https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राजकीय विचारप्रणालीचे स्रोत वा उगमस्थाने आणि साधने Political Ideology Source and Mean


 

राजकीय विचारप्रणालीचे स्रोत वा उगमस्थाने आणि साधने: -

राजकीय विचारप्रणालीचा उगम सामाजिक आणि राजकीय पर्यावरणात उद्भवलेल्या समस्या वा संकटांपासून होत असतो. व्यक्तीच्या मनावर सभोवतालच्या सामाजिक-राजकीय पर्यावरणात घडणाऱ्या घटना वा प्रसंगांच्या संवेदना निर्माण होतात. या संवेदनांच्या माध्यमातून सामाजिक वातावरणात झालेल्या आंतरक्रियांच्या परिणामातून विचारसरणीचा जन्म होतो. समाजव्यवस्थेत अस्तित्वात असलेल्या विविध वर्गातील हितसंबंधांत आढळून येणारी अंतर्गत विसंगती व संघर्ष हादेखील विचारसरणीच्या निर्मितीचा स्रोत मानला जातो. उदा. साम्यवादी विचारसरणीचा जन्म भांडवलदार आणि कामगार वर्गाच्या परस्परविरोधी हितसंबंधांतून झालेला आढळतो. राजकीय विचारप्रणालीची अनेक उगमस्थाने | विचारवंतांनी सांगितलेली आहेत. कोणत्याही एका कारणातून तिचा जन्म झालेला नसून अनेक कारण समूहांतून विचारप्रणालीचा जन्म झालेला आहे. विचारप्रणालीची उगमस्थाने वा स्रोत विचारवंतांनी पुढीलप्रमाणे सांगितलेली आहेत.

१. राजकीय विचारवंत : राजकीय विचारवंत हे राजकीय विचारसरणीचे प्रमुख स्रोत मानले जातात. राजकीय चिंतनाची सुरुवात ग्रीक विचारवंतांपासून झालेली दिसते. ग्रीक विचारवंतांनी स्पष्ट बुद्धिवादाचा धरलेला आग्रह राजकीय चिंतनाचा आधारभूत खोत मानला जातो. सुद्गुण म्हणजे ज्ञान' ह्या सॉक्रेटिसच्या सिद्धान्त आधारावा प्लेटोचे राजकीय विचार आधारलेले आहेत. सॉक्रेटिस, प्लेटो, ऑरस्टॉटल, सोफिय या विचारवंतांनी मांडलेल्या विविध सिद्धान्तांमधून अनेक विचारसरणी उदयाला आलेल्या आहेत. भारतीय विचारधारेचे मुख्य स्रोत वेद, स्मृती, महाकाव्य, कौटिल्य, शुक्र, भरत इत्यादींना मानले जाते. मध्ययुगीन विचारधारेवर सेंट्र ऑगस्टाईन, थॉमस एकीनास, दान्ते इत्यादींचा प्रभाव पडलेला आहे. आधुनिक काळात मॅकियाव्हली, हॉब्ज, लॉक, रूसो, हेगेल, ग्रीन, कार्ल मार्क्स, अॅडम स्मिथ इत्यादी प्रमुख विचारवंतांनी विविध विचारप्रणालींना जन्म दिलेला आहे. आधुनिक राजकीय विचारधारेच्या निर्मितीत डेव्हिड ईस्टन, आल्मंड, लासवेल, मेरियम, ग्रॅहम वॉलास, आर्थर बेंटले, राबर्ट डहाल, पॉवेल, डेव्हिड ऑप्टर इत्यादींचा सहभाग दिसून येतो. आधुनिक भारतीय विचारधारेच्या विकासात राजा राममोहन रॉय, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय चिंतनातून अनेक राजकीय विचारप्रणालींचा विकास झालेला आहे.

