राजकीय विचारसरणीची वैशिष्ट्ये आणि कार्य:-
विचारसरणी हा विशिष्ट
प्रकारच्या विचारांचा संच असतो. त्यात समाजजीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी
आवश्यक ध्येय, कार्यक्रम
आणि उपाययोजनेचा समावेश केलेला असतो. विशिष्ट ध्येय प्राप्त करण्यासाठी विशिष्ट
कार्यपद्धतीचा अवलंब केला जावा, याबाबत मार्गदर्शन केलेले असते. विचारप्रणालीच्या
माध्यमातून समाजजीवनातील महत्त्वपूर्ण समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक
गोष्टींचे विवरण केलेले असते. तिने सुचविलेल्या मार्गानुसार मार्गक्रमण केल्यास
समस्येचे हमखास निवारण हा आशावाद व्यक्त केलेला असतो आणि त्यासोबत भविष्यकालीन
आदर्श समाजाचे चित्रदेखील रेखाटलेले असते. विचारप्रणालीबाबत विविध विचारवंतांनी
विविध मते मांडलेली आहेत. त्या विचारवंतांच्या मताचा अभ्यास करता विचारप्रणालीची
पुढीलप्रमाणे वैशिष्ट्ये सांगता येतात.
१.आदर्शवादावर भर : समाज व राजकीय जीवनाला आकार
देण्यासाठी सामान्य जनतेसमोर आदर्श उभे करावे लागतात. त्या आदर्शाप्रत
पोहोचण्यासाठी आवश्यक परिश्रम जनतेने घ्यावे, म्हणून विचारप्रणालीच्या
माध्यमातून प्रेरणा विकसित केल्या जातात. विचारप्रणाली जनतेसमोर भावी जीवनाचे
आदर्श उभे करत असते. सुखी आदर्श जीवनाचे चित्र जनतेला कार्य करण्यास, परिश्रम करण्यास आणि
निष्ठा विकसित करण्यात प्रभावी भूमिका मांडत असते. त्यामुळे जवळपास सर्वच विचारप्रणालींमध्ये
आदर्शवादावर भर दिला जातो. त्यामुळे वॉटकिन्स यांनी विचारप्रणालीला 'भवितव्याची लाट' (Wave of Future) असे संबोधिले आहे.
२.राजकीय व्यवस्थेचा पाया : विचारसरणी म्हणजे शब्दजंजाळ
नव्हे, तर
ती राजकीय व्यवस्थेचा पाया मानली जाते. विचारसरणीच्या आधारावर राजकीय व्यवस्थेची
उभारणी केली जाते. राजकीय व्यवस्थेचे विविध विभाग, कायदे आणि घटनेतदेखील
विचारप्रणालीचे अस्तित्व दिसते. उदा. रशियामध्ये साम्यवादी सरकार असताना शाळा, महाविद्यालये, प्रसार माध्यमे, चित्रपट व नाटके आणि
प्रशासकीय निर्णय व धोरण आखणीवर साम्यवादाचा प्रभाव होता.. २.
३.परिवर्तनीय : राजकीय विचारप्रणाली कालसापेक्ष असते. तिच्यात काळानुरूप बदल होणे गरजेचे असते. कारण विचारप्रणाली ज्या घटना, परिस्थिती वा प्रसंगांतून विकसित होते; ती परिस्थिती कायम राहत नाही. तीत बदल होत राहतो. त्यामुळे राजकीय विचारप्रणालीतदेखील बदल होणे आवश्यक असते. विचारप्रणालीचा प्रचार व प्रसार झाल्यानंतर तिच्यात अभिप्रेत असलेले आदर्श वास्तवतेत येऊ शकत नाही, जाणीव येऊ लागल्यामुळे विचारप्रणालीत हळूहळू बदल करणे गरजेचे बनते. त्यामुळे सर्व विचारप्रणाली कमीअधिक प्रमाणात परिवर्तनशील असतात. विचारप्रणालीत परिस्थितीनुसार बदल केले नाही, तर ती काळाच्या ओघात नष्ट होण्याचा धोका असतो. विचारप्रणालीला प्रखर विरोध झाल्यामुळे किंवा विरोधी विचारप्रणाली निर्माण झाल्यामुळेदेखील बदल करणे आवश्यक बनते. तसेच कोणतीही विचारसरणी कायमस्वरूपी अस्तित्वात राहू शकत नाहीत. काळानुरूप काही विचारसरणी नव्याने निर्माण होतात, तर काहींची उपयुक्तता संपल्यामुळे नष्ट होतात. उदा. दुसऱ्या महायुद्धानंतर फॅसिझम आणि नाझीझम विचारप्रणाली नष्ट झालेल्या आहेत.
