समुदायवादाची वैशिष्ट्ये, मूलतत्त्वे वा लक्षणे-
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या विशिष्ट
परिस्थितीतून नवउदारवादी विचारसरणी विकसित झाली. नवउदारवादी विचारसरणीने व्यक्ती
आणि व्यक्तिस्वातंत्र्याला दिलेल्या महत्त्वामुळे समुदाय आणि समुदायहिताकडे
दुर्लक्ष झाले. समुदायाचे मानवी जीवनातील महत्त्व पुनःप्रस्थापित करण्याच्या
उद्देशाने नवउदारमतवादांच्या विरोधात जी प्रतिक्रिया उमटली त्यातून समुदायवाद
विचारसरणीचा उदय झालेला दिसतो. या विचारसरणीची काही मूलभूत तत्त्वे वा लक्षणे
सांगता येतात.
१) सार्वभौम व्यक्तीची संकल्पना
अमान्य - उदारवादी व्यक्तीला स्वायत्त व सार्वभौम मानतात. व्यक्तीला चांगलेवाईट, हितअहित कळत असल्यामुळे राज्य वा समुदायाने त्यांच्या
कार्यात हस्तक्षेप करू नये. त्यांच्या शुभविषयक व विकासविषयक योजना व्यक्तीच्या
इच्छेनुसार ठरवू द्याव्यात. समुदायवादी विचारधारेला स्वायत्त व सार्वभौम व्यक्तीची
संकल्पना मान्य नाही. व्यक्ती ही सामाजिक भूमिकांशी संलग्न असल्यामुळे व्यक्तीची
स्वतःच्या उत्तम जीवनाची कल्पना स्वयंनिर्मित नसून समुदायाद्वारा दिलेली आहे.
व्यक्तीला जन्मत:च समुदायाकडून विशिष्ट जीवनशैली प्राप्त होत असते तीच तिच्या
इच्छा आणि हितांना परिभाषित करत असते. त्यामुळे व्यक्ती स्वायत्त नसते. समुदायवादी
मानतात की, व्यक्ती स्वतः सामाजिक
व्यवहारातून उत्पन्न होत असतो म्हणून व्यक्तिगत स्वायत्ततांला समुदायापेक्षा जास्त महत्त्व देणे विनाशकारी ठरेल.
२) समुदायाला महत्त्व - उदारवाद आणि समुदायावाद
यातील वादविवादाचा प्रमुख मुद्दा म्हणजे समुदाय अधिक महत्त्वपूर्ण की व्यक्ती.
उदारवादी व्यक्तीला अधिक महत्त्व देतात. व्यक्तीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास
व्यक्त करता आणि व्यक्तीच्या कार्यात हस्तक्षेप करण्याचा राज्य व समाजाचा अधिकार
नाकारतात. समुदायवादी उदारवादी अवधारणेला मान्य करीत नाही. समुदायवादी
व्यक्तीपेक्षा समुदायाला जास्त महत्त्व देतात. व्यक्तीला समुदायाचा अंश मानतात.
व्यक्ती समुदायाचा सदस्य असल्यामुळे समुदायाशिवाय व्यक्तीच्या स्वतंत्र
अस्तित्वाची कल्पना करता येणार नाही. व्यक्ती विकासाचा मार्ग समुदायातून जात असतो.
व्यक्ती हा समुदायाचा सदस्य असतो आणि समुदायाशी संलग्नित असल्यामुळे सामुदायिक
नियमांच्या विरोधात जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने समुदायवादी समुदायाची तरफदारी
करतात. व्यक्ती जीवनातील समुदायाचे महत्त्व विशद करून व्यक्तीपेक्षा समुदायाला
जास्त महत्त्व देतात.
