https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राजकीय सिद्धांताचा ऱ्हास व पुनरूज्जीवन चळवळ कारणमीमांसा आणि पुनरुज्जीवन


 

राजकीय सिद्धांताचा ऱ्हास व पुनरूज्जीवन चळवळ

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये निर्माण झालेल्या राज्यशास्त्रज्ञांच्या पिढीने पारंपरिक राज्यशास्त्रातील संकल्पनाप्रति आपले असमाधान प्रकट करण्याची चळवळ सुरू केली. त्या चळवळीला वर्तनवादी चळवळ असे म्हणतात. या चळवळीच्या समर्थकांनी प्राचीन काळापासून राज्यशास्त्रात चालत आलेली राजकीय तत्त्वज्ञानाची परंपरा खंडित झाली आहे. असे घोषित केले. डेव्हिड ईस्टन, आल्फ्रेड कॉबन यांनी राजकीय सिद्धांताचा हास झाल्याचे जाहीर केले. पीटर लॉस्वेल आणि रॉबर्ट डहालसारख्या अभ्यासकांनी राजकीय सिद्धांताचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची चर्चा करणारा विचार हा परंपरावाद आणि व्यवहारवाद यातील एक विवाद मानला जातो. प्रत्यक्षवादी, अनुभववादी आणि व्यवहारवादी अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापक (रॉबर्ट डहाल, डेव्हिड ईस्टन) राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाबद्दल चर्चा करतात तर बहुसंख्य युरोपियन आणि ब्रिटिश अभ्यासक परंपरावादाचे समर्थन करत राजकीय सिद्धांताच्या पतनाविषयी शंका प्रदर्शित करतात. राजकीय सिद्धांताचा ऱ्हासाच्या सिद्धांताला गंभीर चूक मानतात. राजकीय सिद्धांताच्या उपयोगितेवर भर देतात. राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाचा विवाद हा मुख्यतः कोणत्या राजकीय पद्धतीचा वापर करावा यावरून सुरू झालेला आहे. परंपरावादी आपले विश्लेषण व उद्देशाची मांडणी ऐतिहासिक, वैचारिक आणि आदर्शवादाच्या आधारावर करतात, तर व्यवहारवादी वैज्ञानिक, अनुभववादी, प्रत्यक्षर्थावाद, विश्लेषणवादाच्या आधारावर करतात.

राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची चर्चा करताना अभ्यासकांनी विविध कारणमीमांसा मांडलेल्या आहेत. उदारमतवादी लोकशाहीच्या यशामुळे राजकीय पेचप्रसंग सुटलेले आहेत. सद्यकाळात लोकशाही व्यवस्थेच्या चौकटीत राजकीय प्रश्नांचे निराकरण करणे सहज शक्य झाल्यामुळे व निवडणुकांमुळे राजकीय सत्तांतर करणे सोपे झाल्यामुळे क्रांती वा संघर्षाचे सिद्धांकन करण्याची आवश्यकता राहिली नसल्यामुळे राजकीय सिद्धांताचा ऱ्हा झाल्याचे काही अभ्यासकांना वाटते. दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या आधुनिक राज्यशास्त्राने राजकीय सिद्धांतातील फोलपणा उघडकीस आणल्यामुळे राजकीय सिद्धांताचा मृत्यू झाल्याची काही अभ्यासकांनी भूमिका मांडली. डेव्हिड ईस्टन यांनी लिहिलेल्या 'The Political System' ग्रंथात पारंपरिक राज्यशास्त्रातील राजकीय सिद्धांत निव्वळ चिंतन-मननावर उभे होते. सिद्धांत मांडणीसाठी सूक्ष्म निरीक्षण व शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला गेला नव्हता. अशा शास्त्रीय राजकीय सिद्धातापासून राज्यशास्त्राची सुटका करणे गरजेचे आहे. प्रबोधन काळापासून ते २० व्या शतकापर्यंत जागतिक इतिहासातील घडामाडींमुळे व उलथापालथीमुळे राजकीय सिद्धांताची रचना करण्यास पोषक वातावरण अस्तित्वात होते. परंतु २० व्या शतकात राज्यशास्त्राच्या अध्ययनात झालेल्या क्रांतिकारी व व्यापक बदलामुळे राजकीय सिद्धांताची आवश्यकता राहिली नाही. ईस्टन मानतो की,         प्रा. हेरॉल्ड लास्कीनंतर नाव घेण्यासारखा तत्त्वज्ञ २० व्या शतकात निर्माण होऊ शकला नाही. याचा अर्थ राजकीय सिद्धांताची प्रस्तुता संपलेली आहे. डेव्हिड ईस्टनची भूमिका अनुभववादी, प्रत्यक्षार्थवादी व वर्तनवादी अभ्यासकांनी उचलून धरली.

