https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राज्यशास्त्र अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती Political Science meaning, Nature and Scope


 राज्यशास्त्र अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती:-

राज्यशास्त्राच्या निर्मितीपासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या अडिच हजार वर्षाच्या विश्लेषणास पारंपरिक राज्यशास्त्र असे म्हटले जाते. 'पारंपरिक' हा शब्द अभ्यासविषय, अभ्यासपद्धती, अभ्यास दृष्टिकोन आणि विषयाचे स्वरूप इत्यादी गोष्टीत झालेल्या व्यापक आणि मूलगामी परिवर्तनाच्या आधारावर वापरलेला आहे. व्युत्पत्तिशास्त्रदृष्टया Politics या संज्ञेचा जन्म Polis या ग्रीक शब्दापासून झालेला आहे. त्याचा मूळ अर्थ "शहराच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेला किल्ला" असा आहे. नंतरच्या काळात Polis शब्दाला विशेष अर्थ प्राप्त झाला. "स्वयंपूर्ण नगरामध्ये स्वतःचे संरक्षण करू शकणारा नियंत्रित श्रमविभाजन साधणारा आणि आपल्या विविध घटकामध्ये व्यवस्थित संबंध प्रस्थापित करणारा समाज" हा अर्थ लागला जाऊ लागला. राज्यशास्त्राचा जनक अॅरिस्टॉटलच्या यांनी आपल्या ग्रंथाला 'Politics' नाव दिल्यामुळे 'राज्यकारभाराचे शास्त्र' म्हणून पॉलिटिक्स हा शब्द प्रचलित झाला. राजकारण आणि राज्यशास्त्र या दोन्ही अर्थानि पॉलिटिक्स बऱ्याच काळापर्यंत वापरला जात होता. पुढे राज्यशास्त्रासाठी 'पोलिटिकल सायन्स' ही संज्ञा रूढ झाली. अॅरिस्टॉटल राज्यशास्त्राला 'शास्त्रांचे शास्त्र' किंवा सर्वश्रेष्ठ शास्त्र असे म्हणत असे. तत्कालीन ग्रीक नगरराज्यामध्ये राज्य आणि समाज यांच्यात भेद केला जात नसे. राज्याचे क्षेत्र संपूर्ण सामाजिक जीवनाला व्यापणारे होते. त्यामुळे राज्यशास्त्राचे स्वरूप सर्वसमावेशक होते. राज्यशास्त्र आणि नगरराज्याची व्याप्ती समान असल्यामुळे राज्यशास्त्रांला शाखांचे शास्त्र म्हटले जात असे. अॅरिस्टॉटलने १५८ नगरराज्याचा तुलनात्मक अभ्यास करून ही संज्ञा मांडली. अॅरिस्टॉटलने Politics या संकल्पना विचार नगरराज्यापुरता केलेला होता. 'नगरराज्याच्या व्यवहारांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र' हा अर्थ अनेक वर्ष अॅरिस्टॉटलच्या प्रभावाने रूढ होता. ग्रीक नगरराज्यांच्या ऱ्हासानंतर मोठमोठी साम्राज्ये निर्माण झाली. राज्याच्या भौगालिक सीमा व लोकसंख्या वाढत गेल्यामुळे स्वयंपूर्ण नगरराज्याची संकल्पना मागे पडली. रोमन साम्राज्याच्या उदयानंतर 'खाजगी बाबी' आणि 'सार्वजनिक बाबी' असा फरक केला जाऊ लागला. सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचा स्वतंत्रपणे विचार होऊ लागला. समाजातील अनेक संस्थासारखीच राज्य ही एक संस्था आहे हा विचार रूढ झाल्यामुळे राज्य संस्थेला सर्वोच्च स्थान राहिले नाही. या नवबदलातून साहजिकच राज्यशास्त्रात नव्या संकल्पना आणि नव सिद्धांताची मांडणी करणे गरजेचे बनले. रोमन काळ व युरोपातील प्रबोधन युगात विकसित झालेल्या संविधानिक व विधिशास्त्रीय दृष्टिकोनाच्या प्रभावातून शासनाशी संबंध असलेल्या