https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

समाजवाद अर्थ, व्याख्या व स्वरूप, तत्त्वे वा वैशिष्ट्ये


 समाजवाद अर्थ, व्याख्या व स्वरूप, तत्त्वे वा वैशिष्ट्ये

समाजवाद म्हणजे काय?

युरोपमध्ये आधुनिक युगात जन्माला आलेल्या भांडवलशाहीतून मानवी विकासाला चालना मिळेल. दारिद्र्य, बेरोजगारी, संसाधनाची कमतरता दूर होऊन प्रत्येकाच्या विकासाला वाव मिळेल, अशी अपेक्षा होती. भांडवलशाहीचे समर्थक अॅडम स्मिथसारख्या विचारवंतांनी भांडवलशाहीच्या माध्यमातून न्यायवितरण होईल, व्यक्तीच्या क्षमतांना योग्य वाव मिळेल, नैसर्गिक संसाधने व स्रोतांचे योग्य वितरण होऊन मानवी विकासाला चालना मिळेल, हे गृहीत धरून मुक्त अर्थव्यवस्थेचे (Laissez-faire) समर्थन केले. भांडवलशाही व्यवस्थेतील फायद्याकडे आकर्षित होऊन अनेक युरोपियन देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मान्यता दिली. भांडवलशाही व्यवस्थेने काही प्रमाणात राहणीमानात वाढ आणि आर्थिक प्रगती साध्य केलेली असली, तरी विषमतावादी समाजव्यवस्था निर्मितीला हातभारदेखील लावला. परंतु श्रमिकाची होणारी पिळवणूक आणि शोषणामुळे भांडवलशाहीच्या विरोधात आवाज उठविला जाऊ लागला. भांडवलशाही व्यवस्थेमुळे समाजातील मूठभर लोकांच्या हातात केंद्रीकरण होऊ लागले. श्रमिकांच्या श्रमप्रधान जीवनात फारसा फरक पडला नाही. खेड्यापाड्यांतून कामाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या मजूरवर्गाला कोणत्याही प्रकारचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध नव्हते. त्यांचे जीवन पूर्णपणे भांडवलदाराच्या मर्जीवर अवलंबून होते. म्हणून औद्योगिक भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नाविषयी १८ व्या शतकात युरोपातील विचारवंतांमध्ये चिंतन-मनन सुरू झाले. भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेली विषमता, संपत्तीचे केंद्रीकरण आणि श्रमिकांचे शोषण नष्ट करण्यासाठी विचारवंतांनी समाजवाद नावाचा नवा पर्याय समोर आणला. उदारमतवादी भांडवलशाही लोकशाहीतून उपरोक्त प्रश्न सुटण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे, समाजवाद हाच खऱ्या अर्थाने श्रमिकांना न्याय देणारा आणि नवसमाज रचनेची पायाभरणी करणारा विचार, असा दावा केला जाऊ लागला.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेने केलेल्या अन्याय-अत्याचार व शोषणातून समाजवाद विचारसरणीचा उदय झालेला दिसतो. लोकशाही समाजवाद ही विचारसरणी समाजवादातील चांगली तत्वे आणि लोकशाहीतील चांगली तत्त्वे यांच्या समन्वयातून निर्माण झालेली असल्यामुळे, लोकशाही समाजवादाचा अभ्यास करण्याच्या आधी आपल्याला समाजवाद विचारसरणीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. समाजवाद ही विचारधारा भांडवलशाही व्यवस्थेकडून केल्या जाणाऱ्या शोषणाला विरोध करते. संपत्तीचे केंद्रीकरण नष्ट करण्यासाठी खाजगी मालमत्तेला विरोध करून मालमत्तेच्या सामूहिकीकरणावर भर देते. व्यक्तीच्या वैयक्तिक कृतीवर भर देण्याऐवजी सामूहिक कृतीवर भर देते. मानवी श्रमाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संपत्तीच्या न्यायवितरणाचा आग्रह धरते. त्यासाठी समता तत्त्वाला महत्त्वपूर्ण स्थान देते.

