https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

भारतीय पोलीस प्रशासन अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये


 

भारतीय पोलीस प्रशासन अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये

पोलीस संकल्पना - पोलीस हा शब्द ग्रीक वाङ्मयातून आलेला आहे.. 'पोलीकस' या ग्रीक शब्दापासून पोलीस शब्द बनलेला आहे. त्याचा अर्थ कायदा अंमलात आणून शांतता प्रस्थापित करणे होय. ग्रीक काळात पोलीस शब्दाचा संबंध शहर वा नगराच्या संरक्षणापुरता मर्यादित होता. आधुनिक काळात मुलकी व्यवस्थेसाठी पोलीस हा शब्द फ्रेंच भाषेत वापरला जाऊ लागला. युरोपिअन देशात नगरपालिका आणि स्थानिक संस्थांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या यंत्रणेसाठी 'पोलीस' हा शब्द वापरला जाऊ लागला. शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे कार्य पोलीस यंत्रणेला करावे लागते. पोलीस म्हणजे जनकल्याणासाठी कार्य करणारी समाजातील एक शक्ती असून त्याद्वारे संपत्ती आणि स्वातंत्र्याचे संरक्षण केले जाते. ऑफक्सर्ड डिक्शनरी नुसार 'पोलीस म्हणजे अशी एक कार्यपद्धती की ज्याद्वारे कायद्याचे संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य केले जाते.' १९२९ साली रॉयल कमिशनने पोलिसांच्या अधिकाराबाबत मत व्यक्त केले आहे की, "पोलीस म्हणजे अशी एक व्यक्ती की जी कर्तव्य म्हणून कार्य करते परंतु जे कार्य वास्तविक स्वतःच्या मनानेच त्या व्यक्तीने एरवी माणूस म्हणून केले असते."

पोलीस प्रशासनाची वैशिष्ट्ये - भारतीय राज्यघटनेने कायदा व सुव्यवस्था विषयाचा समावेश राज्यसूची केलेला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठी पोलीस यंत्रणेची निर्मिती प्रत्येक घटकराज्यात केलेली आहे. पोलीस प्रशासन राज्याच्या अधिकार क्षेत्रात मोडणारा विषय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जनसमूहाला ताब्यात ठेवणे हे पोलीस यंत्रणेचे कर्तव्य होते. परंतु, स्वातंत्र्यानंतर पोलिसांच्या भूमिकेत व्यापक बदल झाला. राज्याच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली. राज्याच्या सुरक्षेला अनुसरून प्रत्येक राज्याने आपल्या पोलीस संरचनेत बदल केलेले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे अत्यंत कठीण कार्य पोलीस यंत्रणेला पार पाडावे लागते. बदलत्या समाजरचनेत गुन्हेगारीचे स्वरूपदेखील बदलत आहे. पोलीस यंत्रणेलादेखील काळानुरूप आपल्या तंत्रात बदल करावा लागत आहे. कालबाह्य कायदे, निधीची कमतरता, राजकीय हस्तक्षेप, संसाधनांची कमतरता, मनुष्यबळाची कमतरता, समन्वयाचा अभाव, गुन्हे सिद्ध होण्याचे कमी प्रमाण, किचकट न्यायव्यवस्था इत्यादी अनेक समस्या पोलीस दलाला भेडसावत आहेत. या समस्यांवर मात करून काम करणे हे पोलीस दलासमोरील फार मोठे आव्हान आहे. पोलीस दलाचा अभ्यास केल्यानंतर दलाची पुढील वैशिष्ट्ये नमूद करता येतात

१) प्राचीन काळापासून पोलीस प्रशासनाचे अस्तित्व आढळून येते.

२) राज्यात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असते.

३) शांतता, सुव्यवस्था, न्याय प्रस्थापित करण्यासाठी पोलीस यंत्रणेची आवश्यकता आहे.

४) पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेमुळे गुन्हेगारीस आळा बसतो.

५) पोलिसांकडे असलेल्या दंडशक्तीमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होतो आणि ते वाईट कृत्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात.

६) पोलीस यंत्रणेच्या विघातक आणि विधायक या दोन्ही बाजूंची चर्चा समाजात होते. या चर्चेतून यंत्रणेविषयीचे लोकमत तयार होते.

७) जनतेचे अपेक्षित सहकार्य नसल्यामुळे पोलीस यंत्रणेला अनेकदा अपशयाला सामोरे जावे लागते.

८) आधुनिक काळात मानवी अधिकार, महिला सबलीकरण आणि विविध नवीन नवीन संकल्पनांमुळे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आणखी वाढली आहे.

९) पोलीस यंत्रणेच्या अस्तित्वामुळे नागरिकांना शांततेने जीवन जगता येते.

१०) पोलीस यंत्रणेमुळे समाजाचा अराजकतेपासून बचाव होत असतो.

११) पोलिसांच्या खराब प्रतिमेमुळे नागरिक यंत्रणेपासून अंतर ठेवून राहतात.

१२) मुंबई पोलीस कायदा १९५१ नुसार पोलीस यंत्रणेचे नियमन केले जाते.

१३) पोलीस हा राज्यसूचीतील विषय असून राज्याच्या गृहमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली पोलीस विभागाचे कार्य चालते.

१४) पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस खात्याचे सर्वोच्च पद असून ते पदोन्नतीने प्राप्त होते.

१५) प्रशासनाच्या सोयीसाठी पोलीस परिक्षेत्रे आणि पोलीस आयुक्तालय यात पोलीस प्रशासनाचे विभाजन केलेले आहे. राज्यातील, शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली आहे. १६) गावपातळीवर पोलीस यंत्रणेस पोलीस पाटील साहाय्य करतो.

पोलीस प्रशासनाची वैशिष्ट्ये लक्षात घेता असे दिसून येते की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन हे अत्यंत महत्त्वपूर्ण अभिकरण आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.