https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक अटी वा घटक Essential Factor of Sucessfuly run Democracy


 

लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक अटी वा घटक

जगात इंग्लंड देशात सर्वप्रथम लोकशाहीचा उदय व प्रसार झाला. लोकशाहीचे स्वरूप, शासन यंत्रणा आणि लोकांचा दृष्टिकोन यात अनुकूल बदल होत गेल्यामुळे लोकशाही लोकप्रिय होत गेली. परंतु २० व्या शतकात जगातील अनेक देशांनी लोकशाहीचा स्वीकार केला. पण पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशात लोकशाही शासनाविरूद्ध क्रांती होऊन लोकशाही नष्ट झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया, आफ्रिका खंडातील देशांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. पण अल्पकाळात त्या देशांमध्ये लोकशाही अपयशी ठरली. लोकशाही यशस्वी करण्यासाठी आवश्यक परिस्थिती असल्याशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. लोकशाही यशस्वी करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात.

 १) जागृत नागरिक - लोकशाहीच्या यशासाठी नागरिकांनी जागृत राहून - सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. इतर नागरिकांचे स्वातंत्र्य व कर्तव्यपालनाबाबत मदत केली पाहिजे. सरकारच्या चांगल्या कार्याबद्दल प्रोत्साहन दिले पाहिजे. अन्यायकारक कायदे व निर्णयाला विरोध केला पाहिजे. निवडून दिलेले प्रतिनिधी व सरकारी अधिकारी योग्य काम करतात किंवा नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या अडचणी शासनाकडून सोडवून घेतल्या पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधीची निवड केली पाहिजे. नागरिकांनी प्रत्येक बाबतीत सक्रिय सहानुभूती दाखविली पाहिजे. लार्ड अॅक्टनच्या मते, लोकशाहीच्या यशासाठी अखंड जागरूकता है मूल्य आवश्यक आहे. लोकशाहीत जनतेच्या जागरूकतेमुळे सत्तेचा दुरूपयोग टाळता येतो आणि राज्यकर्त्यांवर देखील अंकुश प्रस्थापित होतो.

२) लोकशाही मूल्यावर विश्वास - लोकशाहीशी संबंधित मानवी मूल्य आणि शासन पद्धतीवर जनतेचा विश्वास असावा. जनतेने लोकशाहीची शिकवण आत्मसात केली पाहिजे. संघर्ष करण्याऐवजी समन्वय करण्याची प्रवृत्ती जनतेत असली पाहिजे. आपल्या मताबरोबर दुसऱ्याच्या मताची किंमत केली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांवर जनतेची निष्ठा असल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणार नाही. लोकशाहीची शिकवण, तिच्या सिद्धांत व आदर्शांवर विश्वास असला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने इतर नागरिकांशी सहकार्य करून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. लोकशाही यशस्वी करण्याची ईर्षा मनात ठेवून सहकार्य भावनेचा विकास केल्यास सर्वांचा विकास व शांतता प्रस्थापित होईल आणि लोकशाहीवरचा विश्वास विकसित होण्यास साहाय्य मिळेल. विचारविनिमय, विरोधी मतास स्थान, शांततेच्या माध्यमातून सत्तांतर इत्यादी लोकशाही मूल्यांवर जनतेचा विश्वास असल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणे शक्य नाही.

३) व्यक्ती पूजेचा त्याग - लोकशाहीत व्यक्तीपेक्षा तत्त्व व उद्दिष्टांना महत्त्वपूर्ण स्थान असते. सत्तारूढ नेत्यावर विधायक स्वरुपाची टीका करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. देशाची सेवा करणाऱ्या नेत्याबद्दल आदर असावा पण आपली प्रशासकीय यंत्रणा मोडून पडेल इतकी सत्ता कोणतीही व्यक्ती किंवा गटाकडे देऊ नये. व्यक्तीपूजा हुकूमशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. लोकशाहीला व्यक्तीपूजा मान्य नाही. राजकीय नेत्याचे विभूती पूजन आणि व्यक्तिनिष्ठ अनुयायित्व ह्यामुळे लोकशाहीला धोका पोहचतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, भारतात लोकशाही यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये.

४) सामाजिक समता - सामाजिक समता लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक आहे. जातीभेद, लिंगभेद, प्रादेशिकता आणि भाषावाद, उच्चनीच भावना लोकशाहीच्या यशाला धोका निर्माण करतात. लोकशाहीच्या यशासाठी मानवनिर्मित विषमता नष्ट करून समता निर्माण केली पाहिजे. समता म्हणजे सारखेपणा नव्हे तर सर्व नागरिकांना समान दर्जा व संधी उपलब्ध करून दिली पाहिज. प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण केली पाहिजे तरच लोकशाही यशस्वी होईल. बंधुभावाची व एकीची भावना निर्माण करण्यासाठी आर्थिक, सामाजिक व राजकीय समता असली पाहिजे. पं. नेहरच्या मते. लोकशाही म्हणजे समानता किंवा समता, केवळ मतदानाच्या हक्काबाबत नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक समता होय. आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात विषमतेचा नायनाट केल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणार नाही. देशातील विषमता राजकीय लोकशाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीच्या यशासाठी सामाजिक समता निर्माण करणे गरजेचे आहे.

