https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

आंतरराष्ट्रवाद अर्थ, व्याख्या,विकास आणि आधारभूत तत्त्वे वा वैशिष्ट्ये : Internationalism meaning and Fundamental Principles


 

आंतरराष्ट्रवाद अर्थ, व्याख्या,विकास आणि आधारभूत तत्त्वे वा वैशिष्ट्ये : Internationalism

१९ व्या शतकाच्या अंतापर्यंत राष्ट्र-राज्य ही सर्वोच्च राजकीय संघटना मानली जात होती. परंतु २० व्या शतकात व्यक्तीच्या धारणेमध्ये बदल होऊ लागला, २० व्या शतकात घडलेल्या काही घटनांमुळे राष्ट्रवादाचे महत्त्व कमी होऊन आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण होऊ लागले. आंतरराष्ट्रवाद हा मानवी बंधुत्ववा मानवतावाद या आध्यात्मिक भावनेचे राजकीय रूपांतर आहे. आंतरराष्ट्रवाद मानवी समाजाच्या समानतेवर भर देतो. राष्ट्रा-राष्ट्रांतील मतभेद आणि अडथळे कमी करण्याचा प्रयत्न करतो. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सद्भावावर विश्वास व्यक्त करतो. राष्ट्रीय सार्वभौमत्वाची संकल्पना विसर्जित करून संपूर्ण मानवाचे एक विश्वराज्य निर्माण करणे हे आंतरराष्ट्रवादाचे प्रमुख ध्येय मानले जाते. आंतरराष्ट्रवाद हा राष्ट्रवादी भावनेचा एक विस्तार मानला जातो. आंतरराष्ट्रवाद राष्ट्रवादाला विरोध करत नाही. राष्ट्रवादात ज्याप्रमाणे नागरिक राष्ट्रासाठी त्याग व बलिदान करतात त्याप्रमाणे इतर राष्ट्राबद्दल सह-अस्तित्व, परस्पर सहकार्य विकसित करतात. आंतरराष्ट्रवादाच्या माध्यमातून जगातील सर्व राष्ट्रामध्ये विधायक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आंतरराष्ट्रवाद हा अखिल मानव जातीच्या कल्याणाचा विचार करणारी विचारधारा आहे. संपूर्ण विश्व एक राष्ट्र असून अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी प्रत्येक राष्ट्राने प्रयत्न करावा आणि व्यक्ती हीविशिष्ट राष्ट्राची नागरिक नसून संपूर्ण जगाची नागरिक आहे ही भावना आंतरराष्ट्रवादाचा पाया मानली जाते. राष्ट्रवाद ही संकल्पना राष्ट्राप्रति प्रेम आणि स्नेहभाव निर्माण करते, तर आंतरराष्ट्रवाद संपूर्ण विश्वाविषयी स्नेहभावना निर्माण करतो, म्हणून राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद परस्परविरोधी अवधारणा नसून परस्परपूरक अवधारणा आहेत. आंतरराष्ट्रवाद आंतरराष्ट्रीय पातळीवर सामंजस्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. सर्व राष्ट्र स्वतंत्रतापूर्वक जीवन व्यतीत करत असताना पारस्परिक सद्भावनेच्या आधारावर वागण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा संपूर्ण विश्व एक कुटुंब बनेल. आंतरराष्ट्रवादाचा उदय म्हणजे राष्ट्रवादाचा अंत नसून राष्ट्रा-राष्ट्रांत परस्पर सहयोगाच्या वातावरणाची निर्मिती होय. झिमर्नसारखा अभ्यासक सांगतो की, राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद ह्यांमध्ये विरोध नसून आंतरराष्ट्रीयवादाकडे राष्ट्रवादाच्या मार्गानेच जाता येईल.

आंतरराष्ट्रवादाच्या व्याख्या

. गोल्ड स्मिथ:- आंतरराष्ट्रवाद ही एक अशी भावना आहे की, व्यक्ती ही केवळ तिच्या देशाची नागरिक असत नाही, तर ती सर्व जगाची नागरिक असते.

२. विल्यम गॅरिसन:- आंतरराष्ट्रवाद हा व्यापक विचार असून संपूर्ण जग म्हणजे आपला देश, जगातले सर्व मानव म्हणजे आपले बांधव असे मानणारा आणि आपल्या राष्ट्राप्रमाणे इतर राष्ट्रांवरही प्रेम करायला शिकविणारी भावना म्हणजे आंतरराष्ट्रवाद होय.

३. आशिवार्दम:- राष्ट्रीय प्रतिष्ठा, शांततामय सहजीवनाच्या आधारावर समानतेच्या भूमिकेतून परस्परांना सहकार्य करणाऱ्या स्वयंशासित राष्ट्रांना एकत्र आणणारा विचार म्हणजे आंतरराष्ट्रवाद होय.

