https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राष्ट्रवाद संकल्पना, अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि महत्व Nationalism Concept Meaning, Nature and Importance


 राष्ट्रवाद संकल्पना, अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि महत्व-

राष्ट्रवाद विचारसरणीचा उदय १८ व्या शतकात झाला असून, याच शतकाच्या पासून तिच्या विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आढळते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी कोणत्याही राज्यशास्त्रज्ञाने राष्ट्रवादाविषयी तत्त्वज्ञान प्रस्तुत केलेले नाही, हे खरे असले तरी काही अभ्यासकांच्या मते राष्ट्रवाद ही जुनी संकल्पना आहे. ज्यू, ग्रीक आणि भारतीय लोकांमध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची भावना अस्तित्वात होती, असे मानले जाते. राष्ट्रवाद हा शब्द प्रत्यक्षात वापरण्यात आलेला नसला तरी त्याला पूरक असणाऱ्या भावना प्रवृत्ती आणि प्रेरणा अनेक शतकांपासून विकसित होत आलेल्या आहेत.. राष्ट्रवादाची बीजे प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसून येते. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे राजकीय सत्ता लोकांच्या हातात आल्यामुळे राष्ट्रवादाच्या विकासाला मदत झालेल दिसते. राष्ट्रवाद ही संकल्पना फ्रेंच राज्यक्रांतीचा परिपाक आहे. रॉयल इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेल्या 'नॅशनॅलिझम' या ग्रंथातदेखील हे नमूद केलेले आहे..

राष्ट्रवाद ही संकल्पना आधुनिक काळात एक महान शक्ती मानली जाते. राजकीय शक्ती वा संकल्पनेच्या स्वरूपात राष्ट्रवादाचा उदय १८ व्या शतकात झाला. राष्ट्रवाद  संकल्पना समजण्याआधी राष्ट्र (Nation) आणि राष्ट्रीयता (Nationality) या शब्दांचा सर्च लक्षात घेणे गरजेचे आहे. या दोन्ही शब्दांची उत्पत्ती Natus या लॅटिन शब्दापासून झालेली आहे. त्याचा अर्थ जन्म वा वंश असा होता. युरोपमध्ये सुरुवातीला राष्ट्र हा शब्द वॉशिक एकता या अर्थाने वापरला जात असे. राष्ट्र म्हणजे वांशिक एकता आणि रक्तसंबंधामुळे निर्माण होणारा एकात्म समाज असा होता. राष्ट्र हा अशा प्रकारचा जनसमुदाय असतो की, ज्यात जीवनाचे समान आदर्श, एकच संस्कृती, समान भाव-भावना, समान निष्ठा आणि समान परंपरा असते आणि त्यामुळे त्या समाजाची विशिष्ट जीवनपद्धती विकसित होत असते. एखाद्या विशिष्ट भूभागावर राहणाऱ्या आणि समान परंपरा व आकांक्षा, भूतकाळाच्या अनुभवातील समान स्मृती, शत्रू-मित्रत्वाच्या समान भावना आणि सर्वांचे एकमेकांशी निगडित असलेले हितसंबंध असणाऱ्या अशा एकसंध जनसमुदायाला राष्ट्र म्हटले जाते. राष्ट्र हे इतिहासक्रमातील स्थित्यंतरातून निर्माण केले जाते. बेनिडिक्ट अॅन्डर्सन यांच्या मते, राष्ट्र हा कल्पित समूह आहे, ज्यातील लोक है समान भूप्रदेश, संस्कृतीच्या बंधनांनी बांधलेले असतात. एकता हे राष्ट्राचे सर्वात प्रभावी वैशिष्ट्य असून त्यांची निर्मिती विविध प्रकारच्या दृश्य घटना आणि प्रतिनिधित्वाद्वारे केली जाते. त्यात उत्सवी घटना, माध्यमातील प्रतिमा आणि प्रतीके यांचा समावेश असतो'. ॲन्डर्सन यांची राष्ट्र संकल्पना एकता निर्माण करताना विविधतेला नष्ट करने आणि विविध हितसंबंधी गट आणि त्यांच्या वर्चस्ववादी स्थानाचे नैसर्गिककरण करते. राष्ट्र संकल्पना एकता प्रस्थापित करण्यासाठी बहुविविधता नाकारते. पिल्सबरी या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने राष्ट्रीयतेला मानसिक अवस्था म्हटले आहे. तो राष्ट्राची व्याख्या करताना सांगतो की, राष्ट्र म्हणजे स्वतःला एकात्म मानणारा समूह होय. एका विशिष्ट मर्यादित तो गटाच्या हितासाठी व्यक्तिहितास तिलांजली देण्यास प्रवृत्त होतो... या समूहातील प्रत्येक व्यक्ती समूहाच्या प्रगतीने आनंदित होतात, तर समूहाच्या संकटाने व्यतीत होतात. राष्ट्राचे सुखदुःख हे स्वतःचे सुखदु:ख मानतात. सुरुवातीला राष्ट्र आणि राष्ट्रीयता शब्द समान अर्थाने वापरले जात होते. एकोणिविसाव्या शतकात राष्ट्र आणि राष्ट्रीयता हे शब्द भिन्न अर्थाने वापरले जाऊ लागले. राष्ट्र हा शब्द राजकीय स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाशी निगडित आहे. राष्ट्रीयता ही एक अराजकीय मान्यता असून विदेशी नियंत्रणाखाली असलेल्या समुदायातदेखील असू शकते. राष्ट्रीयतेची सर्वमान्य व्याख्या करणे शक्य नाही. लोकांमध्ये एकत्र राहण्याच्या आकांक्षेला राष्ट्रीयता म्हटले जाते. ब्लंट्रली सांगतो की, राष्ट्रीयता विभिन्न व्यवसाय आणि आनुवांशिक समाजातील अशा वर्गांचा समूह की ज्यांची चेतना, भावना एक असते आणि जो भाषा, परंपरेद्वारा एका समान सभ्यतेच्या स्वरूपात विकसित होतो. ही सभ्यता त्या समूहात एकतेचे भान निर्माण करते. इतरांपेक्षा वेगळे आहोत हा भावदेखील निर्माण करते. उपरोक्त मताचा विचार केला तर राष्ट्र आणि राष्ट्रीयता ह्या संकल्पनेतील अंतर स्पष्ट होते.

