उदारमतवाद आणि नागरी समाज
नागरी
समाजाच्या उदयाला उदारमतवाद कारणीभूत मानला जातो. ग्रीक व रोमन काळात राजकीय
क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता होती. परंतु मध्ययुगात चर्च या धार्मिक व
आध्यात्मिक संस्थेने दीर्घकाळ राज्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. प्रबोधन व
ज्ञानोदयाच्या युगात चर्च आणि राज्य यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. या संघर्षात
सुरुवातीला जनतेने राज्यसत्तेला पाठिंबा दिला. जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर राज्याने
चर्चच्या सत्तेवर मात केली आणि चर्चचे कार्यक्षेत्र आध्यात्मिक क्षेत्रापुरते
मर्यादित केले. आधुनिक राजसत्तांनी धर्म आणि राजकारणाच्या फारकतीला सुरुवात केली.
प्रबोधनयुगातील संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी थॉमस हॉब्ज आणि बाँदो सारख्या
अभ्यासकांनी राजसत्तेला प्रभावशाली बनविण्यासाठी सार्वभौम राज्याची संकल्पना
मांडली. सार्वभौमत्वाच्या संकल्पनेमुळे राज्य शक्तिशाली बनली. शक्तिशाली
राजसत्तांनी अधिकारपिपासू वृत्तीचा अवलंब केला. त्यामुळे युरोपातील जनतेने
राजसत्तेविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली. उदा. इंग्लंडमधील राजा व प्रजा यातील
संघर्ष. १८ व्या व १९ व्या शतकात उदयाला आलेल्या उदारमतवादी विचारप्रवाहाने
राज्याच्या सर्वकष सत्तेला आव्हान देण्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना
मांडली. व्यक्तीस्वातंत्र्य व अधिकारासाठी जनतेने सुरू केलेल्या लढ्यामुळे
राजसत्तांना हादरा बसू लागला. अनेक देशातील राजसत्ता कोसळू लागल्या. उदा. १६८८
मध्ये इंग्लंडमधील रक्तविहीन राज्यक्रांती.
प्रबोधन
युगाच्या पहिल्या टप्प्यात धार्मिक सुधारणा चळवळीला गती आली होती. या धार्मिक
सुधारणा चळवळींनी कॅथॉलिक चर्चच्या अधिसत्तेला आव्हान दिले. प्रॉटेस्टंट पंथाच्या
निर्मितीमुळे चर्चची अधिसत्ता नष्ट होण्यास हातभार लागला. प्रॉटेस्टंट पंथ
उदारवादी विचारांचा समर्थक असल्याने धर्म आणि राज्य याची कार्यक्षेत्रे वेगवेगळी
आहेत या मताला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला. परिणामतः युरोपमध्ये धर्म आणि
राजकारणाची फारकत होऊन राज्य हे धर्मापेक्षा श्रेष्ठ ठरले. धर्म ही व्यक्तिगत बाब
मानली जाऊ लागली. धर्माचा राजकीय जीवनातील हस्तक्षेप नष्ट झाल्यामुळे व्यक्तीची
निष्ठा धर्माऐवजी राज्याकडे वर्ग झाली.
व्यक्ती हा राज्याचा एक भाग मानला जाऊ लागला. राज्याचा एक घटक या नात्याने व्यक्ती
विकासासाठी काही स्वातंत्र व अधिकार देण्याची आवश्यकता आहे हा विचार प्रसृत होऊ
लागला. व्यक्ती स्वातंत्र्य व अधिकारांच्या कल्पनेमुळे राज्याच्या सर्वश्रेष्ठ
स्वरूपाला आव्हान मिळाले.
उदारमतवादी
विचारसरणीने व्यक्तीला केंद्रबिंदू मानून राज्याच्या अधिकार व कार्यावर मर्यादा
आणण्याची गरज विशद केली. राज्याचे कार्यक्षेत्र कमीत कमी असावे, जेणेकरून
व्यक्तीला आपल्या कार्यक्षेत्रात काम करता येईल. राज्य ही अनावश्यक आपत्ती आहे.
