अस्तित्ववाद विचारसरणीची स्वरूप, लक्षणे वा वैशिष्ट्ये
अस्तित्ववादी विचारवंतांनी तत्त्वज्ञानाचे प्रचलित संकेत
मानण्यास नकार दिल्यामुळे इतर विचारांपेक्षा वेगळेपणा त्यात आढळून येतो. मानवी
अस्तित्वात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही एका घटकाचा सारतत्त्व म्हणून मान्यता
देणाऱ्या बुद्धिवादाच्या दृष्टिकोनाला ते नाकारतात. बुद्धिवादाऐवजी स्वाभाविक
अंतःप्रेरणेच्या आधारावर उत्कटतेचा अनुभव घेणे व त्यातून निर्माण होणाऱ्या मानवी
स्थितीला शब्दबद्ध करणे हे अस्तित्ववादाचे प्रमुख लक्षण मानले जाते. त्यामुळे
अस्तित्ववादी विचारधारा इतर
विचारधारांपेक्षा भिन्न दिसून येते. या विचारसरणीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
सांगता येतात.
१. अस्तित्ववादी स्वतःला तत्त्वज्ञ मानण्यास तसेच अस्तित्ववादाची
व्याख्या करण्यास विरोध दर्शवितात. अस्तित्ववादी मानवी अस्तित्वाबद्दल चिंतन करतात
आणि अस्तित्व ही कोणत्याही वस्तूप्रमाणे व्याख्येच्या चौकटीत बसविता येणार नाही; कारण प्रत्येक व्यक्तीचे
अस्तित्व अनन्य असते आणि ते दुसऱ्याबरोबर बदलता येत नाही. ते जगण्याच्या पद्धतीतून
आकारास येत असल्यामुळे तत्त्वज्ञानाच्या कोणत्याही विचारव्यूह वा पद्धती त्यांना
अस्वाभाविक वाटतात.
२. बुद्धी किंवा कोणताही एक घटक मानवी अस्तित्वाचे
सारतत्त्व मानता येणार नाही; कारण मानवी अस्तित्व नेहमी घडत असते. जिवंत असणे व जगणे या
संकल्पनांमध्ये ते भेद करतात. 'आधी अस्तित्व नंतर सारतत्त्व' असा क्रम निश्चित करतात.
जाणिवेच्या आधारावर स्वतःला घडविणाऱ्या मानवाला प्रथम प्राधान्य देतात.
अस्तित्ववादामुळे व्यक्तीकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त होते. व्यक्तीच्या
जडणघडणीत बुद्धीव्यतिरिक्त इतर घटकही महत्त्वाचे असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
३. निवडीस्वातंत्र्य वा स्वातंत्र्य संकल्पनेला
अस्तित्ववादात महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्य हा मानवाला मिळालेला शाप आहे.
मानवाच्या सर्व कृतींमागे स्वतःच्या निवडीला महत्त्व आहे. ही निवडीची जबाबदारी
दुसऱ्यावर टाकता येणार नाही. स्वतंत्रपणे निवड व निर्णय घेण्याच्या वृत्तीतून
मनुष्यत्वाचे खरे स्वरूप प्रकट होते.
४. विश्वातील घटकांचे परस्परसंबध जाणण्यात वा त्यातील
कार्यकारणभावाच्या आधारावर तर्कसंगत युक्तिवाद करण्यात अस्तित्ववाद्यांना रस नाही.
व्यक्ती हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे. व्यक्तीसंबंधी विचार करताना ते
बुद्धीपेक्षा भावनिकतेला जास्त प्राधान्य देतात. तटस्थपणे विचारमांडणी करण्याऐवजी
भावनिक गुंतवणुकीच्या आधारावर मांडणी करण्यास महत्त्व देतात.
५. मानवी अस्तित्वाविषयीचे सत्य अपरिवर्तनीय स्वरूपाचे आहे
हा तर्कशास्त्रीय दावा मानवी अपूर्णतेचे द्योतक मानतात.
अस्तित्ववाद्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना
नीतिशास्त्राची उभारणी करता आली नाही, अशी टीका केली जाते. ६. तत्त्वज्ञानातील सर्व संकेतांना
अस्तित्ववादी विरोध करत असल्यामुळे त्यांच्या मांडणीत मोठ्या प्रमाणावर
विस्कळीतपणा आढळून येतो. तत्त्वज्ञानातील शिस्त झुगारून दिल्यामुळे लेखनाला ललित
लेखनाचे स्वरूप प्राप्त झालेले दिसते.
