https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मतदार वा राजकीय उदासीनता स्वरूप, कारणे आणि उपाय


 

मतदार वा राजकीय उदासीनता स्वरूप, कारणे आणि उपाय-

       लोकशाही व्यवस्थेत नागरिकांनी सातत्याने राजकीय सहभाग घेतला पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. राजकीय सहभागाचे वाढते प्रमाण लोकशाहीच्या यशाची आणि राजकीय व्यवस्थेच्या स्थिरतेची खूण मानली जाते. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत राजकारणात सहभागी होणाऱ्या गटासोबत राजकीयदृष्ट्या उदासीन असणाऱ्या गटाचा देखील विचार करावा लागतो. लोकशाही व्यवस्थेत काही लोक राजकीय प्रक्रिया आणि राजकारणात सहभागी होत नाही. या लोकांचा समावेश राजकीय उदासीनता घटकात करता येतो. राजकीय उदासीनता याचा अर्थ व्यक्तीला एखाद्या राजकीय कृती, राजकीय व्यक्ती आणि राजकीय प्रकरणाबद्दल सामान्यता रस नसणे होय, उदासीनतेचे प्रमाण कमी जास्त असू शकते.

       एकच व्यक्ती काही बाबतीत उदासीन असू शकते तर काही बाबतीत सक्रिय सहभागी होऊ शकते. राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेली व्यक्ती राजकारणातील विदारक अनुभवांमुळे देखील उदासीन बनू शकते. उदासीनता सर्व समाजाच्या किंवा एखाद्या घटनेच्या दृष्टीने लक्षात घेतली जाते. उदासीनतेचा संबंध व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडला जातो.. समाजशास्त्रज्ञ उदासीन असणारे आणि उदासीन नसणारे हे दोन गट करतात. व्यक्ती उदासीन का राहते, व्यक्ती स्वतःची जबाबदारी ओळखण्यास असमर्थ असणे, स्वत:च्या भावना न समजणे, चिंताग्रस्त असणे, आत्मविश्वासाचा अभाव, राजकीय सहभाग संधी व प्रेरणाचा अभाव इ. गोष्टींमुळे व्यक्ती उदासीन राहते. याउलट उदासीन नसणाऱ्या व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असणे, स्वतःच्या जबाबदारीची जाणीव असणे, राजकीय सहभागाची संधी व प्रेरणा इ. गुणांचा प्रभाव आढळतो. व्यक्तीगत जीवनात स्थैर्य, सुरक्षितता व विशिष्ट स्थान प्राप्त व्यक्ती राजकारणात अधिक सक्रिय असतात. हितसंबंधाच्या परिपूर्तीसाठी देखील व्यक्ती राजकारणात सहभागी होतात. दोन्ही गटांपैकी उदासीन असलेला गट राजकारणापासून दूर राहतो.

       राजकीय उदासीनता कारणे-

       मॉरिश रोशनबर्गने राजकीय उदासीनतेची पुढिल तीन कारणे सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे होत.

       १) राजकीय कृतीच्या परिणामांची भीती-राजकीय कृतीत भाग घेतल्याने काय परिणाम होतील याची जाणीव व्यक्तीमध्ये अनेक आकार धारण करते. राजकारणात भाग घेतल्यास जिवाला धोका, मित्रमंडळी व शेजारी गमाविण्याचा धोका, नोकरीवर गदा, विरोधी पक्षांचा त्रास, व्यवसायाचे नुकसान, वैवाहिक संबंधात दुरावा, स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का इ. उलटसुलट दडपणांमुळे व्यक्ती राजकीय सहभागापासून दूर राहते. व्यक्ती स्वतःच स्वतःवर नियंत्रण लादून घेतात आणि राजकीय प्रश्नांबद्दल तटस्थता धारण करतात.

       २) राजकीय कृतीची निष्फळता- काही व्यक्तीच्या बाबत राजकीय सहभाग निरर्थक असतो. आपण सहभागी झाल्याने राजकीय प्रक्रियेवर काहीही परिणाम करू शकणार नाही. अपेक्षित उद्दिष्ट साध्य पूर्ती होणार नसेल तर व्यर्थ खटाटोप करणे व्यक्तीला नकोसे होते. प्रत्यक्ष व्यवहारवाद व आदर्शवाद यातील तफावत आपल्याकडून दूर होणार नाही. राजकीय दृष्ट्या क्रियाशील राहूनही फायदा मिळण्याची किंवा स्वतःचा उद्देश साध्य होण्याची आशा वाटत नाही. आपण सहभागी झाल्याने काही फायदा होणार नाही हे व्यक्तीला वाटल्याने तो राजकीय दृष्ट्या उदासिन बनतो. लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही किंवा राजकीय यंत्रणा कुचकामी वा निकामी बनली आहे, अशी भावना व्यक्तीच्या मनात निर्माण झाल्यास व्यक्ती उदासीन बनते. आदर्श व वास्तवातील अंतरातून व्यक्ती राजकीय कृतीपासून लांब राहण्याची शक्यता असते. आपण केलेली मेहनत आपल्याला यश देऊ शकत नाही या भावनेतून राजकीय सहभागापासून अलिप्तता धारण करण्यास सहाय्यभूत ठरत असते.