गोष्टींचा अंर्तभाव राज्यशास्त्रात केला जाऊ लागला. तसेच औद्योगिक क्रांतीमुळे सामान्य माणसांचा राज्यकारभारात सहभाग वाढत गेल्यामुळे राज्यांना राष्ट्र राज्याचा संदर्भ प्राप्त होऊ लागला. राज्यसंस्थेची संकल्पना ग्रीक नगरराज्यापेक्षा संपूर्णतः वेगळी व व्यापक होती. राज्य संकल्पनेस कायद्यासाठी समान भूप्रदेशात सुसंघटित झालेले लोक या अर्थाने ही संकल्पना वापरली जाऊ लागली. पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यासात राज्य आणि त्यांच्या विविध घटकांचा अभ्यास हा मुख्य विषय बनला. परिणामत: राज्यशास्त्राच्या व्याख्या राज्य संस्थेच्या अनुषंगाने करण्यात येऊ लागल्या. या व्याख्येच्या अनुषंगाने पारंपरिक राज्यशास्त्र 'राज्य' संस्थेच्या अभ्यासभोवती केंद्रित होऊ लागले. राज्याचे स्वरूप, उत्पत्ती, कार्यक्षेत्र, व्याप्ती, अधिकार, मर्यादा इत्यादी राज्यशास्त्राचे अभ्यास विषय बनले. औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक पातळीवर घडलेल्या घडामोडीमुळे राष्ट्र राज्यांची संकल्पना अपुरी वाटू लागली. राज्य यंत्रणेच्या चौकटीबाहेर घडणाऱ्या राजकीय घडामोडी बाह्यतः गैरराजकीय वाटत असला तरी सूक्ष्म विचार केल्यात त्यांचे राजकीय संदर्भ ध्यानात येऊ लागतात. उदा. कामगार विरूद्ध व्यवस्थापन, ग्रामीण विरुद्ध शहरी हा संघर्ष वरकरणी अराजकीय वाटतो. परंतु त्यांचा सखोल अभ्यास केल्यास ह्या संघर्षाचे राजकीय स्वरूप लक्षात येतो. त्यातून राजकीय संस्था कोणत्या सामाजिक पर्यावरणात कार्य करतात यांचा विचार करणे गरजेचे बनले. राजकारण ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेनुसार समाजजीवनाच्या कोणकोणत्या क्षेत्राचा राज्यशास्त्रीय अध्ययनात समावेश करता येईल या संबंधीचे विचारमंथन राज्यशास्त्रात सुरू झाल्याने राज्यशास्त्राचे स्वरूप व अर्थ बदलण्यास सुरूवात झाली. पहिल्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घडामोडीतून जागतिक राज्याची कल्पना उदयाला आली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक संघटना स्थापन झाली. आधुनिक जागतिक सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने विचारमंथन सुरू झाले. राज्यशास्त्राचा अभ्यास राष्ट्रराज्या पुरता मर्यादित न राहता त्यास आंतरराष्ट्रीय संस्थाचा अभ्यास होऊ लागला. या परिस्थितीत राष्ट्रीय निष्ठा आणि आणि राष्ट्रीय सीमांतर्गत परिस्थितीच्या संदर्भात केला जाणारा राजकीय विचार अपुरा किंवा कालबाहय मानला जाऊ लागला. या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्यशाखाने नव्या संकल्पना शोधल्या पाहिजेत. आपल्या अभ्यासविषयाला नवे वळण दिले पाहिजे अशी जाणीव त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अध्यापन आणि संशोधकांना झाली. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर नवस्वतंत्र झालेल्या आफ्रोआशियाई देशातील राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करण्यासाठी पारंपरिक राज्यशास्त्राचे अभ्यास पद्धती अपुऱ्या पडू लागल्यामुळे आधुनिक राज्यशास्त्राच्या उदयाला चालना मिळाली.

