https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

निवडणूक व्यवस्थापन अर्थ,स्वरूप आणि यशासाठी आवश्यक अटी Election management meaning and Nature


 निवडणूक व्यवस्थापन अर्थ,स्वरूप आणि यशासाठी आवश्यक अटी

निवडणुका हा लोकशाही गाभा आहे. लोकशाहीचा डोलारा निवडणुकीवर आधारलेला आहे. निवडणुका शांतता आणि योग्य मार्गाने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते. निवडणुका योग्य, पारदर्शी आणि लोकशाही मार्गाने पार पाडल्या नाहीत तर अयोग्य प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता आहे. निवडणुकाच्या माध्यमातून अपेक्षित राजकीय बदल वा परिवर्तन घडवून आणता येते. निवडणुका शांतता आणि कायदेशीर मार्गाने राजकीय परिवर्तन घडवून आणणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेऊन तिचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. आधुनिक काळात निवडणूक प्रक्रियेत अनेक तांत्रिक गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. उदा. ईव्हीएम आणि VVPAT या सर्व तांत्रिक गोष्टीचा उपलब्ध मनुष्यबळाशी योग्य पद्धतीने ताळमेळ बसविण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते.

निवडणूक व्यवस्थापन म्हणजे काय?-

 निवडणूक आणि व्यवस्थापन हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. या दोन्ही शब्दापासून निवडणूक व्यवस्थापन हा शब्द बनलेला आहे. व्यवस्थापन ही संज्ञा विविध विषयात विविध अर्थाने वापरली जाते. व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाला व्यवस्थापन म्हटले जाते. उदा. महाविद्यालयाचा प्राचार्य परंतु व्यवस्थापन ही व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह नसून प्रशासकीय यंत्रणेतील एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्यामाध्यमातून संघटनेतील विविध घटकात योग्य पद्धतीने समन्वय साधून तिची उद्दिष्टये साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. संघटनेची उद्दिष्टये साध्य करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कृती, क्रिया किंवा प्रक्रियेचा समावेश व्यवस्थापन या संज्ञेत केला जात असते. संघटनेने आखलेली उद्दिष्टे आणि ती पूर्ण करण्यासाठी आखलेल्या विविध धोरणे आणि कार्यक्रमाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेला व्यवस्थापन असे म्हणतात. व्यवस्थापन प्रक्रियेत कामाचे नियोजन, योग्य पर्यायाची निवड, साधनसामग्रीची जुळवाजुळव, प्रत्यक्ष होणाऱ्या कार्यावर नियंत्रण आणि मार्गदर्शन इत्यादीचा समावेश होत असते. निवडणुकीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी भारतीय संविधानाने स्वतंत्र आणि स्वायत्त निवडणूक आयोगाची निर्मिती केलेली आहे. या आयोगामार्फत निवडणुक व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणुक व्यवस्थापन केले जात असते.

निवडणूक व्यवस्थापनाच्या यशासाठी आवश्यक अटी-

निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यात निवडणूक आयोगाचा सर्वाधिक मोठा सहभाग असतो. निवडणूक प्रक्रिया ही आयोगाच्या मार्गदर्शन व पर्यवेक्षणाखाली कार्य करीत असते. आयोग नियमितपणे आपल्या व्यवस्थापन व कार्याचा आढावा घेत असते. निवडणूक व्यवस्थापन योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी तीन गोष्टीची आवश्यकता असते.

१. स्वायत्तता- निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी निवडणूक आयोग हा स्वायत्तत आणि स्वतंत्र असणे आवश्यक असते. राजकीय आणि पक्षीय दबावापासून मुक्त असलेला आयोगाच चांगल्या पद्धतीने निवडणूक व्यवस्थापनाची हाताळणी करू शकतो. निवडणूक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी भारतीय संविधानाने आयोगाला घटनात्मक संरक्षण देऊन स्वायत्तता बहाल केलेली आहे. आयोगाला असलेल्या स्वायत्ततेचा आदर राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी करणे आवश्यक आहे. आयोगाला आपल्या पद्धती व नियमानुसार काम करू दयावे. आयोगाच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. आयोगाकडून केले जाणारे पक्ष, राजकीय नेते आणि मतदारांनी सहकार्यांनी यशस्वी करता येईल. आदर्श निवडणूक व्यवस्थापनासाठी आयोग स्वायत्त असणे आवश्यक असते.

२. पारदर्शकता- निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्याची दुसरी अट म्हणजे पारदर्शकता होय. निवडणूक व्यवस्थापनाच्या अंतर्गत आयोगाकडून पार पाडल्या जाणाऱ्या कार्य व जबाबदारी पारदर्शकता असणे आवश्यक असते. आयोगाकडून नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार निःपक्षपातीपणे कार्य पार पाडले पाहिजे. आयोग पक्षपाती पद्धतीने काम करू लागला की त्यांच्या कार्याविषयी असंतोष निर्माण होऊन निवडणूक व्यवस्थापन कोडमडण्याची शक्यता असते. आयोगाच्या कार्यात पारदर्शकता, वशिलेबाजी, भ्रष्टाचाराचा अभाव असणे आवश्यक असते.

३. क्षमता- निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्याची क्षमता आयोगाकडे असणे आवश्यक असते. आयोगाकडे क्षमता नसेल तर निवडणूक प्रक्रियेत अनेक गोंधळ व गडवड निर्माण होऊन निवडणूक व्यवस्थापन कौसळू शकते. निवडणूक व्यवस्थापन योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोगाने पुरेसे ज्ञान आणि कौशल्य असलेले मनुष्यबळ निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमले पाहिजे. या मनुष्यबळात योग्य क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले पाहिजे. मतदार नोंदणीच्या कार्यापासून ते मतमोजणीच्या कार्यापर्यंत सर्वत्र कार्याचा कार्यक्षमतेचा प्रत्यय सर्वसामान्य व्यक्ती, राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांना येणे आवश्यक असते. आयोगाच्या क्षमतेवर निवडणूक व्यवस्थापन अवलंबून असते.

अशा प्रकारे निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी आयोगाने वरील अटी पूर्ण करणे आवश्यक असते. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.