https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

महात्मा फुलेंचे कार्य व योगदान


  

महात्मा फुलेंचे कार्य व योगदान

महात्मा फुले हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते. महात्मा फुले महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा क्रांतीचे आद्य प्रवर्तक मानले जातात. दलित-शोषित मुक्तीचे उद्दिष्ट ठेवून देशात जनआंदोलन चालविणारे फुले हे पहिले समाजसुधारक होते. त्यांच्या चळवळीतून दलित व शोषित वर्गांमध्ये आत्मभान निर्माण झाले. या आत्मभानामुळे शोषित वर्गामध्ये संघर्ष करणारी नेतृत्वाची नवी पिढी निर्माण झाली. सामाजिक चळवळीचे देशी तत्त्वज्ञान फुले यांनी विकसित केले, त्यांच्या चळवळींमुळे वंचितांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले गेले. महात्मा फुलेंचा जन्म २० फेब्रुवारी १८२७ रोजी पुणे येथे झाला. लहानपणीच आई चिमणाबाईचे निधन झाल्यामुळे त्यांचा सांभाळ दाईने केला. वडील गोंविदराव प्रतिष्ठित व व्यावसायिक गृहस्थ होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा सावित्रीबाईशी विवाह झाला. शिक्षण घेत असताना आलेल्या विषमतापूर्ण वागणुकीच्या अनुभवातून सामाजिक कार्याला प्रेरणा मिळाली. तत्कालीन समाजव्यवस्थेत अनिष्ट रूढी, कर्मकांड, परंपरा आणि प्रथांचे स्तोम माजले होते. शूद्रांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत होते. स्त्रियांची स्थिती शूद्रांपेक्षाही वाईट होती. त्यांना समाजात दुय्यम स्थान होते. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी 'दिनबंधू' मासिकातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर 'शेतकऱ्यांचा आसूड', 'गुलामगिरी', 'अस्पृश्याची कैफियत', 'शिवाजींचा पोवाडा', 'इशारा', 'तृतीय रत्न' आणि 'सार्वजनिक सत्यधर्म' इ. ग्रंथांचे लेखन केले. 'अखंड' नावाने काही अभंगांची रचना केली. जोतिबा फुले यांनी ग्रंथ लेखनाच्या माध्यमातून बहुजन समाजाची मानसिक गुलामगिरीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य समता आणि बंधुता मूल्यांवर नव समाजाची उभारणी करावयाची असेल तर समाजाच बौद्धिक मशागत करणे आवश्यक होते. शोषणाच्या मागील मानसिक, सांस्कृतिआणि आर्थिक कारणे समजून घेतल्याशिवाय त्यांचे स्वरूप लक्षात येणार नाही आणि त्यांचे निराकरणदेखील करता येणार नाही या व्यापक उद्देशाने त्यांनी लेखन केले. लेखनासोबत समाजव्यवस्थेला निश्चित दिशा प्राप्त करून देण्यासाठी कार्यक्रमात्मक व्यूहरचना करणे आवश्यक असते या जाणिवेतून कृतिकार्यक्रमाचा एक भाग म्हणून १९४८ साली पुण्यातील बुधवारपेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा काढली. आपल्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला करून सामाजिक क्रांतीचा संदेश स्वत:च्या उदाहरणापासून दिला. १९५१ साली सर्व जातींच्या मुलांसाठी आणि अस्पृश्य जातीतील मुलांसाठी पुण्यातील नाना पेठेत शाळा काढली. मागासलेल्या जातींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली. केशवपनाची रूढी बंद करण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. कुमारी माता व विधवा मातांचा प्रश्न सोडविण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. १८६० साली पहिला पुनर्विवाह घडवून आणला. फुलेंनी सुरू केलेल्या कार्याला त्यांची पत्नी सावित्रीबाई फुलेंची मोलाची साथ मिळाली. मुलींच्या शाळेसाठी शिक्षिका मिळत नसल्याने फुलेंनी सावित्रीबाईंना स्वतः शिकविले आणि शिक्षिका बनविले.

