महात्मा फुलेंचे जीवनपरिचय आणि कार्य-
महाराष्ट्राच्या समाजकारणात प्रबोधनाची ज्योत पेटवत ठेवणारे
विचारवंत म्हणून महात्मा फुले यांचे कार्य व योगदान महनीय मानले जाते.
महाराष्ट्राच्या इतिहासात शूद्रातिशूद्र वर्गाच्या मानवी आणि नैसर्गिक हक्कांबद्दल
प्रथम आवाज उठविणारे आद्य समाजसुधारक म्हणून जोतिबा फुले ओळखले जातात. तसेच
त्यांना स्त्रीमुक्ती चळवळीचे आद्यप्रवर्तकदेखील मानले जाते. त्यांनी
स्त्रियांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष दिले. स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक अशा
की शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले होते. दलित, वंचित आणि शोषितवर्गाचा कैवार घेऊन लढा उभारणारे
जोतिबासारखे विद्वान महाराष्ट्रात बरीच वर्षे अपेक्षित राहिले. त्यांच्या विचार
आणि कार्याकडे विचारवंतांनी दुर्लक्ष करणे पसंत केले. बऱ्याच वर्षांच्या
अज्ञातवासानंतर त्यांच्या विचार व कार्यातील मूलगामीत्व, दूरदर्शित्व आणि देशीपण अभ्यासकांच्या लक्षात
आले. जातिभेद, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीशिक्षण अस्पृश्यता निवारण आणि शेतकरी व कामगारांचे
प्रश्न समाजापुढे आणि निर्णय केंद्रापर्यंत मांडण्याचे धाडस त्यांनी दाखविले.
धार्मिक रूढी, परंपरा आणि धर्माची कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता आपले कार्य सुरू ठेवले.
फुल्यांच्या कार्यामुळे वरिष्ठ वर्गाच्या हितसंबंधाला बाधा पोहोचली. त्यामुळे त्या
वर्गातील लोकांनी त्यांच्या विरोधात ओरड सुरू केली. ब्राह्मणी धर्मातील कावेबाजपणा
उघडकीस आणला. धर्माच्या आधारावर केल्या जाणाऱ्या शोषणाचे स्वरूप उघड करण्याचा
सर्वप्रथम प्रयत्न केला. ब्राह्मणी ग्रंथ आणि धर्माचे अंतरंग उघड करण्याचे कार्य
केले. ब्राह्मणी धर्माने निर्माण केलेल्या सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक विषमतेमुळे समाजव्यवस्थेत
ब्राह्मणांना प्रतिष्ठा व सर्वोच्च स्थान प्राप्त झाले. स्मृती, पुराणे, श्रुती आणि ब्राह्मण ग्रंथाच्या माध्यमातून
निर्माण झालेल्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
केली. सत्यशोधक समाज संघटनेच्या माध्यमातून जोतिबा फुले मानवी प्रतिष्ठा, धार्मिक सहिष्णुता, मानवी हक्क आणि मानवी समानता प्रस्थापित
करण्याचा प्रयत्न करत राहिले. ब्राह्मणवर्गाने धार्मिकतेच्या आधारावर विशेषाधिकार
प्राप्त करून शूद्र, स्त्रियांचे शोषण केले. मूर्तिपूजा, चातुर्वर्ण्य आणि कर्मकांडात जखडलेल्या समाजाची
लूट पुरोहित वर्गाने चालविली होती. ब्राह्मण वर्गाच्या मानसिक गुलामगिरीतून
समाजव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी फुल्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सभा, संभाषणे, पत्रके, जाहीर सभा, विविध संस्था व शाळांची स्थापना आणि ग्रंथलेखन
करून आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
महात्मा फुले हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते.
महात्मा फुले महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा क्रांतीचे आद्यप्रवर्तक मानले जातात, दलित-शोषितांच्या मुक्तीचे उद्दिष्ट ठेवून देशात
जनआंदोलन चालविणारे फुले हे पहिले समाजसुधारक होते. त्यांच्या चळवळीतून दलित व शोषित
वर्गात आत्मभान निर्माण झाले. या आत्मभानामुळे शोषित वर्गात संघर्ष करणारी
नेतृत्वाची नवी पिढी निर्माण झाली. सामाजिक चळवळीचे देशी तत्वज्ञान फुले यांनी
विकसित केले. त्यांच्या चळवळीमुळे वंचितांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले.
त्यांचे घराणे मूळ सातारा जिल्ह्यातील कटगुण येथील खेड्यात राहणारे होते.
व्यवसायाच्या निमित्ताने आजोबा पुण्यात स्थायिक झाले. त्यांचे आडनाव गोन्डे होते.
पण पुण्यात पेशव्यांना फुले पुरवत असल्यामुळे लोक त्यांना फुले असे म्हणू लागले.