 

अनुभववादी अभ्यासकांनी २० व्या शतकाच्या मध्यांतरानंतर राजकीय सिद्धांतावर प्रखर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. राजकीय सिद्धांत म्हणजे स्वप्नरंजन वा निरर्थक प्रयास असे मानले जाऊ लागले. राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाविषयीच्या हाकाटीमुळे पारंपरिक राज्यशास्त्राच्या अध्ययनावर काही काळ काळे ढग जमा झाले. पारंपरिक राज्यशास्त्र अनउपयुक्त आहे, असाही गैरसमज निर्माण झाला. परंतु राजकीय सिद्धांताच्या मृत्यूची घोषणा करणाऱ्यांचे अंतस्थ हेतू समोर आल्यामुळे राजकीय सिद्धांताच्या समर्थकांनी जबरदस्त प्रतिहल्ला चढविला. राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची हाकाटी पुकारणाऱ्या अभ्यासकांचा समाचार घेऊन सिद्धांताचा ऱ्हा होणे अशक्य आहे असे प्रतिपादन केले. राज्यशास्त्राच्या अभ्यासात दोन्ही भूमिकातील प्रखर वादविवाद अनेक वर्षापासून सुरू आहेत. या वादाच्या दोन्ही बाजूंचा सविस्तर विचार आपण करणार आहोत.

राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची कारणमीमांसा-

२० व्या शतकात ज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या व्यापक बदलाचा प्रभाव विविध ज्ञानशाखांवर पडू लागला. विशेषत: सामाजिक शास्त्राच्या अध्ययनात क्रांतिकारी बदल होऊन नवीन नवीन अध्ययन पद्धती वा दृष्टिकोनाचा उदय होऊ लागला. नवीन अध्ययन पद्धतीद्वारे केल्या जाणाऱ्या अध्ययनातून पारंपरिक संकल्पना व भूमिकांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. सामाजिकशास्त्रात झालेल्या बदलाचा प्रभाव राज्यशास्त्रावर देखील झाला आणि त्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्रातील अनेक गोष्टी प्रश्नांकित केल्या जाऊ लागल्या. राज्यशास्त्राचे प्राण मानल्या जाणाऱ्या राजकीय सिद्धांताना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकन विद्यापीठातील राज्यशास्त्रज्ञांनी आव्हानित करण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्याने डेव्हिड ईस्टन, कार्बन, आल्मंड, रॉबर्ट डहाल ही प्रमुख नावे सांगता येतील. या अभ्यासकांनी राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची पुढील कारणे सांगितली आहेत.

१) इतिहासाच्या अध्ययनावर भर - डेव्हिड ईस्टनच्या मते डनिंग, सेबाईनसारख्या राज्यशास्त्रज्ञांनी आपल्या जीवनातील फार मोठा कालखंड गतकाळातील राजकीय विचारवंतांच्या अभ्यासासाठी खर्च केला. नवीन सिद्धांतरचना करून दिशा दाखविण्याऐवजी भूतकाळातील सिद्धांताचे विश्लेषण करण्यासाठी आपले बौद्धिक सामर्थ्य खर्च केले. समकालीन राजकीय संस्थांचे विश्लेषणात्मक अध्ययन करण्याऐवजी ऐतिहासिक कथन मांडण्यात जादा रस घेतला. परिणामतः स्वतंत्र व सृजनशील अध्ययनाला राज्यशास्त्र मुकले. सॉक्रेटिसपासून ते कार्ल मार्क्सपर्यंतच्या राज्यशास्त्रातील अभ्यासकांची महान परंपरा खंडित झाली. राजकीय विचारवंत इतिहासकार बनले. समकालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांचे विश्लेषण करण्याऐवजी इतिहासकाळातील स्वप्नरंजनवादी सिद्धांत कशा प्रकारे अंमलात आणता येईल याबाबतच्या उपाययोजना सुचविण्यात गर्क राहिले. इतिहासवादाला बळी पडलेल्या राज्यशास्त्रज्ञांना बाहेर काढण्यासाठी राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची घोषणा करणे आवश्यक आहे, असे ईस्टनला वाटते.

२) नैतिक सापेक्षतावाद - ह्युमन, वेबर आणि मार्क्ससारख्या अभ्यासकांनी तथ्ये आणि मूल्य यात फारकत करण्याचा प्रयत्न केला. मूल्ये ही व्यक्तिनिष्ठतेवर आधारलेली असतात. राज्यशास्त्राचे अध्ययन मूल्यमुक्त करण्याचा संकल्प वेबरसारख्या अभ्यासकांनी मांडला. इतिहासातील एका कालखंडातील मूल्य दुसऱ्या कालखंडात उपयुक्त ठरू शकत नाही. प्रत्येक कालखंडातील परिस्थितीत बदल होत असतात, परंतु बदलाला स्थान देण्यात पारंपरिक राजकीय सिद्धांताला अपयश आले. २० व्या शतकात राजकीय क्षेत्रात व्यापक बदल झाले. या बदलाची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करण्याऐवजी अभ्यासक नैतिकतेच्या आहारी गेले. जुन्या मूल्यांचा चिकित्सक अभ्यास करून निरपेक्ष राजकीय सिद्धांत बांधण्यात अपयश आले.