२. धार्मिक आणि साहित्यिक ग्रंथ : धार्मिक आणि साहित्यिक ग्रंथांतून जीवनमूल्ये, आदर्श आणि समाजात अस्तित्वात असलेल्या विविध प्रथा, परंपरांचे दर्शन घडते. वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, महाकाव्ये, गीता, शुक्रनीती, चाणक्य नीती इत्यादी ग्रंथांनी भारतीय विचारधारेला प्रभावित केलेले आहे. याचप्रमाणे बायबल, कुराण, हदीस, शरियत, त्रिपिटक, विनयपिटक इत्यादी धार्मिक ग्रंथांनी समाजमनाच्या विचारांचे भरणपोषण करण्यात प्रभावी भूमिका बजावलेली दिसते. जॉन रस्किनचे un to the last, टॉलस्टॉयचा ग्रंथ Kingdom of god is within you, थामूर मूरचे पुस्तक यूटोपिया इत्यादी पुस्तकांतून युरोपीयन समाजवाद विचारधारा विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे. म्हणून राजकीय विचारसरणीच्या उदय आणि विकासात धार्मिक आणि साहित्यिक ग्रंथांचा फार मोठा वाटा राहिलेला आढळतो.

३. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दस्तऐवज आणि संस्था : राजकीय विचारसरणीच्या उदय आणि विकासात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांचा प्रभाव पडलेला आहे. मॅग्नाकॉर्टा, बिल ऑफ राईट, पिटीशन ऑफ राईट यांनी ब्रिटनच्या घटनात्मक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे चार्टर, विविध आंतरराष्ट्रीय करार व संधी, आंतरराष्ट्रीय कायदे, आंतरराष्ट्रीय घोषणापत्रे इत्यादींच्या माध्यमातून राजकीय विचारधारेच्या विकासाला चालना मिळालेली आढळते.

४. राजकीय अभिजन : राजकीय विचारसरणीच्या उदयामुळे राजकीय अभिजनाचा सहभाग महत्त्वपूर्ण मानला जातो. राजकीय व्यवस्थेतील संपूर्ण निर्णय प्रक्रिया राजकीय अभिजनाच्या इच्छेनुसार चालत असते. राजकीय अभिजन अनेक नवीन नवीन तथ्य आणि व्यवस्थांना जन्म देत असतात. प्रत्येक राजकीय अभिजन आपआपल्या विचारानुसार शासन चालवत असतात. शासन चालविताना अनेक नवकल्पना प्रस्तुत करतात. या कल्पनेतून अनेक विचारप्रणालींचा जन्म झालेला दिसतो. उदा. हिटलरने नाझीवाद तर मुसोलिनीने फॅसिझम विचारसरणीला जन्म दिला. अब्राहम लिंकन, नेपोलियन बोनापार्ट, बिस्मार्क, मॅझिनी, लेनिन, माओ, गांधी, नेहरू इत्यादी राजकीय अभिजनांनी अनेक राजकीय सिद्धान्तांची मांडणी केली. या सिद्धान्तांतून अनेक नवीन नवीन विचारधारा निर्माण झालेल्या दिसून येतात.

५. सामाजिक तणाव : सामाजिक तणाव हेदेखील विचारप्रणालीच्या उगमाचे एक कारण मानले जाते. प्रत्येक समाजाच्या रचनेत कालानुरूप परिवर्तन होत असते. या परिवर्तनातून समाजाचे संतुलन नष्ट होते. परिणामतः समाजात काही असमाधानी घटक हे संतुलन प्रस्थापित करण्यासाठी आणि परितर्वनातून निर्माण झालेल्या अंतविरोधाचे निराकरण करण्यासाठी वैचारिक आणि भावनिक मंथन करतात. त्या मंथनातून विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीच्या उगम होतो. उदा. भांडवलशाहीतील अंतविरोध आणि शोषणातून समाजवाद आणि साम्यवाद विचारधारेचा उगम झालेला आहे.

६. हितसंबंधाचे संरक्षण: प्रत्येक समाजव्यवस्थेत प्रस्थापित वर्गाचे हितसंबंध संरक्षित करण्यासाठी विचारप्रणालीचा आधार घेतला जातो. आपला वर्ग वा समूहाचे हितसंबंध नैसर्गिक वा ईश्वरदत्त आणि मूलभूत आहेत हा आभास निर्माण करण्यासाठी विचारप्रणालीची उभारणी केली जाते. तसेच प्रस्थापित वर्गाचे हितसंबंध नष्ट करण्यासाठीदेखील पर्यायी विचारप्रणाली निर्माण केली जात असते. उदा. भांडवलशाहीतील भांडवलदारांच्या हितरक्षणासाठी व्यक्तिस्वातंत्र्यवादी, मुक्त व्यापार, जागतिकीकरण, आर्थिक क्षेत्र हस्तक्षेपापासून मुक्त इत्यादी विचारप्रणालींची उभारणी करण्यात आली. या विचारधारेला वेगळा पर्याय म्हणून समाजवाद, साम्यवाद, समता, कल्याणकारी राज्य इत्यादी विचारधारांची रचना करण्यात आलेली होती.

