समुदायवाद अर्थ,विकास व स्वरूप आणि वैशिष्ट्ये
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जयघोष
लोकशाही युगाच्या तीन मूलभूत आदशांना प्रदर्शित करतो. १८ व्या व १९ व्या शतकातील
समाजवाद, उदारमतवाद, राष्ट्रवाद आणि गणतंत्रवाद सारख्या महान विचारधारा
स्वातंत्र्य, समानता आणि समुदाय या
विषयीचे आपले विचार व्यक्त करतात. त्यात वर्ग एकजूटता, समान नागरिकतेपासून ते समान सांस्कृतिक ओळखी
पर्यंतच्या सर्व संकल्पनांमध्ये समुदाय ही मूलभूत संकल्पना मानली गेलेली आहे. या
विविध विचारधारांनी आपआपल्या विचारधारेच्या आधारावर समुदाय सकल्पना परिभाषित
करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर समुदाय ही संकल्पना तार्किक
पातळीवर अदृश्य बनली. कारण समुदाय संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर फॅसिस्ट व
नाझीवाद्यांनी गैरवापर केल्यामुळे दार्शनिक पातळीवर समकालीन उदारमतवादी
अभ्यासकांनी देखील समुदायाच्या आदर्शाबद्दल फारच क्वचित विचार केला. स्वतंत्रता
आणि समानतेचे विश्लेषण करताना थोड्या फार प्रमाणात समुदायाचा विचार केला गेला.
राजकीय उदारमतवादी विचारधारेत राष्ट्रीयता, भाषा, संस्कृती, धर्म, इतिहास इत्यादी समुदायाच्या स्वतंत्र सिद्धांतांचा
समावेश केला गेला नाही. १९७१ मध्ये जॉन रॉल्सचे 'A Theory of Justic' हे पुस्तक प्रकाशित झाले. जॉन
रॉल्स यांनी स्वातंत्र्य आणि समानतेची व्याख्या करताना समुदाय संकल्पनेकडे
दुर्लक्ष केले. रॉल्सच्या सामाजिक न्याय सिद्धांताने राज्यशास्त्रात राजकीय
तत्त्वज्ञानाची पुनर्स्थापना केली आणि सार्वभौमिक मूल्यांची स्थापना केली. या
सार्वभौमिकतेच्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात आधुनिक समुदायवाद विचारधारेचा उदय झाला
असे मानले जाते.
समुदायवाद अर्थ व वैशिष्ट्ये- 'समुदायवाद' शब्दाचा सर्वप्रथम वापर गुडविन बारम्बी यांनी केलेला आढळतो. हेवूड
समुदायवादाला विचारधारा न मानता सैद्धांतिक प्रवृत्ती मानतात. समुदायवाद
व्यक्तिवादाला विरोध करून राजकीय जीवनातील समुदायाच्या महत्त्वावर भर देतात.
राजकीय संस्थांच्या विकासात समुदायाचे महत्त्वपूर्ण स्थान असते यावर जोर देतात.
मायकल सैण्डल, माइकल वॉल्जर, एलीस्डेयर, मॅकेन्टायर, डेनियल बेल आणि चार्ल्स
टेलर हे समुदायवादाचे समर्थक मानले जातात. इंग्रजीतील Community या शब्दापासून Community हा शब्द बनला आहे.
Community म्हणजे समूह आणि Communitarian म्हणजे समूहाला महत्त्व देणारा
विचार हा समुदायवादाचा शब्दश: अर्थ सांगता येतो. विशिष्ट भूभागात दीर्घकाळापासून निवास
करणाऱ्या आणि परस्परांच्या सहकार्याने जगणाऱ्या व्यक्ती गटाला समुदाय असे म्हणतात.
समान जीवनमूल्य असणाऱ्या आणि विशिष्ट ध्येय, हितसंबंधाची एकत्र येणाऱ्या व्यक्तीगटाला देखील
समुदाय असे म्हटले जाते. उदारमतवादी असे मानतात की, प्रत्येक व्यक्तीला आपले हित-अहित योग्य प्रकारे समजत
असल्यामुळे समाज व राज्याने व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार विकास घडवून आणण्यासाठी
पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करू नये, असे विचार व्यक्त करून व्यक्तीला प्राधान्य देतात.
समुदायवादी नवउदारवाद्यांच्या उपरोक्त विचारांना विरोध करतात. समुदायवाद्याच्या
मते, व्यक्ती हा समुदायाचा अविभाज्य भाग
असल्यामुळे तिचा स्वतंत्रपणे विचार शक्य नाही. म्हणून व्यक्तीला समाजापासून
स्वतंत्र मानून स्वातंत्र्याचा अधिकार दिला जाऊ शकत नाही. समुदायवाद म्हणजे
प्रत्येक समाजाच्या अंतर्गत सहभागी व्यवहार आणि विश्वासाला महत्त्व देणारा विचार आहे.
समुदायवादाची समर्थकांनी काही वैशिष्ट्ये सांगितलेली
आहेत. ती पुढील प्रमाणे होत.