३) सिद्धांत निर्मितीत अपयश - २० व्या शतकात राज्यशास्त्रज्ञांना सिद्धांत निर्मितीत मोठ्या प्रमाणावर अपयश आले. कार्ल मार्क्स, हेरॉल्ड लास्कीनंतर राज्यशास्त्रात प्रभावशाली राजकीय सिद्धांताची मांडणी करणारा तत्त्वज्ञ जन्माला आला नाही याचा अर्थ राज्यशास्त्रातील महान राजकीय तत्त्ववेत्त्यांची परंपरा खंडित झाली. आधुनिक काळात तथ्यसंकलनाच्या आधारावर राजकीय संस्था व प्रक्रियांमध्ये बदल घडवून आणण्याचे उपाययोजनात्मक मार्गदर्शन अभ्यासकांनी केले, परंतु सिद्धांत निर्मितीसाठी आवश्यक प्रयत्न केले नाहीत. राजकारण कसे आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ते असे कशामुळे बनले यामागची शास्त्रीय मीमांसा करण्यात अपयशी ठरले. शास्त्रीय राजकीय सिद्धांताशिवाय परिस्थितीचे यथायोग्य आकलन करणे अशक्य आहे.

४) तांत्रिकतेवर भर - सिद्धांताला अनुभववादी चौकटीत बसविण्याच्या अट्टाहासातून सिद्धांत रचनेपेक्षा तथ्यसंकलनाला अतिरिक्त महत्त्व दिले गेले. प्रत्यक्षार्थवादाच्या प्रभावाखाली केलेल्या लेखनातून राजकीय परिस्थितीचे आकलन झाले. परंतु राजकीय सिद्धांताची उभारणी होऊ शकली नाही. राजकीय प्रश्नांचे आकलन निरीक्षणातून होणे अशक्य आहे. तथ्यसंकलनाविषयी अतिआधुनिक साधनांच्या वापरात राज्यशास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणावर मजल मारलेली आहे. राजकीय प्रश्नांचे समग्र व सर्वसमावेशक अध्ययन करून राजकीय सिद्धांताची उभारणी करण्यात अपयश आलेले आढळते. राजकीय सिद्धांताची उभारणी करण्यासाठी परिस्थितीतील सर्व चलांचा सर्वसाकल्याने अभ्यास करणे गरजेचे आहे. राजकीय प्रश्नांचे अन्य प्रश्नांशी असलेले नाते उकलण्याची गरज अभ्यासकांनी लक्षात न घेतल्यामुळे राज्यशास्त्रीय संशोधन तांत्रिक बनत गेले. तांत्रिकतेच्या अतिहव्यासातून राज्यशास्त्रात सिद्धांताचा ऱ्हास घडून आला असे डेव्हिड ईस्टन यांना वाटते.

५) राज्याच्या कार्यक्षेत्रात वाढ - आल्फ्रेड कॉर्बनच्या मते आधुनिक काळात कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे राज्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. समाजजीवनाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशाल नोकरशाही यंत्रणा आणि लष्करी यंत्रणा उभ्या कराव्या लागल्या. ही सद्यकालीन परिस्थिती राजकीय चिंतनाला मारक ठरली. साम्यवादी राजवटी असलेल्या देशातही पक्षीय व्यवस्थेवर अल्पसंख्याक गटांनी वर्चस्व निर्माण करून पर्यायी विचारप्रवाह दडपण्यात धन्यता मानली. त्यामुळे समकालीन युगातील उदारमतवादी लोकशाही आणि साम्यवादी विचारप्रणालीत राजकीय सिद्धांताची समर्पकता अस्तित्वात राहिली नाही. प्रत्येक देशातील राजकीय व्यवस्थेने आपल्या देशाच्या परिस्थितीच्या अनुकूल राजकीय सिद्धांताची सांधेजोड केल्यामुळे कोणताही सिद्धांत परिपूर्ण वा शुद्ध राहिला नाही. त्यामुळे देखील राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासास हातभार लागला.

 

६) राजकीय चिंतनातील उणिवा - राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासास आधुनिक राजकीय चिंतनातील उणिवा कारणीभूत असल्याचे आल्फ्रेड कॉर्बनचे मत आहे. पारंपरिक राज्यशास्त्रातील महान चिंतक व अभ्यासकांनी व्यावहारिक हेतूच्या परिपूर्ततच्या उद्देशाने राजकीय सिद्धांताची मांडणी केली. त्यांनी सिद्धांत मांडणीत समकालीन राजकीय व्यवस्थेची निर्भर्त्सना करून परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी सिद्धांत उभारणी केल्यामुळे नागरिकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला. त्यांनी केलेले राजकीय चिंतन, राजकीय ध्येय आणि राजकीय समाजापासून तुटकतेची भूमिका घेणारे नसून समाजाच्या भावना व आकांक्षांना सामावून घेणारे होते. नवसमाजनिर्मिती व समाज परिवर्तनासाठी आवश्यक कल्पनाचा त्यांनी पुरस्कार केला. परंतु आधुनिक राजकीय सिद्धांतकारांनी ही भूमिका पाळली नाही. सहेतूक पद्धतीने सिद्धांत मांडणीचा अभाव, नैतिक बांधिलकीची वानवा आणि समकालीन राजकीय प्रवाहाशी नाते जोडून ठेवण्यात आलेल्या अपशयामुळे आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत कुचकामी ठरले. नैसर्गिक शास्त्रासारखी शास्त्रीयता राज्यशास्त्रात निर्माण करण्याच्या हव्यासातून विषयाला कृत्रिमतेच्या कोंदणात बसविण्याचा अट्टाहास राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाला कारणीभूत बनला असे कार्बनला वाटते.

