मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्परसंबंध
पर्यावरण
चळवळ निसर्गाचे सौंदर्य टिकवून धरण्याचे समर्थन करणारी चळवळ नसून निसर्ग आणि मानव
यात संवाद आणि समतोल निर्माण करणारी चळवळ आहे. पर्यावरणशास्त्रात मानव आणि निसर्ग
यातील संबंधाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. संतुलित विकास हा
पर्यावरणशास्त्राचा आत्मा मानला जातो. निसर्गाचे संवर्धन आणि मानवी विकास यांची
गुंफण करण्याचे कार्य पर्यावरणशास्त्राद्वारे पार पाडले जाते. मानवाला निर्भयपणे, आनंदी व
सर्जनशील जीवन व्यतीत करावयाचे असेल तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रभावी पाऊले
उचलणे गरजेचे आहे. निसर्ग आणि मानव यातील समतोल बिघडला तर विकासाचा गाडा मानवावर
उलटण्याची शक्यता आहे. मानवाने विकासाची वाटचाल करताना पर्यावरणीय नियमांची पर्वा
न करता निसर्गाची बेदरकारपणे लूट केली. या लुटीतून अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण
झाले. या प्रश्नामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला. मानवी विकासाला
पर्यावरणीय चेहरा उपलब्ध करून विचार व्यक्त होऊ लागला. नैसर्गिक नियमांची मोडतोड न
करता निसर्गकेंद्री वा निसर्गपूरक विकासाचा विचार पर्यावरणशास्त्रातून मांडला जाऊ
लागला. निसर्ग आणि मानव संबंध परस्परपूरक व उपयुक्त आहेत. मानव श्रेष्ठ की निसर्ग
श्रेष्ठ हा बादाचा मुद्या बाजूला ठेवून निसर्ग आधी आणि मानव नंतर हे मान्य करण्यात
येऊ लागले. त्या आधारावर 'First
Cum First Surve' 'प्रथम
येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वानुसार पर्यावरण संरक्षण प्रथम आणि त्यानंतर मानवी
विकासाचा विचार किंवा मानवी विकासात पर्यावरण संरक्षणाचा विचार अंतर्भूत केला जाऊ
लागला. शाश्वत विकासाच्या माध्यमातून भविष्याच्या पिढीसाठी आश्वासक वातावरण
निर्माण करण्याचा प्रयत्न पर्यावरणवादाद्वारे केला जाऊ लागला. सद्य:कालीन पिढी
जबाबदारीने वागली नाही तर भावी पिढ्यांना पर्यावरणीय प्रश्नांना सामोरे जावे
लागणार नाही. मानवाच्या विकासासाठी निसर्ग आणि मानव यातील परस्परसंबंध एकमेकांना
पूरक राखण्यावर भर दिला जाऊ लागला. शुद्ध हवा, पाणी, निवारा, विश्राम, सौंदर्य
मिळविण्यासाठी मानवाला निसर्गाविषयीच्या व्यवहारात आमूलाग्र बदल करावे लागतील.
शहरीकरण, औद्योगिकीकरण, तंत्रशक्तीच्या
अतिरेकी वापरातून मानवी भवितव्याची चिंता भेडसावू लागलेली आहे. मानवी विकासासाठी
निसर्गाची केली जाणारी बेसुमार लूट निसर्ग आणि मानव यातील सहचर्य नष्ट करीत आहे.
निसर्गाची एकतर्फी लूट न करता त्यांचे संवर्धन व संरक्षण करून निसर्ग आणि मानव यात
सुसंवाद निर्माण करणे हे
पर्यावरण चळवळीचे मुख्य ध्येय आहे.
मानवाची
निर्मिती हा निसर्गातील सर्वात मोठा आविष्कार मानला जातो. त्यामुळे मानव व
निसर्गात एक प्रकारचे घनिष्ठ नाते निर्माण झालेले आहे. मानवाचे संपूर्ण आयुष्य
निसर्गावर अवलंबून आहे. मानवी जीवनाच्या उत्क्रांती प्रक्रियेतून मानवी गट, मानवीसमाज
आणि मानवी संस्कृती निर्माण झाली. समाज आणि निसर्गाच्या बदलत्या नात्यावर मानवाची
निसर्गाप्रति असलेली भूमिका बदलली. प्रत्येक मानवी समूहातील मानव आणि निसर्ग
यांच्यातील सहसंबंधात भिन्नता आढळून येते. पौर्वात्य सांस्कृतिक जीवनात निसर्गाला
मानवाचा मित्र मानले जाते. मानवापेक्षा निसर्ग श्रेष्ठ मानला जातो. त्यांच्या
श्रेष्ठत्वाचा मानसन्मान राखण्यासाठी त्याची भक्ती व उपासना केली जाते. म्हणून
पौर्वात्य संस्कृतीतील अनेक देव,
देवता,
धार्मिक विधी, सण हे
नैसर्गिक जीवनाशी नाते दर्शविणारे आहेत. उदा. भारतासारख्या देशात सूर्य, अग्नी वा
पंचमहाभूतांना देव मानण्याची प्रवृत्ती.