४. संघर्षाची अनिवार्यता : विचारसरणी आणि संघर्ष यांच्यामध्ये
अत्यंत जवळचे नाते आहे. विचारसरणीची मांडणी करणारे लोक प्रस्थापित व्यवस्थेप्रति
फारसे खूश नसतात. त्यांना प्रस्थापित व्यवस्थेत परिवर्तन वा बदल घडवून आणण्याची
गरज वाटते. त्या गरजेतून विचारसरणीची मांडली केली जाते. त्यामुळे प्रस्थापित व्यवस्था
टिकवून ठेवणारे घटक आणि व्यवस्थेत परिवर्तन व्हावे असे मानणारे घटक यांच्यात
संघर्ष होणे अटळ असते. उदा. मार्क्सवादी भांडवलशाही व्यवस्थेला विरोध करतात.
मार्क्सवादी आणि भांडवलवादांमध्ये संघर्ष अटळ राष्ट्राने स्वीकारलेल्या
विचारसरणीला सर्व लोकांची संमती नसते. तसेच विविध राष्ट्रांनी विविध
विचारप्रणालींचा अवलंब केलेला असतो. या कारणामुळे विचारप्रणालीत संघर्ष अटळ मानला
जातो.
५. लवचीकपणा : प्रत्येक विचारसरणीत लवचीकपणा आढळून येतो.
प्रत्येक विचारसरणीची मांडणी विशिष्ट काळ आणि प्रसंगानुरूप केलेली असते. काळात आणि
प्रसंगात नेहमी परिवर्तन होत असल्यामुळे विचारसरणी अमलात आणताना व्यावहारिकतेचा
विचार करून मुख्य आशय कायम ठेवून काही गोष्टींमध्ये बदल केला जातो. व्यवहारात
विचारसरणीचा अवलंब करताना अनेक तडजोडी वा बदल स्वीकारावे लागतात. उदा. चीनने
साम्यवादी राजवटीचा स्वीकार केलेला असला, तरी खाजगी भांडवलदारांना मालमत्तेचा अधिकार आणि
गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
६. प्रतीकांना महत्त्व : प्रत्येक विचारसरणीत कोणत्या ना
कोणत्या स्वरूपाची प्रतीके निर्माण केलेली असतात. प्रतीकांच्या माध्यमातून भावनिक
अस्मिता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रतिकांप्रती निर्माण झालेल्या
निष्ठांचा वापर करून विचारप्रणालीला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
उदा. नाझीझम विचारप्रणालीने स्वस्तिक, लष्करी कवायत, गणवेश तर साम्यवादी विचारप्रणालीने
विळा व हातोडा इत्यादी प्रतीके निर्माण केलेली होती. प्रतीकांच्या माध्यमातून
विचारप्रणाली कोणत्या वर्गांचे वा गटांचे प्रतिनिधित्व करते यांचे दर्शन घडत असते.
७.कृतिशीलता : कृतिशीलता हा विचारप्रणालीचा
मुख्य आधार असतो. विचारप्रणालीच्या माध्यमातून व्यक्तींना कार्यप्रवृत्त करण्याचा
प्रयत्न केला जातो. विचारप्रणालीच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये निष्ठा, प्रेम, ऐक्य आणि आत्मीयतेची
भावना निर्माण होते. या भावनांचा उपयोग करून व्यक्तींच्या कार्याला दिशा दिली जात
असते. विचारप्रणालीच्या आधारावर प्रत्येक व्यक्ती स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करत
असते. विचारप्रणाली व्यक्ती जीवनाची दिशा निश्चित करत असल्यामुळे तिचा वापर करून
व्यक्तीला कार्यप्रवण करणे सहज शक्य असते..
