकीत कथन करणे शास्त्रीयदृष्ट्या जवळपास अशक्य असते; मात्र प्रत्येक विचारसरणी भविष्याविषयीच्या उदात्त आशावादावर आधारलेल्या असतात. या परिस्थितीत विचारप्रणालीचा स्वीकार म्हणजे भविष्याचे रहाटगाडे आपल्या अंगावर ओढून घेण्यासारखे आहे, असे आधुनिक अभ्यासकांना वाटते.

डॅनियल बेल यांनी 'एन्ड ऑफ आयडिऑलॉजी' या ग्रंथात विचारप्रणाली सद्यःयुगात कालबाह्य वा अप्रस्तुत ठरल्याचे घोषित केले आहे. ते सांगतात की, 'भांडवलशाही व्यवस्थेने २० व्या शतकात आणलेल्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनामुळे विचारप्रणालीचे सर्व आधार खिळखिळे केलेले आहेत. अनेक सत्तावादी रचना व कल्याण राज्यांच्या उदयामुळे लोकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण झाले आहे. कामगारांचे राहणीमान बदलल्यामुळे समता आणि स्वातंत्र्य या मूल्यांना मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे डाव्या विचारसरणींचे पक्ष व व्यक्तींचा जहालपणा सौम्यपणात रूपांतरित झाला. त्यामुळे आजच्या युगात मूलभूत परिवर्तनाची आवश्यकता कोणत्याही समाजघटकाला वाटत नाही आणि मतभेदाचे मुद्दे अत्यंत किरकोळ स्वरूपाचे असून, ते व्यवस्थेंतर्गत सुटू शकतात. '  डॅनियल बेल यांनी केलेला युक्तिवाद उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेला मिळालेले यश आणि मार्क्सवादाच्या नावावर रशियामध्ये फसलेल्या प्रयोगाच्या पार्श्वभूमीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. उदारमतवादी लोकशाहीचे पाश्चिमात्य विकास प्रतिमान यशस्वी झाल्यामुळे मार्क्सवादी विकास प्रतिमानाच्या अपेक्षित गरजा आणि अपेक्षांची पूर्तता झालेली आहे. त्यामुळे मार्क्सवादाची गरज राहिलेली नाही, तसेच भांडवलशाहीविषयक मार्क्सने गृहीत धरलेल्या अनेक बाबींबाबत नेमका उलट्या गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे त्याने वर्तवलेली अनेक भविष्ये खोटी ठरली. मार्क्सवादाच्या अपयशामुळे विचारप्रणालीविषयीचे समाजमनाचे आकर्षण कमी झाले. उदारमतवादी लोकशाही व्यवस्थांनी मोठ्या प्रमाणावर जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळे राजकीय स्थिरतेचा प्रश्न संपलेला आहे. कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा अवलंब सर्वच राजकीय व्यवस्थांनी सुरू केल्यामुळे व्यवस्थेच्या चौकटीत राहून आर्थिक विकासाचा प्रश्न सोडविण्यास हातभार लागलेला आहे. त्यामुळे विविध राजकीय व्यवस्थेतील राजकीय पक्षांच्या राजकीय ध्येयधोरणात फारसा फरक राहिलेला नाही. उदा. अमेरिकेतील डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या विचारप्रणालींचा अंत झाला असे बेलला वाटते.

बेल यांनी राजकीय विचारप्रणालीचा अंत स्पष्ट करण्यासाठी अनेक उदाहरणे दिलेली आहेत. विचारप्रणालीच्या अपयशाच्या उदाहरणातून आजच्या काळात विचारप्रणालीचे औचित्य उरलेले नाही, हे प्रतिपादन केले. विचारप्रणालीच्या अंतासाठी पाश्चिमात्य व्यवस्था यशस्वीतेचे गोडवे गायलेले आहेत. विचारप्रणालीच्या अंतामुळे कामगारांचे संघटन उभे करून संघर्ष करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. कारण द्वितीय महायुद्धाच्या काळात विचारप्रणालीतील संघर्षामुळे संपूर्ण जगाला भीषण आपत्तीला सामोरे जावे लागले. त्यामुळे आज कुणीही विचारप्रणालीच्या समर्थनाचे धाडस करू शकणार नाही असे बेलला वाटते. डेनियल बेल यांनी वैज्ञानिक प्रगतीमुळे आदर्शवादी राजकीय व्यवस्थेचा विचार कालबाह्य झालेले आहे, असे मत व्यक्त केले. प्राचीन राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय विचारप्रणाली राजकीय विकासाचे साधन मानली जात होती. परंतु आधुनिक काळात विशिष्ट विचारप्रणालीच्या आधारावर राज्याचा विकास घडवून आणणे अशक्य आहे, ही जाणीव वैज्ञानिक प्रगतीने निर्माण केलेली आहे. विचारप्रणालीच्या अंताविषयी बेल यांनी काही कारणे विशद केलेली आहेत.

१. वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक साधनांद्वारे राज्याचा विकास होणार आहे, हे सत्य लोकांना उमगल्यामुळे विचारप्रणालीचे महत्त्व कमी झाले.

२. राज्याच्या विकासासाठी आर्थिक नियोजन, औद्योगिकीकरण, लोकशाही विकेंद्रीकरण आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थांची गरज आहे, याची जाणीव झाल्यामुळेदेखील विचारप्रणालीचा अंत घडून आलेला आहे.

३. लोकशाही व्यवस्थेतील सत्ताबदलाचा निवडणुका हा योग्य मार्ग आहे, यावर लोकांचा विश्वास बसल्यामुळे विकास व सत्ताबदलासाठी संघर्षाला प्रोत्साहन देणाऱ्या विचारप्रणालीची गरज राहिलेली नाही. व्यवस्थेच्या चौकटीत राजकीय प्रश्नांचे निराकरण करणे शक्य आहे हे वास्तव उमगल्याने, संघर्षाऐवजी सहमतीला महत्त्व आल्यामुळे विचारप्रणालीचा अंत घडून आला.

थोडक्यात डेनियल बेलला वाटते की, विचारप्रणालीमुळे काल्पनिक आदर्श आणि एकाधिकारशाही निर्माण होते. विचारप्रणालीच्या अस्तित्वामुळे राष्ट्राराष्ट्रांत संघर्ष निर्माण होतो. विचारप्रणाली वैज्ञानिक तत्त्वापासून फारकत घेणारी असल्यामुळे मानवी जीवनातील प्रश्नांचे निराकरण करण्यात अनउपयुक्त आहे. त्यामुळे तिचा अंत होणे आवश्यक आहे.

डेनियल बेलसारखी मिळतीजुळती भूमिका लिपसेट यांनी मांडलेली आहे. म्हणतो की, ' औद्योगिक क्रांतीतून मानवी समुदायाच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण झाले आहे. कामगारांना राजकीय नागरिकत्व मिळालेले आहे. ते आर्थिकदृष्ट्या सुस्थिर झाल्यामुळे त्यांच्या जीवनात बदल झालेला आहे. उदारमतवाद्यांनी कल्याणकारी लोकशाहीला मान्यता दिलेली आहे. राजकीय व्यवस्थेला सर्वोच्च स्थान देण्याने आर्थिक प्रश्न पूर्णपणे सुटत नाही; परंतु स्वातंत्र्यावर मात्र अतिक्रमण होते हे डाव्यांना समजले आहे. तसेच राजकीय कृतिप्रवणता आणि राजकीय परिवर्तनासाठी ज्यांना विचारप्रणाली आवश्यक वाटत होती, त्यांना पश्चिमेकडील राजकारणात सामजिक क्रांतीमुळे कोणते स्थान उरलेले नाही. '  

