https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

नागरी समाज संकल्पनेचा अर्थ,उदय व विकास


 

नागरी समाज संकल्पनेचा अर्थ,उदय व विकास

'नागरी समाज' हा शब्द व्यवहारात अनेकदा आपण ऐकतो परंतु त्याचा नेमका आशय व अर्थ आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे 'नागरी समाज' म्हणजे नेमके काय? या विषयी अनेक कल्पना आपल्या मनात आकार घेतात. कारण नागरी समाज ही संकल्पना आधुनिक काळात रूढ झालेली आहे. 'नागरी समाज' संकल्पनेच्या अर्थात काळानुरूप अनेक बदल झालेले आहेत. समाज हे सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी संघटन असते. जन्मतः आपण समाजाशी जोडले जातो. संपूर्ण समाज म्हणजे नागरी समाज हा अर्थ सुरुवातीच्या काळात घेतला गेला. समाज आणि नागरी समाज हे शब्द सुरुवातीच्या काळात समानार्थी वापरले जात होते. नागरी समाज म्हणजे संपूर्ण समाज नव्हे; तर सामाजिक जीवनाचे विविध क्षेत्रात विभाजन झालेले असते. या विविध क्षेत्रापैकी नागरी समाज एक क्षेत्र आहे. व्यापक समाजजीवनाचा एक भाग नागरी समाज असल्यामुळे समाज ही संकल्पना नागरी समाजापेक्षा व्यापक आहे. विशिष्ट स्वरूपाची उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या हेतूने नागरी समाजाची स्थापना समाजातून होते. नागरी समाज संकल्पनेत समाजातील राजकीय संस्थेसह इतर सामाजिक संस्थांचाही समावेश होतो.

 नागरी समाज अर्थ

नागरी समाज ही संज्ञा नागरी (Civil) व समाज (Society) या दोन शब्दांपासून बनलेली आहे. नागरी हा शब्द विविध अर्थाने प्रत्यक्ष व्यवहारात व राज्यशास्त्रात वापरला जातो. समाज हा शब्ददेखील विविध अर्थाने वापरला जातो. त्यामुळे या संज्ञांच्या अर्थाबाबत विचारवंतांमध्ये एकवाक्यता आढळून येते नाही. काही अभ्यासकांनी नागरी समाजाच्या केलेल्या व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येतात.

जेफ्री अलेक्झांडर यांच्यामते, नागरी समाज म्हणजे राज्याव्यतिरिक्त इतर संस्थांना एकत्र आणणारे सर्वसमावेशक संघटन होय.

जॉर्ज हागिन्स यांच्यामते, नागरी समाज हा संघटित समाज असून त्यावर राज्य शासन करत असते.

नीरज गोपाल यांच्यामते, नागरी समाजामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थाचा समावेश होतो व त्यावर राज्याचे नियंत्रण नसते.

लैरी डायमंड यांच्यामते, नागरी समाजात एक संघटित समाज जीवनाचे प्रतिबिंब दिसते की ज्यात ऐच्छिकता, सहभागिता, संघर्ष करण्याची वृत्ती, समर्पितता इत्यादी मूल्यांचा प्रभाव असतो.

लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स - Civil Society refers to the arena of incoerced action around shared interests, purposes and values.

    नागरी समाजाच्या उपरोक्त व्याख्यांवरून असे लक्षात की, नागरी समाज हा राज्यापेक्षा वेगळा व स्वतंत्र असतो. नागरी समाज आणि राज्याचे कार्यक्षेत्र भिन्न भिन्न असते. नागरी समाजावर राज्याचे नियंत्रण असते की नाही याबाबत विचारवंतांमध्ये एकमत आढळून येत नाही. काही अभ्यासक नागरी समाजावर राज्याचे नियंत्रण मान्य करतात तर काही अभ्यासक नागरी समाज हा राज्य नियंत्रणापासून मुक्त असतो. विशिष्ट उद्देशासाठी राज्यासाठी संघर्ष करणारा असतो असे मानतात. नागरी समाजाच्या अर्थाबाबत मतभेद असले तरी नागरी समाजात समाजातील स्वयंसेवी आणि इतर संघटनांचा समावेश असतो याबाबत बहुसंख्यांक अभ्यासकांमध्ये एकमत आढळून येते.