८. वर्गीकरणात्मक : विचारप्रणालीत समाविष्ट
विचारांच्या आधारावर तिचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. विचारप्रणालीचे
कार्याच्या आधारावरदेखील वर्गीकरण केले जाते. उदारमतवादी, पुरोगामी, प्रतिगामी, डावी आणि उजवी विचारसरणी इत्यादी
प्रमुख संकल्पनांच्या आधारावर विचारप्रणालीचे वर्गीकरण आणि स्वरूप निश्चित केले
जाते. डाव्या विचारसरणीत समाजवादी आणि साम्यवादी मानणाऱ्यांचा समावेश केला जातो, तर भांडवलशाही आणि
स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्यांचा उजव्या विचारसरणीत समावेश केला जातो.
अशा प्रकारे विचारप्रणालीची वैशिष्ट्ये विविध विचारवंतांनी विशद केलेली आहेत.
विचारप्रणालीचे कार्य : प्रत्येक
विचारप्रणालीचा जन्म विशिष्ट कार्यासाठी झालेला असतो. विचारप्रणालीच्या आधारावर
विविध कार्ये पार पाडली जातात. विचारप्रणालीचे सामर्थ्य लक्षात घेता तिच्या
माध्यमातून विविध कार्ये पार पाडली जाऊ शकतात. ती कार्ये पुढीलप्रमाणे होत.
२. संस्थानिकीकरण : विचारप्रणालीच्या
माध्यमातून संस्थानिकीकरणाचा प्रयत्न राजकीय अभिजन वर्गाकडून केला जात असतो.
राजकीय अभिजनांचा प्रभाव कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी संस्थानिकीकरणाची गरज
भासते. संस्थानिकीकरणाच्या माध्यमातून राजकीय प्रभावाचे राजकीय अधिकारात रूपांतर
करणे शक्य होते. त्या कार्यासाठी विचारप्रणालीचा आधार घेतला जात असतो. उदा.
पाकिस्तानमध्ये अयुबखान यांनी आपल्या प्रभावाचे राजकीय अधिकारात रूपांतर
करण्यासाठी मार्गदर्शक लोकशाहीची कल्पना मांडली. मार्गदर्शक लोकशाहीच्या
नावीन्यपूर्ण विचारधारेच्या जोरावर राजकीय सत्तेला अधिमान्यता मिळविली.
३. राजकीय व्यवस्था समर्थन: राजकीय व्यवस्थेचे
समर्थन करण्यासाठी अनेकदा राजकीय नेतृत्वाकडून विचारप्रणालीचा वापर केला जातो.
प्रत्येक राजकीय नेतृत्वाला अधिमान्यतेचा प्रश्न भेडसावतो. अधिमान्यता प्राप्त
झाली की बळाचा वापर न करता आपोआप आज्ञापालन घडत असते. जनता स्वत:हून राजकीय
नेतृत्वाच्या अधिकाराला मान्यता देत असतात. त्यामुळे राजकीय अभिजन विशिष्ट
विचारसरणी निर्माण करत असतात. उदा. भारताचे बहुसांस्कृतिक स्वरूप लक्षात घेऊन
काँग्रेस पक्षातील नेतृत्वाने धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय विचारधारेला आपल्या
पक्षाच्या ध्येय-धोरणात आणि जाहीरनाम्यात सातत्याने स्थान दिलेले आढळते.
४. राजकीय स्थिरतेसाठी : प्रत्येक राजकीय
व्यवस्था स्थैर्यासाठी प्रयत्न करत असते. राजकीय व्यवस्थेच्या स्थैर्याला अनेक
घटकांकडून सातत्याने आव्हाने मिळत असतात. या आव्हानांचा मुकाबला करून व्यवस्थेचे
स्थैर्य टिकविण्यासाठी विचारप्रणालीचा वापर केला जातो. राजकीय स्थैर्याअभावी
समाजात राजकीय अराजक वा राजकीय गोंधळाची शक्यता निर्माण होते किंवा अचानक
उद्भवलेल्या एखाद्या घटनेतून वा प्रसंगातून राजकीय स्थैर्याला धक्का पोहोचतो आणि
समाजात अराजकसदृश परिस्थिती निर्माण होते. त्या परिस्थितीतून समाज आणि शासनाला
बाहेर काढण्यासाठी विचारप्रणालीची निर्मिती केली जाते. उदा. भारतात इंदिरा
गांधींनी लादलेल्या आणीबाणीमुळे राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण
देश भयग्रस्त झाला. त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी
संपूर्ण क्रांतीची विचारसरणी मांडली.
