https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

निवडणूक व्यवस्थापनाचे विविध टप्पे वा पायऱ्या Steps of Election Management


 

निवडणूक व्यवस्थापनाचे विविध टप्पे वा पायऱ्या

निवडणूक ही अत्यंत गुंतागुंतीची, किचकट, वेळखाऊ आणि प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता असलेली प्रक्रिया आहे. निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी ही भारतीय निवडणूक आयोगाकडे घटनेने सोपविलेली आहे. भारतीय राज्यघटनेने निवडणुका घेण्यासाठी स्वायत्तत आणि स्वतंत्र निवडणूक आयोगाची निर्मिती केलेली आहे. निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय हस्तक्षेप व दडपणापासून मुक्त राहून योग्य पद्धतीने काम करण्यासाठी आवश्यक स्वायत्तता घटनेने प्रदान केलेली आहे. या सवायत्ततेचा उपयोग करून आयोग आपल्या जबाबदाऱ्या उत्कृष्ठ पद्धतीने पारपाडू शकतो. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यापासून ते निवडणूक निकाल लागण्यानंतर विजयी उमेदवारास प्रमाणपत्र देण्यापर्यंतची विविध कामे आयोगाला पार पाडावी लागतात. ही सर्व कामे योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते. निवडणूक व्यवस्थापन फक्त पर्यवेक्षण, नियंत्रण आणि देखरेखीपुरते मर्यादित नसते तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त आणि लोकशाही बातावरणात संपन्न होणे आवश्यक असते. निवडणूक आयोगाला निवडणूक व्यवस्थापन करताना अनेक जबाबदाच्या आणि कार्य पार पाडाव्या लागतात.

१.    निवडणूक कार्यक्रम घोषणा- निवडणूक व्यवस्थापनाच्या अंतर्गत आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणे हा असतो. निवडणूक कार्यक्रमात नामनिर्देशन पत्र दाखल छाननी, नामनिर्देशन पत्र माघारी वा परत घेणे, प्रचार कालावधी, प्रचार समाप्तीचा दिवस व वेळ, मतदान, मतमोजणीचा दिवस इत्यादी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला दिवस व वेळ जाहीर केला जातो. निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना आयोगाला अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो. संबंधित प्रदेशातील हवामान, लोकाची सवड, आयोगाला काम करण्यासाठी आवश्यक कालावधी सुट्टया इत्यादी सर्व गोष्टीचा विचार करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागतो. अयोग्य वेळेत निवडणुका जाहीर केल्यास मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता असते. आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रमाची सर्व प्रसिद्धी माध्यमे, सरकारी कार्यालये, अधिकृत वेबसाईटवरून प्रसिद्धी दयावी लागते.

२.    निवडणूक कार्यक्रम अंमलबजावणी- निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर कार्यक्रमाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक व्यक्तीच्या नेमणूका करणे हा निवडणूक व्यवस्थापनाचा दुसरा टप्पा मानला जातो. या टप्प्याच्या जबाबदारी आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे सोपविलेली असते. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला आयोगाने बहाल केलेल्या अधिकारानुसार निवडणूक प्रक्रियेत काम करण्यासाठी योग्य पात्रतावान कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागते. निवडणूक प्रक्रियेत काम करण्यासाठी साधारणत: शासकीय आणि निमशासकीय प्रतिष्ठानात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केले जात असते. नियुक्ती करताना कर्मचाऱ्याचे वेतन आणि हुद्याचा विचार करून नेमणूक दयावी लागते. जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र, त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, राखीव मनुष्य बळ आणि मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ इत्यादीचा विचार करून नियुक्तीपत्रे दयावी लागतात.

३.     प्रशिक्षण देणे- निवडणूक व्यवस्थापनाच्या पुढील टप्प्यात मतदान पथकात नेमणूक केलेल्या कर्मचार मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणे आवश्यक असते. निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी आयोगाकडून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया आणि मतदानासंदर्भातील सर्व गोष्टीचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण देत असते. निवडणूक कायदयाची माहिती देत असते. मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपीएटीचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये व जबाबदारी जाणीव निर्माण करून दिली जाते.

