https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये वा लक्षणे


 

आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये वा लक्षणे - 

आदिवासी समाजाचा आयुष्यक्रम वा जीवनक्रम हा सर्वसाधारण समाजापेक्षा वेगळा आहे. आदिवासींमधील प्रत्येक जमातींची स्वतःची स्वतंत्र अशी संस्कृती आहे. जीवनशैली, बोलीभाषा, सामाजिक रीतिरिवाज, सामाजिक मूल्ये, रूढी आणि परंपरा इत्यादी गोष्टी आदिवासींच्या समाजापेक्षा भिन्न आहेत. आदिवासी नसलेल्या समाजगटापेक्षा आदिवासींचा जीवनक्रम भिन्न आहे. आदिवासी समाजात सर्वसाधारण समाजापेक्षा असलेली भिन्नता आहेत करण्यासाठी आदिवासी समाजाची पुढील वैशिष्ट्ये वा लक्षणे नमूद केलेली

१) विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य - आदिवासी जमातीचे वास्तव्य विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात आढळून येते. आदिवासींचे वास्तव्य असलेला भूप्रदेश हा साधारणतः डोंगराळ, दुर्गम, जंगल, चढउताराची जमीन, एकाकी बेटावर आदिवासी समुदायाची वस्ती आढळून येते. या प्रदेशात आढळून येणाऱ्या नदी, नाले, जंगले आणि नैसर्गिक संसाधनांवर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. दुर्गम भागातील वास्तव्यामुळे प्रगत समाजाशी फारसा संपर्क येत नाही. दळणवळण साधनाच्या अभावामुळे अनेक आदिवासी जमाती निसर्गप्रधान जीवन जगताना आढळतात. निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून आपले जीवन चालवित असतात. उदाहरणार्थ, वनस्पती व झाडपालांचा वापर करून आजारावर उपचार करणे. निसर्गाच्या सहवासात जीवन व्यथित करत असल्यामुळे त्यांच्या सामाजिक, धार्मिक व आर्थिक जीवनावर भौगोलिक क्षेत्राचा प्रभाव पडतो.

२) मर्यादित लोकसंख्या - आदिवासी समाजाची लोकसंख्या मर्यादित स्वरूपाची असते. आदिवासींच्या अनेक जमाती आहेत. काही जमाती विशिष्ट भूप्रदेशापुरत्या मर्यादित आहेत. उदाहरणार्थ, अंदमान बेटावरील जारवा आदिवासींची संख्या अत्यंत कमी आहे. मर्यादित लोकसंख्येमुळे सामाजिक संपर्काचे प्रमाणदेखील कमी आढळून येते. गोंड आदिवासींचा अपवाद वगळता इतर आदिवासी जातींची संख्या फारच मर्यादित असते. काही जातींची संख्या तर १००च्या आत आहे. अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहचत नसल्यामुळे मृत्यदराचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही जमातींची लोकसंख्या कमी होत आहे. मर्यादित लोकसंख्येमुळे काही आदिवासी जमाती काळाच्या उदरात गडप होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

 

३) स्वतंत्र बोलीभाषा - भारतातील प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र बोलीभाषा आढळून येते. उदाहरणार्थ, पावरा-पावरी आदिवासी आपल्या बोलीभाषेतून समूह सदस्यांशी संवाद साधत असतो. त्यांचा सर्व व्यवहार हा बोलीभाषेतून चालत असतो. आदिवासी संस्कृतीचे दर्शन आपल्याला बोलीभाषेतून होत असते. आदिवासींच्या बोलीभाषा मौखिक स्वरूपाच्या आहेत. मौखिक पद्धतीने भाषा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. लोककथा, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे हे मौखिक भाषा स्थलांतराचे प्रमुख मार्ग आहेत. आदिवासी भाषांना स्वतंत्र लिपी नसते. लिपी अभावी अनेक बोलीभाषा लुप्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. प्रादेशिक लिपीचा बापर करून आधुनिक काळात आदिवासींच्या बोलीभाषेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात आदिवासींच्या एकूण २०५ प्रकारच्या बोलीभाषा असून २२५ उपबोलीभाषा आहेत.