७) विचारप्रणाली- दान्ते जर्मिनोसारखा अभ्यासक राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाला विचारप्रणाली जबाबदार मानतो. विचारनिर्मिती ही भौतिकवादी प्रक्रिया असून सामाजिक व राजकीय सुधारणा घडवून आणणे हे विचारप्रणालीचे प्रमुख काम वा ध्येय आहे. विचारांचे स्त्रोत विचारप्रणालीपुरते मर्यादित करण्याच्या प्रक्रियेमुळे विचारप्रणालीचा ऱ्हा घडून आला आणि त्यामुळे सिद्धांत निर्मितीची प्रक्रिया थांबली. त्याला जर्मिनो 'आयडिऑलॉजिकल रिडक्शनिझम' असे नाव देतो.

८) प्रत्यक्षार्थवादाचा उदय- ऑगस्ट कॉम्तने मांडलेल्या प्रत्यक्षार्थवादाच्या प्रभावामुळे राज्यशास्त्रात अनुभववादी व वैज्ञानिक अध्ययन पद्धतीचा अवलंब सुरू झाला. अनुभववादाच्या प्रभावामुळे ज्ञानप्राप्तीचे इतर सर्व मार्ग अग्राह्य ठरविल्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्रातील सिद्धांताना देखील अवैज्ञानिक व स्वप्नरंजन मानले गेले. प्रत्यक्षार्थवाद व अनुभववादाच्या प्रभावामुळे वैज्ञानिक कसोटीवर आधारित राजकीय सिद्धांत निर्मितीची प्रक्रिया राज्यशास्त्रात सुरू झाली. परंतु सिद्धांत बांधणी करताना आशयापेक्षा तथ्यसंकलनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे राज्यशास्त्रीय सिद्धांत समकालीन प्रश्न सोडविण्यास कुचकामी ठरले. परिणामतः राजकीय सिद्धांताविषयी आस्था कमी होऊन त्यांचा ऱ्हा घडून आला.

९) मूल्यनिरपेक्षता - अर्नाल्ड ब्रेश्टच्या मते मॅक्स वेबर यांनी मूल्यनिरपेक्ष सिद्धांत रचनेचा आग्रह धरला. तथ्य व मूल्य यात त्यांनी केलेल्या फारकतीचा परिणाम राज्यशास्त्रावर देखील झाला. वेबरच्या प्रभावाने राज्यशास्त्रात अनुभववादी अध्ययनाला महत्त्व आले. अनुभववादी अभ्यासकांनी राज्यशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी नैतिक तटस्थतेचा अवलंब केला. आपल्या वैयक्तिक मूल्यात्मक पूर्वग्रहाचा शिरकाव संशोधनात होणार नाही याची दक्षता घेण्यास प्रारंभ झाल्यामुळे राजकीय मूल्य राज्यशास्त्रीय अध्ययनातून लुप्त झाले. मूल्यविरहित राजकीय संशोधनाचा आग्रह धरल्यामुळे राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असे मानले जाते.

१०) वर्तनवादाचा उदय व विकास - राज्यशास्त्राला विज्ञानवादी बनविण्याच्या प्रयत्नाचा एक व्यापक भाग म्हणजे वर्तनवादी अध्ययन पद्धतीचा उदय मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यशास्त्राच्या अध्ययनात वर्तनवादी अध्ययनाचा महापूर आला. वर्तनवादाने अनुभववाद, प्रयोगपद्धती, सांख्यिकी पद्धत, पडताळणी, नमुना विश्लेषण, सर्वेक्षण, निरीक्षण इत्यादी नवनवीन अध्ययन तंत्रांचा वापर सुरू केल्यामुळे संशोधनातून तत्त्वज्ञान हद्दपार झाले. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे सिद्ध करता येतील त्याच विधान व गृहीतकांचा स्वीकार करावा या मनोभूमिकेमुळे राज्यशास्त्राच्या अध्ययनात नैतिक तटस्थता, तांत्रिकता, आकडेवारी, सारणी इत्यादींना महत्त्व प्राप्त झाले. वर्तनवाद्यांनी मोजमाप करता येईल, अशा विषयाच्या संशोधनाकडे लक्ष दिल्यामुळे दुय्यम दर्जाचे अध्ययन सुरू झाल्यामुळे राजकीय सिद्धांताचा ऱ्हा घडून आला असे काही अभ्यासकांना वाटते.

