https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

पर्यावरणवादअर्थ, व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व Enviornmentalism Meaning, Nature and Importance


 

पर्यावरणवाद अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व-

पर्यावरणवाद ही विचारसरणी सद्य:स्थितीत एक अत्यंत महत्त्वाची राजकीय शक्ती म्हणून उदयाला आली आहे. पर्यावरणवाद ही विचारसरणी हरित चळवळ किंवा हरित राजकीय विचार या नावाने ओळखली जाते. या विचारसरणीला आधार मानून पर्यावरण संरक्षणासाठी अनेक दबावगट आणि राजकीय पक्ष अमेरिका आणि युरोपच्या राजकारणात सक्रिय झालेले आहेत. 'क्लब ऑफ रोम' यांनी Limits to Growth म्हणजे विकासाच्या आणि वाढीच्या मर्यादा नावाने अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासाची मानवी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी गरज आहे हे नमूद केले, परंतु उच्च प्रतीचे जीवनमान प्राप्त करण्यासाठी मानवाने निसर्गाच्या बेसुमार पद्धतीने चालविलेल्या लूटीमुळे विकास प्रक्रिया आपल्यावरच उलटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विकासाचा अतिरेकी आग्रह मानव जातीला अधोगतीकडे नेणारा ठरेल म्हणून विकासाला मर्यादा आहेत हे लक्षात घेऊन विकासासाठी राष्ट्राराष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेला आवर घालणे गरजेचे आहे हे वास्तव लक्षात आले. रोम क्लबच्या अहवालामुळे बडया औद्योगिक राष्ट्राचे अंतस्थ हेतू लक्षात आले. निसर्ग आणि पर्यावरणविषयी नवी जाणीव विकसित होण्यास अहवालामुळे मदत झाली. रोमच्या अहवालामुळे पर्यावरण संकल्पनेला अधिक संपन्न व व्यापक आशय प्राप्त झाला.

     पर्यावरणवाद ही आधुनिक संकल्पना असली तरी पर्यावरणाबद्दलचा विचार प्राचीन काळापासून विविध अभ्यासकांनी केलेला दिसतो. ग्रीक विचारवंत हिपोक्रॅटस यांनी मानवी जीवनातील निसर्गाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. अॅरिस्टॉटल यांनीदेखील पर्यावरणाबद्दल विचार मांडलेले आहेत. मध्ययुगात निसर्गप्रधान जीवनाचे समर्थन अनेक अभ्यासकांनी केलेले दिसते. आधुनिक काळात रूसो यांनी 'निसर्गाकडे चला' ही हाक दिली. डेव्हिड थोरो यांनी पर्यावरण पूरक जीवनाचे समर्थन आपल्या विचारात केले. जॉन म्यूर यांनी देखील पर्यावरणाविषयी विचार मांडले. इंग्लंडमध्ये बकल यांनी पर्यावरणवादाबद्दल विचार मांडले. एडमंड डेमॉजिन्स यांनी निसर्ग आणि मानव संबंधावर चर्चा केली तर एलन सेंपल यांनी 'भौगोलिक पर्यावरणाचे परिणाम' ग्रंथात निसर्गाचे श्रेष्ठत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. फिथ टेलर यांनी निसर्गवादी विचारांची मांडणी केली. पर्यावरण प्रश्नाबद्दल प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक अभ्यासकांनी मते मांडलेली दिसतात. परंतु पर्यावरणवाद ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू विकसित होण्यास प्रारंभ झालेला दिसतो. पर्यावरणवाद ही विचारसरणी १९६० आणि १९७० या दशकात युरोप आणि अमेरिकेत उदयाला आली. निःशस्त्रीकरण चळवळीने पर्यावरणवादी विचारसरणीची पार्श्वभूमी विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावलेली दिसते. व्हिएतनाम युद्धात वनस्पतीनाशक कीटकनाशकाच्या वापरातून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर हास झाला. या युद्धातून अण्वस्त्रप्रसारबंदी, निःशस्त्रीकरण आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जाणिवा तीव्र होत गेल्या. पर्यावरणवादास चालना देणारे रॅशेल कारसनचे 'सायलेंट स्प्रिंग' आणि पॉल एहरिशची 'द पॉप्युलेशन बॉम्ब' सारख्या पुस्तकांनी पर्यावरणवादाचा सैद्धांतिक पाया घातला. जर्मनीतील राजकारणात ग्रीन पक्ष, इंग्लंड व अमेरिकेतील ग्रीन पक्षांना कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले आहे. व्हिएटनामच्या युद्धात अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर रासायनिक हत्यारे आणि बाँबचा वापर केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर संहार घडून आला. व्हिएटनामच्या युद्धामुळे पर्यावरणाच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. सुरुवातीला पर्यावरण चळवळ ही फॅशन वा उच्चभ्रू लोकांचे फॅड असा समज निर्माण झालेला असल्यामुळे डाव्या चळवळी वा विचारवंत चळवळीपासून अलिप्त राहिले. उपभोगवाद वृत्तीतून निसर्गाच्या होत असलेल्या हासातून पर्यावरणाच्या प्रश्नाचे महत्त्व सर्व लोकांना लक्षात आल्यामुळे पर्यावरणवाद ही विचारसरणी विकसित होण्यास हातभार लागला.