गालब्रेथ यांनी New Industrial State' या ग्रंथात आधुनिक समाज हा औद्योगिक समाज असून त्यात व्यावसायिक वर्गाचे वर्चस्व आहे. समाजाचे संचालन तांत्रिकतेवर वर्चस्व असलेल्या वर्गांच्या हातात असते. त्या वर्गांचा विचारसरणीशी काहीही संबंध नाही. बॅरिंग्टन मूर मानतो की, ' संयुक्त राष्ट्र अमेरिकेत निग्रो समुदाय वगळता दुसऱ्या कोणत्याही समुदायाला शासकीय अभिजनाशी संघर्ष करताना विचारधारात्मक प्रेरणा दिसून येत नाही. '  डेविड रीसमैंनच्या मते, पुंजीवादी अर्थव्यवस्थेने विकासात दिलेल्या योगदानामुळे राजकीय संघर्षांचे विचारधारात्मक आधार नष्ट झाले. डॅनियल बेल, लिपसेट, रॉबर्ट लेन, डांते जर्मिनो, बॅॉरेंग्टन मूर इत्यादींना सद्यःकाळात विचारप्रणालीचा अंत सुरू झाला आहे, असे वाटते. औद्योगिक क्रांती, तंत्रविज्ञान प्रगती, उदारमतवादी लोकशाही आणि कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे मानवी जीवनात आलेल्या समृद्धीमुळे, संघर्ष प्रवृत्ती कमी झाल्यामुळे विचारप्रणालीचे आकर्षण कमी होण्यात झाली. या सर्व विचारवंतांच्या विचारांचे एक सूत्र आहे, ते म्हणजे सद्यः काळात विचारसरणीची उपयुक्तता संपलेली आहे.

विचारप्रणालीच्या अंताच्या संकल्पना मांडणाऱ्या बहुसंख्य विचारवंतांनी मार्क्सवादला अनुलक्षून विचार मांडलेले आहेत. मार्क्सवाद हीच आर्थिक परिवर्तन घडवून आणून समताधिष्ठित समाजरचनेची उभारणी करणारी एकमेव विचारसरणी आहे. इतर विचारसरणी जगात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात, तर मार्क्सवाद जग बदलण्याचा प्रयत्न करणारी विचारसरणी आहे, हा दावा करून संपूर्ण जगात भविष्यकाळात साम्यवाद हा एकमेव पर्याय राहील, असे भाकीतकथन अनेक मार्क्सवादी करत होते. मात्र रशियातील मार्क्सवादाने स्टालिनच्या काळात घेतलेल्या वळणाने साम्यवादाविषयीच्या भ्रमनिराशेत वाढ झाली आणि उजव्या विचारसरणीच्या समर्थक देशांना मार्क्सवादाची आलोचना करण्यास योग्य कारण मिळाले. त्या कारणाच्या आधारावर लोकशाहीत उदारमतवादी विचारसरणी ही एकमेव विश्वतारक तत्त्व आहे पटवून देण्यासाठी विचारसरणीच्या अंतचर्चेला पाठबळ उपलब्ध करून दिले. दुसऱ्या महायुद्धानंतर डेव्हिड ईस्टन, आल्मंड, पॉवेल यांनी व्यवस्था विश्लेषण आणि रचनात्मक कार्यवादाच्या माध्यमातून विचारप्रणालींना ऐतिहासिक ठरविण्याचा प्रयत्न केला, विचारप्रणालीतील विचार वास्तवात येऊ शकत नाही आणि त्यांच्यातील संकल्पना शास्त्रीय निकषावर खऱ्या उतरणाऱ्या नाहीत. विचारप्रणाली ह्या कल्पनेच्या मनोन्या आहेत अशी मते मांडली. त्या मताच्या आधारावर डेनियल बेल, लिपसेट आणि इतर विचारवंतांनी विचारप्रणालीचा अंत ही उद्घोषणा सुरू केली.

विचारप्रणालीची अंत संकल्पना परीक्षण- विचारप्रणालीच्या अंताची घोषणा करणारे अभ्यासक विचारप्रणालीमुळे निर्माण झालेला संघर्ष आणि अस्थिरतेवर भर देतात. विचारप्रणालीने विविध क्षेत्रांतील अपेक्षित केलेले बदल उदारमतवादी लोकशाही आणि कल्याणकारी राजवटीत पूर्ण करता येतील यावर भर देतात. भांडवलशाही व्यवस्थेत झालेल्या बदलातून मार्क्सवादी विचारप्रणालीची अव्यवहार्यता लक्षात आली, हे स्पष्ट करण्यासाठी कामगारांना मिळालेले अधिकार आणि त्यांच्या बदलेल्या जीवनमानाची उदाहरणे सादर करतात. नाझीवाद व फॅसिझमसारख्या विचारप्रणालीने जगाच्या केलेल्या विनाशाचीदेखील उदाहरणे देतात. चीन व रशियासारख्या साम्यबादी राष्ट्रांनीदेखील साम्यवादी नमुन्याला मुरड घालून विविध विचारप्रणालींचे संमिश्र प्रतिमान अवलंबिल्याचे आर्वजून नमूद करतात. विविध देशातील राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये विचारप्रणालीचे अस्तित्व कमी झालेले आहे हेदेखील स्पष्ट करतात.