४. निवडणूक कार्यावर देखरेख व पर्यवेक्षण- निवडणूक प्रचाराच्या कालावधीत आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष नेते व मतदान वर्तन करतात की नाही यांचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी निवडणूक व्यवस्थापनाच्या अंतर्गत आयोगाला पार पाडावी लागत असते. या जबाबदारीत आचारसंहिता भंगाबद्दलच्या तक्रारी दाखल करून घेणे, आचारसंहिता भंग करणाऱ्या व्यक्तींना नोटीसा देणे, निवडणूक खर्चाची प्रपत्रे स्वीकारणे, नियमाप्रमाणे निवडणूक खर्च प्रपत्रे येतात की याची खातरजमा करणे, निवडणुका कायदेशीर, शांततामय वातावरणा पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी आयोगाकडून पार पाडल्या जातात. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आयोगाकडून निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक नेमले जातात. निवडणूक सभा, रॅलीचे व्हिडीओ छायाचित्रण देखील वेळप्रसंगी केले जाते.

५.    मतदान प्रक्रिया पार पाडणे- निवडणूक व्यवस्थापनातील सर्वातअनेक कामे पार पाडावी लागतात. त्यातील सर्वात प्रथम जबाबदारी म्हणजे मतदान पूर्व दिवशी सर्व मतदान पथकाना मतदानासाठी आवश्यक साहित्य पुरविणे, साहित्य उपलब्ध करून दिल्यानंतर वाहनाच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत पोहचविणे, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया ठराविक वेळेत सुरू झाले की नाही हे पाहण्यासाठी किंवा काही अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी विभागीय निवडणूक अधिकारी नेमले जातात. हे अधिकारी मतदान केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन अडचणीचे निवारण करण्याचे काम करतात. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाकडून निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक आणि पथके नेमली जातात. मोजक्या मतदान केंद्रातील कार्याचे व्हिडिओ चित्रण देखील केले जातात. आयोगाने नेमलेले निरीक्षक व पथके मतदान केंद्रास भेट देऊन मतदान प्रक्रियाचा आढावा घेत असतात. संवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी निमलष्करी दलाची पथके नियुक्त केली जातात. दिवसातून ठराविक वेळा मतदानाची आकडेवारी केंद्राकडून घेऊन प्रसिद्धी माध्यमांना दिली जाते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान पथकाना मतदान केंद्रावरून निवडणूक कार्यालयापर्यंत वाहनाने आणून मतदान साहित्य जमा करणे आणि जमा केलेल्या साहित्याची मतमोजणीपर्यंत संरक्षणाची व्यवस्था करणे हे निवडणूक अधिकाऱ्यांचे काम असते.

६.  मतमोजणी करणे- निवडणूक व्यवस्थापन प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणजे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडणे. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना कमीत कमी वेळेत मतमोजणी प्रक्रिया कशी पार पाडता येईल यांचे नियोजन करणे आवश्यक असते त्यासाठी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मतमोजणी करणाऱ्या टेबलाची संख्या वाढविली जाते. मतमोजणीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत उमेदवार निहाय मतदानाची संख्या घोषित करणे आणि त्यांची आयोगाला माहिती देणे. मतमोजणी संपल्यानंतर मतमोजणीतून आलेला निकाल आणि माहिती आयोगास कळवून विजयी उमेदवारास प्रमाणपत्र बहाल करणे इत्यादी कामे निवडणूक व्यवस्थापनाच्याअंतर्गत पार पाडावी लागतात.

वरील चर्चेवरून लक्षात आलेले असेल की निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्याची कायदयाने अंतिम जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपविलेली आहे. निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यात आयोगाची सक्रियता सर्वात महत्त्वपूर्ण मानली जाते. निवडणूक प्रक्रियेतील सर्व पैलूंना जोडून ठेवण्याचे कार्य आयोगाला पार पाडावे लागते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील पर्यावरणात काम करताना आयोगाची अनेक ठिकाणी कसोटी लागत असते. आयोगाकडून होणारी एक चूक सुद्धा आयोगाच्या प्रतिमेचे हनन करू शकते म्हणून आयोगाला अत्यंत दक्षतेने निवडणूक व्यवस्थापनाची हाताळणी करावी लागते. योग्य, पारदर्शक आणि लोकशाही वातावरणात निवडणुका पार पाडणे आयोगाची जबाबदारी मानली जाते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.