नागरी समाज संकल्पनेचा उदय व विकास

    नागरी समाजाची उत्पत्ती आधुनिक काळात म्हणजे प्रबोधन युगाच्या प्रभावातून १८ व्या शतकात झाली, असे मानले जात असले तरी राजकीय विचारांच्या क्षेत्रात नागरी समाज संकल्पना फार प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसून येते. महान दार्शनिक सॉक्रेटिसच्या विचारात नागरी समाजाविषयी विचारांचे दर्शन घडते. सॉक्रेटिसच्या मते, द्वंद्वात्मक पद्धतीने होणाऱ्या सार्वजनिक वादविवादाच्या माध्यमातून समाजाचे संघर्ष सोडविले पाहिजे आणि जनतेत नागरिकता आणि चांगल्या जीवनाच्या कल्पना विकसित केल्या पाहिजेत. प्लेटोच्या आदर्श राज्याद्वारे न्यायसंमत समाजाची निर्मिती करण्याचा प्रयत्न नागरी समाज करतो. या समाजात विवेक, साहस, संयम आणि न्याय इत्यादी गुणांप्रति समर्पित भाव व्यक्त करावा आणि नागरी समाजाचे संरक्षण करणे हे तत्त्वज्ञानी राज्याचे प्रमुख कार्य मानतो. अॅरिस्टॉटल यांनी देखील नागरी समाजासाठी कोइनोनिआ पोलिटिके (Koinonia Politike) हा शब्द वापरलेला आहे. नगरराज्य म्हणजे नागरिकांच्या संघटनांची संघटना होती की जी नागरिकांना शासन करणे आणि शासित होण्याचे नैतिक कार्य करण्यास सक्षम बनवते. Societas civilis (सोसाइटस सिविलिस) ही संकल्पना सिसरो यांनी रोमन काळात प्रचलित केली होती. आदर्श समाज नागरिकांना शांततामय जीवनाची हमी देतो असे मानले जात असल्यामुळे प्राचीन काळात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आदर्श समाजासंबंधी विचाराला महत्त्व दिले जात असे. प्राचीन काळातील विचारवंत राज्य आणि समाज संकल्पनेत भेद करत नसत. राष्ट्र ही समाजातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था मानली जात होती. शिष्टाचार चांगल्या नागरिकत्वाच्या गरजेचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जात होते. मानव हा स्वभावतः तर्कसंगत प्राणी आहे. त्यामुळे तो सामूहिक रूपात समाजाच्या प्रकृतीला आकार देत असतो. मनुष्यात निसर्गत:च सामान्य हितासाठी कार्य करण्याची व समाजात शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता आहे असे प्राचीन विचारवंत मानत असल्यामुळे प्राचीन राजकीय विचारवंत आपल्या विवेचनात एका अर्थाने अप्रत्यक्ष रूपात का होईना नागरी समाजाच्या उत्पत्तीचे समर्थन करत होते. मध्ययुगात सामंतवाद, धर्माचे वाढते प्रस्थ, राजकीय अस्थिरतेमुळे नागरी समाजाची संकल्पना राजकीय चिंतनातून अदृश्य झाली आणि ही स्थिती पुनर्जागरण वा प्रबोधनयुगाच्या अंतापर्यंत कायम राहिली.

    नागरी समाज ही संकल्पना युरोपातील प्रबोधन युगाची देण मानली जाते. प्रबोधन युगामुळे युरोपात अनेक सामाजिक आणि राजकीय सुधारणा होऊ लागल्या. धर्म आणि राजकारणाची फारकत झाली. चर्चचा दैवी राज्याचा सिद्धांत आणि अनुवांशिक राजसत्तेला प्रश्नांकित केले जाऊ लागले. समाज आणि राज्य या संकल्पनांचा स्वतंत्रपणे विचार होऊ लागला. या घडामोडींचा राज्यशास्त्रावरदेखील परिणाम झाला. करारवादी विचारवंत जॉन लॉकच्या लिखाणात नागरी समाज संकल्पनेची बीजे आढळून येतात. जॉन लॉकच्या विचारातील नैसर्गिक कायदा सिद्धांतात नागरी समाज निर्मितीला पूरक विचारांचे अस्तित्व दिसते. या सिद्धांतानुसार व्यक्ती हा राज्याआधी जन्माला आल्यामुळे तो राज्यापेक्षा श्रेष्ठ आहे. राज्याला व्यक्तीने सत्ता बहाल केलेली आहे. राज्याची अधिसत्ता व्यक्तीवर अवलंबून असते. नैसर्गिक कायद्याच्या सिद्धांतामुळे ईश्वरी राज्याचा सिद्धांत मागे पडला. राज्य हे व्यक्तीने निर्माण केलेले आहे हे मानले जाऊ लागल्यामुळे व्यक्ती हा राज्याचा केंद्रबिंदू मानला जाऊ लागला. व्यक्तीचे महत्त्व वाढविणाऱ्या विचाराने उदारमतवादाला जन्म दिला.

    जेरेमी बेंथम, जे. एस. मिल, डेव्हिड ह्युम, अॅडम स्मिथ, हेगेल, कार्ल मार्क्स, ग्रामची इत्यादी विचारवंतांच्या विचारांमध्येदेखील नागरी समाज संकल्पनेविषयीचे विचार आढळून येतात. साम्राज्यवाद, वसाहतवाद, पहिले महायुद्ध, हिटलर व मुसोलिनांच्या उदयामुळे नागरी समाज संकल्पना मागे पडली. दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी हक्काच्या चर्चेचा प्रारंभ झाला. जागतिक पातळीवर विविध आंतरराष्ट्रीय संस्थांची स्थापना झाली. (युनो, जागतिक नाणेनिधी व इतर संस्था) अमेरिकेत दुसऱ्या १९६० च्या दशकात सुरू झालेली नागरी हक्क चळवळ आणि स्त्रियांच्या चळवळीमुळे नागरी समाज संकल्पनेला नव्याने आकार येऊ लागला. व्हिएतनाम युद्धाच्या अमेरिकेत होत असलेल्या विरोधातून नागरी समाजाच्या उद्याला झलक दिसू लागली. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर वैचारिक जगतामध्ये नागरी समाज संकल्पनेविषयी चर्चा सुरू झाली. सुरुवातीला अमेरिका व यूरोपियन देशांमध्ये लोकप्रिय ठरलेली संकल्पना नंतरच्या काळात आफ्रो - आशियाई देशांमध्ये देखील लोकप्रिय होऊ लागली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.