विचारप्रणालीच्या अंताची घोषणा करणाऱ्या विचारवंतांचा युक्तिवाद तर्कसंगत वाटत असला, तरी अपुऱ्या ज्ञानावर आधारलेला आहे. उदारमतवादी लोकशाहीच्या यशाने भारावून गेलेल्या लोकांनी वास्तवतेकडे दुर्लक्ष केलेले आहे. उदारमतवादी लोकशाहीतील मूलभूत दोषांची चर्चा न करता, ते दोष झाकून, तिचे दोष उघड करणाऱ्या मार्क्सवादी, समाजवादी आणि तत्सम पर्यायी विचारांचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने ही मांडणी केलेली आहे. 'जगातील संघर्ष संपले' ह्या गृहीतकांवर ही मांडणी उभी आहे; परंतु हे गृहीतक चुकीच्या पायावर आधारलेले आहे. जगाच्या अस्तित्वापर्यंत जगातील संघर्ष अस्तित्वात राहतील, या वास्तवाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. भांडवलशाहीचे समर्थन करण्याच्या नादात विचारप्रणाली संपल्या हे जाहीर करून मोकळे झाले. भांडवलशाही लोकशाही आणि उदारमतवादी लोकशाहीच्या प्रचंड यशानंतरही सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संघर्ष व तणाव कायम आहेत. आर्थिक विषमता व शोषणाचे प्रमाण पहिल्यापेक्षा अधिक वाढलेले आहे. संपत्तीच्या केंद्रीकरणामुळे वितरणात्मक न्यायाची संकल्पना इतिहासजमा झालेली आहे. या परिस्थितीत भांडवलशाहीची भलामण करून विचारप्रणालीचा अंत जाहीर करणे हा वैचारिक दिवाळखोरीचा नमुना वाटतो.

विचारप्रणालीचा अंत झाला हे जाहीर करणाऱ्या विचारवंतांच्या प्रतिपादनाचा समाचार घेताना टिटमस यांनी अनेक मूल्यात्मक व तथ्यात्मक प्रश्न उपस्थित केले कल्याणकारी राज्याने दारिद्र्य वंचिततांचे प्रश्न खऱ्या अर्थान संपलेले आहेत काय? असा प्रश्न उपस्थित करून प्रतिवाद केलेला आहे. पुंजीवादी उदारवादी अर्थव्यवस्थेमुळे एकाधिकारशाही वा मक्तेदारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळाले. परिणामत: उत्तर-औद्योगिक समाजात विषमतेत वाढ होऊन सामाजिक विघटनास गती मिळाली. समाज हा आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला असेल, परंतु सांस्कृतिकदृष्ट्या अवनतीच्या दिशेने जात आहे, असे टिटमस यांना वाटते. लिपसेटसारख्या विचारवंताने औद्योगिक क्रांती मानवी जीवनाचा अंतिम टप्पा मानून विचारमांडणी केलेली आहे. औद्योगिक क्रांतीतून मानवाचे सर्व प्रश्न सुटले, असे गृहीत धरलेले आहे. येथेच त्यांची चूक झाल्याचे टिटमस यांना वाटते. औद्योगिक क्रांतीतून मानवाची आर्थिक भरभराट झालेली आहे. पूर्वपक्षा चांगले जीवन मानव उपभोगत आहे हे जरी खरे असले, तरी दुसऱ्या बाजूला आर्थिक  वंचितता आणि सामाजिक विघटनाचे प्रमाण वाढलेले आहे. मुक्त स्वातंत्र्याच्या नावाखाली उभी राहिलेली मूल्यव्यवस्था वंचितता परत अंधाऱ्या खाईत टाकते आहे. कामगारांना नागरिकत्व मिळाल्याने त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. यंत्रप्रधान औद्योगिकीकरण आणि स्वयंचलित यंत्रांच्या वापरातून कामगार औद्योगिक परिघाबाहेर ढकलले जात आहेत. संघटित क्षेत्रातून रोजगार कमी होत असल्याने कामगारकपात आणि सक्तीच्या सेवानिवृत्ती योजनांमुळे कामगारवर्ग हतबल झाला आहे. आर्थिक अरिष्टातून मानवी जीवनात हतबलता आली आहे. कल्याणकारी राज्य संकल्पनेतून औद्योगिक संबंधात सुरळीतपणा येण्याऐवजी औद्योगिक कलह वाढलेला आहे. लोकांना सोयी-सवलती देण्याच्या नावाखाली महत्त्वपूर्ण क्षेत्राची जबाबदारी भांडवलदाराकडे देऊन नवी सरंजामशाही व्यवस्था निर्माण केली जात आहे.