 

वरील व्याख्यांचा विचार करता आंतरराष्ट्रवाद व्यक्तींमध्ये जागतिक नागरिक ही संकल्पना रुजविण्यास मदत करतो. जगातील राष्ट्रांनी आपल्या विचार आणि कृतीच्या माध्यमातून परस्पर सहकार्य, सहअस्तित्व आणि सार्वभौमत्वाचा आदर विकसित करण्यास आंतरराष्ट्रवाद प्रोत्साहन देतो. स्वतःच्या राष्ट्रीय भावनांना बाजूला ठेवून आंतरराष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी सामूहिक कृती करण्यावर भर देतो. शांततेची आकांक्षा ठेवणाऱ्या राष्ट्रामधील सहजीवनाला आंतरराष्ट्रवाद संबोधिले जाते.

आंतरराष्ट्रवादाचा विकास :- आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना २० व्या शतकात उदयाला आलेली असली तरी तिची पाळेमुळे प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे आढळून येते. राज्य या संकल्पनेच्या उदयासोबतच राज्या-राज्यांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. उदा. ग्रीक नगरराज्याचा ऍम्फीक्टिओनिक लीग ग्रीकमधील स्टोईक तत्त्वज्ञानांनी वैश्विक बंधुभावाच्या सर्वप्रथम मांडल्याचे दिसते. नगरराज्याच्या हासानंतर जगात मोठीमोठी साम्राज्ये निर्माण झाल्यामुळे वैश्विक बंधुत्वाचा विचार मागे पडला. साम्राज्यांच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या संरजामशाही ही आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला पूरक नव्हती. रोमन सम्राटांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे युरोपियन लोकांमध्ये धर्माच्या आधारावर एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. ख्रिश्चन धर्म आणि पोपच्या वाढत्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रवादाच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण होऊ लागले. त्याच प्रभावातून १३ व्या शतकात दांते यांनी 'De Monarchia' (डी मोनेशिया) हा ग्रंथ लिहिला आणि त्यात सर्वप्रथम जागतिक संघराज्याची कल्पना मांडली. पायरी ड्युबीस या फ्रेंच विचारवंताने Recovery of Holi Land' या ग्रंथात आंतरराष्ट्रीय प्रश्न चर्चा आणि मध्यस्थीच्या मार्गांनी सोडवावेत हा विचार मांडला. युरोपियन राजे आणि ख्रिश्चन पोप यांच्यातील संघर्षामुळे पवित्र रोमन साम्राज्य नष्ट झाले. आधुनिक काळातील राष्ट्र-राज्ये निर्माण होण्यास सुरुवात झाली. या राष्ट्र राज्यांमधील संघर्षामुळे तणाव व युद्धाचे वातावरण निर्माण होऊ लागले. वातावरणातील तणाव व संघर्ष कमी करण्यासाठी राज्या-राज्यांतील संबंधांच्या नियमांची चर्चा सुरू झाली आणि चर्चेच्या फलश्रुतीतून आंतरराष्ट्रीय कायद्याचा विकास होऊ लागला. ह्युगोग्रोशियससारख्या विचारवंताने आंतरराष्ट्रीय कायद्याची मांडणी केली. राष्ट्रांनी परस्परांशी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर व्यवहार करावेत हा सल्ला दिला. सतराव्या शतकात सली यांनी 'The Grand Design' आणि विल्यम पेन यांनी 'Present and Future of Peace of Europe' या धात आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये सहकार्य निर्माण करणाऱ्या अनेक उपाययोजन सुचविल्या. करारवादी विचारवंत रूसो यांनी १७६१ मध्ये जागतिक संघराज्याची कल्पना मांडली. राज्यांनी परस्परांतील वाद लवादाच्या माध्यमातून सोडवावे, जागतिक संघराज्याने प्रादेशिक अखंडतेची हमी द्यावी, जागतिक संघराज्याची मध्यवर्ती संसद असावी आणि त्यात सर्व राज्यांना समान अधिकार असावा आणि करार भंग करणाऱ्या राष्ट्राविरोधात लष्करी कारवाई करावी इत्यादी सूचना केल्या. रूसोच्या विचारप्रभावातून जेरेमी बेंधम यांनी 'Priciples for International Law या ग्रंथात बुद्ध टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची तत्त्वे मांडली. इमॅन्यूअल कॉट यांनी Towards Eternal Peace' या ग्रंथात आंतरराष्ट्रीय संघराज्याची कल्पना मांडली. आंतरराष्ट्रवादाच्या वाढत्या प्रभावामुळे १८१७ मध्ये व्हिएन्ना येथे ब्रिटन, रशिया, ऑस्टिया आणि प्रशिया या चार बड्या राष्ट्रांनी पवित्र युती केली. परस्परांतील वादग्रस्त प्रश्न विचारविनिमयाने सोडविण्याचे मान्य केले. या पवित्र युतीचे पुढे युरोपीय मंडळात (Concert of Eupore) रूपांतर झाले. १९ व्या शतकात विभिन्न क्षेत्रांत सहकार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांची स्थापना झाली. १८९९ आणि १९०७ मध्ये भरलेल्या हेग परिषदेत आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेच्या आधारावर हेग या ठिकाणी कायमस्वरूपी लवाद न्यायालय स्थापन झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्याची भावना विकसित होत असताना वसाहती मिळविण्यासाठी युरोपियन राष्ट्रांनी चालविलेल्या स्पर्धेमुळे पहिले महायुद्ध सुरू झाले. पहिले महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष विल्ड्रो विल्सन यांच्या प्रेरणेने १९१९ मध्ये राष्ट्रसंघाची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेस पुढाकार घेणाऱ्या बिल्ड्रो विल्सन यास अमेरिकन सिनेटने राष्ट्रसंघाचे सदस्य होण्यास रोखले. राष्ट्रसंघाच्या रचनेतील उणिवा, इंग्लंड आणि फ्रान्समधील सुप्त संघर्ष यांमुळे संघाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला फारसे यश लाभले नाही. राष्ट्रसंघाला हिटलर आणि मुसोलिनीच्या आक्रमण कारवाया थांबविता आल्या नाहीत. राष्ट्रा-राष्ट्रांतील वाढता तणाव, वसाहती मिळविण्यासाठी चालेली स्पर्धा आणि हिटलर व मुसोलिनीच्या साम्राज्यवादी आणि आक्रमक वृत्तीमुळे दुसरे महायुद्ध घडून आले. या महायुद्धामुळे जगाची अपरिमित वित्त आणि मनुष्यहानी झाली. भविष्यकालीन काळात असे महायुद्ध घडल्यास मानवजात शिल्लक राहणार नाही ही जाणीव निर्माण झाल्यामुळे महायुद्धकाळात आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा विचार प्रभावी बनू लागला. १९४१ साली अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट आणि इंग्लंड पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्यातील चर्चेतून तयार केलेल्या अटलांटिक सनदेत आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेचे बीजारोपण झाले. अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी १ जानेवारी १९४२ मध्ये संयुक्त राष्ट्रे(United Nations) या संकल्पनेची घोषणा केली. कासाब्लाका परिषदेत (१९४३) फ्रान्सने आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेला समर्थन दिले. मॉस्को परिषदेत आंतरराष्ट्रीय संघटना स्थापनेवर आम सहमती होऊ लागली. डंबस्टोन ओकस प्रस्तावातून संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेच्या कल्पनेस स्पष्ट रूप प्राप्त झाले. डंबस्टोन ओकस प्रस्तावावर २१ ऑगस्ट ते ७ ऑक्टोबर १९४४ मध्ये दोन टप्प्यांत चर्चा झाली. फेब्रुवारी १९४५ मध्ये •याल्टा परिषदेत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या रचनेवर सविस्तर चर्चा झाली. सॅन फ्रान्सिस्को परिषदेत संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेच्या दिशेने अंतिम पाऊल पडले. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी सुरक्षा परिषदेतील पाच कायम सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिल्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेची अधिकृत स्थापना झाली.