७. राजकीय सत्तेत सहभाग : समाजरचनेत सत्तेचे वितरण नेहमी असमान स्वरूपाने असते. त्यामुळे समाजात अनेक असंतुष्ट घटक उदयास येतात. हे घटक राजकीय सत्तेत सहभागी होण्याची मागणी करतात. त्यासाठी प्रस्थापित विचारधारा आणि व्यवस्थेला विरोध करतात आणि आपल्या राजकीय मागण्या पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात. राजकीय मागण्यांना वैचारिक आणि तात्त्विक स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून राजकीय विचारप्रणालीची निर्मिती केली जाते. उदा. सामाजिकदृष्ट्या वंचित आणि मागासलेले वर्ग सामाजिक न्यायाची विचारधारा उचलून धरतात आणि त्यांच्या अमलबजावणीचा आग्रह धरतात, कारण त्यातून त्या वर्गाला राजकीय सहभागाची संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते.

८. राजकीय सत्तेचे समर्थन : प्रत्येक राजकीय व्यवस्थेला स्थिर राहण्यासाठी अधिमान्यतेची गरज असते. लोकांकडून अधिमान्यता आपोआप मिळत नाही. अधिमान्यता मिळविण्यासाठी सत्ताधारी वर्ग विचारधारेचा आधार घेत असतात. आधुनिक काळात साम्राज्यवाद, वसाहतवाद, वंशश्रेष्ठत्ववाद इत्यादी विचारप्रणालींच्या आधारावर सत्ता टिकविल्याची वा निर्माण केल्याची अनेक उदाहरणे सांगता येतात. उदा. हिटलरने वंशवादाचे तत्त्वज्ञान निर्माण करून आपल्या सत्तेला अधिमान्यता मिळवली होती.

 

९. नवमूल्यांचे समर्थन : प्रस्थापित सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा आधार असलेली मूल्यव्यवस्था काही समाजघटकांना मान्य असत नाही. कारण या मूल्यव्यवस्थेतून त्या वर्गांवर अन्याय होतो, अशी सार्वत्रिक भावना विकसित होते. त्यामुळे प्रस्थापित मूल्यव्यवस्थेत व्यापक परिवर्तनाचा आग्रह रणारी विचारप्रणाली मांडली जाते. मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी मूलभूत परिवर्तनाच्या आग्रह धरणाऱ्या विचारप्रणाली आहेत. अशा प्रकारे विविध प्रकारचे विचारधारेचे स्रोत आणि उगमस्थाने मानली जातात.

विचारप्रणालीची साधने: विचारप्रणालीची अनेक साधने आहेत. विविध साधनांच्या माध्यमातून विचारप्रणालीचा प्रसार व प्रचार केला जातो. विचारप्रणाली वापरत असलेल्या साधनांचा वापर करून अनुयायींना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो. विचारप्रणालीची साधने जितकी प्रभावशाली असतील, तितकी विचारप्रणाली प्रसिद्ध वा प्रभावी मानली जाते.