विचारप्रणालीचा अंत या चर्चेला लिओ स्ट्रॉस यांनी प्रतिवाद केला. त्यांनी मूलगामी राजकीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला महत्त्व दिले. प्लेटोपासून ते मार्क्सपर्यंत सर्व विचारवंतांच्या विचारांचे मोल मांडण्याचा प्रयत्न केला. प्लेटोच्या विचारांची अभिनव पद्धतीने मांडणी केली. राजकीय सिद्धान्त आणि राजकीय विचारसरणी मूल्यविरहित असू शकत नाही. मूल्याधिष्ठित हे राजकीय सिद्धान्ताचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मूल्यविरहित ज्ञान विपरीत हेतूसाठी वापरले जाते. योग्य-अयोग्यतेचा विचार हा राज्यशास्त्रज्ञाला करावाच लागतो. मानवाचे बौद्धिक कुतूहल जिंवत आहे, तोपर्यंत भविष्याचा वेध घेणाऱ्या आणि मानवाच्या मार्गक्रमणाला दिशा देणाऱ्या विचारसरणीचे महत्त्व कमी होणार नाही. विचारप्रणालीच्या अंताची घोषणा करणारे भांडवलशाहीचे छुपे समर्थन करणारे आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही. भांडवलशाही व्यवस्था मानवी नीतिमत्ता घडविण्याच्या दृष्टीने अयोग्य मानली जाते. या व्यवस्थेत बाजारव्यवस्थेनुसार समाजातील वितरण व्यवस्था आधारित असते. फायदातोटा आणि स्पर्धेच्या आधारावर आधारलेली व्यवस्था समाजातील वंचितांचे शोषण करणार, हे उघड आहे. बाजारव्यवस्थेवर आधारित नीतिमूल्यावर चालणारी व्यवस्था असल्यामुळे शोषितांचे अधिक शोषण होणार, म्हणून या व्यवस्थेला सर्वसमावेशक किंवा समाजहितकारी व्यवस्था मानता येणार नाही, हे धडधडीत सत्य असतानाही विचारप्रणालीचा अंत घोषित करणारे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानतात आणि त्या व्यवस्थेचे गुणगान करण्यात आपले बौद्धिक सामर्थ्य खर्ची करताना दिसतात. या भयानक परिस्थितीत विचारप्रणालीचे महत्त्व कमी होण्याऐवजी जास्त वाढलेले दिसते. आर्थिक समृद्धी वाढत असताना समाज भयग्रस्त होत आहे. कल्याणकारी राज्य संकल्पनेतून समस्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. या परिस्थितीत विचारप्रणालीचा अंत घोषित करणे ही एक फॅशन बनलेली आहे. म्हणून काही विचारवंतांच्या मते, विचारप्रणालीचा अंत घोषित करणे ही नवी पुराणमतवादी विचारप्रणाली आहे. राईस मिल्ससारखे अभ्यासक, 'अकालीच प्रौढ झालेल्या, प्रतिष्ठेच्या पायऱ्या भरभर चढू पाहणाऱ्या, आपली तात्कालिक व प्रांतिक प्रतिष्ठाच लाखमोलाची मानणाऱ्या मध्यमवयीन लेखकांची आत्मसंतुष्ट घोषणा आहे. '  ‘जैसे थे' चे समर्थन करणे त्याला पाठिंबा देणे यांखेरीज त्यांच्याकडे दुसरा नाही.' या शब्दांत विचारप्रणालीचा अंत घोषित करणाऱ्या समाचार घेतात. विकासाच्या पायऱ्या भराभर चढलेल्या पाश्चात्त्य राष्ट्रांना विचारप्रणालीचा अंत घोषित करणे कदाचित परवडेल, परंतु मागास राष्ट्रांना ही चैन परवडणार नाही.

