अस्तित्ववादाची प्रमुख
लक्षणे वा वैशिष्ट्ये
अस्तित्ववाद विचारसरणीच्या
निर्मितीची अनेक कारणे अभ्यासकांनी नमूद केलेली आहेत. संघटित भांडवलशाही आणि केंद्रकृत
राज्यव्यवस्थेमुळे व्यक्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. संघटित
भांडवलशाहीमुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. व्यक्तीचे वस्तुकरण मोठ्या
प्रमाणावर कल गेल्यामुळे व्यक्ती एक उत्पादक वस्तू बनला. वैयक्तिक संबंधाचा मोठ्या
प्रमाणावर लोप घडून आला. समाज सदस्यांमध्ये औपचारिक आणि व्यावसायिकतेच्या आधारावर
तत्कालीन स्वरूपाचे संबंध निर्माण झाले. ज्ञानाचे विशेषीकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या, संचारव्यवस्था इत्यादींमुळे
व्यक्ती व्यक्तीतील पारंपरिक संबंधाचा -हास झाला. कौटुंबिक जीवन, सामुदायिक आणि ग्रामीण जीवन
लुप्त होत असल्यामुळे व्यक्तीचे अस्तित्व नष्ट होत आहे. आतंकवाद, युद्ध, दहशतवाद, आण्विक शस्त्रास्त्र
इत्यादींमुळे मानसिक तणाव व चिंतेमध्ये भर पडत आहे. आर्थिक समृद्धीतून मानवी जीवन
संपन्न आणि नैतिक बनण्याऐवजी दुःखदायक बनत चालेले आहे. आंतरिक भयातून मानवाच्या
अस्तित्वाला ग्रहण लागत आहे. या परिस्थितीत मानवी अस्तित्वाचा शोध घेऊन कार्यतत्पर
बनविणे हा अस्तित्ववादाचा प्रमुख हेतू आहे. अस्तित्ववाद ही एकदम नवीनतम विचारसरणी नसून, प्राचीन काळापासून
अस्तित्वात असलेली विचारधारा आहे; परंतु, दुसऱ्या महायुद्धानंतर या विचारसरणीला सैद्धांतिक चौकटीत
बसविण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केलेला आहे. या अभ्यासकांनी अस्तित्ववाद
विचारसरणीची पुढील प्रमुख वैशिष्ट्ये विशद केलेली आहेत.
१. बौद्धिक वा अमूर्त
चिंतनाचा अस्वीकार अस्तित्ववादी विचारधारा - सर्व प्रकारच्या अमूर्त
चिंतनाला नाकारतात. सर्व प्रकारचे मानवी चिंतन वा तत्त्वज्ञान व्यक्तीचे जीवन आणि
अनुभवाशी संलग्न केले गेले पाहिजे. देकार्त व हेगेल या विचारवंतांनी बुद्धिवादी
परंपरेचा युरोपात जो उद्घोष चालविला होता त्या परंपरेचा अस्तित्ववाद्यांनी प्रखर
शब्दांत समाचार घेतलेला आहे. अस्तित्ववाद ही विवेकवादाच्या विरुद्ध तीव्र
स्वरूपाची प्रतिक्रिया मानली जाते.
विवेकवादाच्या मते, विश्वात एक विकासशील बौद्धिक सत्ता राज्य करत असते, तर अस्तित्ववादाच्या
मतानुसार वस्तुतः जगात अशा प्रकारची कोणती व्यवस्था वा बौद्धिक प्रतिमान जगात
अस्तित्वात नाही. व्यक्तीजवळ अशा प्रकारची कोणतीही बौद्धिक योजना नसते की, • जिच्या जोरावर ती सामाजिक
जगाचा सामना करू शकेल. विवेक आणि तर्क व्यक्तीला भ्रांत जीवन वा विनाशाकडे घेऊन
जाते. अस्तित्ववादी बुद्धिवादाच्या सर्व प्रकारच्या स्वरूपांना विरोध करतात.
बौद्धिक आकलनाऐवजी भावनिकतेच्या आधारावर मानवाचे आकलन करण्याचा प्रयत्न करतात.
२. व्यक्तीला महत्त्व - अस्तित्ववादी मानवी
अस्तित्वाला प्राधान्य देतात. या विचारसरणीचा केंद्रबिंदू व्यक्ती आहे. विचारांचे
महत्त्व व्यक्तीच्या दृष्टीतून जाणले पाहिजे. अस्तित्वाचा संबंध अनुभव आणि
वास्तविक व्यवहाराशी असतो. अनुभवाच्या आधारावर व्यक्तीच्या अस्तित्वाला समजण्याचा
प्रयत्न केला पाहिजे. तत्त्व आणि अस्तित्व यांच्यात विभेद रेषा ओढली पाहिजे.
तत्त्व वस्तूंचे शुद्ध रूप दाखविते, ज्यावर अमूर्ततेच्या आधारावर विचार केला जाऊ शकतो. अस्तित्व
हे तत्त्वाच्या आधी येते. अस्तित्ववादी विचारक व्यक्ती जीवन, अनुभव आणि व्यक्तीच्या
ऐतिहासिक स्थितीच्या आधारावर प्रत्येक दर्शन वा तत्त्वज्ञानाचा विचार करतात.