११) उदारमतवादी लोकशाहीचे यश - लिपसेट आणि पेट्रिजसारखे अभ्यासक राजकीय सिद्धांताच्या हासाला पाश्चिमात्य उदारमतवादी लोकशाहीचे यश कारणीभूत मानतात. पाश्चात्त्य लोकशाहीने समाज जीवनात आणलेली आर्थिक सुबत्ता आणि प्रगतीमुळे शासन संस्थेचा उत्तम प्रकार कोणता याचे उत्तर मिळाले. परिणामतः व्यक्ती व शासन संबंध, राज्याचे कार्यक्षेत्र याविषयीचे प्रश्न अप्रस्तुत ठरले. कारण पारंपरिक राजकीय सिद्धांताचे बहुतांश विषय वरील गोष्टींशी निगडित कहोते. उदारमतवादी लोकशाहीच्या यशाने प्रभावित होऊन साम्यवादी व समाजवादी व्यवस्था असलेल्या राष्ट्रांनी तिचा स्वीकार केल्यामुळे विचारप्रणालीचे आपआपसांतील संघर्ष, इतिहासाचा एक भाग बनले. उदारमतवादी लोकशाहीचे यश हे राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण मानले जाते.

राजकीय सिद्धांताचे पुनरुज्जीवन

प्रत्यक्षार्थवाद, अनुभववाद आणि वर्तनवादाच्या प्रभावातून अमेरिकन विद्यापीठातील राज्यशास्त्रज्ञांनी राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची वा मृत्यूची घोषणा केली. परंपरागत राजकीय सिद्धांतानी अपेक्षित केलेली समाजरचना प्रत्यक्षात येऊ शकली नसल्यामुळे सिद्धांताचा मृत्यू झाला असा प्रचार अभ्यासकांनी सुरू केला. या प्रचाराला युरोपमधुन मोठ्या प्रमाणावर प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न झाला. प्लेटो पासून ते लास्कीपर्यंत राजकीय सिद्धांताची महान परंपरा युरोपामध्ये निर्माण झालेली आढळते. या परंपरेचा पाया उखडण्याचे कार्य राजकीय सिद्धांताच्या हासाच्या चळवळीने सुरू केले. या चळवळीतील खरे तथ्य बाहेर आणण्यासाठी राजकीय सिद्धांताच्या समर्थनार्थ युरोपामध्ये राजकीय सिद्धांताच्या पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू झाली. राजकीय सिद्धांताच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीने राजकीय तत्त्वज्ञान व राजकीय सिद्धांत यात अनुभववादी आणि वर्तनवादी अभ्यासकांनी केलेल्या गल्लतीची चिकित्सा सुरू केली. राजकीय सिद्धांतात राजकीय तत्वज्ञानाचा समावेश असला तरी तत्त्वज्ञान आणि सिद्धांतात मूलभूत फरक असतो हे वर्तनवादी अभ्यासकांना उमगले नाही. राजकीय तत्त्वज्ञान हे चिंतनात्मक स्वरूपाचे असल्यामुळे त्यात व्यक्तिनिष्ठा व स्थलकालसापेक्ष गोष्टीचा भरणा असल्यामुळे ते कालबाह्य ठरू शकते, परंतु राजकीय सिद्धांत कालबाह्य ठरू शकत नाही. काही प्रमाणभूत मूल्य प्रमाण मानून राजकीय सिद्धांताची उभारणी केली जात असते. म्हणून तत्त्वज्ञान कालविसंगत झाले तरी राजकीय सिद्धांत कालविसंगत ठरत नाही. राजकीय सिद्धांतातून राजकीय तत्त्वज्ञान वजा करून उरलेला सैद्धांतिक ढाचा हा कायमस्वरूपी अस्तित्वात राहतो. राजकीय तत्त्वज्ञानापासून राजकीय सिद्धांत अलग काढता येतात असा दावा काही अभ्यासकांनी करून राजकीय सिद्धांताच्या पुनरूज्जीवनाचा प्रयत्न केलेला दिसतो.

राजकीय सिद्धांताचा तत्त्वज्ञानात्मक भाग कालबाह्य झालेला आहे, हा दावा ऑकशॉट, लिओ स्टॉस आणि बर्लिनसारख्या अभ्यासकांना मान्य नाही. बौद्धिक कुतूहलाच्या परिपूर्तीसाठी आणि कारणमीमांसाच्या स्पष्टीकरणासाठी राजकीय तत्त्वज्ञान व सिद्धांताची आवश्यकता कायम राहील. वर्तनवादी आणि अनुभववाद्यांनी उभ्या केलेल्या संख्याशास्त्रीय तथ्य व तपशिलावर उभ्या असलेल्या सिद्धांतातून मानवी बौद्धिक भूक भागण्याची अजिबात शक्यता नाही. २० व्या शतकात निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे खरेतर राजकीय सिद्धांताचा ऱ्हा होण्याऐवजी राजकीय सिद्धांताचे महत्त्व वाढताना दिसते. आधुनिक काळात समाजवाद, अस्तित्ववाद, या सारखे अनेक राजकीय सिद्धांत उदयाला आलेले आहेत. राज्यशास्त्रात मानवाचा विचार प्रत्यक्षार्थवादी करता त्याप्रमाणे यांत्रिक व तांत्रिक पद्धतीने करून चालणार नाही. राज्याशास्त्रात मांडल्या गेलेल्या अभिजात राजकीय चिंतनाचा विचार करून वर्तमानकालीन समस्यांवर व्यावहारिक उपाययोजन करून भविष्यकालीन नवसमाजाची रचना करावी लागेल त्यासाठी राजकीय सिद्धांत व राजकीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला महत्त्व देण्याशिवाय पर्याय नाही.

राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची दावा करणाऱ्या अभ्यासकांच्या विचारांतील फोलपणा स्पष्ट करताना सिद्धांतवादी अभ्यासक मानतात की, राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाच्या समर्थनार्थ मांडले गेलेले विचार प्रत्यक्षात भांडवलशाही व्यवस्था आणि त्यावर आधारलेल्या उदारमतवादी व्यवस्थेच्या यशाचे गोडवे गाण्याच्या अंतस्थ हेतूने मांडलेले आहेत. वर्तनवादी आणि प्रत्यक्षार्थवादी अभ्यासकांना संशोधनासाठी भांडवलदारांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आणि ह्या व्यवस्थेच्या चिरंतनत्वासाठी राजकीय तत्त्वज्ञानाच्या ऱ्हासाचे गुणगान सुरू केले परंतु उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेत लोकांना कितपत स्वातंत्र्य आणि हक्कांचा उपभोग घेता येतो. आर्थिक समृद्धी वाढत असतानाही मानव अधिक भयग्रस्त का होत आहे. लोकशाही व्यवस्थेतही राजकीय सत्ता मूठभरांच्या हातात का दिसते आहे. भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीच्या अपयशावर पांघरुन घालण्यासाठी राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाचा उतारा अभ्यासकांनी सादर केला. राजकीय सिद्धांताच्या हासाची घोषणा करणे, उदारमतवादी लोकशाहीचे वास्तव लोकांसमोर मांडण्यापेक्षा सोयीचे आणि सोपे असल्यामुळे अभ्यासकांनी सुरक्षित आणि सोप्या मार्गाचा अवलंब करून हासाची घोषणा करून टाकली. राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाबद्दलची विविध विचारवंतांची भूमिका पुढील प्रमाणे सांगता येईल.

१) जॉन स्टॅची - राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची घोषणा हा बौद्धिक आळशीपणा वा दिवाळखोरीचा नमुना मानता येईल. या घोषणेच्या माध्यमातून सिद्धांताच्या गुलामगिरीपासून अभ्यासकांनी सुटका करून घेऊन अभिजात राजकीय परंपरेविषयी अनभिज्ञता दाखविली. अभिजात राजकीय परंपरेतून क्रांती व राजकीय परिवर्तनाची आस होती, परंतु वर्तनवादी आणि अनुभववाद्यांनी सुरू केलेल्या तांत्रिक कसरतीतून राजकीय परिवर्तनाचा विचार मागे पडून जैसे थे वा पुराणमतवादी विचारांना प्राधान्य मिळाले. वर्तनवाद्यांनी आकडेवारी, सारण्या व सांख्यिकी आधारावर रचलेल्या अर्धवट सिद्धांतावर भिस्त ठेवून काढलेल्या निष्कर्षाचे हेच फळ मिळणे अपेक्षित होते असे स्टॅचीना वाटते.

२) इसाया बर्लिन - राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची चर्चा करणारे ईस्टन व कॉबनसारखे विचारवंत पारंपरिक राजकीय सिद्धांतातील मूल्यप्रधानतेला असलेले महत्त्व आणि समकालीन काळात महान राजकीय सिद्धांताच्या उदयाचा अभाव इत्यादी कारणांमुळे राजकीय ऱ्हासाची घोषणा करतात. बर्लिन प्रस्तुत विचारांना प्रतिवाद करताना स्पष्ट करतो की, वर्तनवाद्यांनी मूल्यनिरपेक्षतेचा आग्रह धरून राज्यशास्त्राचा आत्मा नष्ट केलेला आहे. मूल्यविरहीत ज्ञान चुकीच्या पद्धतीने वापरले जाण्याची शक्यता आहे. राज्यशास्त्र विषयाचे स्वरूप असे आहे की, त्यात कळत नकळत मूल्याचा विचार केला जात असतो. परंतु वर्तनवाद्यांनी मूल्यांना नाकारून फार मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या सिद्धांताची  संख्या फार मोठी असली तरी राज्यशास्त्राच्या दृष्टीने त्यातील उपयुक्तता अत्यंत सीमित स्वरूपाची आहे. तसेच मानवात असलेल्या तार्किक क्षमता आणि जिज्ञासा वृत्तीच्या प्रवृत्तीतून राजकीय सिद्धांताचा जन्म झालेला आहे आणि ही वृत्ती जोपर्यंत मानवात आहे तोपर्यंत राजकीय सिद्धांताची निर्मिती होत राहील, त्याचा ऱ्हास होणं अशक्यप्राय गोष्ट आहे.