       ३) राजकीय सहभाग प्रोत्साहन अभाव- व्यक्तीला सामाजिक घटकांकडून प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असते. परंतु राजकीय सहभागासाठी आवश्यक प्रेरणा व्यक्तीला मिळत नाही. राजकारणाविषयी असलेल्या नावडीतून व्यक्ती राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. तसेच राजकारणात भाग घेतल्याने लाभ वा समाधान मिळण्याची शक्यता नसते. भौतिक गरजा पूर्ण होणार नाहीत म्हणून व्यक्ती राजकारणापासून दूर राहते. राजकीय कृतीतून होणारा आनंद हा इतर कृतीपासून मिळणारा आनंद निष्कृष्ठ प्रतीचा असेल व्यक्ती राजकारणाप्रति बनते. प्रत्यक्ष व तात्कालीक गरजांच्या सोडवणूकीत व्यक्ती गुंतलेली असते. जीवनातील व्यस्त वेळापत्रकामुळे राजकीय सहभागापासून अलिप्त राहत काही व्यक्ती राजकारणाविषयी आवड असतो परंतु ही सुप्त शक्यता योग्य व व प्रेरणाच्या अभावी राजकारणाविषयी उदासीन बनते.

       ४) इतर कारणे - मॉरिश रोशनबर्गने यांनी सांगितलेल्या कारणांशिवाय पुढील गांमुळे देखील व्यक्ती राजकीयदृष्ट्या उदासिन राहते.

       पर्याप्त माहितीचा अभाव - पर्याप्त माहितीच्या अभावीदेखील काही लोक राजकीय प्रक्रियांमध्ये सहभागी होत नाही. राजकीय सहभागासाठी आवश्यक माहिती नसते किंवा ती माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत नाही. उदा. निरक्षर, एकाकी व्यक्तीपाशी राजकीय सहभागासाठी आवश्यक क्षमतांचा अभाव असल्यामुळे ते राजकीयदृष्ट्या उदासीन राहतात. निरक्षरतेमुळे राजकीय जाणिवा क्षीण होतात.

       जाणीवपूर्वक उदासीनता- एखादी व्यक्ती वा गटाकडे राजकीय सहभागासाठी आवश्यक क्षमता असते परंतु मानसिकदृष्टीने राजकारणात सहभागी होण्यासाठी तयार नसते. राजकीय सहभागासाठी आवश्यक आकर्षणाच्या अभावामुळे काही लोक राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत करतात. क्षमता असूनही हे लोक जाणीवपूर्वक उदासीन राहून राजकीय सहभाग टाळतात. मानसिक इच्छा नसल्यामुळे राजकीय प्रक्रियापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात.

       आत्मविश्वासाचा अभाव - काही व्यक्तीमध्ये राजकीय आत्मक्षमतेची भावना क्षीण असल्याने प्राप्त परिस्थितीत बदल होण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. परिणामत: अशा व्यक्तींचा राजकीय व्यवस्थेविषयीचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे राजकारणापासून दूर राहतात

       राजकीय व्यवस्थेच्या विरोधात असंतोष वा विरोधी राजकीय विचारसरणी- काही व्यक्ती राजकीय व्यवस्थेच्या कार्याविषयी असंतुष्ट असतात. राजकीय व्यवस्थेत तातडीने वा विरोधी राजकीय बदल कोणताही राजकीय नेता व पक्ष घडवून आणणार नाही या राजकीय धारणातून देखील व्यक्ती राजकीय दृष्ट्या उदासीन राहते. एक प्रकारे व्यक्तीच्या मनात राजकारणाविषयी गतिहिनता निर्माण होते ते राजकीय सहभागापासून अलिप्त राहतात तर काही व्यक्तीची विचारसरणी राजकीय सहभागाच्या विरोधी असते उदा. नक्षलवादी

       वैयक्तिक कारणे-याशिवाय राजकारणातील गुंतागुंत, आळस, राजकीय सहभागासाठी वेळेचा अभाव ह्या वैयक्तिक कारणांमुळे देखील व्यक्ती राजकारणापासून लांब राहते. राजकीय सहभागातून मिळणाऱ्या लाभापेक्षा इतर क्षेत्रातून मिळणारे लाभ जास्त असतील तर व्यक्ती राजकारणापासून दूर जाते.

       राजकीय सहभागाची निरर्थकता- समाजातील बऱ्याच लोकांना राजकीय एक निरर्थक व वेळ वाया घालवणारी बाब वाटते.. राजकारणातून ताबडतोब फलप्राप्ती होण्याची शक्यता नसते. आपला स्वार्थ किंवा वैयक्तिक गरजा राजकारणातून पूर्ण होत नसतील तर त्यापासून दूर राहणे व्यक्तीला योग्य वाटते.