पारंपरिक राज्यशास्त्राची व्याख्या :-

पारंपरिक राज्यशास्त्राची व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत.

 १) ब्लंटश्ली: यांच्यामते, राज्याच्या मूलभूत स्वरूपाचे, घटकाचे, व्यक्त स्वरूपाचे आणि विकासाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय.

२) पोलॉक : राज्याच्या स्वरूपाचे, विकासाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय.

३) आर.जी. गेटेल- यांच्यामते, भूतकालीन, वर्तमानकालीन व भविष्याकालीन राज्यसंस्था, राजकीय संघटना व राजकीय कार्य, त्याचप्रमाणे राजकीय संस्था व आधुनिक राजकीय विश्लेषण, राजकीय सिद्धांत यांचा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र होय.

पारंपरिक राज्यशास्त्र अभ्यासाची व्याप्ती :

पारंपरिक राज्यशास्त्राचा 'राज्य' हा मुख्य अभ्यासाचा विषय होता. परंपरागत राज्यशास्त्रीय लेखन राज्य संकल्पने भोवती केंद्रीत झालेले दिसते. पारंपरिक राज्यशास्त्राची व्याप्तीत पुढील अभ्यास विषयाचा समावेश होता.

१) राज्याची निर्मिती, उत्पत्ती, विकास, स्वरूप यांचे अध्ययन पारंपरिकराज्यशास्त्रात केले जात असे.

२) पारंपरिक राज्यशास्त्रात राज्याच्या उदय व उगमासंबंधी मांडलेल्या सिद्धांताचा अभ्यास अभिप्रेत होता.

३) राज्याच्या विविध अंगाचा अभ्यास केला जात होता.

४) पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यासात ज्याचे कार्यक्षेत्र व त्यासंबंधी सिद्धांताचे अध्ययनाला प्रमुख स्थान होते.

५) राज्य व्यवस्थेचे नियंत्रण करणाऱ्या शासन संस्थेच्या विविध घटकाचा त्यात वैधानिक, कार्यकारी आणि न्यायालयीन संस्था व कार्यपध्दतीचा अभ्यास होत असे.

६) राजकीय व्यवहारातील मूलभूत संकल्पना सार्वभौम व विधिनियम कायदा, कायद्याचे अधिराज्य इत्यादी संकल्पनाचा अभ्यास केला जात होता.

७) लोकशाही, समाजवाद, साम्यवाद, फॅसिझम इत्यादी महत्त्वपूर्ण विविध राजकीय तत्वप्रणालीचा उदय, विकास, महत्त्व आणि त्यातील मर्यादाचे अध्ययन केले जात होते.

८) राज्याच्या घटनात्मक व्यवहाराचा अभ्यास त्याप्रमाणे राजकीय संस्था व संघटनाचा व्यावहारिक कार्यपध्दतीचा अभ्यास केला जात असे.

९) आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय संस्था आणि संबंधाचा अभ्यास केला जात असे.

१०) राजकीय संस्था आणि संघटनाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास व्यावहारिक दृष्टिकोनातून न करता आदर्शवादी दृष्टिकोनातून केला जात होता.

पारंपरिक राज्यशास्त्राच्या व्याप्तीत राज्य संकल्पनेच्या संबंधित विविध संकल्पनाचा समावेश दिसतो. पारंपरिक राज्यशास्त्राचा राज्य हा प्रमुख विषय होता. राज्याचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आढावा घेणे, राज्याच्या संघटनात्मक संरचनेचा अभ्यास आणि राज्याशी संबंधित विविध संकल्पनाचा अभ्यास हा पारंपरिक राज्यशास्त्राच्या व्याप्तीत समावेश होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.