३) समुदाय हिताला प्राधान्य - समुदायवादी व्यक्तीचे
कल्याण, व्यक्तीचे हक्क, व्यक्तीचे जीवन व स्वातंत्र्य समुदायातच संभव असते, म्हणून राज्याने समुदायाच्या हिताला प्राधान्य दिले
पाहिजे. समुदायाचा घटक असलेल्या व्यक्तीच्या मागण्यांना जास्त महत्त्व देण्याची
आवश्यकता नाही. सामुदायिक हितात व्यक्तीहित समाविष्ट असते. व्यक्तीला चांगलं काय
आणि वाईट काय याचा योग्य निर्णय घेता येत नाही. चांगले काय आणि वाईट काय याचा
निर्णय राज्य घेत असते. त्यामुळे राज्याने व्यक्ती वा तिच्या हिताला प्राधान्य न
देता समुदायाला प्राधान्य द्यावे. समुदायाला सक्षम बनविण्यासाठी समुदाय हिताला
राज्याने प्राधान्य द्यावे कारण एक सक्षम समुदाय व्यक्तीची पर्याय निवड व
सामुदायिक जीवनशैली यांच्यात संतुलन प्रस्थापित करत असतो..
४) समाजाप्रति व्यक्तीच्या
दायित्वाला -
महत्त्व व्यक्ती हा समाजाचा पायाभूत घटक आहे, परंतु सर्वश्रेष्ठ नाही. समुदायाशिवाय व्यक्तीच्या
अस्तित्वाची कल्पना करता येणार नाही. समुदायाशिवाय व्यक्तिविकास शक्य नाही.
व्यक्तीला आपले कर्तृत्व फक्त समाजातच दाखविता येते. व्यक्तीच्या क्षमता विकसनात
समाजाचा सर्वात मोठा वाटा असल्यामुळे व्यक्तीने आपली बांधिलकी वा दायित्व •
समाजाप्रति ठेवले पाहिजे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा दीर्घकालीन समाज विकास
प्रक्रियेचा परिणाम आहे. राज्याने समाज विकास प्रक्रियांना प्रोत्साहन दिले
पाहिजे. समाजातील विविध समुदाय सामाजिक संबंधाच्या माध्यमातून एकमेकांशी संलग्नित
असतात. त्यातून समूहामध्ये विशिष्ट प्रकारचे नाते विकसित होऊ शकते आणि या समूह
नात्यातून व्यक्ती जीवन समृद्ध आणि विकसित होऊ शकते. समुदायवादी व्यक्तीच्या
अधिकारांसोबत कर्तव्य व दायित्वावर भर देतात. राज्याचे नागरिक समाजातील संस्थांची
स्थापना करतात आणि त्या टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. समुदाय हा व्यक्ती
जीवनाला आकार देत असल्यामुळे व्यक्तीने समुदाय वा समाजाशी आपले उत्तरदायित्व
टिकवून ठेवले पाहिजे असे समुदायवादी मानतात.
५) राज्याच्या हस्तक्षेपाला
मान्यता - उदारवादी व्यक्ती जीवनातील राज्य हस्तक्षेपाला विरोध करतात. नवउदारवादी वा
स्वेच्छाचारितावादी राज्याला केवळ संरक्षणाच्या कारणावरून व्यक्तीच्या वर्तन व
स्वातंत्र्यावर बंधने लादता येतील ही भूमिका मांडतात. राज्य हस्तक्षेपाला पर्याय
म्हणून न्यूनतम राज्य वा तटस्थ राज्य सिद्धांताची मांडणी करतात. समुदायवादी
राज्यांच्या व्यक्ती जीवनातील हस्तक्षेपाला मान्यता देतात. नागरिकांना स्वातंत्र्य
देताना राज्याने निश्चित व उचित प्रमाणकांच्या आधारावर किती स्वातंत्र्य दिले पाहिजे
आणि त्या स्वातंत्र्यावरील मर्यादा आणि अपवादाची काटेकोर व्याख्या केली पाहिजे.
अमर्याद स्वरूपात स्वातंत्र्याची भाषा करणारे स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा
घेतात. अमर्याद स्वातंत्र्यातून समाज विघटनाला चालना मिळेल. समाजाच्या नैतिकतेवर
गंडांतर येईल म्हणून राज्याने अधिकार व स्वातंत्र्य देताना काही मर्यादा लादल्या
पाहिजेत असे समुदायवादी सांगतात.