 महात्मा फुले यांनी समता, मानवता, विनयता, विवेक आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी आपले सारे आयुष्य वेचले. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान मानवी प्रतिष्ठा, मानवी हक्क, धार्मिक सहिष्णुता, मानवी स्वातंत्र्याचा संदेश देणारे आहे. ओपल्या समाज सुधारणेच्या कार्यास संघटनेची जोड देण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ला पुणे या ठिकाणी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्थापनेच्या वेळेस फक्त ६० सदस्य होते. अल्पकाळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ पोहचली. अनेक कार्यकर्ते या चळवळीला येऊन मिळाले. समाजातील स्त्रिया, पददलित आणि शेतकऱ्यांन न्याय व हक्कांची जाणीव करून दिलेली दिसते. वंचित वर्गाला सामाजिक न्या मिळवून देण्यासाठी महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनी आयुष्य प्रयत्न केलेले आढळतात. फुलेंच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अने समाजसुधारक निर्माण झालेले होते. अशा महामानवाचे २८ नोव्हेंबर १८९०  रोजी निधन झाले. 

    ब्राह्मण्यवादाला विरोध हा फुल्यांचा विचार व कार्यातील महत्त्वपूर्ण असला तरी स्त्रीशूद्रातिशूद्रांचे संघटन हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. शूद्र आणि संघटनांच्या माध्यमातून वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था नेस्तनाबूत करण्याचे स्वप्न पाहिले. महात्मा फुल्यांचे विचार विशिष्ट प्रकारच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतून विकसित झालेले असल्यामुळे त्यांच्यावर काळाच्या काही मर्यादा पडलेल्या दिसतात. त्यांनी शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करताना शिक्षणावर अनाठायी विश्वास दाखविलेला दिसतो, आर्थिक विषमतेचा विचार करताना एतदेशीयांनी आणि सांस्कृतिक गटांनी केलेल्या शोषणाचे दाहक स्वरूप मांडलेले असले तरी परकीय ब्रिटिश राजवटीने केलेल्या शोषणाकडे दुर्लक्ष केलेले दिसते. न्याय आणि समता या तत्त्वात ते सूक्ष्म फरक करू शकले नाहीत. धार्मिक व सामाजिक शोषणाप्रमाणे आर्थिक शोषणाचा सखोल विचार त्यांनी केला नाही. त्यांच्या विचारात काही मर्यादा दिसत असल्या तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वयंप्रेरणेने व स्व-प्रयत्नांनी घडविलेले होते. त्यांचा पिंड कृतिशील कार्यकर्त्यांच्या होता. त्यांनी सामाजिक जीवनाचा अन्वयार्थ त्यांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेला असल्याने त्यात काही त्रुटी दिसत असल्या तरी त्यांच्या विचारात नवी परिस्थिती जन्माला घालण्याचे अलौकिक सामर्थ्य होते; म्हणूनच त्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून गौरविले गेले. १९ व्या शतकात जन्माला आलेल्या थोर महापुरुषांमध्ये ते कर्तव्याच्या दृष्टीने एकमेव समाज क्रांतिकारक होते. आमूलाग्र त्यांचा समाजसुधारकी मार्ग उदारमतवादी आणि समकालीन समाजसुधारकांपेक्षा भिन्न होता. तो सामाजिक बंडखोरीच्या जवळ जाणारा होता. त्यांना समाजव्यवस्थेत परिवर्तनाची आस असल्याने वरवरचे बदल नको होते. त्यांच्या या कार्यामुळे 'महात्मा' पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आजच्या काळात जोतिबांच्या विचारांचे सामर्थ्य व्यक्त करताना डॉ. भालबा विभूते 'महात्मा फुले विचारधन' ग्रंथात लिहितात, “आजच्या संदर्भात जोतीरावांचे विचार स्वीकारायचे असतील तर जो जो समाजाचे शोषण करतो त्यास विरोध करावा लागेल. त्यात फक्त ब्राह्मण जातीचे लोक नसून बहुजनांत निर्माण झालेला नव ब्राह्मणांचा वर्गही येतो. त्या विरोधात प्रभावी मोहीम उघडावी लागेल कारण त्यांनी सुरू केलेला संघर्ष विशिष्ट व्यक्तिविरोधी नसून प्रवृत्तीविरोधी आहे." यातून जोतिबांच्या विचार व कार्याची भविष्याकडे पाहण्याच्या वृत्तीची आणि सद्यःस्थितीतील उपयोगिता लक्षात येते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.