राज्याचा व्यक्ती जीवनातील हस्तक्षेप कमीत कमी असावा. राज्याचे कार्यक्षेत्र कायदा, सुव्यवस्था
व संरक्षण क्षेत्रापुरते मर्यादित असावे ह्या उदारमतवादी संकल्पनेमुळे राज्याच्या
इच्छेऐवजी व्यक्तीच्या इच्छेला महत्त्व प्राप्त होऊ लागले. व्यक्तीच्या
हितसंबंधाच्या संरक्षणासाठी संघटना निर्मितीचा अधिकार मान्य करण्यात आला. त्या
अधिकाराचा वापर करून व्यक्तींनी राजकीय संघटनांसोबत गैरराजकीय वा स्वयंसेवी
संघटनाची स्थापना करण्यास सुरुवात केली. या गैरसरकारी संघटनांनी सरकारी हुकूमशाही
विरोधात आवाज उठविण्यास प्रारंभ केला. आपल्या हितसंबंधाच्या परिपूर्तीसाठी राजकीय
व्यवस्थेवर दडपण आणतात. उदारमतवादी विचारधारेतून विकसित झालेल्या व्यक्ती हक्क आणि
व्यक्ती प्रतिष्ठेच्या संकल्पनेतून नागरी समाजाच्या उदयाला बळ मिळालेले दिसते.
सद्यःकाळात नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक स्वयंसेवी वा गैरसरकारी संघटना
अस्तित्वात आलेल्या दिसतात. या संघटना राजकीय व्यवस्थेवर अंकुश निर्माण करण्याचे
कार्य करतात. आधुनिक काळात राज्यापेक्षा राज्यकांचे (स्वयंसेवी संस्था) प्रस्थ व
प्रभाव वाढता दिसतो. या संघटनेच्या उदयाला उदारमतवादी लोकशाही संकल्पनेमुळे
प्राधान्य मिळालेले आहे. उदारमतवाद ही विचारधारा नागरी समाजाचा पाया मानली जाते.
उदारमतवाद
ही विचारधारा व्यक्तीच्या विचारशीलतेवर विश्वास व्यक्त करते. व्यक्तीला आपले
चांगले-वाईट वा हित-अहित कळत असल्यामुळे आपल्या जीवनाचा निर्णय घेण्यास ती सक्षम
असते. त्यामुळे व्यक्तीला आपल्या जीवनाचा योग्य पद्धतीने विकास घडवून आणण्यासाठी
राज्याने स्वातंत्र्य देणे आवश्यक असते. व्यक्तीला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या
जोरावर राजकीय व्यवस्थेने केलेल्या कृतीची योग्यता वा अयोग्यता ठरविली जात असते.
राजकीय व्यवस्थेने व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करणारी कृती केली असेल तर
समाजातील व्यक्ती एकत्र येऊन विरोध व्यक्त करतात. कारण एकटा व्यक्ती विरोध व्यक्त
करून फारसा फरक पडणार नसतो वा राजकीय व्यवस्थेवर दडपण येऊन निर्णय बदलण्याची शक्यता नसते. म्हणून समान हितसंबंध असलेले
व्यक्ती एकत्र येण्याची गरज असते. व्यक्तीला मिळालेल्या आचार, विचार व
संघटना स्वातंत्र्याचा वापर करून व्यक्ती गैरसरकारी वा स्वयंसेवी संघटनांची
स्थापना करून राज्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात किंवा राज्यावर दडपण आणून
निर्णय बदलण्यास भाग पाडतात. नागरी समाज व उदारमतवाद ह्या संकल्पनेचा अत्यंत
निकटचा संबंध दिसून येतो. उदारमतवाद्यांनी आर्थिक स्वातंत्र्य, मुक्त
अर्थव्यवस्थेचा केलेला पुरस्कार,
धर्म आणि राज्य यांची फारकत करणारा धर्मनिरपेक्ष विचार, मानवी हक्क
संकल्पनेला मान्यता देऊन मानवतावादाचा केलेला पुरस्कार, नवउदारमतवादयांनी
न्यूनतम राज्याची मांडलेली संकल्पना (न्यूनतम राज्य म्हणजे राज्याचा व्यक्ती
जीवनात हस्तक्षेपाचा अभाव किंवा संरक्षणाच्या कारणासाठी व्यक्ती जीवनात राज्याला
हस्तक्षेप करता येईल.) आणि स्वातंत्र्य व अधिकाराचे समर्थन इत्यादी विचार नागरी
समाजाच्या निर्मितीला पूरक ठरलेले आहेत. उदारमतवाद हा नागरी समाजाच्या उदयाला
कारणीभूत असलेला प्रमुख घटक मानला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.