राईस मिल्स यांनी विचारप्रणालीचा अंत घोषित करणाऱ्यांना दिलेले उत्तर बहुतांशी लोकांनी मान्य केलेले आहे. कारण विचारप्रणालीच्या प्रभावापासून कोणतेही राष्ट्र अलिप्त नाही. देश प्रगत असो की अप्रगत असो, तेथे विचारप्रणालीचे अस्तित्व दिसून येते. विचारप्रणालीचा अंत घोषित करणाऱ्या अमेरिकेसारख्या देशातील विचारवंतांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, अमेरिका देश भांडवलशाही विचारप्रणालीच्या तत्त्वावर चालत आहे. विचारप्रणाली प्रवाह नेहमी सुरू राहणार आहे. विचारप्रणालीच्या माध्यमातून राजकीय प्रेरणांची निर्मिती होत असते. प्रत्येक व्यवस्थेच्या अस्तित्व सातत्यासाठी ह्या प्रेरणेची आवश्यकता असते, म्हणून विचारप्रणाली अंत ही अशक्य संकल्पना वाटते.

विचारप्रणालीच्या अंताविषयीचा युक्तिवाद पोकळ गृहीतकावर आधारलेला आहे, हे वरील चर्चेतून स्पष्ट होते. विचारप्रणाली कधीही कालबाह्य होऊ शकत नाही. काळानुरूप तिचे महत्त्व कमीजास्त होऊ शकते. राजकीय सत्ताप्राप्तीसाठी संघर्ष उभ्या करणाऱ्या विचारप्रणालीचे महत्त्व आधुनिक काळात कमी झालेले असले, तरी समाजव्यवस्थेला प्रेरणा देणाऱ्या विचारप्रणालीचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. जगातील अनेक राजकीय व्यवस्था आजही विचारप्रणालीच्या आधारावर राज्यकारभार करताना आढळतात. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून विचारप्रणालीच्या अंताच्या चर्चेला केलेल्या विनाशामुळे ह्या चर्चेने जोर पकडला. विचारप्रणाली खरोखरच विनाशकारी वा सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्ध काळात सर्वंकष विचारप्रणालींनी महाभयंकर गोष्ट आहे, हे पटविण्याचा प्रयत्न विचारप्रणालीच्या विरोधकांनी सुरू केला. त्यासाठी वैज्ञानिक प्रगती, तंत्रज्ञान, औद्योगिक क्रांतीचे गोडवे गाण्यास सुरुवात केली. मार्क्सवादाने उभे केलेले मूलभूत प्रश्न इतिहासजमा झालेले आहेत. त्यामुळे संघर्षाची गरज राहिलेली नाही. संघर्षाऐवजी सहमती वा सहकार्याला महत्त्व दिले पाहिजे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला; परंतु हा प्रयत्न फारसा यशस्वी झालेला नाही. विचारप्रणालीच्या समर्थकांनी विचारप्रणालीच्या आवश्यकतेचे महत्त्व पटवून दिले आणि मानवी जीवनात विचारप्रणालीचे असलेले आकर्षण आजही कमी झालेले नाही, हे नमूद केले. विचारप्रणालीच्या अंताच्या चर्चेतून विचारप्रणाली नष्ट करण्याची गरज नसून, त्यात आलेला साचेबंदपणा आणि पोथीबद्धपणा नष्ट करून बदलत्या काळानुसार त्यात प्रवाहीपणा आणण्याची गरज आहे, हे वास्तव लक्षात आणून दिले. विचारप्रणालीच्या आधारावर निर्माण झालेले संघर्ष आधुनिक काळात उपयुक्त नसून, विचारप्रणालीतील चांगल्या तत्त्वांचा समन्वय करून मानवी विकासाला दिशा देणाऱ्या नव्या विचारप्रणालीच्या उभारणीची गरज आहे, हेदेखील स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.