४) स्वतंत्र नाव व रक्त संबंधांवर आधारित समूह - भारतातील प्रत्येक आदिवासी जमातीला स्वतंत्र नाव असल्यामुळे हे समुदाय इतर जमातींपासून असलेला वेगळपणा आणि स्वतंत्रता निदर्शित करतात. आपली उत्पत्ती ही एकाच पूर्वजापासून झाल्याचे मानत असल्याने समाजात आत्मीयता, प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण असते. आपल्या जमातीबद्दल प्रखर आत्मभान असते. जमातीच्या आत्मसन्मानाला धक्का लावणाऱ्या कृतीचा विरोध जमातीचे लोक सामुदायिकपणे प्रखर संघर्ष करण्यास तयार होतात; कारण आदिवासी समुदायातील लोक एकमेकांशी रक्ताचे नाते आहे. असे मानतात. समान रक्त संबंधांवर आधारित समूह असल्यामुळे इतर समुदायांपेक्षा आदिवासींमध्ये ऐक्य जास्त प्रमाणात आढळून येते.

५) प्राथमिक स्वरूपाची अर्थव्यवस्था - आदिवासी समुदायाची वस्ती दुर्गम भूप्रदेशात असल्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेची तांत्रिकता त्यांच्या अर्थकारणात आलेली नाही. अतिदुर्गम आदिवासी भागात आजही वस्तूविनिमय पद्धतीने अर्थकारण चालत असते. आदिवासींचे जीवन आजही काही भागात पूर्णपणे जंगलावर अवलंबून आहे. सभोवतालच्या नैसगिक पर्यावरणात आढळून येणाऱ्या वस्तूंवर आदिवासी आपला जीवनक्रम चालवितात. उदाहरणार्थ, जंगलात शिकार, लाकूडतोड त्याचे उत्पादन व विनिमय साधने प्राथमिक स्वरूपाची आहेत. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आहे. अर्थकारणाचा उद्देश हा निर्वाहपूर्ती आहे. दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात एवढीच त्यांची वृत्ती आहे. संचय प्रवृत्तीच्या अभावामुळे आदिवासींचे अर्थकारण उपभोगापुरते मर्यादित झालेले आहे. पैसा व बाजारपेठेचे ज्ञान नसल्यामुळे आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते.

६) समान धर्म - प्रगत समाजाप्रमाणेच आदिवासींच्या जीवनाला धर्माला महत्त्व असते. आदिवासी समाजाचा धर्मविषयक विचार निसर्गप्रधान वृत्तीवर आधारलेला आहे. आदिवासींच्या जीवनात निसर्गाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. निसर्गात होणाऱ्या घडामोडींबद्दल अज्ञान असल्यामुळे नैसर्गिक गोष्टींना दैवत बहाल करण्याची प्रवृत्ती आदिवासी समुदायात आढळून येते. पर्वत, डोंगर, नद्या, निसर्ग, पूर्वज आणि भूताखेतांची पूजा करतात. जादूटोणा, तंत्रमंत्र यावरदेखील त्यांचा विश्वास असतो. अतिमानवी शक्तींना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या पूजाविधी आदिवासी समाजात आढळून येतात. धर्मश्रद्धेतून जीवनाकडे पाहण्याचा आदिवासींचा स्वतंत्र दृष्टिकोन विकसित झालेला आहे.

७) तांत्रिकदृष्ट्या मागासलेला समाज - आदिवासी वस्तीस्थान डोंगर दल्या व दुर्गम भागात असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान समाजापर्यंत अद्यापही पोहचलेले नाही. तंत्रज्ञानाच्या अभावामुळे आदिवासी समाज शेती, मासेमारी, जंगल कटाई इत्यादी कार्यासाठी पारंपरिक साधने व तंत्रज्ञानाचा वापर करतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे मनुष्यबळाचा वापर करून जास्तीतजास्त कार्य पार पाडली जातात. आदिवासी समूहात वापरली जाणारी हत्यारे व साधने अविकसित स्वरूपाची आहेत. उदाहरणार्थ, शिकारीसाठी केला जाणारा धनुष्यबाण व गोफणीचा वापर.