राष्ट्रवाद ही संकल्पना राष्ट्र संकल्पनेशी निगडित वा संबंधित आहे. राष्ट्रवादात राष्ट्र, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय उत्कर्ष इत्यादी संकल्पनांचा समावेश आहे. राष्ट्रवाद अशा ऐतिहासिक प्रक्रियेचे सुतौवाच करतो की, ज्याद्वारे राष्ट्रीयता राजकीय एककाचे रूप धारण करते. या भावनेने प्रेरित समूह एक निश्चित स्वरूपाचे राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जगामध्ये आपले विशिष्ट स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रवाद समाजातील भावनात्मक आणि प्रेरणात्मक प्रवृत्तीतून निर्माण होत असतो. या संकल्पनेचा संबंध मानवाच्या बुद्धीशी नसून भावनेशी आहे. राष्ट्रवाद ही मानसिक व भावनिक संकल्पना आहे. संकल्पनात्मकदृष्ट्या राष्ट्रवादाचा अर्थ वेगळा आहे. व्यवहारात राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणे, राष्ट्राच्या कल्याणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणे, राष्ट्रासाठी सेवा करणे इत्यादी अर्थ घेतले जातात. राष्ट्रवादाची व्याख्या: राष्ट्रवाद ही अत्यंत गुंतागुंतीची संकल्पना आहे. राष्ट्रवादाची निश्चित आणि सर्वसामान्य अशी व्याख्या करणे अतिशय अवघड काम आहे. असे असले तरी काही विचारवंतांनी राष्ट्रवादाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

१. आशिर्वादम : यांच्या मते, राष्ट्रवाद ही एक ऐतिहासिक प्रक्रिया असून ज्यात राष्ट्रीयत्वाचे एका राजकीय घटकांत रूपांतर होऊन, आपल्या वैधानिक हक्कासाठी लोक राष्ट्राची निर्मिती करतात.

२. हॅन्सकोहन : यांच्या मते, राष्ट्रवाद ही प्रथमतः आणि मुख्यत: मानसिक अवस्था आहे. आत्मीयतेच्या जाणिवेची ती कृती आहे.

३. आल्फ्रेडगाझिया : यांच्या मते, राष्ट्रवाद म्हणजे स्वदेशाबद्दलचे प्रेम आणि परकीयांबद्दलचा संशय या दोन्ही भावनांचे एकत्रीकरण होय.

४. लुई साईन्डर : यांच्या मते, निश्चित स्वरूपाच्या भौगालिक क्षेत्रात राहणाऱ्या; समान भाषा, रूढी, परंपरांनी प्रभावित झालेल्या; समान धर्म असणाऱ्या लोकांची मानसिक एकता म्हणजे राष्ट्रवाद होय.

