दलित चळवळीचे यशापयश किंवा मूल्यमापन - भारतीय समाजाच्या
पुनरंचनेचे स्वप्न पाहात उभी राहिलेली दलित चळवळ आज अडीचशे वर्षांची झाली. महात्मा
फुले यांच्या कार्यापासून सुरू झालेल्या दलितांच्या संघर्ष यात्रेला दलितेतर आणि
दलित समाजाच्या समाजसुधारकांनी पाया उपलब्ध करून देण्याचे काम केले. आंबेडकरांच्या नेतृत्वाने दलित चळवळीच्या कळस उभारणीचे कार्य केले.
आंबेडकरांच्या रूपाने चळवळीला शास्त्रशुद्ध वळण देणारा महापुरुष मिळाला..
आंबेडकरांच्या निधनानंतर योग्य नेतृत्वाअभावी चळवळ भरकटली. चळवळीतील ऐक्य भंगले.
भावनिक प्रश्नापुरते चळवळीतील लोक एकत्र येतात. भावनेचा भर ओरसला की परत चळवळ
म्यानात जाते. दलित चळवळीचे मूल्यमापन करताना चळवळीमुळे झालेल्या सामाजिक बदलांचा
आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.
दलित चळवळीचे यश - दलित चळवळ ही भारतातील एक महत्त्वपूर्ण चळवळ मानली जाते.
प्रत्येक चळवळींचा अभ्यास करताना तिच्या यशापयशाचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण चळवळीच्या दोन्ही बाजूंचा जोपर्यंत
शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून अभ्यास केला जात नाही तोपर्यंत चळवळीबाबत
भाकितकथन करणे योग्य होणार नाही. दलित चळवळीच्या यशाचा विचार करता या चळवळीने अनेक
नेते समाजाला उपलब्ध करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते मायावतींपर्यंत
असे असंख्य नेते या चळवळीतून निर्माण झालेले दिसतात. या चळवळीचा सर्वांत मोठा लाभ
म्हणजे दलित समाजात आत्मभान निर्माण झाले. हा गावकुसाबाहेर राहणारा समाज सर्व प्रकारच्या
संधी आणि सवलतींपासून वंचित होता. या समाजाला चळवळीतून आत्मभान निर्माण झाल्यामुळे
शिकू लागला आणि त्यांच्यात जागृती येऊ लागली आणि तो आपल्या हक्कांसाठी संघर्ष
करण्यास तयार होऊ लागला. दलित चळवळीने केलेल्या नामांतर, भूमिहीन
सत्याग्रह इत्यादी विविध चळवळींमुळे दलित समाजात अस्मितेची भावना निर्माण होऊन
समाजात ऐक्य विकसित झाले. दलित चळवळीतून दलित साहित्याची निर्मिती झाली.
आंबेडकरांच्या विचार प्रेरणेतून दलित समाजात अनेक साहित्यिक जन्माला आले. त्यांनी
आत्मचरित्रात्मक स्वरूपात साहित्य प्रसिद्ध केले. सुरुवातीच्या काळात प्रस्थापित
लेखकांनी या साहित्याला नाके मुरडली. सद्य:स्थितीत दलित साहित्य हा मराठी
साहित्यातील प्रबोधनाचा प्रवाह मानला जातो. दलित चळवळींमुळे महाराष्ट्रातील इतर
समाजघटकांना प्रेरणा मिळाली. विशेषतः दलित चळवळींनी फक्त दलितांच्या
प्रश्नांपुरत्या चळवळी केल्या नाहीत. मंडल आयोग लागू करावा म्हणून संघर्ष केला.
याचा परिणाम इतर वंचित जातींमध्येदेखील जागृती निर्माण झाली. आंबेडकर व
फुल्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन इतर मागासवर्गीय जाती आणि आदिवासींमध्ये
चळवळी विकसित झाल्या. दलित समाजाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनामागे चळवळीने
महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसते. ‘शिका, संघटित व्हा आणि
संघर्ष करा' या मंत्रामधू दलित समाजाच्या लोकांनी मोठ्या
प्रमाणावर प्रेरणा घेऊन आपली शैक्षणिक प्रगती करून नोकऱ्या मिळविल्या त्यामुळे
दलित समाजाची आर्थिक परिस्थिती बदलली. आंबेडकरांच्या प्रेरणेने दलित समाजातील
लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे सांस्कृतिक परिवर्तनाला चालना मिळाली.
हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी आणि कर्मकांडापासून त्यांची कायमची सुटका झाली. बौद्ध
धर्म जातीव्यवस्था, कर्मकांड यांना स्थान देत नसल्यामुळे
समाजात एकात्मता आणि समतेला पूरक वातावरण निर्माण झाले. चळवळीमुळे दलित समाजाला
राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळाले. आरक्षणामुळे अनेक उच्च पदावर दलित
समाजातील लोक कार्यरत असताना दिसून येतात. राजकीय क्षेत्रात 'दलित' ही फार मोठी शक्ती म्हणून उदयाला आलेली दिसते.
या शक्तीचा विचार केल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला पुढे जाता येणार नाही;
म्हणून दलित समाजामध्ये राजकीय जागृती, शैक्षणिक
जागृती, सांस्कृतिक परिवर्तन, आर्थिक
परिस्थितीत बदल, एकात्मता, समतेचे
आकर्षण, प्रगतीचा ध्यास इत्यादी सर्व गोष्टी दलित चळवळीमुळे
निर्माण झालेल्या दिसतात. दलित समाज आज समाजातील सर्व क्षेत्रात अग्रेसर बनलेला
दिसतो. त्याचे श्रेय दलित चळवळीला द्यावे लागेल. दलित चळवळीचे यश पुढील
मुद्द्यांद्वारे थोडक्यात मांडता येते
१) दलित चळवळीमुळे दलित समाजात प्रबोधनाची सुरुवात झाली.
दलित वर्गाला आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली.
२) दलितांचे सांस्कृतिकरण करण्यात चळवळीने मोठ्या प्रमाणावर
योगदान दिले.चळवळीमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे दलित समाजात ऐक्य भावना निर्माण
झाली.
३) दलित चळवळीमुळे दलितांना आपल्या प्रश्नाची जाणीव झाली.
ते आपले प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमक झाले.
४) दलित चळवळीने मानवी हक्क व सामाजिक न्यायापासून वंचित
दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
५) या चळवळीमुळे दलित समाजात आत्मभान व प्रेरणा विकसित
होण्यास हातभार लागला.
६) दलित चळवळीमुळे दलितांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी नष्ट होण्यास
मदत झाली. त्यातून दलितांमध्ये राजकीय नेतृत्व निर्मिती, आरक्षण,
नोकरीच्या संधी, आर्थिक परिस्थितीत बदल हे
चांगले परिणाम घडले.
७) दलित चळवळींमुळे दलितांच्या सर्वांगीण विकासाला संधी
मिळाल्यामुळे दलित साहित्य, दलित रंगभूमी, दलित कलाकार, दलित
नेते निर्माण होऊ लागले.
(८) दलित चळवळीच्या माध्यमातून दलितांच्या प्रश्नाला
सार्वजनिक आवाज मिळाला. इतर समाजही त्यांच्याकडे प्रतिष्ठेने पाहू लागला. दलित
चळवळींमुळे दलित
दलित चळवळीच्या मर्यादा वा अपयश - समाजाला प्रेरणा मिळालेल्या असल्या तरी या
चळवळीच्या अनेक मर्यादा सांगितल्या जातात. या चळवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा
अपवाद वगळता योग्य नेतृत्व मिळाले नाही. आंबेडकरांच्या निधनानंतर योग्य
नेतृत्वाअभावी ही चळवळ दिशाहीन झालेली दिसून येते. चळवळीने काही काळ सामूहिक
नेतृत्वाची कास धरलेली होती, त्या नेतृत्वात एकी फार काळ टिकू शकली नाही. तसेच चळवळीतील नेतृत्वाने
समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाकडे लक्ष
देण्याऐवजी राजकीय क्षेत्रात सत्ता मिळविण्याला जास्त प्राधान्य मिळाले. चळवळीतील
नेत्यांच्या नेतृत्वाची सत्ताकांक्षीपणा आणि निवडणुकांच्या राजकारणाला दिलेल्या
महत्त्वामुळे चळवळीत गटबाजी, सत्तास्पर्धा, फाटाफूट, अंतर्गत संघर्ष, आरोप-प्रत्यारोप
हे प्रकार घडू लागले. चळवळीतील नेत्यांतील आपआपसांतील हेव्यादाव्यांमुळे अनेक गट
निर्माण केले. या गटांनी विविध राजकीय पक्षांना पाठिंबा दिल्यामुळे समाजातील ऐक्य
संपुष्टात आलेले दिसते. दलित चळवळीला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही.