·
व्यक्तीचे अस्तित्व स्वतंत्र नसून ते समाज वा
समुदायाद्वारे निर्माण होत असते. व्यक्ती समाजात जन्माला येत असतो आणि त्याची जडणघडण
समुदायाने निर्माण केलेल्या सांस्कृतिक वातावरणात होत असते.
·
व्यक्तीजवळ प्राकृतिक वा अहस्तांतरित स्वरूपाचे
अधिकार नसतात. व्यक्तीला राज्य आणि समाजाने अधिकार दिलेले असल्यामुळे त्यावर उचित
व योग्य मर्यादा लादण्याचा अधिकार राज्य व समाजाला असतो.
·
व्यक्तीजवळ अहस्तांतरित कर्तव्ये असतात. त्यामुळे
कर्तव्यांचे पालन करणे व्यक्तीवर बंधनकारक असते.
·
समुदायवादी लोकतांत्रिक स्वरूपाच्या राज्याला मान्यता
प्रदान करतात. या राज्याला नागरिक काळानुरूप आकार देत असतात असे मानतात.
·
समुदायवादी उत्तरदायी स्वरूपाच्या राज्याला मान्यता
देतात. ज्या प्रकारे राज्य व्यक्तीला उत्तरदायी असते तसेच राज्याचा सदस्य
व्यक्तीदेखील राज्याचा उत्तरदायी असतो.
समुदायवादाचा विकास व स्वरूप-
समुदायवाद शब्दाचा वापर तत्त्वज्ञानात्मक आणि वैचारिक
या दोन अर्थाने केला जातो. तत्त्वज्ञानात्मक स्वरूपाचा समुदायवाद नवउदारवाद आणि
स्वेच्छाचारितावाद यांना अयोग्य मानून टीका करतात. नवउदारवादी समुदायाला व्यक्तीच्या
ऐच्छिक गतिविधिचे फळ मानतात. समाजाची व्यक्ती जीवनात विशेष स्वरूपाची भूमिका नसते
याचा अर्थ उदारवादी समुदायाच्या उपयोगितेचा पर्याम स्वरूपात विचार करत नाही. याउलट
तत्त्वज्ञानात्मक स्वरूपात समुदायवादी व्यक्तीच्या विकासात समुदायाची भूमिका
मानतात. व्यक्तीचा विकास समुदायांतर्गत होऊ शकतो असे मानतात. वैचारिक समुदायवाद
समुदायावर आपल्या विचारांची इमारत उभी करण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक विवेचनात
वामपंथी विचारधारा व सामाजिक रूढीवादाचा आधार घेतात. समुदायाचे मूल्य आणि विश्वास
सार्वजनिक जीवनात कायमस्वरूपी अस्तित्वात राहावे. व्यक्ती एकाकी जीवन जगत नसून
तिची मुळे समाजात रुजलेली असतात कारण व्यक्ती समाजात जन्माला येते. तिच्या
जन्माआधीपासून समाज अस्तित्वात असतो. व्यक्ती समाजाकडून संस्कार घेत असते.
व्यक्तीचा बौद्धिक विकास समाजाची देणगी आहे. त्यामुळे ते व्यक्तीकडून समुदायाप्रति
आदर व सन्मानाची अपेक्षा करतात. समाजातील विद्यमान संस्थांचे समर्थन करतात आणि
त्या संस्थांकडून व्यक्तीस शिक्षण, स्वच्छ पर्यावरण आणि सामाजिक संरक्षण मिळत असते.
समुदायवाद हा नवीनतम स्वरूपाचा
विचार असला तरी समुदायवादाची बीजे प्लेटो, ॲरिस्टॉटल, रूसो, हेगेल, ग्रीन आणि कार्ल मार्क्ससारख्या विचारवंताच्या
विचारात आढळून येतात. प्लेटोने आदर्श राज्याचे तीन वर्ग हा आधार मानलेला आहे.
अॅरिस्टॉटलने देखील समाजाशिवाय राहणारा मानव एक पशू वा परमेश्वर मानलेला आहे.