६) समानतेचा आग्रह अनाठायी - उदारवादी विचारसरणीने
समतेचा घरलेला आग्रह समुदायवाद्यांना अयोग्य व अशास्त्रीय वाटतो. समुदायातील सर्व
व्यक्ती सारख्या क्षमतेच्या नसतात. स्वातंत्र्य व स्वायत्तता बहाल करताना
व्यक्तींच्या क्षमतांचा विचार करून त्या दिल्या पाहिजेत. परंतु उदारवादी सर्व
व्यक्तींना समान स्वातंत्र्य व स्वायत्ततेचे समर्थन करतात. मात्र आजारपण, मानसिक व्याधी, व्यक्तितील अपरिपक्वता, व्यसनाधीनता इत्यादी कारणांमुळे स्वायत्तपणे व्यक्ती
पर्याय निवडीस सक्षम नसते. सर्वांना समान हक्क देणे आणि नागरिकांचे हक्क व
न्यायतत्त्वाला राजकीय सिद्धांताचा पाया मानणे ही उदारमतवाद्यांची चूक दुरुस्त
करण्यासाठी स्वायत्तता व समान स्वातंत्र्य देताना काही अपवाद करणे वा मर्यादा
लादणे गरजेचे आहे.
७) राज्याविषयी सकारात्मक भूमिका
उदारवादी विचारसरणीप्रमाणे - समुदायवाद्यांनी राज्य संस्थेविषयी नकारात्मक भूमिका
मांडली नाही. राज्यावर अविश्वास प्रकट केला नाही. समुदायवादी राज्य संस्थेच्या
भूमिकांविषयी सकारात्मक विचार व्यक्त करतात. त्यासंदर्भात राज्यसंस्था म्हणजे
नैतिक चिदशक्तीचे मूर्तिमंत रूप हा हेगेलचा विचार ते स्वीकारतात. नागरिकांच्या
नैतिक जीवनासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करण्याचे व टिकविण्याचे कार्य राज्याने
केले पाहिजे. आधुनिक काळात कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमुळे शिक्षण, आरोग्य वा विविध क्षेत्रातील कार्यांच्या नैतिक
भूमिका राज्याने घेतल्यामुळे समुदायवादी राज्याच्या ह्या भूमिकेचे स्वागत करतात.
नागरिकांना सर्वोत्तम बनविण्यासाठी वा त्यांच्या क्षमतेचा विकास घडवून आणण्यासाठी
राज्याने प्रयत्न करावा.
८) सामुदायिक हिताच्या राजकारणाला
महत्व - व्यक्तीची क्षमता, गुणवत्ता, अस्मिता आणि जीवनसाध्ये
समुदायाच्या मूल्याद्वारे निर्धारित केलेल्या असतात. व्यक्तीच्या स्वभावाची जडणघडण
वा तिचे व्यक्तिमत्त्व समुदायाने निर्धारित केलेले असल्यामुळे राजकारणाची सुरुवात
व्यक्तीपासून न होता सामुदायिक आस्थेपासून झाली पाहिजे. राजकीय सिद्धांतांनी
सामाजिक व्यवहार, सामाजिक परंपरा आणि
समजुती लक्षात घेतल्या पाहिजेत. परंपरांपासून स्वतंत्र अशा मानवी जीवनाची कल्पना
करता येत नाही. हक्कांच्या राजकारणाऐवजी सामूहिक हिताच्या राज्याला महत्त्व दिले
पाहिजे. राज्याने लोकांच्या खाजगी जीवनाविषयी आदर्श निश्चित करण्याचा प्रयत्न करू
नये तर सामुदायिक हितासाठी कोणता निर्णय योग्य ठरेल याचा विचार करावा. हक्क, स्वातंत्र्य व्यक्तीऐवजी समुदायांना बहाल केल्यास
समुदायांना राज्याच्या हस्तक्षेपापासून बचाव करता येईल म्हणून समुदायवादी
व्यक्तिगत हिताच्या राजकारणाला नाकारून सामुदायिक हिताच्या राजकारणाला प्राधान्य
देतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.