या चळवळीच्या सुरुवातीला बाबासाहेबांच्या प्रभावाने सर्व जाती धर्मातील लोकांनी
सहभाग घेतला. पाठिंबा दिला. मात्र, नंतरच्या काळात
नवबौद्धाकडेच चळवळीचे नेतृत्व आले. इतर समाजाला चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी
फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे ही चळवळ विशिष्ट समाजापुरती मर्यादित राहिली.
दलितेतर, आदिवासी आणि इतर वंचित घटकांना चळवळीत समाविष्ट न
केल्याने ही चळवळ विशिष्ट समाजापुरती मर्यादित राहिली. त्यातील फाटाफुटीमुळे
समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळवू शकली नाही. चळवळीच्या वैचारिक पायातही
संदिग्धता होती. आंबेडकरवाद की मार्क्सवाद यावरून चळवळीच्या संदिग्धता कमी न
झाल्यामुळे चळवळीत अनेक गट निर्माण झालेले दिसतात. चळवळीची उभारणी भक्कम वैचारिक
पायावर करण्याऐवजी आरक्षण, नामांतर इत्यादींवर जास्त भर
देण्यात आला. समाजपरिवर्तनाच्या लढ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चळवळ दिशाहीन झालेली
दिसते. चळवळीत भावनिक प्रश्नावर सातत्याने समाज ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न
झाला. भावनिक ऐक्याचे संस्थात्मक ऐक्यात रूपांतर करण्यात आलेल्या अपयशामुळे
दीर्घकालीन कार्यकर्ते मिळाले नाहीत. भावनिक प्रश्न निर्माण झाल्यावर समाज संघटित
होत असे, हा प्रश्न निवळल्यावर समाजातील ऐक्य दुभंगत असे,
हे चित्र वारंवार पाहायला मिळते. दलित चळवळीचे मूल्यमापन करताना
अर्जुन डांगळे म्हणतात की, बौद्ध किंवा रिपब्लिकन चळवळीचा
कॅनव्हॉस अत्यंत सीमित असा आहे. एखादा भावनिक किंवा सवलतीसारखा प्रश्न घेऊन त्यावर
मोर्चा काढणे किंवा सभा भरविणे असे चळवळीचे स्वरूप आहे. त्यामुळे दलित समाज एका
सूत्रात बांधला जात नाही. दलित समाजाच्या जीवनाशी निगडित आणि मूलभूत प्रश्नांवर
जेव्हा संघर्ष उभारला जातो तेव्हा या दऱ्या कोसळतात." दलित चळवळीने मर्यादित
प्रमाणावर भर दिला. | चळवळीला निष्ठावान कार्यकर्ते न
मिळाल्याने चळवळीला अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही. दलित चळवळीचे दोष
पुढीलप्रमाणे होत
१) दलित चळवळीची सर्वांत महत्त्वाची मर्यादा म्हणजे
सत्तेच्या अंगाने केलेली संघटनेची उभारणी होय. आंबेडकरांच्या निधनानंतर उदयाला
आलेल्या सर्व दलित संघटना राजकारणामुळे फुटल्या. सत्ता मिळविण्यासाठी त्यात असलेली
गटबाजी, सत्तास्पर्धा, वैयक्तिक अहंकार यामुळे दलित संघटनांमुळे अनेकदा फाटाफूट झाली. या
फाटाफुटीमुळे समाजाचे ऐक्य भंगले.
