https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राजकीय विचारप्रणाली संकल्पना, अर्थ, व्याख्या आणि विशेषता- Political Ideology Meaning, Nature and Features


 

राजकीय विचारप्रणाली  संकल्पना, अर्थ, व्याख्या आणि विशेषता-

 राज्यशास्त्र या विषयात राजकीय विचारधारेच्या अभ्यासाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. राजकीय विचारप्रणालीच्या आधारावर वर्तमान राजकीय व्यवस्थेचे आकलन होऊ शकते. त्यामुळे समाजवाद, साम्यवाद, उदारमतवाद, व्यवहारवाद, उत्तरव्यवहार इत्यादी विविध विचारप्रणालींचा राज्यशास्त्र आणि राजकीय समाजशास्त्राच्या अध्ययनात अभ्यास केला जातो. विचारांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान असते. मानव हा बुद्धिवान आणि विवेकशाली प्राणी असल्यामुळे सभोवतालच्या बाह्य पर्यावरणाच्या प्रभावातून मानवी मनात उमटणाऱ्या संवेदना आणि आंतरक्रियांच्या माध्यमातून विचार उत्पन्न होतात आणि हे विचार अधिक तर्कशुद्ध, स्पष्ट, सूत्रबद्ध आणि व्यवस्थित स्वरूप धारण केल्यानंतर त्यांना विचारप्रणालीचा दर्जा प्राप्त होतो. विचारप्रणाली विशेषतः राजकीय संस्थांशी संबंधित असते, तेव्हा तिला व्यापक स्वरूप प्राप्त होते आणि तेव्हा तिला राजकीय विचारप्रणाली या अर्थाने संबोधिले जाते.

विचारप्रणाली या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग अंतोन द ट्रेसी या फ्रेंच विचारवंताने 'Element of Ideology या ग्रंथात केलेला आहे. 'विचाराचे शास्त्र' या अर्थाने | विचारप्रणाली या शब्दाचा वापर त्यांनी केलेला आढळतो. 'विचारांचा संच' या अर्थानेदेखील विचारप्रणाली या शब्दाचा वापर केला जातो. हा अर्थ अत्यंत मर्यादित स्वरूपाचा दिसून येतो. कारण आधुनिक काळात हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला जातो. राजकीय समाजाचे नियमन करणारा आग्रही विचार, तत्त्वज्ञान, सिद्धान्त, ध्येये, मूल्य आणि कार्यक्रम ह्या सर्वांचा एकत्रित समुच्चय म्हणजे विचारसरणी होय अशी व्यापक संकल्पना विचारसरणीबाबत आधुनिक काळात मांडली जाते. विचारप्रणालीमध्ये साधारणतः निश्चित, सर्वसमावेशक आणि सर्व सामाजिक व राजकीय प्रश्नांची उत्तरे देणारा कार्यक्रम समावेश असतो. विचारप्रणालीद्वारा भविष्यकालीन राजकीय व्यवस्था नेमकी कशा स्वरूपाची असेल. हे आदर्शात्मक स्वरूपाचे दिशादर्शन केलेले असते. आदर्शात्मक व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कार्यक्रमाचा आराखडादेखील विचारप्रणालीत समाविष्ट केलेला असतो. उदा. मार्क्सवादात साम्यवाद प्रस्थापनेसाठ आवश्यक कार्यक्रमाचा समावेश आहे. विचारप्रणाली काही विशिष्ट गृहीत कृत्याका आधारलेली असते. सामाजिक आणि राजकीय जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या निराकरण करण्यासाठी विचारप्रणालीत काही उपाययोजनांचा समावेश केला जातो. विचारप्रणालीत बौद्धिक कार्यक्रम, तर्कशास्त्रीय पद्धतीविरोधी विचारांचे खंडन, भावनि आवाहनाचा समावेशदेखील असतो. सामाजिक आणि राजकीय जीवनात निर्माण झालेल्य एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या उद्देशाने विचारप्रणाली प्रत्यक्षात अस्तित्वात आलेल असते. प्रचलित सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेच्या समर्थनार्थ किंवा तिला अधिमान्यता मिळवून देण्याच्या उद्देशानेदेखील राज्यकर्त्यावर्गाकडून विचारप्रणालीच उद्घोषणा केली जाते. विचारप्रणालीच्या आधारावर जनतेमध्ये भावनिक आत्मीयता निर्माण करता येते. ही आत्मीयता व्यवस्थेच्या स्थैर्य व अधिमान्यतेसाठी आवश्यक मानली जाते. विचारप्रणालीतील आदर्शानुसार लक्ष्य निर्धारित करून आवश्यक कार्यक्रम, चळवळ, प्रचार व प्रसार आणि संघटन इत्यादी प्रक्रियांना चालना मिळते, तेव्हा तिला वास्तव स्वरूप लाभत असते. आदर्श राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेची कल्पना मांडून, ती व्यवस्था वास्तवतेत आणता येईल या दृष्टीने मांडलेला विचारव्यूह म्हणजे विचारप्रणाली मानता येईल. विचारप्रणालीच्या माध्यमातून भूतकाळात घडलेल्या सामाजिक व राजकीय घटनांचे विश्लेषण केलेले असते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कारणमीमांसा करून वर्तमानकाळात भेडसावणाऱ्या समस्येची उत्तरे शोधली जातात आणि या उपाययोजनांची भविष्यात अंमलबजावणी करून आदर्श समाजरचनेचे चित्र रंगविले जाते.