व्यक्तीच्या अस्तित्वाचा शोध वा बोध घेणे हे या विचारसरणीचे प्रमुख लक्षण मानता
येईल. मुख्य म्हणजे स्वतःच्या जगण्याचा आणि विचारांचा अतूट संबंध असला पाहिजे, यावर भर देतात.
३. अनुभवात्मक - अस्तित्ववादी विचारधारेचा
प्रमुख विचार मानवाचे वास्तविक आचरण आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुभव आहे.
व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवाला महत्त्व देतात. सार्त्रच्या मते, माझे माझ्या बाबतीतील ज्ञान
नेहमी दुसऱ्याचे माझ्या बाबतीतील ज्ञानापेक्षा भिन्न असेल. व्यक्तीला सर्वांपासून
अलग करून व्यक्तीचा विश्वास, भावना, संकल्प आदींचा विचार अस्तित्ववादी अनुभवात्मकतेच्या आधारावर
करतात.
४. मानवतावादाला महत्त्व - अस्तित्ववाद ही विचारधारा मानवतावादाला महत्व देते. व्यक्तीच्या
मनात निर्माण झालेल्या निराशा, चिंतेमुळे समाज आणि राज्यव्यवस्थेत स्वतःला
असाहाय्य व एकटा समजते. मानवी • स्थितीचे अध्ययन करून मानवतावादी मूल्य शोधण्याचा
प्रयत्न अस्तित्ववादी विचारधारा करते. या विचारधारेचे प्रमुख ध्येय व्यक्तीत चेतना
निर्माण करणे आहे. मानव नेमका कोण आहे आणि त्याच्या अस्तित्वाचे नेमके
उत्तरदायित्व काय आहे याची जाण विकसित करणे, हे अस्तित्ववादाचे प्रमुख कार्य आहे.
६. वस्तुकरण वा
यांत्रिकीकरणाला विरोध - मानवाचे यांत्रिकीकरण आणि
वस्तुकरण करणाऱ्या सर्व सिद्धान्तांना अस्तित्ववादी विरोध करतात. व्यक्तीची
यांत्रिकी आणि प्रकृतिवादी व्याख्या नाकारतात. व्यक्तीची सार्वजनिक मनोवृत्ती, व्यक्तीची स्वयंस्फूर्ती, अनुपमतेला नष्ट करणाऱ्या
सर्व प्रकारच्या प्रतिमानांना अस्तित्ववादी नाकारतात. व्यक्तीची स्वयंस्फूर्ती हीच
स्वातंत्र्याचे एकमेव लक्षण आहे. संघटित भांडवलवाद, प्रजातंत्र, हुकूमशाही व्यवस्था
व्यक्तीच्या 'स्व' ला दडपण्याचे कार्य करत असतात. व्यक्तीचे वस्तुकरण वा
यांत्रिकीकरणाला उत्तेजन देत असतात. व्यक्तीला उत्पादन व्यवस्थेचा एक भाग बनवितात.
त्यामुळे व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. तो आपले अस्तित्व वस्तूमध्ये
पाहत असतो. या व्यवस्था व्यक्तीच्या अस्तित्वाचे आकलन करू देत नसल्यामुळे
अस्तित्ववादी या व्यवस्थांना विरोध करतात.
७. केंद्रीकृत राज्य
व्यवस्थेला विरोध - अस्तित्ववादी केंद्रीकृत राज्यव्यवस्थेला विरोध करतात.
केंद्रीकृत राज्यव्यवस्थेत व्यक्तीच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कृतीवर
राज्याचे नियंत्रण वा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर असतो. राज्याच्या
व्यक्तिजीवनातील अतिहस्तक्षेपामुळे व्यक्तीच्या विकासाला वा अस्तित्वाला वावच राहत
नाही. व्यक्तीला राज्याच्या हातातील खेळणे बनविण्याच्या आधुनिक राज्यांच्या
स्वरूपाला ते विरोध करतात. राज्याच्या वाढती सत्ता आणि केंद्रीकरणाच्या
प्रवृत्तीला अस्तित्ववादी विरोध करतात.
अशा प्रकारे अस्तित्ववादी
विचारसरणीची प्रमुख लक्षणे सांगता येतात. अस्तित्ववादी विचारसरणी नियतवादी, निसर्गवादी आणि नशीबवादी
विचारसरणीच्या जंजाळातून मानवाची सुटका करण्याचा प्रयत्न करतात. मानवाला तंत्र आणि
उत्तरदायी प्राणी म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करतात. सर्व प्रकारच्या
निर्णयाला दुसऱ्या कुणाला नव्हे तर व्यक्तीला उत्तरदायी देतात. व्यक्तीला सुखी आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यास योग्य
बनविण्यासाठी दिशादर्शन करतात. व्यक्तीला
आदरयुक्त स्थान प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक मार्गाची चर्चा करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.