समाजवादाची व्याख्या व स्वरूप : समाजवाद म्हणजे नेमके काय, हे समजून घेण्यासाठी समाजवाद शब्दाची परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. परंतु समाजवादाबद्दल असंख्य विचारवंतांनी उलटसुलट विचार व्यक्त केलेले असल्यामुळे निश्चित परिभाषा तयार करणे, अवघड काम आहे. सी. इ. एम. जोडसारख्या विचारवंताने समाजवाद म्हणजे वापरून वापरून गुळगुळीत बनलेले नाणे वा वापरून वापरून आकार बदलेली टोपी, असे म्हटले आहे. समाजवाद हा रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे आहे, असे देखील काही अभ्यासकांनी म्हटले आहे. समाजवाद भांडवलशाहीतील असमान वितरण व्यवस्था नाकारून आर्थिक उत्पादन व वितरणाची नवी व्यवस्था सुचवितो. मात्र ही नवी व्यवस्था निर्माण करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, यावरून निर्माण झालेल्या मतभेदातून समाजावादांतर्गत अनेक विचारधारा निर्माण झाल्या. त्यात क्रांतिकारी समाजवाद आणि उत्क्रांतिवादी समाजवाद ह्या प्रमुख दोन विचारधारा निर्माण झाल्या. क्रांतिकारी समाजवाद भांडवलशाही नष्ट करण्यासाठी हिंसक मार्गाला प्राधान्य देतो, तर उत्क्रांतिवादी समाजवाद सनदशीर मार्गाने समाजवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. क्रांतिकारी समाजवादात साम्यवादी आणि श्रमिक संघवाद्यांचा समावेश होतो, तर उत्क्रांतिवादी समाजवादात फेबियन समाजवादी, व्यवसाय संघवादी आणि विकासवादी समाजवाद्यांचा समावेश होतो. समाजवाद शब्दाला इंग्रजीत Socialism असे म्हटले जाते. हा शब्द Socious या मूळ लॅटीन शब्दापासून तयार झालेला आहे. Socious चा अर्थ समाज असा होतो. समाजवाद शब्दाचा शब्दश: अर्थ समाजाच्या हिताचा विचार करणारा वा समाजाला महत्त्व देणारा विचार, असा सांगितला जातो. समाजवाद शब्दाचा सर्वप्रथम वापर 'पुअर मॅन्सगार्डियन' वृत्तपत्रात करण्यात आला होता. समाजवाद शब्दाच्या काही अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे होत. 'An Association of all classes of all Nations' या रॉबर्ट ओवेन यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या चर्चेत हा शब्द सातत्याने चर्चिला गेलेला दिसतो. फ्रेंच लेखक Reybaud यांनी आपल्या 'Reformateur Moderner' ग्रंथात सेन्ट सायमन, फोरियर आणि रॉबर्ट ओवेन यांच्या सिद्धान्ताची चर्चा करताना हा शब्द वापरलेला आढळतो. एकोणाविसाव्या शतका शब्द युरोपमध्ये प्रसिद्ध होऊ लागला आणि नंतरच्या काळात समाजवाद तत्त्वप्रणाली आणि चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले.

१. एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिकानुसार : समाजवाद म्हणजे मालमत्तेचे आजपेक्षा चांगल्या पद्धतीने वितरण करण्याचा आणि उत्पादन वाढविण्याचा सिद्धान्त होय.

२. सेलर्स : समाजवाद ही एक लोकशाही चळवळ आहे. जास्तीत जास्त न्याय आणि स्वातंत्र्य एकाच वेळी उपलब्ध करून देणारी समाजव्यवस्था स्थापन करणे, हा तिचा अंतिम उद्देश आहे.

३. बर्न : समाजवाद म्हणजे समाजहितासाठी प्रमुख उत्पादन व विनिमय साधने यांची खाजगी मालकी नष्ट करणे व त्यावर सामुदायिक नियंत्रण प्रस्थापित करणे होय

४. एलिटर : समाजवाद म्हणजे उत्पादन व वितरणाची साधने समाजाच्या मालकीची व्हावी आणि प्रत्येक व्यक्तीला गुणांची जोपासना करण्याची संधी दिली जावी त्यासाठी संपत्तीचे न्याय्य वितरण करावे.

५. बट्रोल रसेल : भूमी आणि संपत्तीची सामूहिक मालकी प्रस्थापित करणारा वादम्हणजे समाजवाद होय.