विचारप्रणालीत राजकीय विचारांची तर्कशुद्धपणे रचना केलेली असते. तात्त्विकदृष्ट्या महत्त्वपूर्ण घटकांचा समन्वय निर्माण केलेला असतो. सर्व प्रश्नांना उत्तरे देता यावी यासाठी आवश्यक कार्यक्रमाचा आणि तात्त्विक गोष्टींचा ऊहापोह केलेला असतो. विचारप्रणालीला सर्वसमावेशक आणि वैश्विक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातो. जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे विचारप्रणालीच्या आशयात समाविष्ट आहेत, असे विचारप्रणाली मांडणाऱ्या आणि तिचे समर्थन करणाऱ्यांकडून म्हटले जाते.

विचारप्रणालीची व्याख्या : विचारप्रणाली शब्दाचा सर्वप्रथम वापर फ्रेंच विचारवंत अंतोन द ट्रेसी यांनी २३ मे १७९३ मध्ये केलेला होता. 'विचाराचे शास्त्र' हा विचारप्रणालीचा अर्थ लक्षात घेतला होता. राजकीय चिंतनात विचारप्रणालीला महत्त्वाचे स्थान आहे. कार्ल मार्क्स यांनी 'German Ideology' या ग्रंथात विचारप्रणालीला 'मिथ्याचेतना' म्हटले आहे. जार्ग लोरेन यांनी 'Concept of Ideology' या ग्रंथात विचारप्रणालीला चार भिन्न स्वरूपांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

१. नकारात्मक स्वरूपात विचारप्रणाली असत्य चेतना मानली जाते की, जी सामाजिक प्रश्न वा माहिती जाणून घेण्यास विकृती निर्माण करते, तर सकारात्मक स्वरूपात विचारप्रणाली विशिष्ट वर्ग वा समूहाचा विश्वविषयक दृष्टिकोन अभिव्यक्त करते; म्हणजे विचारप्रणालीच्या माध्यमातून विशिष्ट वर्ग वा समूहांचे विचार, विश्वास, सिद्धान्त अभिव्यक्त करता येतात आणि त्यांच्या माध्यमातून समूह वा वर्ग आपल्या हिताची रक्षा करू शकतात वा त्याला प्रोत्साहन देऊ शकतात.

२. विचारप्रणाली आत्मपरक किंवा मनोवैज्ञानिक असू शकते अन्यथा वस्तुपरक घटकावर आधारित असू शकते. आत्मपरक घटकावर आधारित विचारप्रणाली चेतनेचे एक विकृत रूप असेल. ते यथार्थ समजू शकणार नाही. वस्तुपरक असेल तर ही स्वत: यथार्थ भ्रम निर्माण करेल.

३. विचारप्रणालीचा विस्तार काही वेळेस इतका मर्यादित असतो की ती सांस्कृतिक उद्देशांनादेखील स्पर्श करणार नाही, वा इतका व्यापक असेल की सामाजिक जीवनातील समस्त चेतनांना आपल्यात सामावून घेईल.

