https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

घटनावाद अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये Constitutionalism nature and characteristics


 

घटनावाद  अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये


घटनावाद किंवा संविधानवाद ही संकल्पना आधुनिक काळात जन्माला आलेली असली तरी तिचे प्राचीन काळापासून अप्रत्यक्ष स्वरूपात अस्तित्व असल्याचे आढळून येते. घटना आणि घटनावाद हे शब्द व्यवहारात समानार्थी वापरले जात असले तरी त्यांच्यात भेद आहेत. घटनेमुळे शासनाचे स्वरूप, अधिकार, तसेच शासन आणि नागरिक यांच्या परस्पर संबंधाचा बोध होतो तर घटनावादाच्या माध्यमातून शासन व्यवस्था जनतेची आस्था, मूल्ये, आदर्श यांचा समावेश असलेल्या संविधानाच्या नियमानुसार कार्य करते की नाही हे पाहिले जाते. कारण निरंकुश शासन व्यवस्थेत देखील हुकूमशाहा घटना निर्माण करून राज्य चालू शकते परंतु त्या संविधानात जनतेचे आदर्श, राजकीय मूल्ये आणि इच्छा-आकांक्षांचा समावेश नसतो म्हणून या व्यवस्थेत घटना असली तरी ही व्यवस्था संविधान विरोधी असते. घटनेपेक्षा घटनावादाचा अर्थ जास्त व्यापक असतो. संविधानवाद असलेल्या व्यवस्थेत जनतेचे मूलभूत आदर्श प्रत्यक्ष व्यवहारात उपलब्ध असतात. त्यामुळे संविधानवाद हे केवळ प्रक्रियेचे नाव नसून राज्य अंतर्गत, शासन यांच्यावरील नियंत्रण तसेच अमूर्त व व्यापक स्वरूपाची मूल्ये, ऐतिहासिक परंपरा व भावी महत्वकांक्षाशी संबंधित असते. घटनावाद ही घटनेसारखी स्थिर स्वरूपाची संकल्पना नसून विकासात्मक प्रक्रिया आहे. मानवी समाज व्यवस्थेत काळाच्या ओघांमध्ये निर्माण झालेले आदर्श व मूल्ये यांचा वारसा सांगणारी प्रक्रिया असते. भारतीय संविधान 1946 ते 1950 या काळात तयार झालेले असले तरी भारतीय घटनावादाची बीजे त्या पूर्वीच्या काळापासून अस्तित्वात होती. भारतीय घटनाकारांनी घटना निर्माण करून संविधानवादाची अभिव्यक्ती केली याचा अर्थ घटनावादाला घटनेद्वारे व्यावहारिक रूप देणे शक्य होते.

घटना व घटनावाद फरक- घटना आणि घटनावाद या दोन्ही संकल्पना एकमेकांशी निगडित असल्या तरी त्यात पुढील प्रकारचा फरक आढळून येतो.

1. स्वरूप- घटनावादात प्रामुख्याने समाजाचे राजकीय उद्देश आदर्श, मूल्य यांचा समावेश होतो. या विशिष्ट उद्देशापर्यंत पोहोचण्याचे घटना एक साधन असते.

2. निर्मिती- घटनावाद ही एक सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया असते. प्रत्येक देशात मूल्ये आदर्श यांचा अनेक शतकापासून विकास होत आलेला असतो. परंतु संविधान एका विशिष्ट काळी निर्माण केलेले असते.

3. प्रतीक- घटनावाद ही एका विशिष्ट विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत असते. देशातील जनतेचे आदर्श. मूल्ये, आकांक्षांची मिळून एक विचारसरणी तयार होत असते तर घटना हे संघटनेचे प्रतीक असते. या प्रतीकातून सरकार, समाज, व्यक्ती यांचे संघटन आणि परस्पर संबंधाचा बोध होतो.

4. क्षेत्र- अनेक राज्यांचा संविधानवाद एकसारखा असू शकतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीनही मूल्यांचा स्वीकार सर्वच राष्ट्रांनी केलेला आहे. राष्ट्रांचा घटनावाद एकसारखा असला तरी प्रत्येक राष्ट्राचे संविधान भिन्न भिन्न असू शकते.

अशा प्रकारे घटना आणि घटनावाद यात फरक सांगता येतो.

घटनावादाची वैशिष्ट्ये- घटनावाद संकल्पनेची पुढील वैशिष्ट्ये सांगता येतात.

1.    घटनावाद ही संकल्पना मूल्यांची संबंधित असते. प्रत्येक राष्ट्रातील नागरिकांमध्ये असलेल्या मूल्ये, राजकीय आदर्श याच्यातून घटनावादाचा बोध होतो.

2.    घटनावाद ही संस्कृतीशी संबंधित संकल्पना आहे. देशात अस्तित्वात असलेल्या आदर्श, मूल्या मधून संस्कृती निर्माण होते. त्यामुळे घटनावाद ही संकल्पना जनतेच्या संस्कृतीशी संबंधित असते. आधुनिक काळात राजकीय समाजाचे स्वरूप व्यापक बनलेले आहे. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक विभिन्नता अस्तित्वात असते अशा राष्ट्रांमध्ये घटनावाद विभिन्न संस्कृतीमध्ये समन्वय निर्माण करण्याचे काम करतो.

3.    घटनावाद ही गतिशील संकल्पना आहे. प्रत्येक समाज व्यवस्थेत काळानुरूप मूल्ये आणि आदर्श बदलत असतात. त्यामुळे घटनावाद ही संकल्पना प्रगतीस पूरक मानली जाते. संस्कृतीच्या विकासासोबत घटनावादाचा देखील विकास होत असतो.


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.