पर्यावरणवादाचा अर्थ

मानव हा निसर्गातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपला विकास घडवून आणला. परंतु विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करताना मानव हा निसर्गापासून दूर जाऊ लागला. निसर्गाच्या सहकार्याने आपला विकास करण्याऐवजी त्यावर मात करून आपल्या मनमर्जीनुसार विकासक्रमाची आखणी करू लागला. निसर्ग लूटीच्या आधारावर मानवी विकासाची कल्पना आधारित असल्यामुळे विकास हा विनाशाचा सापळा ठरू लागतो. अधिक संपन्न आणि सुखी जीवन प्राप्त करण्यासाठी निसर्गाची बेसुमार लूट करू लागला. या लुटीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला. पर्यावरणीय असमतोलातून अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण होऊ लागले. या पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक केली नाही तर भविष्यात मानव जात शिल्लक राहणार नाही. भविष्यातील मानवी पिढीचे अस्तित्व कायम टिकवून ठेवावयाचे असेल तर मानवी विकासाला पर्यावरणाची जोड दिली पाहिजे ही जाणीव विकसित झाल्यामुळे पर्यावरणवाद संकल्पनेच्या विकासाला वाव मिळू लागला. दुसऱ्या महायुद्धानंतर पर्यावरणवाद नावाची नवी विचारधारा हळूहळू विकसित होऊ लागली. पृथ्वीवरील विशिष्ट किंवा ठरावीक भागास उपलब्ध असलेली सर्व सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. 'Enviorni' या मूळ फ्रेंच शब्दापासून इंग्रजीत Enviornment हा शब्द प्रचलित झालेला आहे. त्याचा अर्थ To Suround असा होता. त्याचा मराठीत अर्थ सभोवतालची परिस्थिती असा आहे. आपल्या सभोवतालची परिस्थिती ही एक किंवा अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. तिच्यात सजीव, निर्जीव, निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो हे सर्व घटक मिळून पर्यावरण निर्माण होत असते. पर्यावरण सर्वत्र सारखे नसते. या संज्ञेत सूर्यप्रकाश, मृदा, तापमान, पाणी, वनस्पती,सजीव वसाहती, धरण प्रकल्प इत्यादी घटकांचा समावेश होतो..

पर्यावरणाची व्याख्या

समकालीन जागतिक राजकारणात पर्यावरणाचा प्रश्न प्रभावी राजकीय शक्ती म्हणून उद्याला आला. पर्यावरणाच्या आधारावर विविध स्वयंसेवी गट आणि राजकीय पक्षांची स्थापना विविध देशांमध्ये होऊ लागली. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर चळवळी सुरू झाल्या. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या प्राप्तीसाठी राष्ट्राराष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेने घेतलेल्या घातक वळणामुळे राष्ट्राराष्ट्रातील संघर्ष तीव्र होऊ लागले. पर्यावरणाच्या हासाचे दुष्परिणाम एका राष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून सर्व राष्ट्रांना त्यांची फळे भोगावी लागत आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा, प्रदूषण, नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी जीवनात अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यामुळे पर्यावरणावाद ह्या विचारसरणीला आधुनिक काळात महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. सजीवांच्या व मानवाच्या समूहावर तसेच जीवनावर सभोवतालच्या नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक घटकांचा एकत्रित प्रभाव पडतो. या प्रभावाचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करणे म्हणजे पर्यावरण होय.

  • ·      जॉन टर्क यांच्या मते, पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. पर्यावरणाच्या संबंधात निर्माण झालेल्या समस्या व त्यावरील उपाय यांचा अभ्यासही पर्यावरणशास्त्रात केला जातो.
  • ·      डॅनियल चिरास यांच्या मते, जैविक व अजैविक घटक यांच्यातील परस्पर क्रियांचा अभ्यास करणारे पर्यावरण हे एक शास्त्र आहे.
  • ·      जैविस्मित यांच्या मते, सजीवांनी अनुभवलेल्या भौतिक रासायनिक व जैविक परिस्थितीची गोळाबेरीज म्हणजे पर्यावरण होय.
  • ·      फंक व वॅगनन्स यांच्या मते, व्यक्ती जीव अथवा समूह यांचे अस्तित्व व विकास यांच्यावर परिणाम करणारी परिस्थिती, घटक किंवा वस्तू म्हणजे पर्यावरण