३) जीन ब्लॉण्डेल - राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची चर्चा करणाऱ्या विचारवंतावर अनुभववाद आणि वर्तनवादाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. राजकीय सिद्धांताचा ऱ्हा ही आधुनिक राजकीय विचारंवतांना राज्यशास्त्राच्या प्रगतीचा एक भाग वाटला. परंतु पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना राजकीय सिद्धांताचा ऱ्हास हे राज्यशास्त्रावर आलेले तांत्रिकतावादी आणि शास्त्रीयतेचा आग्रह धरणारे नवे मिथक वाटले. या दोन्ही मतांचा सारासार पद्धतीने विचार करून ब्लॉण्डेल यांनी परंपरागत राजकीय चिंतनाला महत्त्व अधोरेखित केले. अभिजात राज्यशास्त्रीय ग्रंथाच्या अध्ययनातून मानवी भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक दृष्टिकोनाची निर्मिती करता येऊ शकते, असे सांगून पारंपरिक राजकीय सिद्धांताचे समर्थन केले. त्यासोबत वर्तनवादी राजकीय सिद्धांताने राज्यशास्त्रास दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. वर्तनवादी राजकीय सिद्धांत रचनेतून शास्त्रीय परंपरेचे पुनरूज्जीवन झाले हे मत व्यक्त केले. राजकीय सिद्धांताच्या हासाची चर्चा सुरू असताना १९७० च्या दशकानंतर राजकीय सिद्धांताची गरज जाणवू लागली यासंदर्भात जॉन रॉल्सचे A theory of Justice (१९७३) या पुस्तकाने शास्त्रीय राजकीय सिद्धांताच्या पुनरूज्जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या पुस्तकाने वर्तनवाद्यांना अपेक्षित पद्धतीने सिद्धांत मांडणी केली. वर्तनवादी राजकीय सिद्धांताच्या विरोधात नाही तर सिद्धांतामध्ये आढळणाऱ्या काल्पनिकता, आदर्शरंजन आणि मूल्यात्मकता यांना विरोध करतात अशा पद्धतीने ब्लॉण्डेल यांनी पारंपरिक आणि आधुनिक राज्यशास्त्रीय विचारात समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

४) लिओ स्टॉऊस - पारंपरिक राजकीय सिद्धांत व तत्त्वज्ञानाचे कट्टर समर्थक म्हणून लिओ स्टॉऊसचे नाव घेतले जाते. त्यांनी प्रत्यक्षार्थवादी आणि वर्तनवादी राज्यशास्त्रज्ञांनी पारंपरिक राजकीय तत्त्वज्ञानावर केलेल्या हल्ल्याला समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामते, राजकीय सिद्धांताचे पतन, मृत्य होणे किंवा अदृश्य होणे शक्य नाही. आदर्श वा चांगल्या राजकीय व्यवस्थेच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे हे राजकीय सिद्धांताचे प्रमुख काम असल्यामुळे राजकीय सिद्धांताचा ऱ्हास होणे अशक्य बाब आहे. राजकीय घटनांच्या अनुषंगाने राजकीय सिद्धांताचा विचार केला पाहिजे. सिद्धांताच्या माध्यमातून राजकीय घटनांच्या स्वरूपाचे अध्ययन करून विश्वव्यापी भाकीतकथन सादर केले पाहिजे. म्हणून राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्त्वज्ञान एकदुसऱ्यापासून स्वतंत्र नसून परस्परपूरक आहे. राजकीय विचारांच्या अध्ययनासाठी सिद्धांताची गरज असते. सिद्धांताच्या ऱ्हासाची घोषणा करणारे अभ्यासक मूल्यांपासून अभ्यासकांनी दूर राहावे ही सूचना करतात. स्ट्राऊसच्या मते, मूल्ये ही राजकीय तत्त्वज्ञानाचा अविभाज्य भाग आहेत. राज्यशास्त्र विषयाचे स्वरूप असे आहे की, त्यात योग्य अयोग्यतेचा विचार करावाच लागतो. कारण मानवाच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास भौतिक वस्तूप्रमाणे तटस्थपणे अभ्यासणे शक्य होत नाही. राजकीय तत्त्वज्ञानात मूल्यात्मकता असणे आवश्यक असते. राजकीय तत्त्वज्ञानात मूल्य असतात म्हणून ती कालबाह्य ठरविणे अयोग्य आहे. लिओ स्टॉऊस यांनी पारंपरिक अभिजात राजकीय सिद्धांताचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लेटोचा आदर्शवाद आणि ॲरिस्टॉटलच्या नियतीवादात समन्वय प्रस्थापित करून ग्रीक तत्त्वज्ञानाचे राज्यशास्त्रातील असलेले महत्त्व सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधुनिक काळात युद्ध, मानवी हक्कांचे हनन, राजकीय व आर्थिक शोषण, हिंसाचारात वाढ इत्यादी समस्या लोकांना भेडसावत आहेत परंतु त्या समस्यांवर कोणत्याही प्रकारचा उपाययोजनात्मक सिद्धांत अनुभववाद्याकडे उपलब्ध नाही. मूल्य आणि तथ्य यात फारकत करण्याने वर्तनवाद्यांच्या हातात फारसे काही लाभले नाही. सामाजिकशास्त्रात सिद्धांत उभारणीसाठी तथ्यांसोबत मूल्यांची देखील आवश्यकता असते. समकालीन राजकीय समस्यांचे निराकरण तत्त्वज्ञान व राजकीय मूल्यावर आधारित शास्त्रीय राजकीय सिद्धांताद्वारे होऊ शकते हे अनुभववाद्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