५) विवेकशील नेता - नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वावरही लोकशाहीचे यश अवलंबून असते. नेत्याचे चारित्र्य उच्च दर्जाचे असेल, त्याने घेतलेले निर्णय विवेकपूर्ण असतील, त्याच्याकडे माणसे ओळखण्याची कला असली पाहिजे. अनुभवी, हुशार, त्यागी व दूरदृष्टी असलेला नेता लोकशाहीला यशस्वी करू शकतो. नेत्याने घेतलेले निर्णय विवेकबुद्धीवर आधारलेले असावेत. कारण स्वार्थी नेत्यांच्या हातात लोकशाहीचा कारभार गेल्यास ते स्वार्थासाठी लोकशाही नष्ट करू शकतात. अनुभवी, त्यागी, कर्तृत्ववान, दूरदृष्टी, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेता लोकशाही यंत्रणेचा योग्य वापर करून लोककल्याण आणि देशहित साध्य करू शकतो.

६) राष्ट्रीय चारित्र्य - लोकशाहीच्या यशासाठी नागरिकांचे चारित्र्य उच्च दर्जाचे असले पाहिजे. देशातील नागरिकांचा नैतिक मूल्यांवर विश्वास असावा. राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रप्रेम, इमानदारी, स्वार्थत्याग, सेवाभाव, राष्ट्रसाठी कोणताही त्याग व कष्ट करण्याची तयारी इ. गुणांच्या जोरावर लोकशाही यशस्वी होऊ शकते. ह्या गुणांच्या अभावी लोकशाही यशस्वी होऊ शकते. राष्ट्रीय चारित्र्य आणि नैतिकतेला महत्त्व देणारे नेते आणि नागरिक असतील तर लोकशाही यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही.

७) प्रामाणिक व कार्यक्षम शासनयंत्रणा - लोकशाही शासन आणि शासन अधिकारी यांच्या कार्यक्षम यंत्रणांवर, वर्तनावर लोकशाहीचे यश अवलंबून असते. प्रशासनात वशिलेबाजी-भ्रष्टाचार असेल तर जनतेचा लोकशाहीवर विश्वास राहणार नाही. शासकीय अधिकारी तज्ज्ञ म्हणून असून उपयोगाचे नाही तर ते प्रामाणिक व निःस्वार्थी असले पाहिजे. आधुनिक काळातील कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे शासनाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. म्हणून त्यांनी जबाबदारीने कार्य करणे गरजेचे आहे. जनतेच्या प्रतिनिधीशी विचारविनिमय करून आणि सामोपचाराने निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे.

८) सत्तेचे विकेंद्रीकरण - लोकशाही शिक्षणाच्या शाळा आणि लोकशाहीचा पाया या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या जातात. लोकशाही यशस्वी करण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असते. जनतेचा राज्यकारभारात सहभाग आवश्यक असतो. त्याशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. लोकशाही यशस्वी होण्यासाठी कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदार नागरिकाची आवश्यकता असते आणि असे नागरिक स्थानिक स्वशासन व्यवस्थेतून निर्माण होऊ शकतात. नागरिकांमध्ये सहिष्णुता, सहकार्य, सार्वजनिक हित करण्याची दृष्टी इत्यादी गुण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यात भाग घेतल्यामुळे वाढीस लागत असतात.

९) सामाजिक व आर्थिक समता निर्मिती - लोकशाहीच्या यशासाठी आर्थिक व सामाजिक समता निर्माण होणे आवश्यक आहे. समाजव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमतेचे अस्तित्व असेल तर लोकशाही व्यवस्थेने उपलब्ध करून दिलेले अधिकार जनतेला नीटपणे वापरता येणार नाहीत. दारिद्रय असलेल्या समाजात लोकशाहीतील मतदानाच्या अधिकाराचे फारसे अप्रूप नसते.. मतदान अधिकाराविषयी जागरूकता नसल्यामुळे पैसा घेऊन मतदान करतात. लोकशाहीच्या यशासाठी आर्थिक विषमता नष्ट करणे गरजेचे मानले जाते. आर्थिक विकेंद्रीकरणावर भर, वस्तू आणि सेवांचे योग्य वितरण, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी योजना इत्यादींचा वापर करावा लागतो. धर्म, जात, वंश, लिंग, संस्कृती आणि जन्मस्थान इत्यादींच्या आधारावर असलेला सामाजिक भेदभाव आणि विषमता देखील लोकशाहीला मारक असते. समाजातील सर्व प्रकारचे भेदाभेद आणि विषमता नष्ट करून सामाजिक समता निर्माण करणे लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक मानले जाते.

१०) स्वतंत्र न्यायमंडळ - व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही शासन व्यवस्था कार्यक्षम आणि निष्पक्षपातीपणे चालविण्यासाठी न्यायमंडळाला स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या यशासाठी निष्पक्ष व स्वतंत्र न्यायमंडळ असणे आवश्यक आहे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या नियंत्रणापासून न्यायमंडळ स्वतंत्र असणे आवश्यक असते. घटनाबाह्य कायदे रद्द करण्यासाठी न्यायालयांना न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला असतो. या अधिकाराच्या माध्यमातून न्यायमंडळ घटनेच्या पावित्र्याचे रक्षण करू शकते तसेच जनतेवर लादऱ्या जाणाऱ्या अन्यायकारक घटनाबाह्य कायदयाला अवैध घोषित करू शकतो. व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायमंडळाकडे सोपविली जाते. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी न्यायाधीशांना सेवेची शाश्वती व अधिक वेतन दिले जाते.

    अशा प्रकारे लोकशाही यशस्वी होण्यासाठी वरील गोष्टींची नितांत गरज असते. या गोष्टीच्या अभावातून अनेक देशात लोकशाही यंत्रणा धोक्यात आलेली दिसते. लोकशाही शासन पद्धती आपोआप यशस्वी होत नाही तर ती यशस्वी करण्यासाठी वरील अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.