अस्तित्ववादाचे स्वरूप-
अस्तित्ववाद हे तत्त्वज्ञान
आहे की जीवनभाष्य व्यक्त करणारा प्रतिक्रियात्मक दृष्टिकोन आहे, याबाबत अभ्यासकांमध्ये मतभिन्नता
आढळून येते. अस्तित्ववाद हे एक तत्त्वज्ञान आहे, ही भूमिका अस्तित्ववादी
लिखाण करणाऱ्या विचारवंतांना मान्य नाही. अस्तित्ववादी विचारवंत तत्त्वज्ञान
मांडण्याच्या प्रस्थापित पद्धतीवर आक्षेप घेतात. तत्त्वज्ञानाच्या पूर्वपरंपरेशी
नाते तोडण्याचा प्रयत्न करतात. तत्त्वज्ञान शब्दांशी संबंधित संकल्पनांना
नाकारतात. तत्त्वज्ञानात अंतर्भूत गृहीतकृत्य आणि त्याची बौद्धिक सिद्धता करणाऱ्या
व्यूहरचनेचादेखील अभाव अस्तित्ववादामध्ये दिसून येतो. सुबद्ध तत्त्वज्ञानाची
मांडणी केल्याचा दावा ते करत नाहीत. विश्वाचे स्वरूप आणि त्यातील घटकांच्या
परस्परसंबंधाची उकल करण्यात त्यांना रस नाही. मानवी जीवन जगण्यासंबंधित समस्यांवर
त्यांनी दिलेल्या भावनिक व वैचारिक प्रतिक्रिया आहेत. विविध अस्तित्वावादी
विचारवंतांनी मांडलेल्या संकल्पना व लिखाणात साम्य आढळून येत नाही. अस्तित्ववाद
संकल्पना मानणाऱ्या विचारवंतांच्या विचारात काही साम्यता आढळून येतात.
त्यासंदर्भात 'बाङ्मयीन बाद : संकल्पना आणि स्वरूप' नामक पुस्तकातील 'अस्तित्ववाद' लेखात विश्वास पाटील पुढील
मत व्यक्त करतात की, मानवी जगण्याशी संबंधित To live आणि To exit या संकल्पनांत अस्तित्ववादी
फरक करतात. to live म्हणजे जिवंत असणे. मानवाप्रमाणे झाडे, वनस्पती जिवंत असतात. exit म्हणजे आपण जगत आहोत, याचे भान ठेवून जगण्याविषयी
बोलतात. अस्तित्ववादी विचारवंतांच्या विचारात काही समान संकल्पना, नैतिक भूमिका आणि समान
आस्थाविषय आहेत; म्हणून सर्व विचारवंतांच्या विचाराला अस्तित्ववाद हा
सर्वसामान्य शब्द वापरतो. विश्वास पाटील यांनी व्यक्त केलेल्या मतातून
अस्तित्ववाद ही विचारप्रणाली वा तत्त्वज्ञान नाही, हे स्पष्ट रेखा इनामदार
साने यांनी 'अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी नामक होते.
पुस्तकात विविध अभ्यासकांच्या मतांचा आधार घेऊन
अस्तित्ववादास तत्त्वज्ञान मानता येणार नाही, याची चार प्रमुख कारणे विशद केलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे
होत
१. महायुद्ध काळात निर्माण झालेल्या परिस्थितीतून मानवी
जीवनात निर्माण झालेल्या अभावग्रस्त वा वैफल्यग्रस्त परिस्थितीतून हा विचार उदयाला
आला; तसेच बुद्धिवाद आणि
तर्कसंगततेला आलेल्या अवाजवी महत्त्वाला नाकारण्याच्या भूमिकेतून हा विचार उदयाला आला, असे मानले जाते.
२. तत्त्वज्ञानात निश्चित गृहीतकृत्यं असतात. ही
गृहीतकृत्यं सिद्ध करण्यासाठी तर्कशुद्ध पायावर आधारित सुसंगत भूमिका मांडलेली
असते; परंतु, अस्तित्ववादात अशा प्रकारची
सुसंगतता आढळत नाही. त्यामुळे ते तत्त्वज्ञान नाही, असे मानले जाते.
३. तत्त्वज्ञानात विश्वाच्या स्वरूपाविषयी सिद्धान्तमांडणी
केली जात असते. त्यातून हाती गवसलेले सत्य वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहे, असे मानले जाते; पण अस्तित्ववादात
व्यक्तीच्या जीवन जगण्याला केंद्रवर्ती मानून विचार मांडले जातात. स्वतःच्या
अस्तित्वाविषयी विचारांची मांडणी केली जात असल्याने त्यात व्यक्तिनिष्ठतेचा दोष
असतो.
४. अस्तित्ववादी विचारांत बौद्धिक आणि वैचारिक शिस्तीचा
अभाव आढळून येतो. आत्मप्रकटीकरणाला जास्त बाव दिला जात असल्यामुळे
संदिग्धता जास्त आढळून येते. तत्त्वज्ञानाच्या रूढ पद्धतींना ते
नाकारतात.
एकदंरीत अस्तित्वादाचे
स्वरूप विसंगती, संदिग्धता, विरोधाभासांनी भरलेले आहे. त्यामुळे त्याला तत्त्वज्ञानाचा
दर्जा देणे योग्य नाही, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. मानवी जीवनाचा शोध घेऊन
जीवनाच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडविणे, हे अस्तित्ववादाचे कार्य मानता येईल. मानवी जीवनातील समस्या
कधीही संपणाऱ्या नाहीत त्यातून निर्माण होणारी निरर्थकता, परात्मता मानवात वैफल्य
निर्माण करणारी असली तरी त्यांना धैर्याने सामोरे जावे ही मानवी जीवनाकडे बघण्याची
आशादायी मर्मदृष्टी देणारा विचार म्हणून अस्तित्ववाद ओळखला
जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.