५) पॅटीस - परंपरागत राजकीय विश्लेषणात राजकीय सिद्धांत आणि - आदर्शवाद यात घनिष्ठ स्वरूपाचे संबंध होते. परंतु आधुनिक काळात ह्या संबंधात अनुभववादाच्या उदयामुळे शिथिलिकरणची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे राजकीय सिद्धांतात आधुनिक काळात राजकीय आदर्शवादाची उणीव जाणवू लागली. त्याचा अर्थ राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला असा लावला गेला. मात्र हा वास्तवतेपासून दूर जाणारा आहे. राजकीय सिद्धांताचा ऱ्हा होणे प्रत्यक्षात शक्य नाही.

६) डेव्हिड ईस्टन - राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची घोषणा करणाऱ्या प्रत्यक्षार्थवाद्यांना अल्पकाळात राजकीय सिद्धांताची गरज जाणवू लागली. सिद्धांताशिवाय संशोधन म्हणजे आत्म्याशिवाय शरीर होय. अनुभववाद्यांच्या प्रभावातून सुरू झालेल्या मूल्यनिरपेक्ष संशोधनाच्या उणिवा नजरेस येऊ लागल्यामुळे डेव्हिड ईस्टन यांनी राजकीय सिद्धांत आणि राजकीय मूल्यांचे जोरदार समर्थन सुरू केले. तथ्य व सिद्धांत हे परस्परांवर अवलंबून असतात. सिद्धांतावाचून तथ्यसंकलन म्हणजे निरर्थक तपशिलाचा संग्रह असतो. डेव्हिड ईस्टनसारख्य आधुनिक राज्यशास्त्रज्ञाला देखील राजकीय सिद्धांताचे महत्त्व उमगले.

७) प्लॅमेनाटझ - राजकीय सिद्धांताचे महत्त्व १९७० च्या दशकात आधुनिक राज्यशास्त्रज्ञांना उमगू लागले. त्यासंदर्भात प्लॅमेनाटझसारख्या विचारवंताचे मत प्रातिनिधिक स्वरूपाचे मानले जाऊ लागले. राजकीय सिद्धांत म्हणजे व्यावहारिक तत्त्वज्ञानाचा प्रकार आहे, तो शासनाशी संबंधित असल्यामुळे व्यावहारिक तत्त्वज्ञान आहे. सिद्धांत ही एक अत्यंत अवघड आणि बौद्धिक कृती असून आधुनिक काळात तिची पूर्वीइतकीच, खरे तर अधिकच गरज आहे अशा पद्धतीने प्लॅमेनाटझ सारख्या अभ्यासकांचे मत राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची हाकाटी करणाऱ्या अभ्यासकांना दिलेले झणझणीत उत्तर मानता येते.

अशा पद्धतीने वरील चर्चेचे थोडक्यात सार लक्षात घेता राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला नाही. वर्तनवादी आणि अनुभववाद्यांनी सुरुवातीच्या काळात राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची घोषणा केलेली असली तरी अल्पकाळात त्यांना आपली चूक लक्षात आली. वर्तनवादयांनी नंतरच्या काळात शास्त्रीय राजकीय सिद्धांताची कास धरल्यामुळे राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाला नवी दिशा प्राप्त झाली. प्रत्यक्षार्थवाद्यांनी औपचारिक राजकीय गोष्टीसोबत अनौपचारिक राजकीय सिद्धांताची गरज व्यक्त केल्यामुळे व्यापक अभ्यासक्षेत्र राज्यशास्त्रज्ञांना खुले झाले. राजकीय तत्त्वज्ञान आणि राजकीय सिद्धांताच्या दीर्घकालीन परंपरेला नाकारणे राज्यशास्त्राच्या दृष्टीने सोयीचे असणार नाही हे तथ्य आधुनिक आणि परंपरागत राज्यशास्त्राच्या ध्यानात आल्यामुळे तसेच राजकीय सिद्धांतातील तथ्य आणि मूल्य संबंधाविषयीचे गैरसमज दूर झाले. तथ्यसंकलन आणि सिद्धांत रचना करतांना असलेले मूल्यांचे महत्त्व अभ्यासकांना लक्षात आल्यामुळे राजकीय सिद्धांताच्या ऱ्हासाची चर्चा तर्कविसंगत ठरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.