    पर्यावरण हा घटक समकालीन राजकारणामध्ये महत्त्वाचा बनण्याचे कारण म्हणजे राष्ट्राराष्ट्रांतील वाढते परस्परावलंबित्व आहे. हवा, पाणी, पर्वत, जंगले हे पर्यावरणीय घटक सृष्टीतील सजीवांना जोडण्याचे काम करत आहेत. एका राष्ट्राकडून झालेल्या पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम केवळ त्या राष्ट्राला भोगावे लागत नाही, तर शेजारी राष्ट्रांना किंवा विश्वालाही भोगावे लागत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक आणि औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेने वेग घेतलेला आहे. या विकास प्रक्रिये अंतर्गत मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीची बेसुमार लूट केली जात आहे. या लुटीतून पर्यावरणाचा समतोल बिघडत असून भावी काळात ही साधनसंपत्ती नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यातून प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, आम्ल पर्जन्य, अवर्षण आणि अतिपर्जन्य ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. याचे हानिकारक परिणाम केवळ मानवाला नाही तर प्रत्येक सजीवाला भोगावे लागत आहेत. म्हणून नैसर्गिक पर्यावरणातील विविध घटकांचे गुणधर्म, त्या घटकांचा सजीवांशी येणारा संबंध, पर्यावरण हासावर उपाय व नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या पद्धती इत्यादी विषयांचा अभ्यास करण्यासाठी पर्यावरणशास्त्राचा अभ्यास केला जातो आणि मानवात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करता येऊ शकते.

पर्यावरणवादाचे स्वरूप

 पर्यावरणशास्त्र हे पृथ्वीवरील सर्वच सामाजिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक घटकांचा अभ्यास करत असल्याने त्यांचा सर्व सामाजिक शास्त्रांशी निकटचा संबंध येतो. सजीवांच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी विविध शास्त्र निर्माण झालेली असली, तरी त्यात परस्परसंबंध असतो. त्याप्रमाणे पर्यावरणशास्त्र हे आंतरविद्याशाखीय आहे. विविध शास्त्राशी त्याचा संबंध आहे. पर्यावरणशास्त्र हे फक्त मानवासाठी नव्हे तर सर्व सजीवांच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. ते नेहमीच परिवर्तनशील असते. आपल्या सभोवताली घडणाऱ्या दृश्य व अदृश्य गोष्टींचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जात असतो.

  • ·      पृथ्वीवरील कोणत्याही मानव व इतर सजीव आणि तिच्या सभोवताली असणारे निर्जीव घटक यांच्या संयोगातून निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.
  • ·      पर्यावरणवाद हा निसर्गकेंद्री विचार आहे. निसर्गाची निर्मिती मानवाच्या आधी झालेली आहे. निसर्गावर मानवाचे अस्तित्व अवलंबून असल्यामुळे त्याचे रक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे.
  • ·      पृथ्वीवरील जैविक व अजैविक घटकांच्या संयोगातून सर्वांसाठी निर्माण झालेले आवरण म्हणजे पर्यावरण होय. परिवर्तनशीलता हा पर्यावरणाचा प्रमुख गुण असून स्थल आणि काळाप्रमाणे त्यात बदल होत असतो. पर्यावरणाचे परिणामही बदलत असतात.

 ·   पर्यावरणवाद हा आंतरविद्याशाखीय विषय आहे. पर्यावरणवादाची व्याप्ती विविध ज्ञानाशाखांशी निगडित आहे. पर्यावरणीय प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सामाजिक शास्त्रे, नैसर्गिक शास्त्रे इत्यादींची मदत घेणे अनिवार्य बाब आहे.

 ·      अध्ययन व अध्यापन या साधनांद्वारे, पर्यावरणातील समस्यांचे आकलन करून त्या सोडविण्याची कृती म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.

 ·      पर्यावरणवाद विविध परिस्थितीतील संबंध, त्यांची कार्यप्रणाली, बाह्य घटकांचा परिसंस्थांवर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना इत्यादींचे सखोल अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन पर्यावरणवादात केले जाते.

 ·      पर्यावरणातील घटक हे परस्परावलंबी असतात. त्याचे अस्तित्व एक दुसऱ्यावर अवलंबून असते. त्यामुळे पर्यावरणवादाचा अभ्यास करतांना सर्व घटकांचा एकत्रितपणे अभ्यास करावा लागतो. कारण एक दुसऱ्याचे वैशिष्ट्यपूर्ण संबंध असतात.

 ·      हवा, पाणी आणि जमीन हे पर्यावरणातील प्रमुख घटक आहेत. या घटकांच्या संयोगातून सजीव सृष्टी आकाराला आली आहे. त्याच्यातील संबंधाचा अभ्यास पर्यावरणवादात केला जातो.

 ·      पर्यावरणातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विविध घटक अमर्यादित नसून मर्यादित आहेत. हे नैसर्गिक खोत भावी काळात समाप्त होणारे आहेत. म्हणून त्यांचा काटकसरीने वापर करावा याची जाणीव विकसित करणे हे पर्यावरणवादाचे आद्य तत्त्व आहे.

 ·      पर्यावरणीय प्रश्नाची दाहकता एका पुरती मर्यादित राहिलेली नाही. एका राष्ट्रातील पर्यावरणीय प्रश्नाचा दुसऱ्या राष्ट्रावर घातक परिणाम होतो, म्हणून पर्यावरणाचा विचार एका राष्ट्रापुरता करून चालणार नाही तर विश्वव्यापक पद्धतीने पर्यावरणीय प्रश्नाचा विचार करणे भाग आहे, हे लक्षात येऊ लागल्यामुळे पर्यावरणवादाला वैश्विक स्वरूप प्राप्त झालेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.