https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

जिल्हा प्रशासन अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये


 

जिल्हा प्रशासन अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये-

जिल्हा प्रशासन भारतात प्राचीन काळापासून एक प्रादेशिक संघटनेच्या स्वरुपात निर्माण केले होते. या संघटनेला व्यवस्थित स्वरूप देण्याचा प्रयत्न ब्रिटिश झाला. इंग्लंडमध्ये 'डिस्ट्रिक्ट' हा न्यायव्यवस्थेसाठी असलेला घटक अस्तित्वात होता. त्या घटकाच्या प्रभावातून गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांनी १७७२ मध्ये 'डिस्ट्रिक्ट' ची निर्मिती केली. 'डिस्ट्रिक्ट' घटकावर कायदा सुव्यवस्था आणि महसूल वसुलीची जबाबदारी सोपविली आणि त्याचा कारभार पाहण्यासाठी 'कलेक्टर वा जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. जिल्हा हा घटक ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण केला. जिल्हा प्रमुख म्हणून 'जिल्हाधिकारी' पदाची निर्मिती केली तेव्हापासून जिल्हा प्रशासनाचा प्रमुख घटक बनला.

जिल्हा प्रशासन अर्थ-जिल्हा म्हणजे प्रशासकीय दृष्टिकोनातून निर्माण केलेला विशिष्ट भूभाग असतो. जनतेच्या दैनंदिन प्रशासनाच्या संदर्भात जिल्हा प्रशासन प्रारंभिक स्वरूपाचे प्रशासन कार्य करणारा घटक म्हणून विकसित केलेला आहे. राज्य आणि केंद्र प्रशासनातील सर्व कार्य सचिवालयाकडून पार पाडणे शक्य नसते. सामान्यजनता आपल्या समस्या कार्यासाठी सचिवालयावर अवलंबून राहू शकत नाही. सचिवालयाबाहेर जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कार्य पार पाडण्यासाठी भारतात ब्रिटिश काळात जिल्हा प्रशासनाची निर्मिती करण्यात आलेली होती, जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेला प्रशासकीय घटक आहे.

भौगोलिकदृष्ट्या सोयीचा किंवा लोकप्रशासनाची सर्व अभिकरणे जिल्ह्यात स्थापन केली जातात. जनता आणि शासन यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणारा प्रशासकीय घटक म्हणूनदेखील 'जिल्हा प्रशासन' ओळखले जाते.भारताचे प्रशासन तीन स्तरांवरून चालत असते. प्रथम स्तर केंद्रशासन, द्वितीयस्तर राज्य सरकार आणि तृतीय स्तर जिल्हा प्रशासन होय. भारताने संघराज्य शासनप्रणालीचा स्वीकार केलेला आहे. संघराज्य पद्धतीनुसार देशाचे विभाजन राज्यात करण्यात आले आहे. राज्याने प्रशासकीय सोयीसाठी प्रशासकीय विभाग निर्माण केले आहे. प्रशासकीय विभागाची जिल्ह्यात विभागणी केली असून जिल्ह्याचे विभाजन तालुक्यात केलेले आहे. प्रशासनाचा हाच आकृतिबंध जवळपास सर्वच राज्यांनी स्वीकारलेला आहे.

'जिल्हा' शब्दाचा नेमका अर्थ लक्षात घेण्यासाठी शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. District या इंग्रजी शब्दाला मराठीत जिल्हा असे महटले जाते. District शब्द हा लॅटिन भाषेतून इंग्रजीत आला. या शब्दाचा वापर न्यायदान क्षेत्रात केला जात होता. District हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील असला तरी हा शब्द त्यांनी फ्रान्समधील प्रिफेक्ट व्यवस्थेच्या प्रभावातून स्वीकारलेला आढळतो. भारतात इंग्रजांना बक्सारच्या लढाईनंतर बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांताचे दिवाणी अधिकार मिळाले. या अधिकाराच्या अंतर्गत सर्वप्रथम कोलकत्याच्या दिवाणीसंबंधी 'जिल्हा' हा शब्दप्रयोग वापरात आणला. जिल्हा या प्रशासनाच्या विभागाचा विकास ब्रिटिश काळात झाला. स्वातंत्र्योत्तर काळात आपण ब्रिटिशकालीन पद्धती चालू ठेवली. जिल्हा शब्दाचा शब्दकोशामध्ये पुढील अर्थ विशद केलेला आढळतो. चेंबर्स शब्दकोशात जिल्हा म्हणजे 'विभागाचा उपविभाग' हा अर्थ नमूद केलेला आहे तर लघु ऑक्सफर्ड शब्दकोशात जिल्हा म्हणजे विशिष्ट भूभाग यांच्या निर्मितीचा हेतू प्रशासनाचे विशेष कार्य असते हा अर्थ होय." शब्दकोशात व्यक्त केलेल्या अर्थातून जिल्हा प्रशासनाची नेमकी कल्पना येत नाही. जिल्हा प्रशासनाबद्दलची सर्वसमावेशक माहिती अर्थ लक्षात यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या काही अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या दिलेल्या आहेत

) श्री. एस. एस. खेरा - जिल्हा प्रशासन हे लोकप्रशासनाचे एक अंग असून जिल्ह्याच्या मर्यादित कार्यक्षेत्रात ते कार्य करीत असते.

) ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार- जिल्हा प्रशासन म्हणजे एका विशिष्ट भूभागात विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी केले जाणारे सार्वजनिक कार्याचे व्यवस्थापन होय.

 ) पुले बर्नेल- जिल्हा हा एका प्रशासकीय जिल्ह्याचे तांत्रिक नाव आहे. ज्यामध्ये संपूर्ण ब्रिटिश भारताचे विभाजन झालेले होते.

) डॉ. एम. पी. शर्मा- प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे लहान लहान भागात केलेले विभाजित भाग म्हणजे जिल्हा प्रशासन होय.

) जिल्हा प्रशासन हे लोकप्रशासनाचे अंग असून जे जिल्ह्याच्या मर्यादित भूप्रदेशासाठी चालविले जाते.

जिल्हा प्रशासनाच्या दिलेल्या व्याख्येवरून जिल्हा म्हणजे नेमके काय ते लक्षात येते. केंद्र आणि राज्य प्रशासनाच्या खालोखाल जिल्हा प्रशासन हे महत्त्वाचे मानले जाते. जनतेच्या जिव्हाळाशी संबंधित अनेक कार्य जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागते. त्यामुळे जनतेचा जिल्हा प्रशासनाशी अत्यंत जवळचा संबंध असतो. केंद्र आणि राज्य प्रशासनातील दुवा हा जोडणारा पूल म्हणूनदेखील जिल्हा प्रशासनाचा विचार केला जातो. जिल्हा प्रशासन हा भारतीय प्रशासन व्यवस्थेचा पाया असला तरी संविधानात त्याबद्दल स्वतंत्र तरतूद केल्याचे दिसून येत नाही.

जिल्हा प्रशासनाची वैशिष्ट्ये- भारताच्या प्रशासकीय संरचनेत जिल्हा प्रशासनाला विशिष्ट स्वरूपाचे स्थान आणि स्वतंत्र ओळख प्रदान केलेली आहे. केंद्र प्रशासन आणि राज्य प्रशासनापेक्षा वेगळ्या स्वरूपाची वैशिष्ट्ये जिल्हा प्रशासनात आढळून येतात.

 

) जिल्हा प्रशासनाचे मुख्य कार्य म्हणजे राज्य प्रशासन आणि स्थानिक प्रशासन (गाव तालुका प्रशासन) यात दुबा वा मध्यस्थ म्हणून काम पाहणे असते.

) जिल्हा प्रशासनात पदसोपान वा उतरंड दिसून येते. सर्वांत प्रथम जिल्हा कार्यालये, त्यानंतर तहसिल कार्यालय, मंडळ कार्यालय, तलाठी कार्यालये अशी रचना आढळून येते.

) एका जिल्ह्यात ते १२ पर्यंत तालुके असू शकतात. एका तालुक्यात १०० ते १५० गावांचा समावेश असतो. जिल्ह्यात साधारणत: ६०० ते १८०० पर्यंत गावांचा समावेश असू शकतो. लोकसंख्या साधारणत: १० ते २० लाखांच्या दरम्यान असते. लोकसंख्या आणि गावाचे प्रमाण निश्चित नसते. जिल्हा निर्मितीचा अधिकार राज्य शासनाला असल्यामुळे शासन आपल्या सोयीप्रमाणे जिल्ह्याची निर्मिती करत असल्यामुळे राज्याराज्यांत गाव लोकसंख्येचे प्रमाण भिन्न भिन्न असू शकते.

) जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. तो जिल्ह्यातील सर्व विभागांचा प्रमुख, नियंत्रक, समन्वयक आणि मार्गदर्शक असतो

) राज्य शासनाची सर्व अभिकरणे वा कार्यालये हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. केंद्र शासनाची काही कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू केलेली असतात.उदाहरणार्थ, आयकर विभाग

) लोकशाही विकेंद्रीकरणाचा एक घटक म्हणून पंचायतराज मधील जिल्हापरिषदनावाची संस्था जिल्हा मुख्यालयी स्थापन केलेली असते. जिल्हापरिषदेकडे विकास योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिलेली असते. जिल्हा परिषद संस्थेमुळे जिल्हा प्रशासनावरील कामाचा ताण हलका होण्यास हातभार लागलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडील विकास कार्य जिल्हापरिषदेकडून पार पाडली जातात.

) भारतात लोकसभा मतदारसंघ निर्माण करताना जिल्हा हा निर्वाचन क्षेत्र मानला जातो. जिल्ह्याचा आकार वाढल्यास एका जिल्ह्याचे दोन मतदारसंघात विभाजन केले जाते वा जिल्ह्यातील काही भाग दुसऱ्या जिल्ह्याच्या मतदारसंघाला जोडला जातो. उदाहरणार्थ, नाशिक जिल्ह्यातील काही भाग धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे.

) जिल्हा हा सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीचे केंद्र मानला जातो. प्रत्येक जिल्ह्यातील लोकांची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख भिन्न भिन्न स्वरूपाची असू शकते. या सांस्कृतिक ओळखीच्या आधारावर जिल्ह्याचे वेगळेपण अधोरेखित केले जाऊ शकते.

वरील वैशिष्ट्यांचा विचार करता जिल्हा प्रशासन हे भारतात प्राचीन काळापासून ते आजपर्यंत प्रशासनाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून ओळखले जाते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.