व्यक्ती जीवनासाठी समुदायाची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे. रूसोने सामूहिक ईहा (General Will) संकल्पनेच्या माध्यमातून समुदायाला
महत्त्व दिलेले आहे. ग्रीननेदेखील समाजहिताचा विचार करून स्वातंत्र्याचा सिद्धांत
मांडलेला आहे. मार्क्सवादानेदेखील समुदाय संकल्पनेवर जोर दिलेला आहे. पारंपरिक
मार्क्सवादापेक्षा समुदायवाद हा फारच वेगळा विचार आहे. पारंपरिक मार्क्सवाद हा
प्रस्थापित समाजव्यवस्था नष्ट करून नवीन समाजव्यवस्था क्रांतिकारी मार्गाने
निर्माण करण्याचे स्वप्न पाहतो तर समुदायवाद हेगेलच्या विचारांवर विश्वास ठेवून
समकालीन समाज व्यवस्थेत सामंजस्य प्रस्थापित करण्यावर भर देतो. या अर्थाने
समुदायवाद हा मार्क्सवादापेक्षा भिन्न विचार मानला जातो. समुदायवाद विचारधारेवर
हेगेलच्या विचारांचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. पारंपरिक उदारमतवादाची हेगेल यांनी
केलेली समीक्षा आणि नवउदारमतवादाची समुदायवाद्यांनी केलेल्या चिकित्सेत मोठ्या
प्रमाणावर साम्य आढळून येते. लॉक आणि काँटसारख्या पारंपरिक उदारमतवादी
विचारवंतांनी विचारांचे मूल्यमापन करताना हेगेल यांनी मॉरालिटेट (Moralist) संकल्पनेच्या आधारावर केले आणि त्यांच्या
विचारांना पर्याय देण्यासाठी स्टिलिखेट (Moralist) संकल्पनेच्या आधारावर नवा पर्याय दिला. (स्टिलिखेट
म्हणजे नैतिक कर्त्याच्या स्वरूपात व्यक्ती ओळख, त्यांचे शुभ आणि क्षमता समुदायाशी जोडलेल्या असतात.
म्हणून नैतिक स्वरूपात व्यक्तीची ओळख व क्षमता विशिष्ट सामाजिक आणि राजकीय
भूमिकेशी निगडित असतात.) मॉरालिटेट व स्टिलिखेट संकल्पनेतील विरोधाचे दर्शन
वर्तमानकालीन समुदायावाद्यांच्या लेखनात आढळून येते.
१९६० व ७० च्या दशकात मार्क्सवादी सकेंद्रीकरण
सिद्धांताच्या विरोधात व्यक्तीचे स्वातंत्र्य, स्वायत्तता समर्थन करणाऱ्या आणि व्यक्तीच्या
प्राकृतिक वा नैसर्गिक अहस्तांतरित अधिकारांचे समर्थन करणाऱ्या विचारसरणीला
स्वतंत्रतावाद वा स्वेच्छाचारितावाद किंवा नवउदारमतवाद नावाने संबोधिले जाते.
हायेक, फ्रीडमन, जॉन रॉल्स, रॉबर्ट नॉजिक व ड्डारकिन इत्यादी विचारवंत स्वतंत्रतावादाचे प्रमुख समर्थक
मानले जातात. नवउदारमतवादाची काही वैशिष्ट्ये अभ्यासकांनी विशद केलेली आहेत. ती
पुढील प्रमाणे होत.
·
व्यक्तीला प्रकृतीकडून अधिकार प्राप्त होत असल्यामुळे
व्यक्तीचे अधिकार जन्मजात असतात कारण ते व्यक्तीला जन्मतः प्राप्त होतात.
·
व्यक्तीचे अधिकार जन्मजात असल्यामुळे ते हिरावून
घेण्याचा अधिकार वा प्रतिबंध लादण्याचा
अधिकार समाज व राज्याला नाही.
·
स्वातंत्र्यावर केवळ संरक्षणाच्या कारणावरून राज्याला
प्रतिबंध लादता येतील.
·
राज्याचे कार्य न्यूनतम स्वरूपाचे असले पाहिजे.
रॉबर्ट नॉजिक सारखे अभ्यासक न्यूनतम राज्याची (Minimal State) संकल्पना मांडतात. न्यूनमत राज्य म्हणजे राज्याने
संरक्षण क्षेत्रापुरते आपले काम सीमित ठेवावे. व्यक्ती राजकीय हस्तक्षेपापासून
मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्या इच्छेनुसार प्रगती करू शकत नाही म्हणून राज्याचा
व्यक्ती जीवनात कमीत कमी हस्तक्षेप असावा.
·
अर्थव्यवस्था स्वतंत्र, मुक्त व बाजार व्यवस्थेवर आधारित असावी. राज्याचा
अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप नसावा.
·
समुदायवादाचा जन्म वरील मुद्यांचे खंडन करण्यासाठी
झालेला आहे. समुदायवाद ही विचारधारा
उदारमतवादाची प्रतिक्रिया मानली जाते.
१९७१ मध्ये जॉन रॉल्सचे 'A Theory of Justice' हे पुस्तक प्रकाशित झाले. या
पुस्तकाने राजकीय तत्त्वज्ञानाची पुनर्स्थापना केली आणि सार्वभौमिक मूल्यांची
स्थापना केली. या सार्वभौमिकतेच्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात आधुनिक समुदायवाद
विचारधारेचा उदय झाला. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात समुदायवाद नावाचा एक नवा
संप्रदाय ( Thought of
School) विकसित झाला. समुदायवादी स्वातंत्र्य आणि समानतेच्या संकल्पनेला कमी-जास्त
महत्व न देता समान महत्त्व देण्याचे समर्थन करतात. न्यायाच्या उदारमतवादी
सिद्धांतात आणि उदारमतवादी समाजातील राजकीय संस्कृतीत समुदायाच्या मूल्यांना
पर्याप्त स्वरूपात मान्यता दिली नाही असा आरोप करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.