४. विज्ञानाच्या संदर्भात विचारप्रणाली प्रतिवादाच्या स्वरूपात विकसित होईल, तथा विचारप्रणालीची स्थिती सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळे आणण्याचे काम करेल. जार्ग लोरेन यांनी विचारप्रणाली विभिन्न स्वरूपांत मांडण्याचा प्रयत्न केला. आधुनिक काळात प्रत्येक राजकीय संघर्षाला विचारप्रणालीच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक राजकीय व्यवस्थेचे विचारप्रणालीच्या आधारावर वर्गीकरण केले जाते. विचारप्रणाली संकल्पनेचा चांगल्या आणि वाईट पद्धतीने अर्थ लावला जातो. तसेच कालानुरूप विचारप्रणाली संकल्पना विविध विचारवंतांनी आपआपल्या आकलनानुसार लावून विविध व्याख्या आणि परिभाषा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विचारप्रणालीच्या प्रमुख व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येतात.
१. ट्रेसी : यांच्या मते, विचारप्रणाली हे विचारांचे शास्त्र आहे.

२. मॅक आयव्हर : यांच्या मते, उद्दिष्टांना जन्म देणारी राजकीय, सामाजिक मूल्यांची पद्धती म्हणजे सामाजिक व राजकीय विचारप्रणाली होय.

३. डॅनिअल इगलसोल : यांच्या मते, प्रत्येक विचारप्रणालीमध्ये वर्तमान स्थितीचे मूल्यमापन आणि भविष्याच्या दूरदृष्टीचा समावेश असतो.

४. कार्ल फ्रेडरिक : यांच्या मते, एखादी राजकीय व्यवस्था सुधारण्यासाठी, टिकविण्यासाठी, बदलण्यासाठी जी सुसंगत विचारसंहिता स्वीकारली जाते तिला विचारसरणी असे म्हणतात.

 वरील व्याख्यांचा विचार करता विचारप्रणालीत समाज आणि राज्याची रचना कशी असावी याबाबत केलेल्या विचारमंथनाचा समावेश असतो. विचारप्रणालीद्वारा राजकीय व्यवस्थेतील ध्येय, मूल्य आणि आदर्शाबाबत दिशादर्शन केलेले असते. राजकीय समस्यांशी संबंधित विस्कळीत स्वरूपाचे विचार संघटित, व्यवस्थित आणि सुस्पष्ट रूप धारण करतात, तेव्हा त्याला विचारप्रणाली असे संबोधिले जाते. विचारप्रणाली वर्तमान राजकीय संस्थांशी निगडित असते. वर्तमान राजकीय व्यवस्थेचे समर्थन वा त्यात परिवर्तन करण्यासंबंधी विचारपुंजाचा समावेश असतो. विचारप्रणालीच्या माध्यमातून राजकीय सत्तेचे वितरण करणाऱ्या सत्ता, अधिकार, अधिमान्यता संकल्पनेचे आकलन आणि स्थिती स्पष्ट होत असते. राजकीय विचारप्रणाली विचारांचे शास्त्र असून, जे मानवी स्वभाव आणि सामाजिक परिवर्तन स्पष्ट करत असते. त्यासोबत भविष्यात आदर्श समाज व्यवस्था कशी निर्माण करता येईल याबाबत भूमिका मांडत असते आणि व्यवस्थेच्या प्राप्तीसाठी आवश्यक संसाधने, मार्ग आणि माध्यमांचादेखील उल्लेख करत असते.

राजकीय विचारप्रणालीची विशेषता : राजकीय विचारप्रणालीची विशेषता आणि तिचे स्वरूप पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून विशद करता येते.

१. विचारप्रणाली सामान्यतः सामाजिक वातावरणाशी होणाऱ्या आंतरक्रियेचे फळ मानले जाते. मनुष्य विवेकशील. भावनाप्रधान प्राणी असून समाजजीवनात घडणाऱ्या घटनांच्या संवेदना मानवाच्या मेंदूत विचार प्रवृत्त करतात आणि त्यातून विचारप्रणाली आकार धारण करते. सामाजिक चेतना आणि वातावरणाच्या प्रभावातून विचारप्रणाली उत्पन्न होत असते.

२. आधुनिक विचारप्रणालीचा प्रारंभ फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाला, असे मानले जाते.या क्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, गणराज्य यांसारख्या तत्त्वांना मान्यता प्रदान केली. या क्रांतीच्या प्रभावातून अन्य देशांतही विचारप्रणालीच्या आधारावर परिवर्तन किंवा क्रांतीचा प्रयत्न सुरू झाला.