८) राजकीय संघटन - आदिवासी समाजात पारंपरिक स्वरूपाचे राजकीय संघटन आढळून येते. आपल्या जमातीचे वादविवाद आणि तंट्याचे निराकरण करण्यासाठी जातपंचायतीची स्थापना केलेली आहे. या जातपंचायतीत अनुभवी व ज्येष्ठ लोकांकडे न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम मानला जातो. पंचांच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. समाजात शांतता व सुव्यवस्था, न्यायदान, दोषींना दंड इत्यादी कामे जातपंचायतकडे सोपविलेली असतात. जातपंचायतीचा प्रमुख हा साधारणतः आदिवासी समाजाचा नेता असतो. त्याच्या आदेशाने समूहातील लोक वाटचाल करीत असतात.

९) वांशिक सजातीयता - आदिवासी समुदाय हा वांशिक समुदाय आहे. विशिष्ट आदिवासी समाजाचा एक वंश असतो. विभिन्न प्रदेशात बिखुरलेली जमात व एका जमातीच्या उपजमाती त्याच वंशाच्या मानल्या जातात. उदाहरणार्थ, नागा जमातीतील आ, अन्गामो, रन्गामी, आओ नागा हे सर्व मंगोल वंशाचे आहेत.

१०) शैक्षणिक मागासलेपणा - आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा फार मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येतो. कुटुंबात मिळणाऱ्या अनौपचारिक शिक्षणावर उदरनिर्वाह करण्यावर त्यांचा भर असतो. आदिवासी जमाती डोंगराळ भागात वास्तव्य करत असल्याने बहुतेक भागात दळणवळण साधनांच्या अभावामुळे औपचारिक शिक्षण अजूनही पोहचू शकले नाही. शिक्षणाबद्दल फारशी जागृती नसल्यामुळे गळतीचे प्रमाण आदिवासी भागातील शाळांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.

११) सामाजिक एकजिनसीपणा - समान बोलीभाषा, समान संस्कृती, समान धर्माचरण आणि समान सामाजिक नियमनाचे अस्तित्वामुळे आदिवासी समाजाच्या आचारविचार व जडणघडणीत कमालीची समानता व एकजिनसीपणा आढळून येतो. धर्मश्रद्धा, परंपरा व रीतीरिवाज यांचा प्रभाव सर्व जमातींवर दिसून येतो. त्यांच्या जीवनप्रणालीतील साम्यामुळे जीवनात घडणाऱ्या घडामोडींसंदर्भात सर्व आदिवासींची नसल्याचे प्रतिक्रिया एकाच प्रकारची असते. त्यांच्या आचरणात वेगळेपणा दिसून येत नाही.

१२) अंतर्विवाह पद्धत - आदिवासी समाज हा अंतर्विवाही समाज सुरुवातीला मानले जात होते. परंतु, हिंदू धर्मातील इतर जातींप्रमाणेच आदिवासी समाज हा अंतर्विवाही आहे. आपल्या जमातीच्या बाहेर विवाह करण्याची प्रथा आदिवासी समाजात नाही. त्यांच्यात होणारे प्रेमविवाहदेखील जातीअंतर्गत होतात. जमातीबाहेरील विवाहांना आदिवासींची मान्यता नाही.

वरील प्रकारची वैशिष्ट्ये वा लक्षणे लक्षात घेतल्यानंतर असे दिसून येते की, आदिवासी समाज हा इतर समाजाहून वेगळा व भिन्न स्वरूपाचा आहे. इतर समाजापेक्षा वेगळी वैशिष्ट्ये आदिवासींमध्ये आढळून येतात. उदाहरणार्थ, महिलांच्या संदर्भात आदिवासींची भूमिका इतर समाजापेक्षा वेगळी आहे. आदिवासी समाजात महिलांना मान-सन्मान, स्वायतत्ता आणि चांगले स्थान आढळून येते. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील वास्तव्यामुळे आदिवासींची सामाजिक जडणघडण, कार्यपद्धती, राजकीय संघटन आणि प्रतिक्रियादेखील भिन्न आढळून येते. ही भिन्नता आदिवासींना वेगळेपणा प्रदान करण्यास कारणीभूत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.