५. हितरक्षण: राजकीय व्यवस्थेचा
जन्म हितसंबंधांच्या रक्षणासाठी झालेला असतो. राजकीय व्यवस्था जेव्हा विशिष्ट वर्ग
वा गटांच्या हितसंबंध रक्षणासाठी वापरण्याची गरज असते, तेव्हा त्याला तात्त्विक मुलामा
देण्यासाठी विचारप्रणालीचा वापर केला जातो. उदा. मुसोलिनीने फॅसिझम विचारधारेच्या
आधारावर इटलीतील विशिष्ट वर्गाचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला. लोकशाही
व्यवस्थेतदेखील विशिष्ट हितसंबंधांच्या आधारावर राजकीय पक्षाची निर्मिती केली
जाते. राजकीय पक्षाचे चिन्हदेखील हितसंबंध रक्षणाचे प्रतीक म्हणून वापरले जाते.
उदा. साम्यवादी पक्ष विळा आणि हातोडा या चिन्हाच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगार
वर्गाच्या हितरक्षणासाठी प्रतिनिधित्व करतो, हे दाखविण्याचा प्रयत्न करतात..
६. सामाजिक ऐक्य निर्मिती : समाज व्यवस्थेत ऐक्य
निर्मितीसाठीदेखील विचारप्रणाली काम करीत असते. विविध कारणांमुळे समाजातील ऐक्य
नष्ट होऊन विभाजनवादी वा फुटीरवादी प्रवृत्तीचा विकास होतो आणि त्यामुळे समाज व
राष्ट्राच्या एकात्मतेला धोका पोहचतो. विभाजनवादी प्रवृत्तीस वेळेवर आळा न
घातल्यास राष्ट्राचे तुकडे होण्याची शक्यता असते; म्हणून विभाजनवादी प्रवृत्ती नष्ट
होऊन समाज-ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी विचारप्रणालीचा वापर केला जातो. उदा.
बिस्मार्कने जर्मनीच्या एकीकरणाची हाक देऊन संपूर्ण जर्मन भाषिकांना एकत्र
आणण्याची कामगिरी केली होती.
७. सामाजिक परिवर्तन घडवून
आणण्यासाठी : प्रत्येक समाजात काळानुरूप परिवर्तन होत असते. परंतु या परिवर्तनाला योग्य
वळण वा दिशा देण्यासाठी विचारप्रणालीचा वापर केला जातो. विचारप्रणालीच्या आधारावर
समाज व्यवस्थेत नवी मूल्ये, श्रद्धा आणि निष्ठा निर्माण करून सामाजिक परिवर्तन
साध्य केले जात असते. उदा. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता
या मूल्यांच्या आधारावर फ्रेंच समाजात सामाजिक आणि राजकीय परिवर्तन करण्याचा
प्रयत्न झाला होता.
८. नव्या व्यवस्थेचे समर्थन
करण्यासाठी : नव्याने प्रस्थापित झालेल्या राजकीय व्यवस्थेला जुन्या व्यवस्थेने केलेले
राजकीय संस्कार नष्ट करण्याची गरज भासते, म्हणून नवी व्यवस्था विचारप्रणालीच्या आधारावर ते
कार्य पार पाडत असते. उदा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू यांनी
ब्रिटिश राजवटीचे संस्कार नष्ट करण्यासाठी धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सामाजिक न्याय आणि समता इत्यादी
विचारसरणींचा वापर केलेला होता. नवीन निर्माण झालेली व्यवस्था पूर्वीच्या
व्यवस्थेपेक्षा वेगळी आणि नावीन्यपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठीदेखील विचारप्रणालीचा
वापर केला जातो. पूर्वीच्या व्यवस्थेने वापरलेल्या विचारप्रणालीपेक्षा नवीन
विचारप्रणाली नवीन व्यवस्था अमलात आणत असते.
अशा प्रकारे विचारप्रणालीचे कार्य सांगता येते.
विचारप्रणालीच्या कार्याचा विचार करता तिचे महत्त्व लक्षात येते. आधुनिक काळात
प्रत्येक राजकीय व्यवस्था कोणत्या ना कोणत्या विचारधारेच्या आधारावर उभी आहे.
विचारप्रणालीच्या अस्तित्वाशिवाय राजकीय व्यवस्थेची कल्पनाच करता येणार नाही, इतके विचारप्रणालीचे
कार्य महत्त्वाचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.