३.विचारप्रणाली ही मुख्यतः राजकीय स्वरूपाची असते. अन्य संदर्भात ही संकल्पना वापरली जात असली, तरी तिचा वापर राजकीय कारणासाठी जास्त प्रमाणात केला जातो. राजकीय चळवळीची गृहीतके, ध्येय आणि समर्थन तिच्या आधारावर केले जाते.

४. विचारप्रणालीच्या आधारावर राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणले जाते. नियंत्रण आणि अनुशासन करण्यासाठीही वापर केला जातो. प्रस्थापित व समकालीन व्यवस्थेची निर्भत्सना आणि परिवर्तनाच्या मार्गाचा शोध विचारप्रणालीद्वारे घेतला जातो.

५.विचारप्रणालीमध्ये परस्परविरोध अस्तित्वात असल्यामुळे दोन विचारप्रणाली एकसारख्या असत नाहीत. प्रत्येक विचारप्रणालीची प्रकृती, पद्धती, साधने आणि आदर्शांमध्ये तफावत आढळून येते. प्रत्येक विचारप्रणालीत एक मुख्य बिंदू वा विचार असतो. त्याच्या आवतीभोवती अनेक विचारांची आणि तत्त्वांची मांडणी केलेली असते.

६. विचारप्रणाली सिद्धान्त आणि पद्धतीच्या आधारावर कार्य करीत असते. तिच्या माध्यमातून विशिष्ट धोरण, क्लृप्त्या व व्यावहारिक उपक्रमांचे दिशादर्शन समाजाला केले जात असते.

७. प्रत्येक विचारप्रणालीत घोषणा, प्रतीके, मिथके आणि आकर्षक कार्यक्रमाचा समावेश असतो.

८. विचारप्रणालीचा जन्म, विकास आणि लय सामाजिक पर्यावरणातून होत असतो.. सामाजिक पर्यावरणाच्या प्रभावातून विशिष्ट काळात विशिष्ट विचारप्रणालीला महत्त्व प्राप्त होते. सामाजिक पर्यावरण बदलल्यास तिचे महत्त्व कमी होते. उदा. रशियन राज्यक्रांतीमुळे साम्यवादाचे महत्त्व वाढले आणि रशियाचे पतन झाल्यामुळे साम्यवादाचे महत्त्व कमी झाले.

९. राजकीय विचारप्रणालीत संघटन आणि एकता निर्माण करण्याची शक्ती असते. विचारप्रणालीतील मूल्ये तिच्या समर्थकांसाठी प्रेरणास्रोत बनतात. हळूहळू तिची मूल्ये अनुयायांच्या श्रद्धा आणि निष्ठेचा विषय बनतात आणि त्यामुळे ते तिच्या रक्षणासाठी काहीही करायला तयार असतात.

१०. विचारप्रणाली राजकीय व्यवस्थांना अधिमान्यता प्रदान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जातात. राष्ट्रीय चारित्र्य, अनुशासन आणि राष्ट्रीय शक्तीला वाढविण्यासाठीदेखील उपयुक्त मानल्या जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर परराष्ट्र व्यवहारातील वास्तविक उद्देश स्पष्ट करण्यासाठी विचारप्रणालीचा वापर केला जातो.

११. विचारप्रणाली हे विचारांचे शास्त्र असते. विशिष्ट गट वा समुदायातील लोकांचे समज, कल्पना व प्रवृत्ती यांचा विचारप्रणालीत समावेश असतो. विचारप्रणालीचे स्वरूप सर्वसाधारण विचारांशी संबंधित नसते, तर एखाद्या विचाराशी संबंधित असते.

१२. विचारप्रणाली नेहमीच व्यक्तींना कृतिप्रवण करून भविष्याकडे वाटचाल करण्याचा संदेश प्रसारित करत असतात.

अशा पद्धतीने राजकीय विचारप्रणालीची निर्मिती सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरणातून होत असते. प्रत्येक विचारसरणीचे मूल्य, ध्येय, पद्धती, मार्ग आणि सिद्धान्त असतात. बदलत्या काळानुसार विचारसरणीत परिवर्तन होत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.