अशा प्रकारे प्राचीन काळापासून ते युनोच्या स्थापनेपर्यंत आंतरराष्ट्रवाद संकल्पनेच्या विकासाचा इतिहास सांगता येतो.

आंतरराष्ट्रवादाची आधारभूत तत्त्वे वा वैशिष्ट्ये :- आंतरराष्ट्रवाद हा व्यापक स्वरूपाचा विचार आहे. संपूर्ण विश्वातील मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या आंतरराष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये वा तत्त्वे सांगता येतात.

१. आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना वैश्विक पातळीवर बंधुभाव वा भ्रातृभाव यांच्या निर्मितीला महत्त्व देते.

२. -आंतरराष्ट्रवाद राष्ट्रवाद नष्ट करण्याची भाषा करत नाही, परंतु राष्ट्रवादाचा विस्तार करून व्यक्तीमध्ये जागतिक नागरिक ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करतो.

३. आंतरराष्ट्रवाद जागतिक शांतता, राष्ट्रा-राष्ट्रांतील परस्पर सहकार्य आणि सहअस्तित्व वा सहजीवनास प्राधान्य देतो.

 ४. आंतरराष्ट्रवाद राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये मैत्रीचे बंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

५. आंतरराष्ट्रवाद हा आक्रमणकारी वृत्ती, युद्ध, वसाहतवाद आणि साम्राज्यवादी वृत्तीला विरोध करतो.

६. आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांततामय व सनदशीर आणि नैतिक पद्धतींचा अवलंब करण्यास महत्त्व देतो. ७. आंतरराष्ट्रवाद राष्ट्रा-राष्ट्रांतील प्रश्न आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यास प्राधान्य देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.