फुले हे त्यांचे पुढे आडनाव बनले. महात्मा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे
येथे झाला. लहानपणीच आई चिमणाबाईचे निधन झाल्यामुळे त्यांचा सांभाळ सगुणा
क्षीरसागर नामक विधवा दाईने केला. वडील गोविंदराव प्रतिष्ठित व व्यावसायिक गृहस्थ
होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कुलात झाले, मिशनरी शाळेत आलेल्या अनुभवातून त्यांच्या
व्यक्तिमत्वाची जडणघडण चांगल्या प्रकारे झाली. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा
सावित्रीबाईशी विवाह झाला. टॉमस पेन यांच्या 'राइटस् ऑफ मॅन' पंथाचा त्यांच्यावर शिक्षण घेत असताना खूप
प्रभाव पडला. समाजाची दैनावस्था पाहून त्यांनी सरकारी नोकरी न करण्याचा निर्णय
घेतला. लहुजी मांग यांच्या आखाड्यात दांडपट्टयाचे प्रशिक्षण घेऊन राजवटीविरोधात
बंड करण्याचा विचार मनात घोळू लागला. परंतु ब्राह्मण मित्राच्या वरातीत अपमानास्पद
वागणूक मिळाल्यामुळे राजकीय गुलामगिरी करण्याऐवजी सामाजिक गुलामगिरी नष्ट
करण्याबाबत विचार करू लागले. सामाजिक गुलामगिरीची तीव्रता ही राजकीय
गुलामगिरीपेक्षा कितीतरी पटीने व्यापक होती. सामाजिक गुलामगिरी नष्ट केल्याशिवाय
राजकीय स्वातंत्र्याला काहीही अर्थ नाही हे लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यासाठी
वाहून घेण्याचा निर्धार केला. कारण तत्कालीन समाजव्यवस्थेत अनिष्ट रूढी, कर्मकांड, परंपरा आणि प्रथांचे स्तोम माजले होते.
शूद्रांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत होते. स्त्रियांची स्थिती
शूद्रांपेक्षाही वाईट होती. त्यांना समाजात दुय्यम स्थान होते. या प्रश्नांना वाचा
फोडण्यासाठी त्यांनी 'दिनबंधू' मासिकातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच 'शेतकऱ्यांचा आसूड', 'गुलामगिरी', 'अस्पृश्याची कैफियत', 'शिवाजीचा पोवाडा', 'इशारा', 'तृतीय रत्न आणि 'सार्वजनिक सत्यधर्म' इ. ग्रंथांचे लेखन केले. 'अखंड' नावाने काही अभंगांची रचना केली. जोतिबा फुले
यांनी ग्रंथ लेखनाच्या माध्यमातून बहुजन समाजाची मानसिक गुलागिरीतून सुटका
करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मूल्यांवर नवसमाजाची उभारणी
करावयाची असेल तर समाजाची बौद्धिक मशागत करणे आवश्यक होते. शोषणाच्या मागील मानसिक, सांस्कृतिक आणि आर्थिक कारणे समजून घेतल्याशिवाय
त्यांचे स्वरूप लक्षात येणार नाही आणि त्यांचे निराकरणदेखील करता येणार नाही या
व्यापक उद्देशाने त्यांनी लेखन केले.
महात्मा फुले यांनी समता, मानवता, विनयता, विवेक आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी आपले सारे
आयुष्य वेचले. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजात आत्मविश्वास निर्माण
करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान मानवी प्रतिष्ठा, मानवी हक्क, धार्मिक सहिष्णुता, मानवी स्वातंत्र्याचा संदेश देणारे आहे. आपल्या
समाज सुधारणेच्या कार्यास संघटनेची जोड देण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे या
ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व
कोषाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्थापनेच्या वेळेस फक्त ६० सदस्य होते.
अल्पकाळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ पोहोचली. अनेक कार्यकर्ते या
चळवळीला येऊन मिळाले. समाजातील स्त्रिया, पददलित आणि शेतकऱ्यांना न्याय्य हक्कांची जाणीव
करून दिलेले दिसते. १८७६ साली पुणे नगरपालिकेचे सदस्य बनले. शिक्षणविषयक प्रश्नाचा
अभ्यास करण्यासाठी ब्रिटिशांनी नेमलेल्या हंटर कमिशनला निवेदन सादर केले. सरकारने
दलित आणि शोषितांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी हा आग्रह धरला. व्हॉईसरॉय लॉर्ड
लिटन यांच्या स्वागतार्थ खर्च केल्या जाणाऱ्या पैशाचा विनियोग गरिबांच्या
शिक्षणावर खर्च केला असता तर तो सार्थको लागला असता अशी टीका केली. 'ड्युक ऑफ कनाट' पुणे भेटीप्रसंगी शेतकरी वेशात हजर राहिले.
कार्यक्रमातील वैभवावरून देशाबद्दल मत बनवू नये तर खेड्यांना भेटी देऊन
परिस्थितीची माहिती राणी व्हिक्टोरियाला द्यावी ही विनंती केली. शेतकऱ्यांच्या
दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. १९ मे १८८८ रोजी मांडवीच्या
कोळीवाडा सभागृहात जनतेने त्यांना 'महात्मा' ही पदवी बहाल केली. वंचित वर्गाला सामाजिक न्याय
मिळवून देण्यासाठी महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी
आयुष्यभर प्रयत्न केलेले आढळतात. फुलेंच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात
अनेक समाजसुधारक निर्माण झालेले होते. अशा महामानवाचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी निधन
झाले. ब्राह्मण्यवादाला विरोध हा फुल्यांचा विचार व कार्यातील महत्त्वपूर्ण भाग
असला तरी स्त्रीशूद्रातिशूद्रांचे संघटन हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. शूद्र आणि
स्त्री संघटनांच्या माध्यमातून वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था नेस्तनाबूत करण्याचे
स्वप्न पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.