पाश्चिमात्य
संस्कृतीतील तत्त्वज्ञान हे बुद्धिवादावर आणि भौतिकवादावर आधारलेले असल्याने
निसर्ग ही मानवाला मिळालेली देणगी असून तिचा मानवाच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त
कसा उपयोग करून घेतला पाहिजे याचे तंत्र शोधण्यावर भर देते. या विचारधारेतून
औद्योगिक क्रांतीनंतर नैसर्गिक साधनसंपत्तीची बेसुमार लूट करण्यात आली. त्यामुळे
नैसर्गिक घटकांतील संतुलन नष्ट झाले. त्यातून पर्यावरणविषयक अनेक समस्या निर्माण
झाल्या आणि त्यात दिवसेंदिवस घट होण्याऐवजी वाढ होताना दिसते आहे. पाश्चिमात्य
देशांत विकसित झालेला विचार पौर्वात्य देशातही पसरत चालला आहे. पाश्चिमात्य देशांच्या
अनुयाने जलद आर्थिक विकासाच्या स्वप्नाने तिसऱ्या जगातील देश पाश्चिमात्य
देशांप्रमाणे औद्योगिकीकरण, राहणीमानाचा स्तर उंचावणे, भौतिकतावाद
यांच्या मागे लागला आहे. संतुलित विकासाऐवजी असंतुलित विकासाची कास या देशांनी
धरल्याने पर्यावरणविषयक समस्यांनी सद्य:स्थितीत गंभीर रूप धारण केलेले आहे.
प्राचीन
काळी मानव हा निसर्गाचा आज्ञाधारक उपासक आणि संरक्षक म्हणून वावरत होता. अर्वाचीन
काळात मानवाने ही भूमिका बदलून तो अधिक संहारक, विध्वंसक
बनू लागला आहे. जगातील बहुतेक समाज आणि मानवी समूह निसर्गातील घटकांना पूर्वी पवित्र
मानून त्यांची पूजा करत असत. त्या पवित्रतेला लोकांनी मान्य करावे म्हणून त्याला
धार्मिकतेची जोड देण्यात आली. धार्मिकतेच्या आधारामुळे लोक पर्यावरणाच्या
रक्षणासाठी स्वतःहून प्रयत्न करत आहेत. उदा. भारतात नद्यांना देवता मानणे होय.
निसर्गाला गुरूच्या केंद्रस्थानी ठेवून मानव
आजपर्यंत अनेक गोष्टी शिकत आलेला आहे. मानवाची संशोधकवृत्ती आणि धडपडीतून
निसर्गातील अनेक गुपिते त्याला अवगत झाल्याने अनेक शोध लागले. त्यातून मानवाने
अनेक जीवनाश्यक वस्तू निर्माण केल्या अनेक महत्त्वपूर्ण वस्तूही निर्माण केल्या.
उदा. पक्ष्यांच्या उडण्यापासून प्रेरणा घेऊन विमानाचा शोध लावला. ज्ञानेंद्रिये
आणि कल्पनाशक्तीच्या आधारावर निसर्गातील अनेक अदृश्य घटकांचे ज्ञान मिळविले.
सातत्याने चालणाऱ्या संशोधनामुळे निसर्गासंबंधी ज्ञानात भर पडली. मानव निसर्गाला
समजून घेऊ लागला. आपले जीवन सुसह्य करण्यासाठी त्याचा वापर करू लागला.
निसर्गाच्या
संरक्षणासाठी आपल्या देशात प्राचीन काळापासून काही चालीरीती, रूढी, परंपरा चालत
आलेल्या आहेत. यातील एक परंपरा म्हणजे संवर्धन वनराई अथवा देवराई. अशा या देवराईचा
समाज, धार्मिक
संस्था आणि शासनाकडून सांभाळ केल्यामुळे पर्यावरण संरक्षणाला हातभार लागलेला आहे.
श्रद्धा व विश्वासाच्या तत्त्वामुळे अनेक प्रदेश अजूनही सुरक्षित आहेत. उदा.
हिमालयातील हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांमुळे तेथील जंगलांना संरक्षण मिळाले आहे.
जंगल संरक्षणातून मूळ वनस्पतीचे संरक्षण होत असताना दिसते. पूर्वी रोज लोक शिकारीसाठी
जंगल वा देवराईचा उपयोग करीत असत. प्रत्येक राजाच्या साम्राज्यात देवराई होत्या.
आज त्याचे प्रमाण कमी झालेले दिसते. त्याचे पुनरुज्जीवन केल्यास पर्यावरण
रक्षणाच्या प्रश्नास हातभार लागेल. देवराईची मालकी शासन, स्थानिक
स्वराज्य संस्था, काही जमाती आणि कुटुंबाकडे दिसते. त्यात धार्मिक विधी, उत्सव, सणसमारंभ
साजरे केले जातात. त्यामुळे पर्यावरण हासाचा त्यातून धोका जाणवतो. शासनाने
स्वप्रयत्नाने वनराया विकसित केल्यास पर्यावरण समस्या कमी होण्यास हातभार लागेल.
अभयारण्य, वनराई यातून
जैवविविधताचे रक्षण करता येईल. अभयारण्यातून दुर्मीळ पशू, पक्षी आणि
पाण्याचे संवर्धन करतात येईल त्यासोबत पर्यावरण आणि परिसंस्थेचा समतोल टिकविण्यास
हातभार लागेल.
प्राचीन
काळापासून सुरू असलेल्या रूढ्या,
प्रथा,
परंपरा वाढत्या अर्थार्जनाच्या महत्त्वामुळे मोडीत निघाल्या
आहेत. लोकांच्या मनावरील धार्मिक आणि निसर्गप्रधान जीवनाचा पगडा व श्रद्धा कमी होऊ
लागल्या. निसर्गप्रधान जीवन जगणाऱ्याला रानटी, अप्रगत
मानले जाऊ लागल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीच्या संवर्धनाऐवजी लूटीला प्राधान्य
मिळू लागले आहे. मानवाची भूमिका पर्यावरण रक्षकऐवजी भक्षक बनू लागल्यामुळे
पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी असंतुलित विकासाऐवजी
संतुलित पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्यावे लागेल. विकास करत असतांना
पर्यावरणाचा हास होणार नाही, प्रदूषण
होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल तर मानव आणि निसर्ग यांचा समतोल टिकून दोघांचे
अस्तित्व टिकून राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.