 

राष्ट्रवादाची सर्वमान्य व्याख्या करता येत नसली, तरी वरील व्याख्यांवरून त्याचे  स्वरूप निश्चित करता येते. राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी समूहांमध्ये काही समान मूल्य वा घटक असणे गरजेचे असते. समान भूप्रदेश, समान रूढी, परंपरा व इतिहास, समान राजकीय आकांक्षा इत्यादी घटकांमुळे समूहातील सदस्यांमध्ये एकता आणि आपलेपणाची भावना निर्माण होते. आपण सर्व एक आहोत आणि इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना राष्ट्रवाद निर्मितीला पोषक वातावरण निर्माण करते. त्यामुळे राष्ट्रवाद ही मानसिक व भावनिक संकल्पना मानली जाते. राष्ट्रवादाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रत्याग व राष्ट्राप्रति समर्पणाची भावना नागरिकांमध्ये निर्माण करता येते. त्यामुळे आधुनिक काळात ही संकल्पना सर्वांत शक्तिशाली तसेच विध्वंसकारीदेखील मानली जाते.

राष्ट्रवादाचे स्वरूप : राष्ट्रवाद ही एक मानसिक किंवा भावनिक अवस्था असून त्यात स्वदेश प्रेम, मातृभाषा, स्वकीय, स्वसंस्कृती, साहित्य, इतिहास, लोकपरंपरा व श्रद्धा, धर्म आणि वंश यांबद्दल आत्मीयता व आस्था निर्माण होते. आपल्या देशात राहणाऱ्या व्यक्तीबद्दल आपुलकी वा आपलेपणाची भावना निर्माण होऊन लोकांमध्ये ऐक्य निर्माण होत असते.

१. राष्ट्रवाद या मानसिक भावनेमुळे आपल्या राष्ट्राविषयी प्रेमाची भावना निर्माण होते. त्यासोबत दुसऱ्या राष्ट्राविषयी साशंकतेची भावनादेखील निर्माण होत असते. त्यामुळे स्वकीयांबद्दल प्रेम व परकीयांबद्दल अलगतेची भावना विकसित करण्यास राष्ट्रवाद हातभार लावतो.

२. राष्ट्रवादाची भावना देशावर प्रेम करावयास लावणारी मानसिक अवस्था आहे. राष्ट्रप्रेमाने भारलेले नागरिक साहजिकच राष्ट्रासाठी कोणताही त्याग करण्यास तयार होतात. राष्ट्रभक्तीने भारलेले लोक देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास केव्हाही तयार असतात. अशा व्यक्तींच्या त्यागातून राष्ट्रविकासाचा पाया रचला जातो.

३. राष्ट्रवादाने प्रेरित झालेल्या विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या समूहात आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व असावे ही आकांक्षा निर्माण होण्यास प्रारंभ होतो. उदा. ज्यू वंशीयांतील आत्मीयतेतून इस्त्रालय राष्ट्राची निर्मिती झालेली दिसते.

४. राष्ट्रवादाने भारलेल्या व्यक्तींना आपले स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असावे असे वाटते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाल्यावर भारतीय स्वातंत्र्य चळवळ गतिमान बनली. भारतीयांनी ब्रिटिशांच्या नियंत्रणापासून मुक्तीसाठी स्वातंत्र्याची हाक दिली. या हाकेस जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. ५. व्यक्तिगत जीवनात धर्माला जे स्थान आहे ते स्थान राष्ट्राच्या जीवनात राष्ट्रवादाला आहे. राष्ट्रवाद राष्ट्राविषयी प्रेम विकसित करत नसून, राष्ट्रासाठी बलिदानाची भावनासुद्धा निर्माण करत असतो. उदा. भारतीय स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी केलेले बलिदान होय. ६. राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून राष्ट्राची निर्मिती होत असते. राष्ट्रीयत्व ही मनाची विशिष्ट अशी अवस्था आहे. त्या अवस्थेतून व्यक्ती-व्यक्ती राजकीय संबंध निर्माण होत असतात.

७. राष्ट्रवादाचा संबंध राष्ट्रीय प्रगती व विकासासाठी जोडला जातो. राजकीय आणि सामाजिक ऐक्य आणि राष्ट्राप्रति आत्मीयता राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. उच्च राष्ट्रीयता असलेल्या समाजाची लवकर प्रगती होत असते.

८. समान मूल्यातून राष्ट्रवादाची भावना निर्माण होत असल्याने, राष्ट्रवादातून ऐक्य भावना विकसित होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.