       या विविध कारणांमुळे व्यक्ती राजकीयदृष्टया उदासीन राहत असते. राजकीय दृष्ट्या उदासीन वर्गाचे वाढते प्रमाण राजकीय व्यवस्थेच्या स्थैर्याच्या दृष्टीने योग्य नसते. मोठया प्रमाणात लोक राजकीय सहभाग घेत नसतील तर व्यवस्थेची अधिमान्यता धोक्यात येऊ शकते.

       उपाययोजना किंवा उपाय-

       लोकशाही व्यवस्थेत राजकीय उदासिनतेची योग्य वेळी दखल घेणे आवश्यक असते. राजकीयदृष्ट्या उदासीन असलेल्या नागरिकांचे वाढते प्रमाणराजकीय व्यवस्थेचे स्थैर्य व अधिमान्यतेवर विपरीत परिणाम घेऊन आणू शकते. राजकीय उदासीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना अभ्यासकांनी सुचविलेल्या आहेत.

       १. राजकीय जागरूकता- लोकशाहीच्या यशासाठी नागरिकांनी जागून राहून सार्वजनिक कार्यात म्हणजे राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. सरकारच्या चांगल्या कार्याबद्दल प्रोत्साहन दिले पाहिजे अन्यायकारक कायदे व निर्णयाला विरोध केला पाहिजे. निवडून दिलेले प्रतिनिधी व सरकारी अधिकारी योग्य काम करतात किंवा नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या अडचणी शासनाकडून सोडवून घेतल्या पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधीची निवड केली पाहिजे. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सक्रिय सहानुभूती दाखविली पाहिजे. लोकांमध्ये योग्य पद्धतीने राजकीय जागरुकता निर्माण केल्यास राजकीय उदासीनतेचे प्रमाण कमी होऊ शकते. लॉर्ड अॅक्टनच्या मते, लोकशाहीच्या यशासाठी अखंड जागरूकता हे मूल्य आवश्यक आहे.

       २. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार- समाजातील लोकांमधील राजकीय उदासिनता कमी करण्यासाठी शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार करणे गरजेचे आहे. शिक्षणातून व्यक्तीची वैचारिक पातळी उंचावत असते. नव्या नव्या गोष्टींचे ज्ञान व्यक्तीला मिळते. शिक्षणातून जबाबदार नागरिक निर्माण होत असल्यामुळे शिक्षणाच्या सर्वत्र प्रसार केला पाहिजे. अज्ञानी आणि मागासलेल्या समाजातील लोकांमध्ये राजकीय सहभागासाठी आवश्यक पात्रता नसल्यामुळे ते राजकीय सहभागापासून अलिप्त राहतात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केल्यास सर्व लोकांमध्ये राजकीय सहभागासाठी आवश्यक क्षमता विकसित होईल.

        3. लोक शिक्षण- राजकीय सहभागाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदारांचे लोकशिक्षण करणे गरजेचे आहे. मतदारांना मताच्या हक्काविषयी जागृत केले पाहिजे. मतदारांनी जागृतपणे मतदान करून योग्य प्रतिनिधिची निवड केली केली तर त्यापासून होणाऱ्या फायद्याची लोकांना जाणीव करून दिल्यास राजकीय सहभागाचे प्रमाण वाढू शकेल. जनतेचे योग्य पद्धतीने प्रबोधन केल्यास राजकीय उदासिनतेचे प्रमाण कमी होऊ शकते.

       ६. मूलभूत प्रश्न सोडविणे- दारिद्र्य, बेरोजगार, दहशतवाद, नक्षलवाद - या समस्या राजकीय सहभागाच्या मार्गातील प्रमुख अडथळे आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शासनाने त्वरीत निर्णय घेतले पाहिजे. या समस्या सुटल्या नाहीतर लोकांमध्ये नैराश्य निर्माण होते. शासन आपल्यासाठी काहीच करत नाही अशी भावना निर्माण होते आणि ही भावना त्याला राजकारणापासून दूर नेते. शासनाने मूलभूत समस्यांचे निराकरण केल्यास राजकीय सहभागाचे प्रमाण वाढेल.

       ७.राजकीय सहभागासाठी प्रोत्साहन - लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात राजकीय सहभाग घ्यावा यासाठी आवश्यक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. राजकीय सहभागासाठी आवश्यक संधी उपलब्ध करू दिली पाहिजे. ज्या वर्गाचा राजकीय सहभाग अत्यंत कमी आहे त्या वर्गासाठी विशेष तरतूदी करून सहभाग वाढविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाजात राजकीय सहभागास पूरक व उत्साहवर्धक वातावरण असल्यास राजकीय उदासीनतेचे प्रमाण कमी करता येईल.

 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.