https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

पर्यावरणवादाची वैशिष्ट्ये Charisteristics of Enviormentalism


 

पर्यावरणवादाची वैशिष्ट्ये

विसाव्या शतकाच्या उत्तरार्थात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये उदयाला आलेला पर्यावरणवाद ही एक महत्त्वपूर्ण विचारसरणी आहे. गेल्या काही दशकात विकसित होत असलेली चळवळ ही पर्यावरणवादातून विकसित झालेली आहे. पर्यावरणवादी चळवळीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होत.

१) औद्योगिकीकरणाला विरोध - पर्यावरणवाद ही विचारसरणी स्वार्थी आणि अविवेकी औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकास प्रक्रियेला विरोध करते. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर आर्थिक आणि औद्योगिक विकासाने जोर पकडला. ही प्रक्रिया सुरक्षित विकासाऐवजी पर्यावरणाच्या न्हासावर आधारित होती. उद्योगधंदांच्या विकासातून पर्यावरणाचा समतोल नष्ट होऊन प्रदुषणाचे प्रमाण वाढले. नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबाडणे सुरू झाले. पर्यावरणवाद या स्वार्थी औद्योगिकीकरणाला विरोध करतो. औद्योगिकीकरणाच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनामागे पर्यावरणवादी आहेत.

२) निसर्गाचे श्रेष्ठत्व - पर्यावरणवादी निसर्गाला मानवापेक्षा श्रेष्ठ मानतात. मानव हा निसर्गातील बुद्धिवान व विवेकशील प्राणी असला तरी निसर्गापेक्षा तो श्रेष्ठ नाही. निसर्ग हा मानवाच्या आधी जन्माला आलेला आहे. निसर्गाच्या मदतीनेच मानवाचा विकास शक्य आहे. निसर्गाचे श्रेष्ठत्व मान्य करून मानवाने आपल्या विकासासाठी निसर्गाशी मैत्रीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. निसर्ग हा मानवाला मार्गदर्शन करू शकतो. निसर्गातील अनेक गोष्टींचा अभ्यास करून मानवाने अनेक शोध लावलेले आहेत. उदा. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा. निसर्गाचे श्रेष्ठत्व मान्य करून आपल्या विकासासाठी त्याचा उपयोग करून घेणे पर्यावरणवादात अपेक्षित आहे.

३) भांडवलशाहीला विरोध  - पर्यावरणवादी विचारसरणीतील समाजवादी गट भांडवलशाहीला विरोध करतात. युरोपातील औद्योगिकीकरणाचा पाया हा भांडवलशाही आहे. भांडवलशाहीने विकासाची संकुचित संकल्पना मांडली. आर्थिक समृद्धी म्हणजे विकास ही संकुचित कल्पना विकसित केली. आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रांमध्ये अनिष्ट स्पर्धा सुरू झाली. विकासाच्या नावावर नैसर्गिक संपत्तीची बेसुमार लूटचा परवाना उद्योगांना मिळाला. त्यामुळे हा विकास भावी पिढीच्या विकासाच्या मुळावर उठणारा आहे. म्हणून पर्यावरणवादी स्वार्थी भांडवलशाहीला विरोध करतात.

 ) निसर्गकेंद्रित विचारसरणी - पर्यावरणवादी विचारसरणी निसर्गकेंद्रित आहे. विविध विचारधारांतून व्यक्तीला केंद्रस्थानी मानून विचार करतात. पण व्यक्तीचे अस्तित्व तिच्या सभोवताली असलेल्या पर्यावरणावर अवलंबून असल्याने निसर्गकेंद्रित विचार हा अधिक संयुक्तिक विचार आहे, असे पर्यावरणवादी मानतात. पर्यावरण असमतोलातून व्यक्तीचे अस्तित्व धोक्यात येते. त्यामुळे व्यक्ती नव्हे तर पर्यावरण अधिक महत्त्वाचे, असे पर्यावरणवादी मानतात. निसर्ग आणि मानव यांचे अस्तित्व परस्परांना पूरक व उपकारक आहे. निसर्गाशी स्पर्धा करण्यापेक्षा मैत्री करून शाश्वत व संतुलित विकास साध्य करणे शक्य आहे हे लक्षात आल्यामुळे पर्यावरणवाद निसर्गाशी मैत्री करून त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यास प्रोत्साहन देतो.

५) मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाची चिंता - पर्यावरणवाद हा विचार पृथ्वीवरील मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाशी निगडित आहे. वाढत्या पर्यावरण प्रदूषणातून मानवी संस्कृतीचे भवितव्य धोक्यात आले असून तिच्या अस्तित्वाची चिंता पर्यावरणवादयांच्या केंद्रस्थानी आहे. व्यक्तीचा घसरत जाणारा जीवनस्तर, वाढत्या सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक समस्याविषयी सहानुभूती पर्यावरणवादी विचारसरणीत अंतर्भूत आहे.

६) पर्यावरणवादामधील स्त्रीवादी दृष्टिकोन - पर्यावरणवादातील स्त्रीवादी दृष्टिकोन पर्यावरणाच्या विनाशाला, प्रदूषणाला पुरुषप्रधान संस्कृतीतील स्वार्थी आणि अधिकारपिपासूवृत्तीला जबाबदार मानतात. पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्त्रियांनी सक्रिय भूमिकेवर भर देतात. स्त्रियांनी निसर्गकेंद्रित जीवन जगण्यावर भर देतात.

७) सुधारणावादी दृष्टिकोन - पर्यावरण हा मूलतः सुधारणावादी विचार - आहे. प्रदूषणातून पर्यावरणाचा बिघडलेला असमतोल कमी करून पर्यावरणात सुधारणा घडवून आणणे हा या विचारसरणीचा प्रमुख उद्देश आहे. पर्यावरण सुधारण्याच्या हेतूने अनेक दबाबगट आणि राजकीय पक्ष कार्य करतांना दिसत आहेत. युरोपातील अनेक पर्यावरणवादी गट कायदेमंडळात शिरून पर्यावरणपूरक कायदे करण्यासाठी शासनावर दडपण आणून कायदा निर्मितीचा प्रयत्न करीत आहेत. मानवी हस्तक्षेपातून पर्यावरणीय प्रश्नाची उत्पत्ती झालेली असल्यामुळे पर्यावरण संरक्षण व मानवी विकास यांची सांगड घातल्याशिवाय समस्याचे निराकरण करता येणार नाही ही जाणीव पर्यावरणवादयांना झालेली आहे. म्हणून पर्यावरणवाद बदलत्या परिस्थितीत नवनवीन उपाययोजनावर काम करतो आहे.

८) निःशस्त्रीकरणाचे समर्थन - पर्यावरणवाद चळवळीच्या उदयाला पोषक पार्श्वभूमी निःशस्त्रीकरण चळवळीने निर्माण करून दिली आहे. अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे, रासायनिक व जैविक शस्त्रातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते. या शस्त्राच्या अमर्याद विनाश क्षमतेतून निःशस्त्रीकरणाची चळवळ विकसित झाली. या चळवळीस पर्यावरणवाद्यांचे समर्थन आहे. अण्वस्त्र निर्मिती, हवा, जमीन आणि पाण्यात चाचणीला विरोध, अणुतंत्रज्ञान हस्तांतरणाला बंदी यासारखी अनेक आंदोलने पर्यावरणवाद्यांनी केलेली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.