२) दलित चळवळीतील सर्वांत महत्त्वाचा दोष म्हणजे दलित नेते
व कार्यकर्ते यातील मतभेद, गटबाजी, सत्ताकांक्षी वृत्ती, वैचारिक
दिवाळखोरीतून चळवळीत विविध गट, उपगट निर्माण झाल्यामुळे
संघटितपणे लढा देण्याची शक्तीही चळवळी गमावून बसल्यामुळे ही चळवळ कमकुवत ठरली.
३) बाबासाहेबांच्या निधनानंतर समर्थ नेतृत्व दलित चळवळीला न
मिळाल्यामुळे सामूहिक नेतृत्व चळवळीने स्वीकारले परंतु हा सामूहिक नेतृत्वाचा
प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. चळवळीतील नेता स्वतःला स्वायत्त मानू लागल्यामुळे
चळवळीला तडे गेले.
४) दलित चळवळीत कुशल संघटन, प्रभावी कार्यक्रम, भक्कम संघटनेच्या
अभावातून ही चळवळ गतिहीन बनलेली आहे.
५) जनतेच्या
जिव्हाळ्याच्या आणि मूलभूत प्रश्नावर चळवळ संघटित करण्याचा फारसा प्रयत्न
दादासाहेब गायकवाड वगळता आंबेडकरी चळवळीतील इतर नेत्यांनी न केल्यामुळे समाजाचा
पाठिंबा रोडावला.
६) दलित चळवळीने विधायक कार्याऐवजी राजकीय सत्तेला
प्राधान्य दिल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा गमावून बसलेली दिसते.
७) आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी अहंभाव जपला. आपल्या
अहंकाराला कुरवाळत राहिले. दलितोद्धाराच्या कार्याला वाहून घेण्याऐवजी अहंकार
जपण्यासाठी आपला वेगळा लहानसा गट घेऊन वावरत राहिले.
८) दलित चळवळीने भक्कम वैचारिक चौकट विकसित करण्याऐवजी
भावनिक व तत्कालीन मुद्दावर भर दिल्यामुळे केलेल्या चळवळींना अल्प यश प्राप्त
झाले. चळवळीला ध्येयवादी कार्यकर्ते मिळाले नाहीत.
९) दलित चळवळीने निवडणूक क्षेत्रात आपला हिस्सा वाढविण्यावर
भर दिला. त्यासाठी दलित नेत्यांनी कोणत्या ना कोणत्या पक्षाबरोबर झटपट युती
करण्याचा प्रयत्न केला. दलितांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न उचलून त्यावर आंदोलन
करण्याचा प्रयत्न केला नाही. जात वर्गातील संबंधांची गुंतागुंत आणि जातीचे
सद्य:स्थितीतील स्थान या समस्यांच्या मूळापर्यंत जाऊ न शकल्यामुळे चळवळीचा प्रभाव
कमी झाला.
१०) दलित चळवळीने इतर पददलित वर्गाला सामावून घेण्याऐवजी
एकाच जातीच्या आधारावर चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे इतर समाज घटकांचा
पाठिंबा चळवळीला मिळू शकला नाही.
महाराष्ट्राच्या इतिहासातील परिवर्तनकारी चळवळ आज अपशयाच्या
गर्तेत गेलेली आहे. दलितांवरील अन्याय-अत्याचार कमी झालेले नसताना चळवळीचा हास
होणे समाजाच्या दृष्टीने क्लेशदायक आहे. समाजाच्या अनेक प्रश्नांचे निराकरण
अद्यापपर्यंत झालेले नाही. समाजाचे आत्मभान निर्माण करणारी चळवळ नष्ट झाली की समाज
सैरभैर होईल. जागतिकीकरणाच्या तडाख्यात बहुसंख्य चळवळी नामशेष होत असताना दलित
चळवळींचा प्रभाव ओसरणे ही धोकादायक सूचना आहे. नव आंबेडकरवादी नेतृत्वाने
एकविसाव्या शतकाची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने पोथिनिष्ठ कर्मठता, टोकाची अस्मिता व अहंकाराचा त्याग करून एका
प्रवाहात आल्याशिवाय चळवळीला सुवर्णकाळ येणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.