राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना
(Raju Shetti and Swabhimani Shetkari Sanghtana) - अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी नेते मानले जातात. राजू शेट्टी हे शरद जोशींच्या बरोबरीने शेतकरी संघटनेत कार्य करीत होते. शरद जोशी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी झालेल्या वैचारिक मतभेदातून त्यांनी संघटना सोडली. २००१ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आहेत. २००४ मध्ये संघटनेच्या नेत्यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. राजू शेट्टी हे पक्षाचे अध्यक्ष तर सदाभाऊ खोत हे प्रवक्ते होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रामुख्याने ऊस व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देत आलेली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील साखर लॉबीकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शोषणाच्या विरोधात संघटनेने सातत्याने लढे दिले. महाराष्ट्रात जवळपास २ कोटी ५ लाख ऊस उत्पादक आहेत. १८८ साखर कारखाने आहेत. साखर कारखानदाराकडून शेतकऱ्यांची संघटितपणे लूट केली जाते. ऊसाला हमी भाव मिळावा यासाठी संघटनेने रास्ता रोको, ऊस तोडणीस बंदी, साखर कारखान्यावर बहिष्कार इत्यादी मार्गाचा वापर केला. ऊसाला हमी भाव मिळावा म्हणून संघटनेने सातत्याने प्रयत्न करत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंथन करण्यासाठी संघटना ऊस उत्पादक परिषद बोलविते. या परिषदेत ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. दुधाच्या भावावरून संघटनेने सातत्याने आंदोलने केली,
स्वाभिमानी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संघटनेने शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न उचलून धरलेला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी वा सातबारा कोरा करावा ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. राजू शेट्टी सर्वप्रथम २००२ मध्ये उदगाव मतदार संघातून जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आले. २००४ मध्ये शिरोळ मतदार संघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. २००९ मध्ये हातकणंगले मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. निवडणुकीत त्यांनी शेतकऱ्यांकडून एक एक रुपया निवडणूक निधी घेऊन निवडणूक लढविली. त्यांनी लढविलेल्या निवडणुका चर्चेचा विषय ठरला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या आश्वासनामुळे स्वाभिमानी पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा घटक पक्ष बनला. सदाभाऊ खोत यांनी माढा मतदार संघातून तर राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविली. सदाभाऊ खोत पराभूत झाले तर राजू शेट्टी विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत पक्षाने भाजपसोबत युती केली. भाजप शिवसेना युतीच्या सरकारला पाठिंबा दिला. पाठिंब्याच्या मोबदल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांचा विधानपरिषद सदस्य आणि काही काळानंतर मंत्रिमंडळात समावेश केला. सदाभाऊ खोत हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात शेती, बागकाम आणि पणन खात्याचे मंत्री आहेत. कर्जमाफीच्या प्रश्नावरून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद झाले. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी पक्षातून बाहेर पडून 'रयत क्रांती' संघटनेची स्थापना केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राजू शेट्टी हे एनडीएतून बाहेर पडले आणि काँग्रेस पक्षाशी हातमिळविणी करत आहेत.
शरद जोशींच्या प्रमाणेच राजू शेट्टींच्या राजकारणाबद्दलच्या धरसोड वृत्तीचा परिचय वेळावेळी दिलेला आहे. शरद जोशी यांनी हिंदुत्ववादी शक्तीशी केलेल्या सलगीमुळे शेट्टी बाहेर पडले. स्वतः त्यांनी हिंदुत्ववादी शक्तीशी हातमिळविणी केली. हात पोळले गेल्यानंतर परत काँग्रेसच्या छत्रछायेत येण्याचा प्रयत्न सुरू केला. हा त्यांचा राजकीय प्रवास शेतकऱ्यांच्या मनाला वेदना देणारा आहे. शेतकरी चळवळीचे नेते राजकारणात शिरल्यामुळे चळवळींचा बट्ट्याबोळ होता हा इतिहास आहे; पण इतिहासापासून धडा न घेता नेते राजकारणातभाग घेतात. तत्त्वाला मुरड घालून युती वा आघाडी करतात. चळवळ राजकारणाच्या दावणीला बांधून मोकळे होतात हाच अनुभव शेट्टींच्या चळवळीत लोकांना आला. राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यावर अनेक टीका केल्या जात असल्या तरी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी चळवळ टिकवून ठेवण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. पश्चिम महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकन्यांची मोठी ताकद त्यांच्या नेतृत्व व संघटनेच्या मागे उभी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारा आणि आवाज उठविणारा प्रभावशाली दबावगट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.