समाजवादाची सर्वसामान्य व्याख्या करता येत नसली तरी समाजवाद पूँजीवादातून निर्माण झालेल्या समस्यांच्या विरोधातील प्रतिक्रिया मानली जाते. समाजवाद ही विचारधारा सामूहिक मालकी आणि सामूहिक नियंत्रणाचे समर्थन करते. समाजातील आर्थिक शोषण, अत्याचार, असमानता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि नफेखोरी प्रवृत्तीच्या विरोधातील एल्गार, म्हणजे समाजवाद होय. समाजातील आर्थिक व भौतिक साधनांवर समाज वा जनतेचे नियंत्रण प्रस्थापित करून, सामाजिक उत्पादन आणि सामाजिक वितरणाला महत्त्व देणे वा राज्यांतर्गत उत्पादित होणाऱ्या आर्थिक वस्तूंचे न्यायसंगत • वितरण करून मानवतेची मूल्ये रुजविण्यास साहाय्य करणे, हा समाजवाद निर्मितीचा प्रमुख उद्देश मानला जातो. समाजवादात राज्याच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक प्रतिष्ठा व संधी बहाल करण्याचा प्रयत्न केला जातो.

समाजवादाची तत्त्वे वा वैशिष्ट्ये : समाजवादाचे अनेक पंथ वा उपपंथ आढळून येत असले, तरी समाजावादाची काही सामान्य वैशिष्ट्ये आढळून येतात.

१. समाजहिताला प्राधान्य : व्यक्तिवाद आणि समाजवाद ह्या परस्परविरोधी विचारसरणी मानल्या जातात. व्यक्तिवाद व्यक्तिहिताला प्राधान्य देतो. व्यक्ती ही बुद्धिवान प्राणी असल्यामुळे, प्रत्येकाला आपले हित कळत असते, म्हणून समाज वा राज्याने व्यक्तिहितात हस्तक्षेप करू नये असे व्यक्तिवादी मानतात. व्यक्तिवादाने व्यक्तिहिताला दिलेल्या अवाजवी महत्त्वामुळे समाजहिताकडे दुर्लक्ष झाले. सर्व व्यक्तींना आपले हित कळत असले, तरी त्यांची पूर्तता करण्यायोग्य परिस्थिती समाजात उपलब्ध नसेल, तर समाजातील बलवान व्यक्तीच्या हिताची पूर्ती होते. दुर्बलाच्या हिताची पूर्ती होत नाही, तसेच प्रत्येकाला आपले हित कळेलच असे नाही. व्यक्ती आपले हित साध्य करताना दुसऱ्याचे अहित करण्याची शक्यता जास्त असते, म्हणून समाजवादी व्यक्तिहितापेक्षा समाजहिताला जास्त महत्त्व देतात. सामाजिक हितासमोर व्यक्तिहिताला गौण मानतात. समाजातील उत्पादन व वितरण समाजहिताच्या अनुरूप व्हावे, यावर भर देतात. समाजहितासाठी खाजगी मालमत्तेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची भाषा करतात. समाजहितासाठी खाजगी मालमत्ता नष्ट करण्यास मान्यता देतात.

२. उदारमतवादाला विरोध : समाजवाद ही विचारसरणी उदारमतवादी विचारसरणीला विरोध करते. उदारमतवादी विचारसरणी व्यक्तिहित, व्यक्तिस्वातंत्र्याचे अवाजवी प्रमाणात समर्थन करते. खाजगी मालमत्तेच्या अधिकाराचे समर्थन करून, त्यावर नियंत्रण लादण्यास विरोध करते. मुक्त व अहस्तक्षेपवादी अर्थव्यवस्थेचे समर्थन करून, राज्याच्या आर्थिक क्षेत्रातील नियंत्रणाला विरोध करते. उदारमतवादाच्या उपरोक्त विचारांमुळे भांडवलशाहीच्या विकासाला गती मिळाली आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या शोषण व अन्याय-अत्याचाराला तात्त्विक आधार मिळाला, म्हणून भांडवलशाहीला पाठिंबा देणाऱ्या उदारमतवादी विचारसरणीला समाजवाद विरोध करतो. उदारमतवादामुळे समाजात निर्माण झालेल्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी पर्यायी कार्यक्रम, पर्यायी समाजरचना निर्मितीचे सुतौवाच समाजवाद करतो.