१. भाषाशैली: विचारप्रणाली असलेला विचारांचा आशय शब्द, प्रतीक वा चिन्हांच्या माध्यमातून प्रसारित केला जात असतो. विचारप्रणाली ज्या शब्द वा प्रतीकांच्या माध्यमातून प्रसारित केली जाते, ते शब्द जनमाणसांच्या भावनांना उत्तेजित वा प्रेरित करणारे असतात. भावनिक चेतना वा संवेदना निर्माण करून विचारप्रणालीचे बीजारोपण केले जाते, म्हणून तीत वापरली जाणारी भाषा भावनिक स्वरूपाची असते. त्यासाठी आकर्षक भाषाशैलीचा आधार घेतला जातो. विचारप्रणालीतील सर्व तांत्रिक आशय, कार्यक्रम आणि मूल्य रुजविण्यापेक्षा भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागाचा प्रचार-प्रसार करून समाजमनात रुजविला जातो. त्यासाठी घोषणा, जयजयकार, आकर्षक शब्दरचना, भव्यदिव्य स्वप्ने दाखविणे इत्यादी गोष्टी २. कायमस्वरूपी समाजमनाच्या नजरेसमोर राहतील, यांची पुरेपूर दक्षता घेतली जाते. मिथके व बोधकथा : मिथके आणि बोधकथांचा मानवी जीवनावर प्रभाव असतो. बोधकथा, मिथके आणि प्रतीकांच्या माध्यमातून जनतेला मार्गदर्शन मिळत असते आणि मानवी जीवनाला नवी दिशादेखील मिळत असते. मानवी जीवनातील अनेक कृतींचे निर्धारण करण्यास त्या उपयुक्त मानल्या जातात. विचारप्रणालीकडून साधारणत: पारंपरिक काळापासून अस्तित्वात असलेल्या मिथकांचा वापर केला जात असतो. वेळप्रसंगी नवी मिथके निर्माण केली जातात. मिथकांच्या माध्यमातून वर्तमानापेक्षा भविष्याकडे पाहण्याच्या दृष्टीचा विकास घडवून आणला जातो. सद्य परिस्थितीत भोगाव्या लागणाऱ्या यातना कमी करण्यासाठी भाकीत कथन केले जाते. या कथनाच्या माध्यमातून भावी काळातील आदर्श जीवनाचे चित्र रंगविले जाते. हे चित्र आकर्षक वाटत असले, तरी सत्याच्या कसोटीवर अजिबात टिकणारे नसते. परंतु ते सत्य नसले, तरी त्यातून प्रेरणांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असते. मिथकांच्या माध्यमातून जनसामान्यांना कृतिप्रवण बनविणे सहज शक्य होते; म्हणून प्रत्येक विचारधारा मिथके, बोधकथा, बोधवाक्य यांचा मोठ्या प्रमाणावर आधार घेत असते.

3. शास्त्रीय मांडणी : प्रत्येक विचारप्रणाली शास्त्रीय असल्याचा दावा करतात.विचारप्रणालीत समाविष्ट तत्त्वे शास्त्रीय सत्य म्हणून समाजासमोर मांडली जातात. समाजात उपलब्ध वास्तवाच्या अध्ययनावर विचारप्रणाली आधारित असते, असा दावा केला जातो. अर्थात, हा दावा प्रचारकी किंवा अतिशयोक्तीच्या तत्त्वावर आधारलेला असतो. विचारप्रणालीचा शास्त्रीय अभ्यास केल्यास त्यातील फोलपणा लक्षात येतो. तरीही विचारप्रणालीचे समर्थक हार मानायला तयार नसतात. आपल्या विचारसरणीतील समाविष्ट तत्त्वे, मूल्य आणि कार्यक्रम सत्य म्हणून सादर करतात. प्रत्यक्ष समाजात काय अस्तित्वात आहे, यापेक्षा काय असावे यांची मांडणी करतात.

४. सर्वसमावेशकता : विचारप्रणालीचे समर्थक तिच्या सर्वसमावेशकतेवर जोर देतात. समाजात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिच्यात अंतर्भूत असतात, असे गृहीत धरले जाते. त्यामुळे सर्व प्रश्नांचे निराकरण विचारप्रणालीच्या चौकटीत करण्याचा प्रयास केला जातो. ही चौकट ज्या लोकांना मान्य नसते, त्यांना खलनायकाच्या रूपामध्ये सादर करतात. काही जहाल विचारधारांचे समर्थक विरोधी सूर लावण्याचा, नायनाट करण्याचा प्रयत्न करतात. उदा. साम्यवादी व्यवस्थेत भांडवलदारांच्या निर्दालनावर भर दिला जातो. ह्या सर्व कृती योग्य आहेत आणि समाज परिवर्तनासाठी आवश्यक आहेत असाही दावा केला जातो.

विचारप्रणालीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वरील साधनांचा वापर केला जातो. या साधनांच्या माध्यमातून तिचे बीजारोपण जनमानसात करण्याचा प्रयत्न केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.