३. भांडवलशाहीला विरोध : समाजवादी भांडवलशाहीला विरोध करतात. भांडवलशाही व्यवस्थेत संपत्तीचे केंद्रीकरण, विषमता आणि शोषणाला वाव मिळतो. भांडवलदार वर्ग श्रमिकांना श्रमाचा योग्य मोबदला देत नाही. अत्यंत अल्प मोबदल्यात श्रमिकांकडून प्रचंड काम करून घेतात. भांडवलशाहीमुळे राष्ट्रीय उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असली, तरी प्रत्यक्ष श्रमिकांना त्यांचा काहीही फायदा होत नाही. भांडवलदार आपल्याकडील अतिरिक्त संपत्तीच्या जोरावर इतर उद्योग विकत घेतात. भांडवलशाही श्रमिकाप्रमाणे ग्राहकांचीदेखील शत्रू असते.. ग्राहकांना जास्त किंमतीत विकणे, उत्पादनाबद्दल खोटी जाहिरातबाजी करून ग्राहकांची फसवणूक करणे, वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठेबाजी करणे, प्रतिस्पर्धी कंपन्याची टिंगलटवाळी करून त्या बंद पाडणे, वस्तू उत्पादनात मक्तेदारी निर्माण करणे इत्यादी मार्गांनी भांडवलशाहीत सातत्याने प्रयत्न सुरू असतात. भांडवलशाही समाज, राष्ट्र, श्रमिक आणि ग्राहकांसाठी घातक असल्यामुळे ती नष्ट करण्याची भाषा समाजवाद करतो.

४. समतेला महत्त्व : समाजवाद आणि समता याचा घनिष्ठ संबंध आहे. समाजवाद विचारधारेची निर्मिती समतेच्या प्रस्थापनेसाठी झालेली आहे. भांडवलशाही व्यवस्थेकडून श्रमिकांच्या केलेल्या जाणाऱ्या आर्थिक शोषणातून समाजात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. भांडवलदार दिवसेंदिवस श्रीमंत होत असताना, श्रमिक मात्र आपल्या दैनंदिन गरजादेखील पूर्ण करू शकत नाही. भांडवलशाहीत होणाऱ्या संपत्तीच्या केंद्रीकरणामुळे आर्थिक विषमतेत वाढ झालेली आहे. समाजातील आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी, समता प्रस्थापित करण्यावर समाजवादी भर देतात. समता प्रस्थापित करण्यासाठी खाजगी संपत्ती व उद्योग-व्यवसायाचे राष्ट्रीकरण केले पाहिजे, वा त्यांच्यावर समाजाचे नियंत्रण प्रस्थापित करण्याची आवश्यकता समाजवादी सांगतात. संपत्तीचे सामाजीकरण आणि खाजगी मालमत्तेच्या निर्मूलनाशिवाय आर्थिक समता शक्य नाही, असे समाजवाद्यांना वाटते.

५. राष्ट्रीयीकरणावर भर : समाजवाद ही विचारसरणी उत्पादन साधनांवरील खाजगी मालकीला विरोध करते. उत्पादन साधनांवरील खाजगी मालकीतून संपत्तीचे केंद्रीकरण होते. आर्थिक विषमतेत वाढ होते. समाजात नफेखारी वृत्तीला उत्तेजन मिळते आणि श्रमिकांचे शोषण करण्याची संधी भांडवलदारांना उपलब्ध होते. म्हणून उत्पादन साधनांवरील खाजगी मालकी नष्ट करून, त्यावर समाजाची वा राष्ट्राची मालकी करणे वा उत्पादन साधनांवर समाजाचे नियंत्रण प्रस्थापित करणे गरजेचे असते. राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणावर सहकारी तत्त्वावर चालविले गेले पाहिजेत, जेणे करून समाजातील विविध घटकांना उत्पादन प्रक्रियेत आपले योगदान देता येईल.

६.अनिर्बंध स्पर्धेला लगाम : भांडवलशाही अर्थव्यवस्था स्पर्धेला अत्यंत महत्त्व देते. भांडवलशाही व्यवस्थेत अनिर्बंध स्वरूपाची स्पर्धा असते. स्पर्धेच्या माध्यमातून लवकरात लवकर विकास साध्य करता येतो, तसेच कमी किंमतीत ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देता येते, असा दावा भांडवलशाहीचे समर्थक करतात; परंतु समाजवादी असे मानतात की, स्पर्धेमुळे उद्योग जास्त नफा देणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाकडे लक्ष देतात. परिणामत: जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष होते. स्पर्धेमुळे प्रतिस्पर्धी कंपन्याचे दोष जाहीर करणे, वस्तू उत्पादनात मक्तेदारी निर्माण करणे, लहानलहान उद्योगांचे विलिनीकरण करणे, प्रचंड जाहिरातबाजी करून वस्तू घेण्यास ग्राहकांना मजबूर करणे इत्यादी मार्गांचा वापर केला जातो. त्यामुळे समाजवादी अनिर्बंध स्पर्धेला लगाम लावण्यावर भर देतात. मंदी, बेकारी, रोजगाराची अनिश्चितता हे स्पर्धेमुळे निर्माण होणारे दोष टाळण्यासाठी; स्पर्धेऐवजी सहकार्य, समन्वय व सहकारावर आधारित नवीन अर्थव्यवस्था निर्मितीचा प्रयत्न समाजवादाकडून केला जातो.

७. राज्याला व्यापक अधिकार : समाजवादात राज्याला व्यापक अधिकार बहाल केले जातात. समाजवाद ही विचारसरणी समाजाच्या विकासाची जबाबदारी राज्याकडे सोपविते. समाज विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी राज्याकडे व्यापक अधिकार असणे गरजेचे असते. राज्याने शांतता व सुव्यवस्थेपुरते आपले कार्यक्षेत्र मर्यादित करू नये, तर व्यक्तिविकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत. व्यक्तिविकासाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करावा. व्यक्तिविकासाला पूरक वातावरण निर्माण करावे. समाजवाद व्यक्तिविकासाची जबाबदारी वा उत्तरदायित्व राज्याकडे सोपवते आणि ही जबाबदारी योग्य मार्गाने पूर्ण करण्यासाठी राज्याला व्यापक अधिकार देण्याचे समर्थन करते.

८. लोकशाहीचा स्वीकार : समाजवाद विचारसरणी लोकशाहीला मान्यता देते. समाजवाद लोकशाही व सनदशीर मार्गानेदेखील प्रस्थापित करता येईल, यावर समाजवादी विश्वास व्यक्त करतात. लोकशाही मार्गाने समाजवादाची प्रस्थापना करण्यासाठी लोकशाही समाजवाद नावाच्या समन्वयकारी विचारसरणीचा उदय समाजवादातून झालेला आहे. लोकशाहीतील चांगली तत्त्वे आणि समाजवादातील चांगली तत्त्वे यांच्या समन्वयातून लोकशाही समाजवाद निर्माण करता येईल, असा आशावाद समाजवादी व्यक्त करतात. परंतु समाजवादातील क्रांतिकारी गट लोकशाहीविषयी फारसा समाधानी नाही. लोकशाही मार्गाने समाजवाद प्रस्थापित 'होणार नाही असे त्यांना वाटते, म्हणून ते लोकशाहीऐवजी श्रमिकांना प्राधान्य देणाऱ्या सर्वकषशाहीचा पुरस्कार करतात.

९. नवसमाजरचनेची स्थापना : उदारमतवादी भांडवलशाही व्यवस्थेपासून समाजातील व्यक्तीची सुटका करण्यासाठी समाजवाद नवसमाजरचनेची कल्पना मांडतो. समाजवादी समाजरचनेत खाजगी मालमत्तेवर नियंत्रण, सहकारी पद्धतीने उत्पादन, शेतीचे सामाजीकरण, न्यायपूर्ण वितरण, व्यक्तिविकासाला संधी, सामूहिक विकासाला प्राधान्य, नियोजनाच्या माध्यमातून विकास इत्यादींवर आधारित नवसमाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न समाजवादाच्या माध्यमातून केला जात आहे. समाजवाद पर्यायी समाजरचना निर्मितीसाठी तात्त्विक दर्शनाचेदेखील काम करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.